Tag Archive for: उन्मुखता

 

शांती किंवा शक्ती शरीरात अवतरित होऊ लागल्यामुळे शरीर ग्रहण-सुलभ होते. तेव्हा काही जणांना शरीर डोलत असल्याचा किंवा शरीरात स्पंदने निर्माण झाल्याची जाणीव होते. शरीराला जेव्हा हे शांतीचे किंवा शक्तीचे अवतरण सवयीचे होऊन जाते तेव्हा त्याचे हे हलणे-डुलणे थांबते. ध्यानाच्या वेळी शांती पूर्णपणे अवतरित होते कारण त्या वेळी श्रीमाताजींप्रति केलेल्या एकाग्रतेमुळे उच्चतर चेतनेची शक्ती खाली अवतरित होते आणि व्यक्ती जर सक्षम असेल तर, ती त्या शक्तीचा स्वीकार करू शकते.

एकदा का त्या शक्तीचे अवतरण सुरू झाले की, सहसा तिचे बळ वाढत जाते आणि त्याबरोबर साधकाची ग्रहणशीलतादेखील वाढत राहते. पुढे ती शक्ती सदा सर्वकाळ आणि सर्व परिस्थितीमध्ये अवतरित होऊ शकते आणि अधिकाधिक काळ टिकून राहू शकते. ती स्थिर होईपर्यंत हे असे चालू राहते.

साधकाने मात्र त्याच्या बाजूने एक प्रयत्न केला पाहिजे आणि तो म्हणजे, ती शक्ती ग्रहण करण्यासाठी म्हणून त्याने स्वतःची चेतना शक्य तितकी अविचल आणि स्थिर ठेवली पाहिजे. उच्चतर आध्यात्मिक चेतनेची शांती, शक्ती, प्रकाश, आनंद या साऱ्या गोष्टी ऊर्ध्वस्थित आहेत, परंतु त्या झाकलेल्या स्वरूपात आहेत. त्यांच्या अवतरणासाठी एक प्रकारची उन्मुखता (opening) असली पाहिजे. मनाची अविचलता आणि अवतरित होऊ पाहणाऱ्या दिव्य प्रभावाला खुली असणारी एकाग्र क्रियाविरहितता (concentrated passivity) या गोष्टी म्हणजे त्या अवतरणासाठी आवश्यक असणारी उत्तम स्थिती होय.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 481-482)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

उन्मुखता किंवा खुलेपणा ही गोष्ट काही अगदी सुरुवातीपासूनच पूर्णत्वाला पोहोचलेली असते असे नाही. सुरुवातीला अस्तित्वाचा एखादा भाग उन्मुख होतो आणि चेतनेचे इतर भाग हे अजूनही बंद किंवा अर्धवट उन्मुख झालेले असतात; ते सर्वच्या सर्व भाग खुले व्हावेत म्हणून व्यक्तीने अभीप्सा (aspire) बाळगणे आवश्यक असते.

अगदी सर्वोत्तम आणि प्रगत साधकांमध्ये देखील पूर्ण खुलेपण येण्यासाठी काही कालावधी लागतो. तसेच एखादा साधक अध्यात्ममार्गाच्या वाटचालीमध्ये आड येणाऱ्या गोष्टी कोणताही संघर्ष न करताच सोडू शकला आहे, असेही आढळत नाही.

आणि त्यामुळे, अडीअडचणीच्या वेळी तुम्ही श्रीमाताजींकडे मदतीसाठी साद घातलीत तर ती त्यांच्या कानी पडणार नाही, असे समजू नका. मानवी प्रकृतीच्या अडीअडचणी श्रीमाताजी जाणतात आणि त्याच तुम्हाला या साऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतील. धीर धरा, त्यांच्यापाशी नेहमी प्रार्थना करत राहा. तसे केलेत तर, प्रत्येक अडचणीनंतर तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 156-157)

 

