Tag Archive for: मृत्यू

 

तुमचा भावी काळ जेव्हा तुम्हाला जणू अनंत शक्यतांनी उजळलेल्या आकर्षक सूर्यासारखा वाटत असतो; आणि त्या शक्यता जेव्हा तुम्हाला खुणावत असतात तेव्हा तुम्ही तरुण असता. मग या पृथ्वीतलावर तुम्ही किती वर्षे व्यतीत केली आहेत याला महत्त्व नसते, तुम्ही तरुण असता आणि भावी काळात प्रत्यक्षात येऊ शकतील अशा शक्यतांची संपदा तुमच्यापाशी असल्यामुळे तुम्ही समृद्ध असता.

परंतु (त्या शक्यता प्रत्यक्षात उतरविण्याच्या प्रयत्नांत) तुमच्या शरीराने तुम्हाला साथ देत राहावी असे जर तुम्हाला वाटत असेल तर, तुम्ही तुमच्या ऊर्जा निरर्थक क्षोभामध्ये, अस्वस्थतेमध्ये व्यर्थ खर्च करू नका. तुम्ही जे काही करता ते अगदी शांतपणाने आणि स्थिरचित्ताने करा. शांती आणि निश्चल-नीरवतेमध्ये महत्तर सामर्थ्य सामावलेले असते.

*

चिरविश्रांतीसाठी असो किंवा अगदी निर्वाणाच्या परमानंदासाठी असो, व्यक्तीने इहलोकाचा निरोप घेण्याची कोणतीही घाई करू नये किंवा त्वराही करू नये. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला करण्यासारखे किंवा शिकण्यासारखे निःसंशयपणे काहीतरी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 123), (CWM 15 : 119)

 

(आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या दुसऱ्या ऊर्जास्रोताचा विचार करू या.)

आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती अचेतनेच्या (inconscient) गर्तेमधून, निम्न स्तरावरून प्राप्त केली जात नाही तर, ती वरून म्हणजे मनुष्यमात्रांचे आणि या विश्वाचे परमोच्च उगमस्थान असलेल्या स्थानापासून, म्हणजे अतिचेतनाच्या (superconscient) सर्व-शक्तिमान आणि शाश्वत वैभवाकडून प्राप्त होते. ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र असते, ती प्रत्येक वस्तुमध्ये झिरपत असते. तिच्या संपर्कात येण्यासाठी व ती ग्रहण करण्यासाठी तिच्याविषयी अगदी प्रामाणिकपणे आस बाळगणे आणि श्रद्धेने व विश्वासाने तिच्याप्रत खुले होणे, तसेच स्वतःची चेतना विशाल करणे आणि वैश्विक चेतनेशी तादात्म्य पावणे, एवढेच पुरेसे असते.

सुरुवातीला, ही गोष्ट अगदी अशक्यप्राय नाही, पण अतिशय अवघड वाटू शकते. परंतु बारकाईने या गोष्टीचा विचार केला तर व्यक्तीला असे आढळते की, ही गोष्ट वाटते तेवढी अशक्य नाही, किंवा सामान्यत: विकसित असलेल्या मानवी चेतनेपासून ती फार दूरही नाही. आपण सद्यस्थितीत जिथे आहोत त्यापेक्षा काहीसे वर उचलले गेलो आहोत आणि एक प्रकारची अनपेक्षित व असाधारण शक्ती आपल्यामध्ये आली आहे, आपण अशक्यप्राय गोष्टसुद्धा करू शकत आहोत, असा अनुभव बहुधा सर्वांनाच कधी ना कधी तरी आयुष्यात आलेला असतो, किमान एकदा तरी असा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. खरोखर, ज्यांना असा अनुभव कधीच आलेला नाही अशा फारच थोड्या व्यक्ती असतील. आयुष्यातील अशा ज्या घटिका असतात त्या वेळी व्यक्तीला कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही; त्यावेळी ‘अशक्य’ या शब्दाला जणू काही अर्थच उरलेला नसतो. हा अनुभव अगदी कितीही क्षणिक असला तरी त्यामधून, योगसाधनेद्वारे व्यक्ती कोणत्या प्रकारच्या उच्चतर शक्तीच्या संपर्कात येऊ शकते याची झलक व्यक्तीला मिळते.

