Tag Archive for: प्रगती

(एका साधकाला स्वप्नामध्ये जे दिसले आहे त्यावरून दिव्य प्रकाश स्वीकारण्यासाठी तो सक्षम आहे असे दिसते, असे श्रीअरविंदांनी येथे म्हटले आहे. त्या साधकाला उद्देशून पत्रामध्ये काय मजकूर लिहावा ते श्रीअरविंद साहाय्यकाला सांगत आहेत.)

तुम्ही ‘क्ष’ ला असे सांगू शकता की, योगसाधनेमध्ये मुख्यत्वे करून दोन पायऱ्या असतात. एक असते पूर्वतयारीची पायरी आणि दुसरी पायरी म्हणजे प्रत्यक्ष तीव्र, उत्कट साधना. त्याने पहिल्या पायरीपासून सुरुवात करण्यास हरकत नाही असे त्याला कळवावे.

पहिल्या पायरीवर असताना, हृदयामध्ये प्रार्थनेसह अभीप्सा, भक्ती, ध्यान, जीवन ईश्वरार्पण करण्याचा संकल्प या गोष्टी महत्त्वाच्या असतात. प्रकृतीचे शुद्धीकरण हे पहिले उद्दिष्ट असले पाहिजे. आध्यात्मिक अनुभव यावेत यासाठी अति-आतुरता, उतावीळपणा असता कामा नये. मात्र जे अनुभव येतील त्यांचे निरीक्षण केले पाहिजे. योग्य दृष्टिकोनासाठी आणि खऱ्या उन्नतीसाठी जर ते अनुभव उपयोगी पडणारे असतील तर त्यांचा स्वीकार केला पाहिजे. पण ज्यामुळे अहंकार कुरवाळला जाईल किंवा पोसला जाईला अशा सर्व गोष्टींना (जाणीवपूर्वक) नकार दिला पाहिजे.

प्रगती संथगतीने होत असली किंवा मार्गामध्ये अनेक अडचणी आल्या तरीसुद्धा (साधकामध्ये) अधीरता असता कामा नये. त्याने सर्व गोष्टी ‘दिव्य मातेवर’ पूर्ण भरवसा ठेवून आणि स्थिरचित्ताने व धीराने केल्या पाहिजेत. हा कालावधी साधकाच्या क्षमतेची आणि ईश्वराप्रति असलेल्या त्याच्या अभीप्सेच्या प्रामाणिकपणाची कसोटी घेणारा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 35 : 551)

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

व्यक्तीमध्ये दिव्य शक्तीचे अवतरण हे सहसा, त्या व्यक्तीच्या प्रकृतीवर कार्य करण्यासाठी आणि हृदयामध्ये ईश्वरी उपस्थितीची जाणीव व्हावी या दृष्टीने व्यक्तीची तयारी करून घेण्यासाठी होत असते. जे अवतरित होणार आहे ते धारण करता यावे यासाठी आधी मानवी प्रकृतीमधील बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते. व्यक्तीचे मन अक्षम असते; ते सीमित, मर्यादित असते. व्यक्तीच्या हृदयामध्ये आणि इतर घटकांमध्ये पुरेशी विशुद्धता नसते, त्यांच्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता असते. (यासारख्या अनेक गोष्टींमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते.) होणारे अवतरण धारण करण्यासाठी अविचल मन आणि विशुद्ध हृदय यांची आवश्यकता असते.

आणि म्हणूनच ‘क्ष’ या साधिकेला तिच्यामध्ये असलेली अस्वस्थता जाणवत आहे, तिला तिच्या अक्षमतेची जाणीव होत आहे. हा असा अनुभव बहुतेक सगळ्यांनाच येतो. तिला प्रगतीसाठी जर पुढची वाटचाल करायची असेल तर तिने तिच्या मानसिक व भावनिक अस्तित्वामध्ये स्थिरता, शांती, विशुद्धता इत्यादी गोष्टींची आस बाळगली पाहिजे आणि तिच्यामध्ये ज्या गोष्टींचे अवतरण होत आहे त्या गोष्टी स्थिरस्थावर होऊ दिल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 488)