ईश्वरी प्रभावासमोर स्वत:ला खुले, उन्मुख करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो प्रभाव तुमच्या मनामध्ये व शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या आणि कार्य करणाऱ्या शक्तीच्या रूपाने अवतरतो; तो आनंदरूपाने अवतरतो; ईश्वरी उपस्थिती म्हणून, साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. त्याविषयी सचेत होईपर्यंत व्यक्तीने त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; तसेच तिने खुलेपणासाठी, उन्मुखतेसाठी (opening) आस बाळगणे देखील आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

 

(एका साधकाने श्रीअरविंद यांना पत्राने काही शंका विचारली होती. तेव्हा त्याला काय उत्तर द्यावे हे श्रीअरविंद यांनी सचिवाला लिहून कळविले होते. ते हे पत्र…)

श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांचा प्रभाव ग्रहण करण्यासाठी, त्या प्रभावाप्रत स्वतःला खुले करण्याची क्षमता व इच्छा, श्रद्धा आणि आध्यात्मिक मार्गाचे अनुसरण करण्यामध्ये संपूर्ण प्रामाणिकपणा यांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही अटी नाहीत. सहसा प्रामाणिकपणा व श्रद्धा यांचा परिणाम म्हणून, श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रभावाप्रत स्वतःला खुले, उन्मुख करण्याची क्षमता निर्माण होते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 106)

 

हृदयामध्ये प्रामाणिकपणा असेल आणि हेतू निःस्वार्थी असेल आणि वरून (ईश्वरी शक्तीकडून) येणाऱ्या साहाय्याप्रत खुलेपणा, उन्मुखता असेल तर, कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्यावर मात करता येते किंवा कालांतराने त्यामध्ये बदल करता येतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 528)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १६

साधकाची योगमार्गावर जी वाटचाल चालू असते त्या वाटचालीमध्ये अशी एक अवस्था येते की, ज्या अवस्थेमध्ये साधक त्याच्या अंतरंगामध्ये कार्यरत असणाऱ्या दिव्य शक्तीविषयी सचेत असतो किंवा किमानपक्षी, तो त्या कार्याच्या परिणामाविषयी तरी नक्कीच सचेत असतो. (आणि अशा रितीने सचेत झाल्यामुळे) तो आता तिच्या अवतरणामध्ये किंवा तिच्या कार्यामध्ये, स्वतःच्या मानसिक गतिविधींमुळे किंवा स्वतःच्या प्राणिक अस्वस्थतेमुळे किंवा शारीरिक जडतेमुळे व तमोमयतेमुळे अडथळे निर्माण करत नाही. यालाच ‘ईश्वराप्रति खुले असणे’ (openness to the Divine) असे म्हणतात.

ईश्वराप्रति खुले होण्याचा समर्पण (Surrender) हा सवोत्तम मार्ग आहे. पण साधकामध्ये जोपर्यंत समर्पण भाव निर्माण होत नाही तोपर्यंत, अभीप्सा आणि अविचलतेच्या साहाय्याने एका विशिष्ट मर्यादेपर्यंत हे खुलेपण येऊ शकते.

स्वतःकडे असलेले सर्वकाही ईश्वराच्या स्वाधीन करणे; तसेच स्वतःकडे जे आहे ते सर्व आणि एवढेच नव्हे तर, स्वत:ला सुद्धा ईश्वराप्रति अर्पण करणे म्हणजे ‘समर्पण’. समर्पण करणाऱ्या व्यक्तीने स्वत:च्या कल्पना, इच्छा, सवयी यांचा आग्रह धरता कामा नये तर, त्या प्रत्येकाची जागा दिव्य सत्याच्या ज्ञानाने, संकल्पाने आणि कार्याने घ्यावी यासाठी, त्या दिव्य सत्याला मोकळीक देणे म्हणजे ‘समर्पण’.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 67)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १४