अर्थात, हा संपर्क कसा साधायचा याची पद्धती येथे सांगत बसणे कठीण आहे. शिवाय, ही गोष्ट व्यक्तिगत असते आणि ती प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्न असते. व्यक्ती सद्यस्थितीत जेथे असते तेथपासून त्या पद्धतीची सुरुवात होते आणि ती पद्धती त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करते आणि व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडावे यासाठी तिला साहाय्य करते. कधीकधी हा मार्ग काहीसा दीर्घ आणि संथ असतो परंतु या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी व्यक्तीने जे कष्ट घेतले होते ते मोलाचे होते हे, त्याच्या परिणामांवरून व्यक्तीच्या लक्षात येते.

प्रकाशमान विशुद्धतेमध्ये सर्व-शक्तिमान असणाऱ्या, ऊर्जेच्या या अमर्याद स्रोताकडून, सर्व परिस्थितीमध्ये, स्वतःच्या इच्छेनुसार ऊर्जा संपादन करणाऱ्या या शक्तीच्या परिणामांची आपण अगदी सहजतेने कल्पना करू शकतो. काळजी, थकवा, आजारपण, वार्धक्य आणि एवढेच काय पण, अगदी मृत्युसुद्धा या मार्गावरचा केवळ एक अडथळा असतो आणि सातत्यपूर्ण संकल्पशक्तीद्वारे त्यावर निश्चितपणे मात केली जाऊ शकते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 262)

नैराश्यापासून सुटका – ०५

सत्कृत्य करणे; न्यायाने, सरळपणाने, प्रामाणिकपणाने वागणे हा शांत व समाधानी जीवन जगण्याचा आणि स्वत:च्या चिंता, काळज्या कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. अगदी पूर्ण स्वार्थी हेतुने पाहिले तरीसुद्धा ही गोष्ट खरी असल्याचे दिसते. याशिवाय खरोखरच, एखादी व्यक्ती जर नि:स्वार्थी, निरपेक्ष असेल आणि कोणत्याही वैयक्तिक आशाआकांक्षा वा अहंकारापासून मुक्त असेल तर, ती व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी होणे शक्य आहे.

तुमच्या कर्मांमुळे तयार झालेले वातावरण तुम्ही तुमच्याबरोबर, तुमच्या सभोवती आणि तुमच्यामध्ये वागवीत असता. तुम्ही केलेली कर्मे ही जर सत्कर्मे असतील, ती सुंदर, हितकर आणि सुसंवादी असतील, तर तुमच्या आजूबाजूचे वातावरणही तसेच सुंदर, हितकर व सुसंवादी राहील. पण या उलट तुमचे जीवन क्षुद्र आपमतलबीपणाने, अविचारी स्वार्थी भावनेने आणि घोर दुष्ट इच्छेने भरलेले असेल तर, तशाच वातावरणात तुम्हाला तुमचा प्रत्येक श्वास घ्यावा लागणार; म्हणजे सतत दु:ख, सततचा असंतोषच तुमच्या वाट्यास येणार; म्हणजे अंतिमत: तुमच्या पदरी नैराश्यच पडणार.

तुम्ही देह-त्याग केलात तर तुमची या वातावरणापासून सुटका होईल असे तुम्ही मानता कामा नये; उलट, देह हा एक प्रकारे अचेतनाचा (unconsciousness) पडदा असल्यासारखा असतो, जो दुःखभोगाची तीव्रता कमी करतो. जडभौतिक प्राणिक जीवनामध्ये (vital life) वावरत असताना जर तुम्ही देहाच्या संरक्षणाविना असाल तर, दुःखभोग हे अधिक तीव्र होतात आणि ज्यामध्ये बदल घडविणेच आवश्यक असते त्यामध्ये बदल घडविण्याची, ज्यामध्ये सुधारणा घडविणे आवश्यक असते त्यामध्ये सुधारणा घडविण्याची, आणि अधिक उच्चतर, अधिक आनंदी व अधिक प्रकाशमय जीवन व चेतना यांच्याप्रत स्वतःला खुले करण्याची संधीही (देह नसल्याने) आता तुमच्यापाशी नसते.

