Tag Archive for: ईश्वरी कृपा

तुम्ही जर अगदी तळमळीने ईश्वराला म्हणाल, “मला फक्त तूच हवा आहेस”, तर ईश्वर अशी परिस्थिती घडवून आणेल की तुम्हाला प्रामाणिक होणे भागच पडेल. तुमच्या अस्तित्वातील कोणतातरी एखादा भाग जेव्हा म्हणतो की, ‘हे ईश्वरा, मला फक्त तूच हवा आहेस.‌’ अशा वेळी तुमच्या त्या अभीप्सेमुळे काय होते? तर, तो तुम्हाला त्याचे अस्तित्व कळू देणार नाही, तो तुम्हाला दिसणारसुद्धा नाही, पण तो येईल. तुम्हाला त्याची पुसटशी चाहूलदेखील लागणार नाही पण तो सर्व परिस्थितीची अशा रितीने रचना करेल की, तुम्ही पूर्णपणे ईश्वराचे होण्यामध्ये ज्या गोष्टी अडथळा निर्माण करत होत्या त्या गोष्टी अगदी अपरिहार्यपणे तो तुमच्या मार्गामधून काढून टाकेल.

पण मग अशा रितीने तुमच्यापासून सर्व गोष्टी बाजूला केल्या गेल्यामुळे, तुम्ही आक्रोश करू लागता, तक्रार करू लागता. पण नंतर, तुम्ही खरोखरच प्रामाणिक असाल आणि स्वतःच्या नजरेला नजर देऊन, जर थेटपणे स्वतःकडे पाहिलेत तर तुमच्या लक्षात येईल की, तुम्हीच कधी काळी ईश्वराला म्हटले होते, ‘मला फक्त तूच हवा आहेस.‌’ आता तो तुमच्या सन्निध असेल पण बाकी सारे नाहीसे झालेले असेल. ही खरोखरच एक उच्चतर ईश्वरी कृपा असते. अट एकच असते, तुम्ही ते तसे अगदी खात्रीने, विश्वासाने मागितले पाहिजे.

तुम्ही ते अगदी समग्रपणे म्हटले पाहिजे असेही मी म्हणत नाहीये. कारण जर एखादी व्यक्ती खरोखरच अशा रितीने समग्रपणे ‘मला फक्त ईश्वरच हवा आहे,’ असे म्हणेल तर तिचा सर्व कार्यभागच पूर्ण झालेला असतो. आवश्यकता असते ती तुमच्या अस्तित्वाच्या एखाद्या भागाने, खरंतर, तुमच्या केंद्रवर्ती संकल्पाने, ‘मला फक्त ईश्वरच हवा,’ असे अगदी खात्रीने म्हणण्याची! व्यक्तीने एकदा जरी असे प्रामाणिकपणे म्हटले असेल तर ते तेवढे पुरेसे असते. अर्थात या सर्व गोष्टींना कमी अधिक कालावधी लागतो. कधीकधी तर त्याला अनेक वर्षं लागतात पण व्यक्ती ध्येयापर्यंत जाऊन पोहोचतेच.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176–177)

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला निश्चितच एक महत्त्व असते; पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान माणसं ज्यांना अगदीच नगण्य समजतात अशा अनेक व्यक्तींना ईश्वरी कृपे‌मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना किंवा फारशी मानसिक शक्ती नसताना किंवा कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नसताना किंवा त्यांच्या व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांना एकाएकी किंवा अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते आणि त्यांनी अभीप्सा बाळगली होती.

ही आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांचा एवढा ऊहापोह का केला जातो, किंवा इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

‘सामर्थ्य’, जर ते आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती ‘प्रामाणिकपणा’मध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती त्या सगळ्यातून पार होतेच, हे मी आजवर अनेकदा सांगितले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)

 

साधक : मला अगदी प्रामाणिकपणे असे वाटते की, मला दुसरेतिसरे काही नकोय, फक्त ईश्वरच हवा आहे. पण मी जेव्हा इतरांच्या संपर्कात येतो किंवा साध्या किरकोळ गोष्टी करण्यामध्ये मी गुंतलेला असतो, तेव्हा साहजिकच मला माझ्या ध्येयाची म्हणजे ईश्वराची आठवण राहत नाही. हा ‘अप्रामाणिकपणा‌’ आहे का?

