Tag Archive for: प्रकृती

 

जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वरा‌चे अपयश असते. परंतु त्यामुळे ‘प्रकृती‌’ मात्र समाधानी होते आणि अशा जिवांची संख्या वाढविण्यामध्ये आनंद मानते. कारण, प्रकृती टिकून राहील आणि तिचे साम्राज्य दीर्घकाळ चालत राहील अशी ग्वाही ते जीव देत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 208)

 

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे अशा प्रकारे आरोहण करणारा क्रमविकास (evolution) आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच त्यामुळे, ‘मी या विकासाचा अंतिम टप्पा असून, माझ्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काही असणे शक्यच नाही‌’, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा एक फार मोठा गैरसमज आहे.

त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशूच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे.

अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट राहू शकत नाही यामध्ये शंकाच नाही. प्रकृती एक नवीन जीव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पशुच्या तुलनेत मानव जसा आहे तसा, मानवाच्या तुलनेत तो जीव असेल. तो जीव बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; पण त्याची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि तो जीव अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेला असेल.

मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर अवतरले आहेत. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना‌’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवसंपन्न, सचेत जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे श्रीअरविंदांनी सांगितले आहे. ज्या चेतनेला त्यांनी अतिमानस (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना (पृथ्वीकरता म्हणून) स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वत:भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून त्यांना साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर स्वत:चे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

– श्रीमाताजी (CWM 12 : 116)

 

(पूर्वार्ध)

जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी अन्न हा एक अगदी अपरिहार्य असा घटक असणार आहे. ऊर्जा मिळविण्याचे इतर मार्गदेखील योगशास्त्राला ज्ञात आहेत आणि त्यापैकी दोन महत्त्वाच्या मार्गांचा विचार आपण येथे करणार आहोत.

पार्थिव जडभौतिक जगतामध्ये असलेल्या ऊर्जा-साठ्याच्या संपर्कात यायचे आणि या अक्षय ऊर्जास्रोतामधून मुक्तपणे ऊर्जा संपादन करायची हा त्यातील पहिला मार्ग आहे. या भौतिक ऊर्जा अंधकारमय व अर्ध-चेतन असतात आणि त्या मनुष्यामधील पशुत्व वाढीस लावतात, (हे खरे आहे.) मात्र त्याच वेळी त्या मानव आणि जडभौतिक प्रकृती यांच्यामध्ये एक प्रकारचे सुसंवादाचे नाते प्रस्थापित करत असतात. या ऊर्जा कशा ग्रहण करायच्या आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे ज्यांना माहीत असते अशा व्यक्ती ज्या गोष्टी हाती घेतील त्यामध्ये आणि जीवनामध्ये सहसा यशस्वी होतात. परंतु त्यासाठी त्या व्यक्ती त्यांच्या आरोग्यपूर्ण स्थितीवर आणि जीवनमानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. पण मानव आणि जडभौतिक प्रकृती यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण झालेला असला तरी, हा सुसंवाद त्या व्यक्तींचे सर्वच आघातांपासून संरक्षण करू शकतो, असे नाही. परिस्थिती जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा सहसा ही प्रतिकारक्षमता नाहीशी होते.

लहान मूल अगदी सहजपणाने जडभौतिक प्रकृतीमधून ऊर्जा ग्रहण करते. कारण ते कोणताही हिशोब न करता, आनंदाने व मुक्तपणाने त्या ऊर्जा वापरत असते. परंतु तेच मूल वयाने जसजसे वाढत जाते तसतशी त्याच्यामधील ऊर्जा ग्रहण करण्याची ही क्षमता जीवनातील चिंतांमुळे कमी होत जाते. नंतर मग त्याच्या चेतनेमधील बहुतांश जागा मानसिक गतिविधींनी व्यापलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून ही क्षमता क्षीण होऊन जाते. तथापि, आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच आटत नाही. (उत्तरार्ध उद्या…)

• श्रीमाताजी (CWM 12 : 261-262)

साधना, योग आणि रूपांतरण – ६४

भौतिक मनाच्या (physical mind) गोंगाटाला, तुम्ही अस्वस्थ न होता, अविचलपणे नकार दिला पाहिजे. इथपर्यंत नकार दिला पाहिजे की तो (गोंगाट) नाउमेद होऊन जाईल आणि मान हलवत निघून जाईल आणि म्हणेल, “छे! हा माणूस फारच शांतचित्त आणि कणखर आहे.”

नेहमीच अशा दोन गोष्टी असतात की ज्या वर उफाळून येतात आणि तुमच्या शांत अवस्थेवर हल्ला चढवितात. प्राणाकडून आलेल्या सूचना आणि भौतिक मनाची यांत्रिक पुनरावृत्ती या त्या दोन्ही गोष्टी असतात. दोन्ही बाबतीत शांतपणे नकार देत राहणे हाच उपाय असतो.

