Tag Archive for: प्रामाणिकपणा

 

प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते.
*
निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे.

• श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 67)

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)

(महाकालीचे प्रहार कधीकधी व्यक्तीच्या प्रगतीसाठी आवश्यक का असतात त्याचे कारण कालच्या भागात आपण विचारात घेतले. त्यावर एका साधकाने शंका विचारली आहे.)

साधक : मग व्यक्तीवर सर्व आघात एकदमच का होत नाहीत?

श्रीमाताजी : तसे झाले तर ते तुम्हाला मारक ठरेल. कारण तो प्रहार जर तुम्हाला वठणीवर आणण्याइतपत पुरेसा जोरदार असेल तर तो तुम्हाला चिरडूनदेखील टाकू शकेल. तुमचं अगदी चिपाड होऊन जाईल. परंतु तुम्ही जर थोडी थोडी प्रगती करत राहिलात, आज थोडी, उद्या थोडी अशी क्रमाक्रमाने प्रगती करत राहाल, ते आघात पचवत राहाल तर मग तुम्ही टिकून राहू शकाल.

अर्थातच ही गोष्ट आंतरिक सामर्थ्यावर, आंतरिक प्रामाणिकपणावर आणि प्रगती करण्याच्या तुमच्या क्षमतेवर, अनुभवातून शहाणपण शिकण्यावर आणि मुख्य म्हणजे, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे ते शहाणपण विसरून न जाण्यावर अवलंबून असते. ते न विसरण्याइतपत जर व्यक्ती भाग्यवान असेल तर मग ती वेगाने प्रगती करू शकते. अशी व्यक्ती वेगाने पुढे जाऊ शकते.

आणि त्याच वेळी जर समजा व्यक्तीकडे आंतरिक नैतिक सामर्थ्य असेल तर, तिची प्रगती अधिक वेगाने सुद्धा होऊ शकते. म्हणजे समजा, व्यक्ती त्या दुःखाग्नीमुळे पोळून निघाली आणि त्याची धग कमी होऊ न देता जर ती व्यक्ती त्या दुःखाच्या मुळापर्यंत जाऊन पोहोचली तर, तिची प्रगती अधिक वेगाने होऊ शकते. परंतु बहुसंख्य लोक एवढे सामर्थ्यशाली नसतात. उलट ते चटकन ती गोष्ट लपवून ठेवण्याचा, अगदी स्वतःपासूनसुद्धा ती गोष्ट लपवून ठेवण्याचा प्रयत्न करतात. व्यक्ती स्वतःच स्वतःला अगदी क्षुद्र किरकोळ स्पष्टीकरणं देत असते. व्यक्तीने जो मूर्खपणा केलेला असतो त्यासाठी ती अनेकानेक कारणं सांगत असते. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 324)

(एखाद्या व्यक्तीमध्ये प्रगती करण्याची प्रामाणिक आस असेल तर तिच्या प्रगतीसाठी, वेळप्रसंगी महाकालीकडून तिच्यावर प्रहारदेखील केले जातात, या बाबतीतले तथ्य श्रीमाताजी येथे उलगडवून दाखवीत आहेत. हा भाग विस्तृत असल्यामुळे क्रमशः देत आहोत.)

श्रीमाताजी : प्रामाणिक असणे खरोखरच खूप कठीण असते… आणि म्हणूनच तुमच्यावर वारंवार आघात होत राहतात. कधीकधी तर ते आघात अधिकच भयानक होतात कारण तुमच्यामधील मूर्खपणा नाहीसा करण्याचा तोच एकमेव मार्ग असतो; संकटे का कोसळतात त्याचे हे कारण आहे. जेव्हा तुम्ही अतीव वेदनादायी अशा परिस्थितीमध्ये सापडलेले असता आणि तुमच्यावर खोलवर परिणाम करेल अशा परिस्थितीला तुम्हाला सामोरे जावे लागते, तेव्हाच तुमच्यातील मूर्खपणा थोड्याफार प्रमाणात तरी नाहीसा होतो. पण तो थोडा नाहीसा झाला तरी, अजूनही आतमध्ये थोडातरी शिल्लक असतोच आणि म्हणूनच दुःखसंकटादी साऱ्या गोष्टी इतक्या दीर्घकाळ चालू राहतात…

आपण म्हणजे कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपले अस्तित्वच नाही, आपण खरोखर अगदी कोणीच नाही, त्या दिव्य चेतनेखेरीज आणि ईश्वरी कृपेखेरीज खरोखर कोणते अस्तित्वच नाही, याची व्यक्तीच्या अंतःकरणात खोलवर जाण येण्यासाठी जीवनामध्ये कितीतरी आघात आवश्यक असतात.