श्रीमाताजी : होय. हा अप्रामाणिकपणा आहे. ज्यावेळी व्यक्तीच्या एका घटकाला ईश्वर हवा असतो आणि दुसऱ्या घटकाला मात्र निराळेच काहीतरी हवे असते त्यावेळी तो त्या व्यक्तीचा अप्रामाणिकपणाच असतो. अज्ञान आणि मूढता यांमुळे व्यक्ती अप्रामाणिक बनते. परंतु इच्छाशक्ती दृढ असेल आणि ईश्वरी कृपेवर संपूर्ण विश्वास असेल तर, हा अप्रामाणिकपणा नाहीसा करता येतो.

– श्रीमाताजी (CWM 14 : 68)

 

साधक : अहंभावात्मक व अज्ञानी शक्ती आणि श्रीमाताजींची दिव्य शक्ती यामध्ये एखाद्या साधकाला जर पूर्णतः फरक करता येत नसेल आणि तो कनिष्ठ शक्तींना नकार देऊ शकत नसेल, तर त्या साधकाची अवस्था कशी होईल? त्या साधकाने योगमार्गाचा अवलंब करण्यासाठी कोणते पाऊल उचलले पाहिजे?

श्रीअरविंद : कोणतीही व्यक्ती अगदी सुरुवातीलाच दिव्य शक्ती आणि अदिव्य व कनिष्ठ शक्तींमध्ये पूर्णपणे फरक करू शकत नाही किंवा त्या कनिष्ठ शक्तींना लगेचच पूर्णपणे नकारही देऊ शकत नाही. त्यामध्ये पूर्ण यश येईपर्यंत त्या व्यक्तीने प्रामाणिकपणाने प्रयत्न करत राहणे, ही गोष्ट अनिवार्य असते. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या अंगी संपूर्ण प्रामाणिकपणा असतो तोपर्यंत ईश्वरी कृपा निश्चितपणे व्यक्तीसोबत असते आणि ती कृपा त्या व्यक्तीला योगमार्गावर प्रत्येक क्षणी साहाय्य करत असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 225)

 

ईश्वरी कृपा आणि संरक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते. तुम्ही आंतरिक किंवा बाह्य अशा कोणत्याही अडचणीत किंवा संकटात सापडलेला असलात तरी त्यांना शिरजोर होऊ देऊ नका आणि अशी वेळ येईल तेव्हा, संरक्षण करणाऱ्या दिव्य शक्ती‌चा आश्रय घ्या. तुम्ही नेहमीच असे श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे करत राहाल तर, पृष्ठभागावर दिसणाऱ्या सर्व प्रकारच्या खळबळीमध्ये, गोंधळामध्येसुद्धा जे नेहमीच स्थिर आणि शांतिपूर्ण असते, असे तुमच्या अंतरंगातील काहीतरी खुले होत आहे, असे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 724-725)

 

(तुम्हाला सत्याची आस असेल तर तुम्हाला सत्य गवसतेच, असे श्रीमाताजी सांगत आहेत. पण त्यासाठी तुम्ही, तुमच्या इच्छाआकांक्षामुळे स्वत:च्या त्रुटींकडे डोळेझाक करता कामा नये किंवा त्यांचे समर्थन करता कामा नये, हेदेखील त्या सांगत आहेत.)

तुमच्यामध्ये जेव्हा प्रामाणिकपणा असतो तेव्हा, तुम्हाला प्रतिसाद देण्यासाठी ईश्वरी कृपा सज्ज असते; तेव्हा तुम्हाला ईश्वरी साहाय्य, मार्गदर्शन लाभतेच हे तुमच्या लक्षात येईल. मग पुढे फार काळ तुमच्याकडून चुका घडत नाहीत.

