Tag Archive for: व्यावहारिक जीवन

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले. त्याचा हा उत्तरार्ध…)

जीवनाकडून जेव्हा तुम्हाला एखादा जबरदस्त दणका बसतो, ज्याला लोकं दुर्दैव असं म्हणतात, त्या परिस्थितीत व्यक्ती प्रथम काय करते? तर, ती परिस्थिती विसरण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. वाट्याला आलेल्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती हर तऱ्हेच्या गोष्टी करत राहते. जेव्हा एखादी गोष्ट अगदी दुःखद असते तेव्हा ती स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवू पाहते आणि त्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी करत राहते. अशी व्यक्ती चेतना उन्नत करण्याऐवजी चेतना निम्न पातळीवर उतरवते.

तुमच्याबाबतीत जर एखादी अत्यंत क्लेशदायक गोष्ट घडली तर तेव्हा नुसते सुन्न होऊन बसू नका आणि अचेतनेच्या गर्तेमध्ये जाऊ नका, तर ते दु:ख विसरण्याऐवजी, त्या दुःखाच्या थेट मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तेथे, त्या दुःखाच्या पाठीमागे दडून असलेल्या प्रकाश, सत्य, सामर्थ्य आणि हर्ष या गोष्टी सापडतील. परंतु त्यासाठी तुम्ही दृढ राहिले पाहिजे आणि तुमची घसरण होऊ देता कामा नये.

अशा प्रकारे, जीवनातील प्रत्येक घटना, मग ती लहान असो की मोठी, प्रगती करण्याची ती एक उत्तम संधी ठरू शकते. एवढेच काय पण, घटनांचा लाभ कसा करून घ्यायचा हे तुम्हाला माहीत असेल तर जीवनातील अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा तुम्हाला अगदी साक्षात्कारपर्यंत घेऊन जाऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

 

व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा येतो. प्रगती करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आलो आहोत. प्रगतीविना हे जीवन किती कंटाळवाणे होऊन जाईल! बरेचदा जीवन एकसुरी, नीरस असते. त्यामध्ये काही मजाच नसते. ते बरेचदा सुंदरही नसते. परंतु तुम्ही त्या जीवनाकडे जर प्रगती करण्याचे क्षेत्र म्हणून पाहिलेत तर मग मात्र प्रत्येक गोष्ट बदलून जाते, प्रत्येक गोष्ट स्वारस्यपूर्ण बनते आणि मग कंटाळा या गोष्टीला जागाच राहत नाही.

पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा काहीच न करता वेळ वाया घालवण्यापेक्षा हा कंटाळा कशामुळे येत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुमच्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल आणि तुम्ही खरोखरच (कंटाळा म्हणजे नक्की काय हे) समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकरच असे लक्षात येईल की, जणू एक प्रकारचा चमत्कार झाला आहे आणि आता तुम्हाला कंटाळवाणे वाटत नाहीये. हा उपाय प्रत्येक गोष्टीबाबतच लागू पडतो.

कधीकधी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टच उदासवाणी, कंटाळवाणी, वेडेपणाची वाटू लागते. त्याचा अर्थ असा की तुम्हीदेखील त्या परिस्थितीइतकेच कंटाळवाणे झाला आहात आणि त्यातून हे दर्शविले जाते की, तुम्ही तेव्हा प्रगती करत नसता. ही कंटाळवाणेपणाची जणू एक लाट असते. या कंटाळवाणेपणासारखी, आपल्या जीवनाच्या प्रयोजनाशी विरोधी असणारी अशी अन्य कोणतीच गोष्ट असू शकत नाही. अशा वेळी तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “मला आलेल्या या कंटाळ्याचा अर्थ असा आहे की, मला काहीतरी नवीन शिकले पाहिजे, मी माझ्यामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे, माझ्यामधील जडत्वावर विजय मिळविला पाहिजे, माझ्यातील एखाद्या दुर्बलतेवर मी मात केली पाहिजे.”