ज्या क्षणी व्यक्तीला या गोष्टीची जाण येते त्या क्षणीच सारे दुःखभोग संपून जातात; सारी संकटे, अडचणी दूर होतात. व्यक्तीला जेव्हा हे पूर्णपणे कळते तेव्हा दिव्य चेतनेला विरोध करणारे तिच्यामध्ये काहीच शिल्लक राहत नाही… अर्थात या गोष्टीला खूप काळ लागतो. (क्रमशः)

• श्रीमाताजी (CWM 06 : 323-324)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तू परिपूर्ण ज्ञान आहेस, परम चेतना आहेस. जो तुझ्याशी सायुज्य पावतो तो – जोपर्यंत त्याचे तुझ्याशी ऐक्य टिकून असते तोपर्यंत – सर्वज्ञ असतो. परंतु ही अवस्था प्राप्त होण्यापूर्वीदेखील, ज्याने स्वतःच्या अस्तित्वाच्या पूर्ण प्रामाणिकपणाने आणि सचेत संकल्पशक्तीच्या आधारे, तुझ्याप्रति आत्मदान केलेले असते; ज्याने स्वतःमध्ये आणि स्वतःच्या संपूर्ण प्रभावक्षेत्रामध्ये, तुझ्या ‘दिव्य प्रेमाचा दिव्य कायदा’ विजयी व्हावा आणि तो आविष्कृत व्हावा यासाठी ‘तुला साहाय्यभूत होण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन,’ असा निर्धार केलेला असतो, त्याच्या जीवनातील सर्व गोष्टी बदलून गेल्या आहेत असे त्याला आढळते. सर्व परिस्थिती ही आता तुझ्या दिव्य कायद्याची अभिव्यक्ती करू लागली आहे आणि ती तुझ्याप्रति आत्मनिवेदन करण्यास साहाय्य करू लागली आहे असे त्याला आढळते. त्याच्यासाठी, जे सर्वोत्तम आहे तेच नेहमी घडून येते.

पण असे असूनही, जर त्याच्या बुद्धिमत्तेमध्ये जर कोठे अजूनही काही तमोमयता शिल्लक असेल, एखादी अज्ञानी इच्छावासना अजूनही रेंगाळलेली असेल, कदाचित अशी एखादी इच्छा त्याच्यामध्ये शिल्लक आहे हे त्याला लगेच कळणारसुद्धा नाही, पण आज ना उद्या त्याच्या हे नक्की लक्षात येईल की, ती परम-उदार अशी शक्ती त्याचे खुद्द त्याच्यापासूनसुद्धा रक्षण करत आहे. त्याच्या विकसनासाठी, त्याच्या समग्र परिवर्तनासाठी व त्याच्या रूपांतरणासाठी आणि त्या ईश्वरी शक्तीला साधन म्हणून त्याचा उपयोग करता यावा यासाठी सर्वाधिक अनुकूल परिस्थिती त्या शक्तीने त्याच्यासाठी राखून ठेवली आहे, असे त्याच्या लक्षात येईल.

व्यक्ती जेव्हा याविषयी सचेत होते आणि तिला ही गोष्ट पूर्णपणे पटते तेव्हा ती भावी परिस्थितीविषयी किंवा भविष्यात काय घटना घडतील याची चिंता करत बसत नाही. त्या क्षणाला जे करणे सर्वोत्तम आहे, असे तिला वाटते ते परिपूर्ण प्रशांततेमध्ये ती करत असते. त्या कृतीमधून आमच्या मर्यादित बुद्धीला जे परिणाम अपेक्षित असतात ते तसे परिणाम दिसून आले नाही तरी आमच्या मनात एक ठाम विश्वास असतो की, त्याचा परिणाम म्हणून सर्वोत्तम तेच घडेल.