म्हणून तुम्ही तुमचे कार्य येथेच (या पृथ्वीवर असतानाच) करण्याची त्वरा केली पाहिजे; कारण तुम्ही तुमचे कार्य इथेच खऱ्या अर्थाने करू शकता. मृत्युकडून कोणतीही अपेक्षा बाळगू नका. जीवन हीच तुमची मुक्ती आहे. या जीवनात राहूनच तुम्ही स्वतःचे रूपांतरण केले पाहिजे. पृथ्वीवरच तुमची प्रगती होऊ शकते आणि पृथ्वीवरच तुम्हाला साक्षात्कार होऊ शकतो. या देहामध्ये असतानाच तुम्ही विजय संपादन करू शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 197-198)

विचारशलाका १६

ज्या क्षणी तुम्ही समाधान पावून, अभीप्सा बाळगेनासे होता, तेव्हापासून तुम्ही मरणपंथाला लागलेले असता. जीवन ही एक वाटचाल आहे, जीवन हा एक प्रयास आहे; जीवन म्हणजे पुढे चालत राहणे, भावी प्रकटीकरण आणि साक्षात्काराप्रत उन्नत होणे. विश्रांती घेण्याची इच्छा बाळगणे याइतकी दुसरी कोणतीच भयानक गोष्ट नाही.

*

प्रगती हेच पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन आहे. तुम्ही जर प्रगत होत राहणे थांबविलेत तर तुम्ही मृत्युमुखी पडाल. प्रगत न होता जो कोणता क्षण तुम्ही व्यतीत करता, तो प्रत्येक क्षण तुम्हाला स्मशानाच्या एक पाऊल जवळ घेऊन जाणारा असतो.

– श्रीमाताजी [CWM 15 : 75]

पृथ्वीवर जडद्रव्याची जी विशिष्ट परिस्थिती होती त्यामुळे ‘मृत्यू’ अपरिहार्य झाला. अचेतनतेच्या (unconsciousness) प्राथमिक पायरीपासून उत्तरोत्तर चेतनेकडे विकसित होत जाणे हाच जडतत्त्वाच्या उत्क्रांतीचा अर्थ आहे. आणि जेव्हा ही विकासाची प्रक्रिया प्रत्यक्ष घडू लागली तेव्हा या प्रक्रियेत, आकारबंधांचा विलय, विघटन ही एक अटळ अशी आवश्यकता ठरली. सुसंघटित व्यक्ति-चेतनेला एक स्थिर असा आधार मिळावा म्हणून एका निश्चित बांधीव आकाराची गरज होती. आणि असे असूनसुद्धा या आकारबंधाच्या स्थिरतेमुळेच मृत्यू अटळ बनला. जडद्रव्य आकारबद्ध होणेच भाग होते; अन्यथा वैयक्तिकीकरण (पृथकीकरण) (individualisation) होणे आणि प्राणशक्तीला वा चेतनाशक्तीला सघन असे मूर्तरूप येणे अशक्य होते. आणि त्यांच्याविना पार्थिव, जडतत्त्वाच्या पातळीवर पुढे सुसंघटित अस्तित्व निर्माण होण्यास आवश्यक अशा पायाभूत परिस्थितीची उणीव भासली असती. पण निश्चित, घनीभूत अशी घडण होताच एकाएकी त्याच्या ठिकाणी अलवचिकता, कठीणता आणि पाषाणवतता येण्याची प्रवृत्ती आढळून आली. हा पृथक आकारबंध अतिशय बंधनकारक असा साचा बनला; तो शक्तींच्या गतीचे अनुसरण करू शकत नाही; या वैश्विक गतिमानतेशी सुमेळ राखत तो स्वत:मध्ये क्रमश: बदल घडवू शकत नाही; तो प्रकृतीच्या अपेक्षा अखंडपणे भागवू शकत नाही किंवा तिची गती देखील पकडू शकत नाही; तो प्रवाहाबाहेर फेकला जातो. मात्र एका विशिष्ट क्षणी, आकारबंध आणि त्याला चालना देणारी शक्ति या दोहोंमधील वरील प्रकारच्या वाढत्या असमानतेमुळे व विसंवादामुळे त्या आकारबंधाचे संपूर्णत: विलयन, विघटन अटळ होऊन बसते. एक नवीन आकारबंध निर्माण करावयास हवा ज्यामुळे एक नवीन (आकारबंध व त्याला चालना देणारी शक्ती यांमध्ये) सुमेळ आणि समानता शक्य होईल.