कंटाळा ही चेतनेची सुस्ती असते. त्यावरील उपाय तुम्ही तुमच्या स्वतःमध्येच शोधण्याचा प्रयत्न केलात तर, तो कंटाळा त्वरित नाहीसा होऊन जाईल. बरेचदा लोकांना जेव्हा कंटाळवाणे वाटते तेव्हा चेतनेमध्ये एक पायरी उन्नत होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते एक पायरी खाली घसरतात. ते आधी जिथे होते त्यापेक्षाही अजून एक पायरी खाली उतरतात आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहतात, त्यांचा कंटाळवाणेपणा घालविण्यासाठी ते काहीतरी अचकटविचकट गोष्टी करत राहतात. आपले मनोरंजन करण्याच्या नावाखाली ते स्वतःला एका धुंदीमध्ये, नशेमध्ये बुडवून टाकतात; स्वतःची तब्येत बिघडवून घेतात आणि मेंदू मृतवत करून टाकतात; विचारशक्ती गमावून बसतात. स्वतःचे असे पतन करण्याऐवजी जर त्यांनी स्वतःचे उन्नयन केले तर, त्यांनी प्रगती करण्याच्या या संधीचा सदुपयोग केला असे म्हणता येईल.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

(आपण कालच्या भागात अन्नाव्यतिरिक्त उपलब्ध असणाऱ्या एका ऊर्जास्रोताचा विचार केला. आज आता अविनाशी असणाऱ्या दुसऱ्या ऊर्जास्रोताचा विचार करू या.)

आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की, ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच संपुष्टात येत नाही. ही ऊर्जा आध्यात्मिक ऊर्जा असते आणि ती अचेतनेच्या (inconscient) गर्तेमधून, निम्न स्तरावरून प्राप्त केली जात नाही तर, ती वरून म्हणजे मनुष्यमात्रांचे आणि या विश्वाचे परमोच्च उगमस्थान असलेल्या स्थानापासून, म्हणजे अतिचेतनाच्या (superconscient) सर्व-शक्तिमान आणि शाश्वत वैभवाकडून प्राप्त होते. ती आपल्या अवतीभोवती सर्वत्र असते, ती प्रत्येक वस्तुमध्ये झिरपत असते. तिच्या संपर्कात येण्यासाठी व ती ग्रहण करण्यासाठी तिच्याविषयी अगदी प्रामाणिकपणे आस बाळगणे आणि श्रद्धेने व विश्वासाने तिच्याप्रत खुले होणे, तसेच स्वतःची चेतना विशाल करणे आणि वैश्विक चेतनेशी तादात्म्य पावणे, एवढेच पुरेसे असते.

सुरुवातीला, ही गोष्ट अगदी अशक्यप्राय नाही, पण अतिशय अवघड वाटू शकते. परंतु बारकाईने या गोष्टीचा विचार केला तर व्यक्तीला असे आढळते की, ही गोष्ट वाटते तेवढी अशक्य नाही, किंवा सामान्यत: विकसित असलेल्या मानवी चेतनेपासून ती फार दूरही नाही. आपण सद्यस्थितीत जिथे आहोत त्यापेक्षा काहीसे वर उचलले गेलो आहोत आणि एक प्रकारची अनपेक्षित व असाधारण शक्ती आपल्यामध्ये आली आहे, आपण अशक्यप्राय गोष्टसुद्धा करू शकत आहोत, असा अनुभव बहुधा सर्वांनाच कधी ना कधी तरी आयुष्यात आलेला असतो, किमान एकदा तरी असा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो. खरोखर, ज्यांना असा अनुभव कधीच आलेला नाही अशा फारच थोड्या व्यक्ती असतील. आयुष्यातील अशा ज्या घटिका असतात त्या वेळी व्यक्तीला कोणतीच गोष्ट अवघड वाटत नाही; त्यावेळी ‘अशक्य’ या शब्दाला जणू काही अर्थच उरलेला नसतो. हा अनुभव अगदी कितीही क्षणिक असला तरी त्यामधून, योगसाधनेद्वारे व्यक्ती कोणत्या प्रकारच्या उच्चतर शक्तीच्या संपर्कात येऊ शकते याची झलक व्यक्तीला मिळते.