आणि म्हणूनच हे ईश्वरा, आमचे अंतःकरण भाररहित, हलके झाले आहे; आमचे विचार शांत झाले आहेत. आणि म्हणूनच हे ईश्वरा, आम्ही तुझ्याकडे पूर्ण विश्वासाने येतो आणि शांतिपूर्णतेने म्हणतो, हे ईश्वरा, तुझाच संकल्प सिद्धीस जाऊ दे कारण त्यातूनच खरा सुसंवाद प्रत्यक्षात येणार आहे.

• श्रीमाताजी (CWM 01 : 102)

(फक्त कर्मफलच नव्हे तर, संपूर्ण कर्मच ईश्वराला समर्पित केले पाहिजे. किंबहुना आपल्या माध्यमातून ती ईश्वरी शक्तीच ते कर्म करत आहे, असा अनुभव साधकाला आला पाहिजे, असे श्रीअरविंद सांगत आहेत. पण असे करत असताना प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो हेदेखील ते येथे स्पष्ट करत आहेत.)

साधकाने त्याच्या माध्यमातून ती दिव्य शक्ती, दिव्य उपस्थिती, दिव्य संकल्प कार्य करत आहे याची नेहमी जाणीव ठेवली पाहिजे. परंतु ही जाणीव बाळगण्याचा प्रयत्न करत असताना एक धोकासुद्धा असतो. तो असा की, छुप्या अहंकाराला किंवा एखाद्या निम्नस्तरीय शक्तीलाच तो ईश्वर समजण्याची शक्यता असते आणि त्यांच्या मागण्या हाच ‘ईश्वरी आदेश‌’ आहे, असे तो समजण्याची शक्यता असते. त्याच्यावर या कनिष्ठ प्रकृतीचा हल्ला होण्याचा धोका असतो. आणि उच्चतर शक्तीप्रत असणाऱ्या त्याच्या या तथाकथित समर्पणात विकार निर्माण होण्याची शक्यता असते. (म्हणजे ते समर्पण, समर्पण न ठरता उलट,) स्व-इच्छा आणि एवढेच नव्हे तर, त्याच्या स्वतःच्या इच्छावासना, त्याचे भावावेग यांमध्ये अधिकत्वाने आणि अनियंत्रितपणे रममाण होण्याचे निमित्त ठरू शकते.

आणि असे होऊ नये यासाठी संपूर्ण प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. आणि हा प्रामाणिकपणा त्याने फक्त स्वतःच्या सचेत मनामध्येच बाणवला पाहिजे असे नाही तर, त्यापेक्षाही, गुप्त गतिविधींनी भरलेल्या स्वतःच्याच अंतस्तलीय (subliminal) भागामध्येसुद्धा बाणवण्याचा प्रयत्न करणे अधिक आवश्यक असते. कारण, तेथे म्हणजे विशेषतः त्याच्या अंतस्तलीय प्राणिक प्रकृतीमध्ये, एक नाटकं करणारा आणि निगरगट्ट असा भोंदू वसलेला असतो. साधकाने त्याच्या कर्माचे ओझे ईश्वराकडे सोपविण्यापूर्वी, योगमार्गावर त्याची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे. म्हणजे, इच्छावासनांचे निर्मूलन व्हावे या दिशेने आणि सर्व कर्म व सर्व घटना यांच्याकडे पाहण्याची एक स्थिर समत्वबुद्धी यावी यासाठी त्या साधकाची बरीच वाटचाल झालेली असली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 23 : 229-230)

साधक : प्रसन्नचित्ताने ईश्वराला शरण कसे जायचे, ते आम्हाला सांगाल का?

श्रीमाताजी : ती शरणागती प्रामाणिक असली पाहिजे. जर ती खरोखरच प्रामाणिक असेल तर ती आनंददायी होते. जोपर्यंत शरणागती स्वीकारण्यात आनंद वाटत नाही तोपर्यंत ती शरणागती पूर्णपणे प्रामाणिक नाही, असे निश्चित समजा; कारण जर ती शरणागती खरोखरच प्रामाणिक असेल तर, ती नेहमीच आनंददायी असते.

जर ती आनंददायी नसेल तर त्याचा अर्थ असा की, तुमच्या व्यक्तित्वातील काहीतरी तुम्हाला मागे खेचत आहे, तुमच्यामधील एखाद्या भागाला शरणागती स्वीकारणे नको आहे, त्याला त्याची स्वतःची म्हणून काही इच्छा आहे, काही आकांक्षा आहे, त्याचे स्वतःचे असे काही प्रयोजन आहे आणि तो भाग संतुष्ट नाहीये आणि म्हणून तो पूर्णपणे समर्पित होत नाहीये आणि म्हणून त्याच्या समर्पणामध्ये प्रामाणिकपणा नाहीये.