 

मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने शासित झालेल्या विचारांच्या, बोधाच्या, संवेदनांच्या, भावनांच्या, इच्छावासनांच्या, उपभोगांच्या, कृतींच्या गोळाबेरजेतून झालेली असते. या सर्व गोष्टी बहुतांशी रूढ झालेल्या आणि स्वतःहून पुनरावृत्त होणाऱ्या असतात. त्यातील काही गोष्टीच फक्त गतिशील आणि स्व-विकसित होणाऱ्या असतात, पण (कशाही असल्या तरी) त्या सर्वच्या सर्व गोष्टी पृष्ठवर्ती अहंभोवती केंद्रित झालेल्या असतात. या सर्व कृतींच्या गतिविधींची गोळाबेरीज होऊन, सरतेशेवटी त्यातून आंतरिक वृद्धी होते. या जीवनामध्ये ही वृद्धी अंशतःच दृष्टोत्पत्तीस येते आणि कार्यकारी होते. काही प्रमाणात तिच्यामध्ये येथील जीवनानंतरच्या अनेक जीवनांमधील प्रगतीचे बीज सामावलेले असते.

सचेत जिवाची (conscious being) ही वृद्धी, हा विस्तार, चढतेवाढते आत्म-आविष्करण, जिवाच्या घटकांचा अधिकाधिक सुसंवादी विकास, हा मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ आहे आणि संपूर्ण गाभा आहे.

विचार, संकल्प, भावभावना, इच्छावासना, कृती आणि अनुभव यांद्वारे होणाऱ्या चेतनेच्या या अर्थपूर्ण विकसनासाठी आणि सरतेशेवेटी परमोच्च दिव्य आत्मशोधाकडे घेऊन जाण्यासाठी, मनुष्य – मनोमय पुरुष हा या जडभौतिक देहामध्ये प्रविष्ट झाला आहे. बाकी सर्व गोष्टी या एकतर त्यास साहाय्यकारी असतात किंवा त्या गौण असतात; अन्यथा एकतर त्या आनुषंगिक असतात किंवा मग निरुपयोगी असतात. ज्या गोष्टी टिकून राहतात आणि मनुष्याच्या प्रकृतीच्या विकासासाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी, त्याच्या प्रगमनशील प्रकटीकरणासाठी आणि त्याच्या आत्म्याच्या व चैतन्याच्या शोधासाठी साहाय्यकारी ठरतात फक्त तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 89-90)

 

साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का की, ज्या दिशेने ही सृष्टी मार्गक्रमण करत आहे?

श्रीमाताजी : हे विश्व म्हणजे शाश्वतपणे स्वतःला उलगडवत नेणारी एक प्रक्रिया आहे. त्याचे अमुक एखादे अंतिम गंतव्य किंवा अमुक एखादे ध्येय आहे अशी कोणती एकच एक गोष्ट तुम्ही निर्धारित करू शकत नाही. परंतु एखादी कृती किंवा कार्य करण्याच्या दृष्टीने आणि हे किंवा ते आमचे ध्येय आहे, असे सांगता येण्यासाठी, स्वयमेव अनंत असलेल्या या प्रक्रियेचे आपल्याला काही भाग करावे लागतात. कार्य करत असताना, ज्यावर आपण आपले लक्ष्य निर्धारित करू शकू अशी एखादी गोष्ट उद्दिष्ट म्हणून आवश्यक असते.

चित्र काढत असताना त्याची मांडणी, रंगसंगती यांची निश्चित अशी काही योजना तुमच्याकडे असणे गरजेचे असते. तुम्हाला जे चित्र काढायचे आहे त्यासाठी काही सीमा आखून घेणे आणि ते एका निश्चित चौकटीमध्ये बसविणे आवश्यक असते. मात्र ती सीमा काल्पनिक, आभासी (illusory) असते; ती चौकट हा निव्वळ एक संकेत असतो. चित्रामध्ये नेहमीच कोणत्याही विशिष्ट चौकटीच्या पलीकडे विस्तारित होत जाणारे एक सातत्य असते. आणि चौकटींच्या अनंत मालिकांमध्ये, त्याच परिस्थितीत ते सातत्य चित्रित करता येणे शक्य असते.