अंतरंगात असणारा पुरुष हा प्रकृतीला आदेश देऊ शकतो आणि तिने काय स्वीकारावे किंवा काय नाकारावे हे तिला सांगू शकतो. मात्र त्याची इच्छा ही शक्तिशाली, अविचल इच्छा असते; तुम्ही जर अडचणींमुळे अस्वस्थ झालात किंवा क्षुब्ध झालात तर एरवी त्या ‘पुरुषा’ची इच्छा जितकी परिणामकारक रीतीने कार्य करू शकली असती तितकी परिणामकारक रीतीने (तुम्ही अस्वस्थ किंवा क्षुब्ध असताना) ती कार्य करू शकत नाही.

उच्चतर चेतना ही प्राणामध्ये पूर्णपणे उतरली असताना कदाचित सक्रिय साक्षात्कार (dynamic realisation) होऊ शकेल. उच्चतर चेतना जेव्हा मनामध्ये उतरते तेव्हा ती आपल्याबरोबर ‘पुरुषा’ची शांती आणि मुक्ती तसेच ज्ञानसुद्धा घेऊन येते. ती जेव्हा प्राणामध्ये उतरते तेव्हा सक्रिय साक्षात्कार वर्तमानात प्रत्यक्षात होऊ शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 304-305)

विचारशलाका १९

नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; तत्त्वज्ञानाच्या सर्व पुस्तकांमधून, अगदी योगामध्येसुद्धा तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमचा स्वभाव बदलू शकत नाही, कारण तुमच्या जन्माबरोबरच तो आलेला असतो, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी अत्यंत अवघड असे काही तुम्हाला करावे लागते. (कारण) तुम्हाला केवळ तुमचीच प्रवृत्ती बदलायची नसते तर, (तुमच्यामध्ये असलेली तुमच्या) पूर्वजांची प्रवृत्तीदेखील तुम्हाला बदलायची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही (कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो), पण तुम्हाला मात्र  तुमच्यामधील ती प्रवृत्ती बदलणे आवश्यक असते.

त्यांनी ज्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या असतात – तुमच्या जन्माबरोबर जणू या सुंदर भेटवस्तू तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या तुम्हाला बदलायच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात आणि तुम्ही जर त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर, एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त झालेले असाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती झालेले असाल; नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल.

– श्रीमाताजी [CWM 04 : 262]

विचारशलाका १२

आपल्या अस्तित्वाची आत्ताची रचना किंवा स्थिती ही अंतिम आहे असे मानून, विकासक्रमाच्या शक्यतेवर मर्यादा घालण्याचे काहीच कारण नाही. पशुजीवन ही एक अशी प्रयोगशाळा आहे की, ज्या प्रयोगशाळेमध्ये प्रकृतीने मनुष्यजात घडवली. मनुष्यदेखील तशीच एक प्रयोगशाळा बनू शकतो. या मनुष्यरूपी प्रयोगशाळेमध्ये अतिमानव (superman) घडविण्याचे कार्य करण्याचा प्रकृतीचा संकल्प आहे. दिव्य जीवाच्या रूपाने आत्म्याला प्रकट करण्याचा व एक दिव्य प्रकृती उदयास आणण्याचा तिचा संकल्प आहे.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 502]

आध्यात्मिकता २२

मनुष्य एकदा जरी स्वत:च्या आध्यात्मिकीकरणासाठी संमती देऊ शकला तरी सारेकाही बदलून जाईल; परंतु त्याची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मनुष्य स्वत:च्या अपूर्णतेवर प्रेम करतो.

‘आत्मा’ हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण त्यांच्या परिपूर्ण दशेमध्ये तेच त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत.

केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामुळे स्वर्ग-गमनासाठी कित्येक जीव तयार होतात, परंतु ते पृथ्वीला मात्र, ती जिथे होती तिथेच सोडून जातात.

– श्रीअरविंद [CWSA 13 : 210]

आध्यात्मिकता १९

‘आध्यात्मिकता’ आंतरिक अस्तित्वाला मुक्त करते, प्रकाशित करते; मनापेक्षा उच्चतर असणाऱ्या गोष्टीशी संपर्क करण्यासाठी ती मनाला साहाय्य करते; एवढेच नव्हे तर ती, मनाची मनापासून सुटका करून घेण्यासाठीसुद्धा साहाय्य करते. आंतरिक प्रभावाद्वारे ती व्यक्तींच्या बाह्यवर्ती प्रकृतीचे शुद्धीकरण आणि उन्नयन करू शकते परंतु जोपर्यंत तिला मानवी समूहामध्ये मन या साधनाद्वारे कार्य करावे लागते, तोपर्यंत ती पृथ्वीवरील जीवनावर फक्त प्रभाव टाकू शकते; परंतु ती त्या जीवनाचे रूपांतरण करू शकत नाही.