अर्थात, हा संपर्क कसा साधायचा याची पद्धती येथे सांगत बसणे कठीण आहे. शिवाय, ही गोष्ट व्यक्तिगत असते आणि ती प्रत्येक व्यक्तिगणिक भिन्न असते. व्यक्ती सद्यस्थितीत जेथे असते तेथपासून त्या पद्धतीची सुरुवात होते आणि ती पद्धती त्या व्यक्तीच्या वैयक्तिक गरजांनुसार स्वतःमध्ये बदल करते आणि व्यक्तीचे एक पाऊल पुढे पडावे यासाठी तिला साहाय्य करते. कधीकधी हा मार्ग काहीसा दीर्घ आणि संथ असतो परंतु या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी व्यक्तीने जे कष्ट घेतले होते ते मोलाचे होते हे, त्याच्या परिणामांवरून व्यक्तीच्या लक्षात येते.

प्रकाशमान विशुद्धतेमध्ये सर्व-शक्तिमान असणाऱ्या, ऊर्जेच्या या अमर्याद स्रोताकडून, सर्व परिस्थितीमध्ये, स्वतःच्या इच्छेनुसार ऊर्जा संपादन करणाऱ्या या शक्तीच्या परिणामांची आपण अगदी सहजतेने कल्पना करू शकतो. काळजी, थकवा, आजारपण, वार्धक्य आणि एवढेच काय पण, अगदी मृत्युसुद्धा या मार्गावरचा केवळ एक अडथळा असतो आणि सातत्यपूर्ण संकल्पशक्तीद्वारे त्यावर निश्चितपणे मात केली जाऊ शकते.

• श्रीमाताजी (CWM 12 : 262)

 

(पूर्वार्ध)

जोपर्यंत माणसं आणि हे जग आत्ता जसं आहे तसंच राहील तोपर्यंत, ऊर्जा मिळविण्यासाठी अन्न हा एक अगदी अपरिहार्य असा घटक असणार आहे. ऊर्जा मिळविण्याचे इतर मार्गदेखील योगशास्त्राला ज्ञात आहेत आणि त्यापैकी दोन महत्त्वाच्या मार्गांचा विचार आपण येथे करणार आहोत.

पार्थिव जडभौतिक जगतामध्ये असलेल्या ऊर्जा-साठ्याच्या संपर्कात यायचे आणि या अक्षय ऊर्जास्रोतामधून मुक्तपणे ऊर्जा संपादन करायची हा त्यातील पहिला मार्ग आहे. या भौतिक ऊर्जा अंधकारमय व अर्ध-चेतन असतात आणि त्या मनुष्यामधील पशुत्व वाढीस लावतात, (हे खरे आहे.) मात्र त्याच वेळी त्या मानव आणि जडभौतिक प्रकृती यांच्यामध्ये एक प्रकारचे सुसंवादाचे नाते प्रस्थापित करत असतात. या ऊर्जा कशा ग्रहण करायच्या आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हे ज्यांना माहीत असते अशा व्यक्ती ज्या गोष्टी हाती घेतील त्यामध्ये आणि जीवनामध्ये सहसा यशस्वी होतात. परंतु त्यासाठी त्या व्यक्ती त्यांच्या आरोग्यपूर्ण स्थितीवर आणि जीवनमानावर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असतात. पण मानव आणि जडभौतिक प्रकृती यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण झालेला असला तरी, हा सुसंवाद त्या व्यक्तींचे सर्वच आघातांपासून संरक्षण करू शकतो, असे नाही. परिस्थिती जेव्हा प्रतिकूल होते तेव्हा सहसा ही प्रतिकारक्षमता नाहीशी होते.