पूर्वार्ध

एकीकडे तुम्ही असे म्हणत असाल की, मी स्वतःला ‘श्रीमाताजीं’प्रति खुले ठेवले आहे आणि त्याच वेळी तुम्ही समर्पण मात्र हातचे राखून ठेवत असाल तर, तुमच्या त्या म्हणण्याला फारसा आध्यात्मिक अर्थ नाही. जे पूर्णयोगाची साधना करतात त्यांनी आत्मदान करावे किंवा समर्पण करावे असे अभिप्रेत असते. कारण, व्यक्तीच्या अशा प्रकारच्या प्रगमनशील (progressive) समर्पणाखेरीज, ध्येयाच्या जवळपास पोहोचणे देखील अशक्यप्राय असते.

स्वतःला खुले ठेवणे म्हणजे तुमच्यामध्ये कार्य करावे यासाठी श्रीमाताजींच्या ‘शक्ती’स आवाहन करणे. पण तुम्ही जर त्या शक्तीला समर्पित झाला नाहीत तर, त्याचा परिणाम असा होतो की, एकतर तुम्ही तुमच्यामध्ये त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देत नाही किंवा तुम्हाला ते कार्य ज्या पद्धतीने व्हावे असे वाटते त्या पद्धतीने होणार असेल तरच, तुम्ही त्या शक्तीला कार्य करण्यास संमती देता. म्हणजेच, त्या शक्तीला तुम्ही तिच्या पद्धतीने म्हणजे दिव्य सत्याच्या पद्धतीने कार्य करू देत नाही.

अशा प्रकारच्या अटी घालणे हे सहसा कोणत्यातरी विरोधी शक्तीकडून केले जाते किंवा मनाच्या किंवा प्राणाच्या एखाद्या अहंभावात्मक घटकाकडून केले जाते. त्याला ईश्वरी ‘कृपा’ किंवा ‘शक्ती’ हवी असते पण ती त्याला स्वतःच्या हेतुसाठी वापरायची असते; त्याला ईश्वरी उद्दिष्टासाठी जीवन जगण्याची इच्छा नसते. त्याला ईश्वराकडून जे जे मिळविणे शक्य असते ते सर्व हवे असते पण तो स्वतःला मात्र ईश्वराप्रति अर्पण करू इच्छित नसतो. उलटपक्षी, सत्-अस्तित्व (true being), आत्मा हा ईश्वराभिमुख होतो आणि त्याला ईश्वराप्रति समर्पण करण्याची केवळ इच्छाच असते असे नाही तर, तो आनंदाने समर्पण करण्यासाठी तत्पर असतो. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 32 : 140-141)

पूर्णयोगाचे अधिष्ठान – १३

श्रीमाताजींप्रति स्वत:ला उन्मुख, खुले ठेवा, त्यांचे नित्य स्मरण ठेवा आणि श्रीमाताजींच्या शक्तीव्यतिरिक्त इतर सर्व प्रभावांना नकार द्या आणि त्या शक्तीला तुमच्यामध्ये कार्य करू द्या; हा पूर्णयोगाचा नियम आहे.

*

श्रीमाताजींसमोर आंतरात्मिकरित्या उन्मुख, खुले राहिल्याने, कार्यासाठी किंवा साधनेसाठी जे काही आवश्यक असते ते सर्व क्रमश: विकसित होत जाते. साधनेच्या महत्त्वाच्या रहस्यांपैकी हे एक रहस्य आहे, साधनेचे ते केंद्रवर्ती रहस्य आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 109), (CWSA 32 : 154)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३३

उन्मुख असणे, खुले असणे (To be open) याचा अर्थ असा की, श्रीमाताजींचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही नकाराविना किंवा अडथळ्याविना चालावे अशा रितीने तुम्ही श्रीमाताजींकडे वळलेले असणे.