हा आहे मृत्युचा खरा अर्थ आणि ही आहे मृत्यूची प्रकृतीमधील उपयुक्तता! पण हा आकारबंध जर का अधिक वेगवान व अधिक लवचिक झाला आणि बदलत्या चेतनेनुरुप स्वत:मध्ये बदल घडविण्याविषयी शरीरातील पेशींना जागृत करता आले तर मूलगामी विघटनाची गरजच उरणार नाही, आणि मृत्यू ही अटळ गोष्ट राहणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 37)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आमच्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AUROMARATHI या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

**

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मानवी अस्तित्वाचे वास्तविक सत्य कोणते? सर्वोच्च ध्येय कोणते ? विश्वाच्या या महान चक्रांमध्ये युगानुयुगे माणसाचा जन्म आणि मृत्यू पुन्हापुन्हा होत राहतो ती म्हणजे एक प्रदीर्घ प्रगती असते; या प्रगतीद्वारे तो स्वतःची तयारी करत असतो आणि अमर्त्यत्वासाठी स्वतःला सुयोग्य बनवत असतो. आणि तो स्वतःला कशा प्रकारे तयार करेल? त्यासाठी योग्य माणूस कोण? मी म्हणजे प्राण आहे आणि मी म्हणजे शरीर आहे या संकल्पनेच्या जो अतीत झाला आहे; जो या जगाचे भौतिक आणि संवेदनात्मक स्पर्श त्यांच्या त्यांच्या मूल्यानुसार स्वीकारत नाही किंवा भौतिक मनुष्याला (Physical man) ते स्पर्श ज्या मोलाचे वाटतात त्या मोलाने जो हे स्पर्श स्वीकारत नाही; जो मी स्वतः आत्मा आहे आणि सर्वजण देखील आत्मे आहेत हे जाणतो, जो स्वतः स्वतःच्या शरीरामध्ये नाही तर, आत्म्यामध्ये राहायला शिकलेला आहे आणि इतरांशी व्यवहार करत असतानादेखील जो त्यांच्याशी भौतिक अस्तित्व म्हणून केवळ व्यवहार करत नाही तर, इतरांबरोबर देखील जो आत्मवत व्यवहार करतो, तो मनुष्य अमर्त्यत्वासाठी योग्य असतो. मृत्युचे अस्तित्व नसणे म्हणजे अमर्त्यत्व असा त्याचा अर्थ नाही. — ज्याला जन्मतः मन मिळालेले आहे अशा प्रत्येक प्राणिमात्राला ही गोष्ट आधीच मिळालेली असते, — परंतु अमर्त्यत्व म्हणजे जन्म आणि मृत्युच्या अतीत असणे. अमर्त्यत्व हे असे एक आरोहण असते की, ज्या आरोहणामुळे मनुष्य, मनो-मार्गदर्शित शरीर (mind-informed body) म्हणून जगणे सोडून देतो आणि अंततः आत्मा म्हणून, परम आत्म्याच्या ठिकाणी जीवन जगतो.

जो कोणी दुःख आणि शोकाच्या अधीन असतो, संवेदना आणि भावना यांचा गुलाम असतो, क्षणभंगुर गोष्टींच्या स्पर्शाने व्याप्त असतो असा कोणीही अमर्त्यत्वासाठी सुयोग्य बनू शकत नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 61-62)

विचार शलाका – ०३

माणूस त्याच्यावरच विजय प्राप्त करून घेऊ शकतो, ज्याला तो घाबरत नाही. आणि जो मरणाला घाबरतो त्याला मृत्युने आधीच पराभूत केलेले असते.