पण जर व्यक्ती समर्पणामध्ये प्रामाणिक असेल तर ती अगदी स्वाभाविकपणे परिपूर्णतया आनंदी असते. खरंतर व्यक्तीला आपोआपच अवर्णनीय असा आनंद अनुभवायला मिळतो. आणि म्हणूनच, जोपर्यंत तुम्हाला असा अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्ही प्रामाणिक नसल्याची ती खात्रीशीर खूण आहे असे समजा. म्हणजे तुमच्यामधील एखादा भाग, एखादा लहान किंवा मोठा भाग प्रामाणिक नाहीये असे निश्चित समजा.

• श्रीमाताजी (CWM 06 : 210–211)

व्यक्तित्वाची घडण व्हावी यासाठी अहंकाराची आवश्यकता होती. पण म्हणूनच त्याचा विनाश हा तितकाच अवघड असतो. (अहंकाराचे उच्चाटन करण्याचा) एक अवघड पण चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे अहंकाराचे रूपांतरण करायचे आणि त्याला ईश्वराचे साधन बनवायचे. अहंकार रूपांतरित होऊन, तो जर ईश्वराला समग्रतया समर्पित झाला, तर तो अतिशय सशक्त आणि परिणामकारक साधन बनू शकतो. हा प्रयत्न अतिशय अवघड आहे आणि त्यासाठी निरपवाद आणि दृढ प्रामाणिकपणाची आवश्यकता असते. ज्यांच्यापाशी प्रबळ संकल्पशक्ती आहे, उत्कट अभीप्सा आणि अविचल प्रामाणिकपणा आहे, त्यांनी हा प्रयत्न करण्यास हरकत नाही.

• श्रीमाताजी (CWM 16 : 425)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

श्रीमाताजींच्या दिशेने अभिमुख झालेले असणे आणि त्यांना आवाहन करणे हे ठीक आहे. पण आणखी काहीतरी गरजेचे आहे. कारण ती फक्त पहिली आवश्यक गोष्ट आहे. साधकाने संपूर्ण आत्मदान केले पाहिजे आणि समर्पित असले पाहिजे. उदाहरणार्थ, तुम्ही मनमानी करत राहणे हे काही योग्य नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर, अन्नग्रहण वर्ज्य करणे हा वासनांपासून सुटका करून घेण्याचा योग्य मार्ग आहे, ही तुमची संकल्पना अशीच आहे. तुमची ही संकल्पना हास्यास्पद आहे कारण एखादी व्यक्ती उपासतापास करत असूनही, वासनामय जीवन जगणारी असू शकते. श्रीमाताजी आणि मी अशा रितीने स्वतःची उपासमार करण्यास संमती देत नाही, हे तुम्हाला चांगले माहीत आहे आणि असे असूनही तुम्ही एखादी संधी मिळण्याचा अवकाश, तसेच वागू इच्छिता. या व यासारख्या उदाहरणांमध्ये दिसून येतात त्याप्रमाणे, तुमच्या ज्या काही कल्पना असतील त्या तुम्ही सोडून दिल्या पाहिजेत.

इच्छा-वासनांच्या बाबतीत सांगायचे झाले तर, त्या वासनांपासून सुटका व्हावी अशी प्रामाणिक आस बाळगणे आणि श्रीमाताजींच्या शक्तीने तुमच्यामध्ये कार्य करावे म्हणून त्यांना आवाहन करणे, हा योग्य मार्ग आहे. श्रीमाताजींचा प्रकाश आणि त्यांची शक्ती जेव्हा तुमच्यामध्ये कार्य करू लागेल तेव्हा ती शक्ती व तो प्रकाशच तुम्हाला तुमच्यामध्ये काय बदल घडवणे आवश्यक आहेत ते दाखवून देतील आणि तुम्ही जर त्यास प्रामाणिकपणाने, पूर्ण सहमती दिलीत तर तसे परिवर्तन ती शक्ती आणि तो प्रकाश तुमच्यामध्ये घडवून आणेल.

• श्रीअरविंद (CWSA 32 : 393)