मन जर त्याच्या स्वतःच्या कल्पनांमध्येच बंदिस्त राहिले आणि त्याने जर स्वतःमध्ये ‘प्रकाश’ व ‘सत्य’ आणण्यासाठी, श्रीमाताजींना कार्य करू देण्यास नकार दिला तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

प्राण जर त्याच्या इच्छावासनांनाच चिकटून राहिला आणि श्रीमाताजींची शक्ती, जी खरी प्रेरणा व खरे भावावेग घेऊन येत असते, त्या गोष्टींना जर त्याने स्वतःमध्ये प्रवेश करू दिला नाही तर, ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा याचा अर्थ होतो.

शरीर जर स्वतःच्या इच्छा, सवयी व जडत्वामध्येच बंदिस्त राहिले आणि त्यामध्ये ‘प्रकाश’ व ‘शक्ती’चा प्रवेश होऊ देण्यास आणि कार्य करू देण्यास शरीराने मुभा दिली नाही, तर ती व्यक्ती उन्मुख झालेली नाही, असा त्याचा अर्थ होतो.

एकाच वेळी सर्व गतिविधींमध्ये संपूर्णतया खुले, उन्मुख होता येणे शक्य नसते, परंतु (फक्त मनामध्येच नव्हे तर) तुमच्या प्रत्येक भागामध्ये एक मध्यवर्ती उन्मुखता (central opening) असली पाहिजे आणि केवळ श्रीमाताजींच्या कार्यालाच प्रवेश करू देईल अशी प्रभावशाली अभीप्सा व संकल्पशक्ती असली पाहिजे, उर्वरित सर्व गोष्टी (श्रीमाताजींच्या शक्तीद्वारे) चढत्यावाढत्या क्रमाने केल्या जातील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 151)

जीवन जगण्याचे शास्त्र – ३०

साधक : अभीप्सेचा अग्नी कधीही विझू नये यासाठी मी काय केले पाहिजे?

श्रीमाताजी : व्यक्ती जेव्हा तिच्या सर्व अडीअडचणी, तिच्या इच्छावासना, तिच्या सर्व अपूर्णता यांचे त्या अग्नीमध्ये हवन करत राहते तेव्हा त्यामुळे, तो अग्नी तेवत राहतो. अभीप्सेचा हा अग्नी प्रज्वलित राहावा म्हणून सकाळ-संध्याकाळ मला अंतःकरणपूर्वक प्रार्थना करा आणि त्या अग्निमधील समिधा म्हणून त्या सर्व गोष्टी मला अर्पण करत जा.

साधक : अभीप्सारूपी या अग्नीची तीव्रता वाढीस लागावी म्हणून मला एकांतवासात जावे असे वाटत आहे. मी एकांतवासात जाऊ का?

श्रीमाताजी : दैनंदिन जीवनाच्या धुमश्चक्रीमध्येच हा अग्नी प्रज्वलित होत राहिला पाहिजे जेणेकरून, तो तुमच्या सर्व गतिविधी सुयोग्य करू शकेल.

साधक : मी माझ्या सर्व गतिविधी तुम्हाला अर्पण करत आहे आणि “माझा अभीप्सा-अग्नी प्रज्वलित राहू दे,’’ अशी प्रार्थना मी तुम्हाला करत आहे.

श्रीमाताजी : जोपर्यंत तुम्ही अभीप्सारूपी ज्योत तेवत ठेवण्याची आस बाळगत आहात तोपर्यंत ती मालवू नये याची काळजी मी घेईन.

साधक : मी त्या ज्योतीवर एकाग्रता करण्याचा खूप प्रयत्न केला, पण, ती ज्योत प्रज्वलित करण्याइतपत माझी अभीप्सा उत्कट नाही.

श्रीमाताजी : अभीप्सेचा अग्नी प्रज्वलित करणे हे तुमचे काम नाही. मी तुम्हाला म्हटले त्याप्रमाणे, तो अग्नी नेहमी मी प्रज्वलित करत असते. तो ग्रहण करण्यासाठी तुम्ही फक्त स्वतःला उन्मुख केले पाहिजे आणि तो अग्नी सद्भावनेने सांभाळला पाहिजे.

श्रीमाताजी (CWM 17 : 126)