*

मृत्युवर मात करण्यासाठी आणि अमरत्व जिंकून घेण्यासाठी, व्यक्तीने मृत्युला घाबरता कामा नये तसेच त्याची आसही बाळगता कामा नये.

*

आपण प्राप्त करून घेऊ इच्छितो ते आपले साध्य आहे ‘अमरत्व’ ! आणि सर्व सवयींपैकी मृत्यू ही निश्चितपणे सर्वाधिक हटवादी सवय आहे.

*

तू संपूर्ण परित्यागाविषयी बोलत आहेस, पण देहाचा त्याग हा काही संपूर्ण परित्याग नव्हे. ‘अहं’चा त्याग हाच खरा आणि संपूर्ण परित्याग असतो की जो देहत्यागापेक्षा देखील अधिक दुःसाध्य असा प्रयत्न असतो. जर तुम्ही अहंचा परित्याग केला नसेल तर नुसत्या देहत्यागामुळे तुम्हाला मुक्तता मिळणार नाही.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 120), (CWM 15 : 119)

अमर्त्यत्व म्हणजे काय ?

 

अमर्त्यत्व म्हणजे मृत्युनंतर मानसिक व्यक्तिमत्त्व टिकून राहणे नव्हे, (अर्थात तेही खरंच आहे) तर अमर्त्यत्व म्हणजे, शरीर हे ज्याचे केवळ एक साधन असते, एक छाया असते त्या अजन्मा आणि मृत्युहीन असलेल्या आत्म्याचे जागृत आधिपत्य असते. (श्रीअरविंदलिखित या वचनावर भाष्य करताना श्रीमाताजी म्हणतात) …अमर्त्यत्व म्हणजे अनादी आणि अनंत असे जन्मरहित किंवा मृत्युरहित जीवन होय, जे शरीरापासून पूर्णतः स्वतंत्र असते. हे आत्म्याचे जीवन असते, प्रत्येक व्यक्तीच्या मूलभूत अस्तित्वाचे ते जीवन असते आणि ते विश्वात्मक आत्म्यापासून विभक्त नसते. आणि हे जे मूलभूत अस्तित्व असते त्याला आपल्या विश्वात्मक आत्म्याशी असलेल्या एकत्वाची जाण असते; वास्तविक हे अस्तित्व म्हणजे साक्षात या विश्वात्मक आत्म्याचे व्यक्तिरूपाने अभिव्यक्त झालेले व्यक्तिमत्त्व असते आणि त्याला आदी नसतो किंवा अंतही नसतो, त्याला जन्म नसतो, मृत्युही नसतो, ते शाश्वतपणे अस्तित्वात असते आणि ते अमर्त्य असते. आपण जेव्हा या आत्म्याविषयी पूर्णपणे जागृत होतो तेव्हा आपण त्याच्या शाश्वत जीवनामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे आपणही अमर्त्य होतो.