लहान मूल अगदी सहजपणाने जडभौतिक प्रकृतीमधून ऊर्जा ग्रहण करते. कारण ते कोणताही हिशोब न करता, आनंदाने व मुक्तपणाने त्या ऊर्जा वापरत असते. परंतु तेच मूल वयाने जसजसे वाढत जाते तसतशी त्याच्यामधील ऊर्जा ग्रहण करण्याची ही क्षमता जीवनातील चिंतांमुळे कमी होत जाते. नंतर मग त्याच्या चेतनेमधील बहुतांश जागा मानसिक गतिविधींनी व्यापलेली असते आणि त्याचा परिणाम म्हणून ही क्षमता क्षीण होऊन जाते. तथापि, आणखी एक अशा प्रकारचा ऊर्जास्रोत असतो की ज्याचा एकदा शोध लागला की मग बाह्य परिस्थिती किंवा जीवनाची भौतिक परिस्थिती कशीही असली तरी तो स्रोत कधीच आटत नाही. (उत्तरार्ध उद्या…)

• श्रीमाताजी (CWM 12 : 261-262)

 

तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि विकसित होण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रगती करणे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता तिने सातत्याने अधिकाधिक परिपूर्ण करत नेणे आणि विकसित होत जाणे म्हणजे स्वतःच्या क्षमता व स्वतःचे सामर्थ्य सतत वाढवत नेणे.

व्यक्तीचे वय वाढले आहे म्हणजे ती आता वृद्ध झाली आहे असे समजणे चुकीची आहे. व्यक्ती जर अक्षम झाली असेल किंवा ती प्रगती करण्यास आणि विकसित होण्यास नकार देत असेल तरच ती वृद्ध होते. वीस वर्षांची म्हातारी माणसं आणि सत्तर वर्षांची काही तरुण माणसं मला माहीत आहेत. जीवनात आता आपण स्थिरस्थावर व्हावे आणि तरुणवयात केलेल्या कष्टांची फळे चाखावीत असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; करण्यासारखे जे काही होते ते आता करून झाले आहे आणि जे काही साध्य करायचे होते ते आता साध्य झाले आहे, असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; थोडक्यात म्हणजे, व्यक्ती परिपूर्णत्वाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे किंवा प्रगती करण्याचे ज्या क्षणी थांबविते त्या क्षणीच तिची परागती आणि तिचे वार्धक्य निश्चित झालेले असते.

व्यक्तीला जर खरी पद्धत गवसली असेल आणि तिच्या शरीराला योग्य रितीने प्रशिक्षित करण्यात आले असेल तर, शरीराची प्रगती करत राहण्यास किंवा शरीराच्या सामर्थ्यामध्ये वाढ करत नेण्यास कोणतीच सीमा नसते, हे व्यक्ती स्वतःच्या शरीराला शिकवू शकते. आपण इथे (श्रीअरविंद आश्रमात) ज्या गोष्टींवर प्रयोग करू इच्छितो त्यांपैकी हा एक प्रयोग आहे. आपल्याला वार्धक्याबद्दलच्या प्रचलित असणाऱ्या सर्व प्रकारच्या सामूहिक समजुती मोडीत काढायच्या आहेत आणि मानवी क्षमता कल्पनातीत प्रमाणात विस्तारता येतात, याचा आदर्श जगापुढे ठेवायचा आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 257)

 

श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला जर मागे रेंगाळत राहिलेले पांथस्थ होऊन जगायचे नसेल तर, वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत तारुण्याचा तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 12 : 211-212)

 