प्रगतीसाठीच्या तळमळीमध्ये असणारा प्रामाणिकपणा व सत्यशोधनाबाबतच्या संकल्पामध्ये असणारा प्रामाणिकपणा आणि (ज्याला आध्यात्मिकदृष्ट्या विशुद्ध मानले जाते अशा) विशुद्ध असण्याच्या आवश्यकतेमध्ये असणारा प्रामाणिकपणा – हा प्रामाणिकपणा हीच सर्व प्रकारच्या प्रगतीची गुरुकिल्ली असते.

– श्रीमाताजी (CWM 03 : 192)

(उत्तरार्ध)

तुम्ही ज्यावेळी एकाएकी आपसूकपणे ध्यानात शिरता तेव्हा ते इतके स्वाभाविक असते की ते टाळताच येत नाही, असे ध्यान हे सर्वोत्तम ध्यान असते. अशा वेळी तुम्हाला कोणता पर्यायच नसतो, एकाग्र होणे, ध्यान लागणे आणि वरकरणी दिसणाऱ्या रूपांच्या पलीकडे जाऊन पाहणे याशिवाय दुसरा कोणता पर्यायच तुमच्यापाशी नसतो. ध्यानामध्ये अशी तुमची पकड घेतली जाण्यासाठी तुम्ही अरण्यामध्ये एकांतवासात असणे गरजेचे नसते. जेव्हा तुमच्यातील काहीतरी सज्ज झालेले असते, जेव्हा ती वेळ आलेली असते, जेव्हा तुम्हाला खरी आस लागलेली असते आणि जेव्हा ईश्वरी कृपा तुमच्यासोबत असते, तेव्हा हे घडून येते.

मला वाटते की, मानवतेने प्रगतीचा काहीएक टप्पा गाठलेला आहे आणि त्यामुळे आता जीवनामध्ये राहूनच खरा विजय प्राप्त करून घेतला पाहिजे. बाह्य परिस्थिती कशीही असली तरीदेखील, त्या शाश्वत‌, अनंत अस्तित्वासोबत एकांतात कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. सर्व व्यवहारांमध्ये व्यग्र असतानादेखील, त्यांपासून मुक्त होऊन, त्या परमेश्वराला आपला सांगाती बनवून कसे राहायचे हे तुम्हाला समजले पाहिजे. हाच खरा विजय!

– श्रीमाताजी (CWM 03 : 276)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – २६

‘ईश्वरी कृपा’ आणि ‘ईश्वरी शक्ती’ (साधकाच्या बाबतीत) सर्व काही करू शकते, पण ते ती साधकाच्या पूर्ण सहमतीनेच (assent) करू शकते. अशी पूर्ण सहमती द्यायला शिकणे हाच साधनेचा समग्र अर्थ आहे. अशा सहमतीसाठी मनामधील कल्पना, प्राणामधील इच्छावासना किंवा शारीरिक चेतनेमधील जडत्वामुळे, तामसिकतेमुळे कदाचित वेळ लागेल परंतु, या गोष्टी दूर केल्याच पाहिजेत आणि ते शक्य असते. ईश्वरी शक्तीने कार्य करावे यासाठी तिला आवाहन केल्याने आणि ईश्वरी शक्तीच्या साहाय्याने त्या गोष्टी दूर करता येऊ शकतात.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 171)

