Self-portrait by The Mother

श्रीमाताजींनी काढलेले स्वत:चे चित्र (श्रीमाताजींच्या भौतिक जीवनाविषयी माहीत करून घेण्यापूर्वी त्यांचे खालील विधान ध्यानात घेणे आवश्यक आहे. त्या म्हणतात, “या देहाच्या भौतिक तपशीलाविषयी प्रश्न विचारू नका, त्या दृष्टीने ते महत्त्वाचे नाहीत आणि त्यावर लक्षही केंद्रित करता कामा नये. सबंध आयुष्यभर, कळत वा नकळत, भगवंताला मी जसे व्हावे असे वाटत होते तशी मी होत आलेली आहे. मी जे करावे अशी त्याची इच्छा होती ते मी केलेले आहे आणि तेच केवळ महत्त्वाचे आहे.” )

*

श्रीमाताजींचा जन्म फ्रान्समध्ये पॅरिस येथे दि. २१ फ्रेबुवारी १८७८ रोजी झाला. श्रीमती मॅथिल्ड इस्मलालून आणि बँकर मॉरिस अल्फासा या आईवडिलांच्या पोटी श्रीमाताजींचा जन्म झाला. त्यांचे नाव ‘मीरा’ असे ठेवण्यात आले. मीरेच्या जन्माच्या वर्षभर आधी मॉरिस आणि कुटुंबीय इजिप्तमधून फ्रान्सला आले होते.

त्यांचे प्राथमिक शिक्षण हे घरीच झाले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांना आपल्या कार्याची जाणीव होती. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी एकत्व पावणे शक्य झाले होते. पुढे श्रीमद्भगवद्गीता आणि स्वामी विवेकानंदांचे राजयोग या पुस्तकांमधून त्यांना मार्गदर्शन मिळाले.

इ.स.१८९३ मध्ये त्यांनी आर्ट स्टुडिओमध्ये जायला सुरूवात केली. तेथे त्यांनी चित्रकलेचे प्रगत अध्ययन केले. त्या एक प्रतिभावंत चित्रकार म्हणून गणल्या जात होत्याच. तसेच त्या उत्तम पियानो-वादक होत्या; त्या लेखनही करत असत.

त्यांच्या आध्यात्मिक आयुष्याविषयी सांगावयाचे झाले तर, त्यांच्याच शब्दांच्या आधारे असे म्हणता येईल की, ” वयवर्षे ११ ते १३ च्या दरम्यान त्यांना आलेल्या आंतरात्मिक आणि आध्यात्मिक अनुभवाच्या आधारे त्यांना ईश्वराचे अस्तित्व उघड झाले; एवढेच नव्हे, तर मनुष्य त्या ईश्वराशी एकात्म पावू शकतो हेही त्यांना ज्ञात झाले, मनुष्य त्याच्या कृतीद्वारे आणि त्याच्या जाणिवेद्वारे समग्रतया त्या ईश्वराशी एकरूप होऊन, दिव्य जीवनाद्वारे त्याचे आविष्करण करू शकतो हे त्यांना त्या अनुभवांमधून समजून आले.”

Max Theon

मॅक्स थिऑन

इ.स. १९०५ च्या सुमारास मीरा गूढवादाचा अभ्यास करण्यासाठी अल्जेरियामध्ये पोलिश गूढविद्याशास्त्रज्ञ मॅक्स थिऑन यांच्याकडे गेल्या. मॅक्स थिऑन आणि त्यांच्या पत्नीचा गूढशास्त्राचा दांडगा अभ्यास होता. इ.स.१९०६ मध्ये पॅरिसला परतल्यावर मीरा अल्फासा यांनी अध्यात्मसाधकांचा एक छोटा गट स्थापन केला. इ. स. १९११ ते १९१३ या दरम्यान पॅरिसमधील विविध समूहांसमोर त्यांनी व्याख्याने दिली. त्यांच्या वयाच्या छत्तीसाव्या वर्षी (मीरा अल्फासा) श्रीमाताजी आपले पती मि. पॉल रिचर्ड्स यांच्यासमवेत पाँडिचेरीला आल्या.

Sri Aurobindo

श्रीअरविंद

दि. २९ मार्च १९१४ रोजी श्रीमाताजी व श्रीअरविंद यांची प्रथम भेट झाली. अनेक वर्षे आंतरिक रित्या श्रीमाताजींना ज्यांचे आध्यात्मिक बाबतीत मार्गदर्शन मिळत होते ते मार्गदर्शक श्रीअरविंदच आहेत, हे श्रीमाताजींनी पहिल्याच भेटीत ओळखले. आणि आपले उर्वरित सर्व कार्य हे श्रीअरविंदांबरोबरच होणार आहे हे ही त्यांनी ओळखले. संपूर्ण समर्पित झालेल्या श्रीमाताजींविषयी श्रीअरविंद म्हणाले, ” I have never seen anywhere a self-surrender so absolute and unreserved. ”

श्रीमाताजी, त्यांचे पती व श्रीअरविंद हे तिघे मिळून त्या काळात आर्य हे मासिक चालवीत असत. अकरा महिने भारतात राहिल्यानंतर, पहिले महायुद्ध सुरू झाल्याकारणाने त्यांना फ्रान्सला परतावेच लागले. एक वर्षभर फ्रान्समध्ये राहिल्यानंतर पुढील चार वर्षे त्या जपान मध्ये राहिल्या.

दि. २४ एप्रिल १९२० रोजी त्या पाँडिचेरीला परतल्या आणि त्यांनी श्रीअरविंदांसमवेतच्या त्यांच्या कार्याला सुरुवात केली. उरलेले संपूर्ण आयुष्य त्यांनी पाँडिचेरी येथेच व्यतीत केले.

श्रीमाताजी जेव्हा श्रीअरविंदांसमवेत कार्य करण्यासाठी आल्या तेव्हा श्रीअरविंदांभोवती अगोदरच काही शिष्यगण तयार झाला होता. श्रीमाताजींच्या आगमनानंतर शिष्यवर्गाची संख्या वाढतच गेली. कालांतराने या समूहाचे आश्रमामध्ये रूपांतर झाले.

दि. २४ नोव्हेंबर १९२६ च्या अधिमानसाच्या अवतरणानंतर (Descent of Overmind) श्रीअरविंदांना अधिक उच्चतर साधनेसाठी एकांतवासात जाणे भाग पडले आणि त्यावेळी त्यांनी आश्रमाची, भौतिक आणि आध्यात्मिक सर्व जबाबदारी श्रीमाताजींवर सोपविली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, आश्रमाचा चहू अंगांनी विस्तार झाला आहे.

The Mother

श्रीमाताजी

दि.२४ एप्रिल १९५६ रोजी ध्यानानंतर श्रीमाताजींनी ‘अतिमानसाचे आविष्करण (Supramental Manifestation) ही आता एक प्रत्यक्ष वस्तुस्थिती बनली आहे,’ असे कथन केले. श्रीमाताजींच्या मार्गदर्शनाने ‘श्रीअरविंद इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ ची इ.स.१९५१ मध्ये तर ‘ऑरोविल’ या आंतरराष्ट्रीय नगरीची स्थापना इ.स.१९६८ मध्ये करण्यात आली.

दि. १७ नोव्हेंबर १९७३ रोजी, वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी श्रीमाताजींनी त्यांचा देह ठेवला.

**

अधिक माहितीसाठी पाहा : मराठी विकिपीडियावरील मीरा अल्फासा यांच्यावरील नोंद