आणि त्यामुळेच आध्यात्मिक मनामध्ये, या प्रभावावरच अल्पसंतुष्ट राहण्याची तसेच मुख्यतः इतरत्र कोठेतरी, पारलौकिकामध्ये परिपूर्ती शोधण्याची किंवा बाह्य जीवनातील सारे प्रयत्न पूर्णपणे सोडून देण्याची आणि फक्त स्वतःच्या आध्यात्मिक मुक्तीवर किंवा सिद्धीवर लक्ष केंद्रित करण्याची प्रवृत्ती आढळते. (आणि म्हणूनच,) अज्ञानाद्वारे निर्माण झालेल्या प्रकृतीचे संपूर्णपणे रूपांतर करण्यासाठी मनापेक्षा अधिक उच्चतर असणाऱ्या साधनभूत क्षमतेची आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद [CWSA 21-22 : 918-919]

जीवनाचा आणि ‘योगा’चा योग्य विचार केला असता, असे दिसून येते की, सर्व जीवन म्हणजे ‘योग’च आहे. मग ते जाणीवपूर्वक असो किंवा अर्ध-जाणीवपूर्वक असो. मनुष्यामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाच्या द्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न हा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. आणि या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि ‘विश्वा’मध्ये अंशत: आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत ‘अस्तित्वा’शी व्यक्तिगत मानवाचे ऐक्य, ही होय.

जीवनाच्या सर्व दृश्य रुपांच्या मागे आपण दृष्टी टाकली तर, असे दिसून येईल की, हे जीवन म्हणजे ‘प्रकृती’चा एक महान ‘योग’ आहे. ही प्रकृती जाणीवपूर्वक किंवा अर्धजाणीवपूर्वक, स्वत:चे पूर्णत्व गाठावयाच्या प्रयत्नामध्ये आहे; स्वतःमधील विविध शक्ती सारख्या वाढत्या प्रमाणात प्रकट करीत, प्रकृती स्वतःचे पूर्णत्व गाठण्याचा प्रयत्न करीत आहे. या ‘योगा’च्या आधारे, प्रकृती तिच्या दिव्य सत्य स्वरूपाशी ऐक्य पावण्याचा प्रयत्न करते. जेणेकरून तिचा हा महान हेतू अधिक वेगाने आणि प्रभावीपणे साध्य व्हावा, म्हणून प्रकृतीने मानव या आपल्या विचारशील घटकाद्वारे, आत्मजाणीवयुक्त साधनांचा आणि कृतींच्या संकल्पयुक्त योजनाबद्ध व्यवस्थेचा, या ‘पृथ्वी’वर प्रथमच वापर केला आहे.

स्वामी विवेकानंद यांनी म्हटल्याप्रमाणे, “योग हे व्यक्तीने आपल्या पार्थिव जीवनामध्ये असताना, स्वत:ची विकासप्रक्रिया शीघ्रतेने एकाच जन्मात, किंबहुना काही वर्षांमध्येच, वा काही महिन्यांमध्येच साध्य करून घेण्याचे साधन आहे.”

– श्रीअरविंद [CWSA 23 : 06]

साधक : श्रीअरविंद नेहमीच असे सांगतात की, श्रीमाताजी तुमच्या अंतरंगात आहेत.

श्रीमाताजी : हो, खरे आहे, अगदी पूर्णपणे बरोबर आहे. मी ‘शाश्वत ज्योती’ मध्ये एक ‘ईश्वरी अस्तित्व’ या नात्याने ‘उपस्थित’ आहे, संजीवन देणारी आणि कृतिप्रवण करणारी ‘शक्ती’ या नात्याने मी उपस्थित आहे, सर्व शांतीपूर्ण गोष्टी आणि माधुर्य प्रदान करणारी ‘शांती’ या नात्याने मी उपस्थित आहे, ओसंडून वाहणारा आणि उन्नयन करणारा ‘मोद’, शुद्धिकरण करणारा ‘प्रकाश’ आणि संमती प्रदान करणारे ‘स्पंदन’ या नात्याने मी तेथे उपस्थित आहे.

श्रीअरविंद तेथे एक चिरस्थायी ‘सत्त्व’ म्हणून उपस्थित आहेत आणि मी तेथे एक ‘मार्गदर्शक’ म्हणून उपस्थित आहे. वास्तविक, दोघांमध्ये एकच अस्तित्व आहे. एक, जो निरीक्षण करतो तो साक्षी आहे आणि दुसरी प्रत्यक्षात उतरविणारी शक्ती आहे. आणि जोपर्यंत व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत तिला काहीच समजू शकत नाही…..

होय, श्री अरविंदांना आणि मला जो जाणतो, (वास्तविक, ही एकच गोष्ट आहे, एकच अस्तित्व आहे.) – त्याच्यासाठी सारे अडथळे, साऱ्या अडचणी, सर्व पाश, सत्याच्या मार्गावरील सारे तथाकथित अडथळे गळून पडतात आणि ते कायमसाठी काढून टाकले जातात. केवळ या जन्मातच असे नव्हे तर, मृत्युनंतरच्या जीवनातील आणि त्यानंतर येणाऱ्या सगळ्या जीवनांमधील सुद्धा – अगदी शाश्वतकाळपर्यंत काढून टाकले जातात. अशा व्यक्तीसाठी ‘परमेश्वर’ हा सर्व शक्तिमान असतो.

[The Supreme by Mona Sarkar]