– श्रीमाताजी

(CWM 10 : 27-28)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

मृत्यु अशी कोणती गोष्टच अस्तित्वात नाही, कारण, शरीर नष्ट होते पण शरीर म्हणजे काही मनुष्य नव्हे. जे अस्तित्वविहीन (nonexistent) आहे ते कधीही अस्तित्वात येऊ शकत नाही, तद्वतच जे वस्तुतः अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्व कधीही लोप पावू शकत नाही; ते ज्या माध्यमांतून प्रकट होते त्या माध्यमांची रूपे बदलू शकतात परंतु त्याचे अस्तित्व मात्र लोप पावू शकत नाही. आत्मा असतोच आणि तो कधीही नष्ट होऊ शकत नाही. अस्तित्वात असणे आणि नसणे यामधील विरोध, अस्तित्व (Being) आणि अस्तित्वात येणे (Becoming) यांच्यामधील समतोल हा मनाचा अस्तित्वविषयक दृष्टिकोन असतो; आणि या दृष्टिकोनाचा निरास तेव्हाच होतो जेव्हा आत्मा हाच एकमेव अविनाशी असून, त्याच्याद्वारेच या विश्वाचा विस्तार झाला आहे; हा साक्षात्कार मनाला होतो. समर्याद शरीरांना अंत असतो, परंतु त्याच्यावर ज्याची सत्ता असते, जो या शरीराचा वापर करतो तो (आत्मा) मात्र अनंत, अमर्याद, शाश्वत आणि अविनाशी असतो. मनुष्य ज्याप्रमाणे जीर्ण झालेली वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे परिधान करतो त्याप्रमाणेच तोसुद्धा जुने शरीर त्यजून नवीन देह धारण करतो. आणि यामध्ये दुःख करण्यासारखे, खचून जाण्यासारखे किंवा कोमेजून जाण्यासारखे काय आहे ? हा (आत्मा) जन्माला येत नाही किंवा तो मरतही नाही; जी एकदाच अस्तित्वात येते आणि ती निघून गेली तर पुन्हा अस्तित्वातच येणार नाही, अशी काही ही गोष्ट नाही. ती गोष्ट अजन्मा, पुरातन आणि शाश्वत आहे; शरीराच्या हत्येने तिची हत्या होत नाही. अमर्त्य आत्म्याची हत्या कोण करू शकेल ? शस्त्रांनी त्याचा छेद करता येत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही किंवा पाणी त्याला बुडवू शकत नाही किंवा वारा त्याला सुकवू शकत नाही. शाश्वतपणे स्थिर, अविचल, सर्वव्यापी असणारा तो आत्मा सदैव, अगदी नेहमीच अस्तित्वात असतो. शरीराप्रमाणे तो व्यक्त होत नाही पण सर्व व्यक्ताहून तो अव्यक्त आत्मा श्रेष्ठ आहे. विचारांनी त्याचे विश्लेषण करता येत नाही तरीही समग्र मनापेक्षा तो महान असतो; जीवन, त्याची अंगे आणि जीवनाच्या विषयांप्रमाणे आत्म्यामध्ये परिवर्तन आणि फेरबदल होणे शक्य नसते; परंतु, तो मन, प्राण आणि शरीराच्या परिवर्तनापलीकडचा असूनही, हे सर्व जण जिचे आकलन करून घेण्यासाठी धडपड करत असतात अशी ती एक सद्वस्तु असते.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 62-63)

अमर्त्यत्वासंबंधी गीतेची शिकवण

आपण सारे एकच आत्मा आहोत, आपण तो ईश्वर आहोत, आपल्या आकलनापलीकडे असणारे अद्भुत असे म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो, त्याच्याविषयी बोलतो, त्याच्याविषयी ऐकतो. आपण कितीही धडपड केली, शोध घेतला, ज्ञानी माणसांकडून ज्ञान ग्रहण केले आणि ज्ञान प्राप्त झाले असे घोषित केले तरीही कोणत्याच मानवी मनाला त्या परमतत्त्वाचे (Absolute) कधीच आकलन झालेले नाही. शरीराचा स्वामी असणारे ते परमतत्त्व, या विश्वाद्वारे झाकलेले आहे; सर्व जीवन ही केवळ त्याची पडछाया आहे; आत्म्याचे शारीरिक आविष्कारामध्ये येणे आणि मृत्युद्वारे निघून जाणे ही आत्म्याच्या अनेक गतिविधींपैकी केवळ एक किरकोळ गतिविधी आहे…

एकच गोष्ट सत्य आहे आणि त्यामध्येच आपल्याला जगायचे आहे, ते ‘शाश्वत तत्त्व’ स्वत:च्या तीर्थयात्रेच्या महान चक्रामध्ये मनुष्याचा आत्मा म्हणून स्वतःला आविष्कृत करत असते, त्या आत्म्याच्या या तीर्थयात्रेमध्ये जन्म आणि मृत्यू हे मैलाचे दगड असतात, पलीकडील विश्वं ही त्याची विश्रांतीची ठिकाणे असतात, त्यांच्या सहित तो प्रवास करत असतो. जीवनातील सर्व सुखदुःखाची परिस्थिती ही आपल्या प्रगतीची, युद्धाची, विजयाची साधने असतात, या साधनांसहित तो प्रवास करत असतो. आणि ‘अमर्त्यत्वा’सहित तो आत्मा आपल्या स्व-गृहाकडे प्रवास करत असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 19 : 63-64)