भावी काळ हा तरुणांचा आहे. सद्यस्थितीत, एक नूतन व युवा जग आकाराला येत आहे आणि त्याची निर्मिती तरुणांनीच केली पाहिजे. हे जग जसे नूतन आहे तसेच ते सत्य, धैर्य, न्याय, उदात्त आकांक्षा आणि निखालस परिपूर्तीचे सुद्धा आहे. आपण असे जग निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

भ्याड लोकांना किंवा जे स्वतःच्या स्वार्थासाठी धडपडत आहेत अशा लोकांना किंवा नुसत्या वाचाळवीरांना, म्हणजे जे आरंभशूर असतात आणि त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या अनुयायांना जे तसेच गर्तेत सोडून देतात अशा लोकांना, भावी घडामोडीच्या काळामध्ये कोणताही थारा नाही.

ज्या पायावर राष्ट्राचे भवितव्य उभारले जाऊ शकते तो एकमेव पाया म्हणजे धाडसी, मोकळे, प्रांजळ, शुद्ध अंतःकरणाचे, धैर्यशील आणि आकांक्षा बाळगणारे तरुण.

– श्रीअरविंद (CWSA 08 : 168)

 

प्रामाणिकपणा, विनम्रता, चिकाटी आणि प्रगतीसाठी असणारी दुर्दम्य तृष्णा या गोष्टी आनंदी व सफल जीवनासाठी आवश्यक असतात. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते आणि ती म्हणजे, प्रगतीच्या अगणित शक्यता असतात, याची व्यक्तीला खात्री असली पाहिजे. प्रगती म्हणजे तारुण्य. व्यक्ती अगदी शंभर वर्षांची असतानादेखील तरुण असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 16 : 431)

 

तुम्ही तरुण मुलं म्हणजे देशाची आशा आहात आणि या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही स्वतःला घडविले पाहिजे.

*

एका गोष्टीबाबत तुम्ही निश्चितपणे खात्री बाळगू शकता आणि ती गोष्ट म्हणजे, तुमचे भवितव्य तुमच्या हाती आहे. तुम्ही जसे असावे असे तुम्हाला वाटते तसे तुम्ही व्हाल. तुमचा आदर्श, तुमची आकांक्षा जेवढी अधिक उच्च असेल तेवढे त्याचे प्रत्यक्षीकरण अधिक उच्च असेल. मात्र त्यासाठी तुम्ही दृढ निश्चय केला पाहिजे आणि तुमच्या जीवनाचे खरे ध्येय तुम्ही कधीही विसरता कामा नये.

*

तरुण असणे म्हणजे भविष्यामध्ये जीवन जगणे.
आपण जे बनायला हवे तसे बनण्यासाठी, आपण सद्यस्थितीत जे आहोत त्याचा त्याग करण्याची नेहमी तयारी ठेवणे म्हणजे तरुण असणे.
अमुक एखाद्या गोष्टीमध्ये कदापिही सुधारणा होणे शक्य नाही, असा विचार मनाला कधीही न शिवणे म्हणजे तरुण असणे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 122)

 

शिक्षिका : शाळेला लागलेली सुट्टी व्यतीत करण्याचा उत्तम मार्ग कोणता असे विद्यार्थी मला विचारत होते. त्यांना काय सांगावे?

श्रीमाताजी : मुलांना असे सांगावे की, स्वतःच्या आवडीचे एखादे काम करण्यासाठी किंवा काहीतरी नवीन शिकण्यासाठी किंवा त्यांच्या प्रकृतीमध्ये किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये एखादी कमतरता, एखादी उणीव असेल तर त्यावर मात करण्यासाठी सुट्टी म्हणजे एक चांगली संधी असते. त्यांनी अगदी मोकळेपणाने एखादा उपक्रम हाती घ्यायला हरकत नाही, त्याच्या माध्यमातून त्यांना स्वतःमधील काही क्षमतांचा शोध लागण्याचीसुद्धा शक्यता असते; त्यादृष्टीने ही एक चांगली संधी असते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 356)