नैराश्यापासून सुटका – २१

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

प्राणिक निराशेच्या कोणत्याही लहरीला तुमच्यामध्ये शिरकाव करू देऊ नका आणि खिन्न मनोदशेला तर अजिबातच थारा देऊ नका. बाह्य व्यक्तिमत्त्वाबाबत बोलायचे झाले तर, केवळ तुमच्यामध्येच नव्हे, तर प्रत्येकामध्येच, हाताळण्यास अतिशय अवघड असा एक पशु नेहमी दडलेला असतो. त्याला धीराने आणि शांत व प्रसन्न चिकाटीनेच हाताळले पाहिजे. त्याच्या प्रतिकाराने कधीच निराश होऊ नका, कारण त्यामुळे तो हळवा व उद्विग्न होतो आणि हाताळायला अधिकच अवघड होऊन बसतो; अन्यथा तो हतोत्साहित होतो. (तेव्हा निराश न होता) त्याला स्वच्छ सूर्यप्रकाशाचा दिलासा द्या, त्याच्यावर तुमच्या अविचलतेचे दडपण येईल असे पाहा आणि मग एक दिवस तो ‘ईश्वरी कृपे‌’प्रत पूर्णपणे खुला झाला असल्याचे तुम्हाला आढळून येईल.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 187)

नैराश्यापासून सुटका – ०६

आध्यात्मिक साक्षात्कारामध्ये सामर्थ्याला (strength) निश्चितच एक मूल्य असते, पण आध्यात्मिक साक्षात्कार हा केवळ सामर्थ्यामुळेच होऊ शकतो आणि तो अन्य कोणत्याच मार्गामुळे होऊ शकत नाही, असे म्हणणे ही खूपच अतिशयोक्ती ठरेल.

‘ईश्वरी कृपा’ ही काही एखादी काल्पनिक गोष्ट नाही, तर ती अनुभवास येणारी आध्यात्मिक वस्तुस्थिती आहे. विद्वान आणि सामर्थ्यवान व्यक्ती ज्यांना अगदी नगण्य समजतात अशा अनेक जणांना ‘ईश्वरी कृपे‌’मुळे आध्यात्मिक साक्षात्कार झालेला आहे. अशिक्षित असताना आणि कोणतीही मानसिक शक्ती किंवा प्रशिक्षण नसताना, व्यक्तित्वामध्ये (तुम्ही म्हणता तसे त्यांच्यापाशी) कोणतेही ‘सामर्थ्य’ नसताना किंवा संकल्पशक्ती नसताना देखील, त्यांनी (फक्त आणि फक्त) अभीप्साच बाळगली होती आणि त्यांना एकाएकी, अगदी अल्पावधीतच आध्यात्मिक साक्षात्कार झाला होता; कारण त्यांच्यापाशी श्रद्धा होती किंवा ते प्रामाणिक होते.

ही जी तथ्यं आहेत, ती आध्यात्मिक इतिहासातील तथ्यं आहेत आणि ती तथ्यं अगदी सार्वत्रिक आध्यात्मिक अनुभवाचा भाग आहेत. असे असूनही या गोष्टी काल्पनिक आहेत असे समजून, त्यांच्या बाबतीत एवढा उहापोह का केला जातो, त्यांच्या बाबतीत इतके युक्तिवाद का केले जातात, किंवा या गोष्टी नाकारल्या का जातात हेच मला कळत नाही.

सामर्थ्य, जर आध्यात्मिक असेल तर, त्यामध्ये आध्यात्मिक साक्षात्काराची शक्ती असते; (पण) त्याहूनही अधिक शक्ती प्रामाणिकपणामध्ये असते; आणि सर्वाधिक शक्ती ‘ईश्वरी कृपे‌’मध्ये असते. कितीही वेळ लागला आणि कितीही अडचणी आल्या तरी, एखादी व्यक्ती जर प्रामाणिक असेल तर ती या सगळ्यामधून पार होतेच, हे मी असंख्य वेळा सांगितले आहे. मी अनेकवेळा ईश्वरी कृपे‌विषयीदेखील बोललो आहे. “शोक करू नकोस; मी तुला सर्व पापांमधून आणि अनिष्ट गोष्टींपासून मुक्त करेन,” (अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्ष्ययिष्यामि मा शुच:) हे ‘गीते‌’मधील वचन मी अनेकवेळा उद्धृत केले आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 172)