आपण म्हणतो की, आमचे हे ध्येय आहे किंवा ते ध्येय आहे परंतु आपल्याला हे ज्ञात असते की, आपले हे ध्येय म्हणजे त्याच्या पलीकडे असणाऱ्या आणखी दुसऱ्या ध्येयाची सुरुवात असते. आणि ते दुसरे ध्येयसुद्धा आपल्याला आणखी एका तिसऱ्या ध्येयाकडे घेऊन जाणार असते. ही मालिका नेहमीच विकसित होत राहते आणि कधीही थाबंत नाही.

– श्रीमाताजी (CWM 03 : 31-32)

 

प्रगती करण्याची व विकसित होण्याची क्षमता नसणे ही गोष्ट नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक असते आणि त्यालाच खऱ्या अर्थाने ‘वृद्धत्व’ म्हणता येईल. ज्या क्षणी तुम्ही ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगती करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही (आलेल्या अनुभवातून) बोध घेणे अथवा प्रगल्भ होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रूपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध होता; म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा उतरणीचा प्रवास सुरू झालेला असतो. असे काही तरुण असतात, की जे (वर उल्लेख केलेल्या दृष्टिकोनातून पाहता) वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे (खरे तर) तरुण असतात.

तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्योत बाळगलीत; तुम्ही जागरूकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, सर्व गोष्टी मागे टाकण्याची तयारी ठेवलीत; तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रूपांतरणासाठी नेहमीच खुले राहिलात, तर तुम्ही चिरंतन तरुण राहाल. मात्र तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये संतुष्ट होऊन आरामशीर बसलात; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखायची अशी जर तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच असते जर्जरता आणि खरेतर, हाच असतो मृत्यू. जे करायचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते. गतायुष्याकडे पाहू नका. नेहमी पुढे पाहा आणि नेहमी पुढेच चालत राहा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 238)

(कंटाळा आला तर त्याचा प्रगतीसाठी कसा उपयोग करून घेतला पाहिजे हे आपण कालच्या भागात पाहिले. त्याचा हा उत्तरार्ध…)

जीवनाकडून जेव्हा तुम्हाला एखादा जबरदस्त दणका बसतो, ज्याला लोकं दुर्दैव असं म्हणतात, त्या परिस्थितीत व्यक्ती प्रथम काय करते? तर, ती परिस्थिती विसरण्याचा व्यक्ती प्रयत्न करते. वाट्याला आलेल्या परिस्थितीचा विसर पडावा म्हणून ती हर तऱ्हेच्या गोष्टी करत राहते. जेव्हा एखादी गोष्ट अगदी दुःखद असते तेव्हा ती स्वत:चे लक्ष दुसरीकडे वळवू पाहते आणि त्या नावाखाली मूर्खपणाच्या गोष्टी करत राहते. अशी व्यक्ती चेतना उन्नत करण्याऐवजी चेतना निम्न पातळीवर उतरवते.

तुमच्याबाबतीत जर एखादी अत्यंत क्लेशदायक गोष्ट घडली तर तेव्हा नुसते सुन्न होऊन बसू नका आणि अचेतनेच्या गर्तेमध्ये जाऊ नका, तर ते दु:ख विसरण्याऐवजी, त्या दुःखाच्या थेट मुळाशी जाण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तेथे, त्या दुःखाच्या पाठीमागे दडून असलेल्या प्रकाश, सत्य, सामर्थ्य आणि हर्ष या गोष्टी सापडतील. परंतु त्यासाठी तुम्ही दृढ राहिले पाहिजे आणि तुमची घसरण होऊ देता कामा नये.

अशा प्रकारे, जीवनातील प्रत्येक घटना, मग ती लहान असो की मोठी, प्रगती करण्याची ती एक उत्तम संधी ठरू शकते. एवढेच काय पण, घटनांचा लाभ कसा करून घ्यायचा हे तुम्हाला माहीत असेल तर जीवनातील अगदी बारीकसारीक गोष्टसुद्धा तुम्हाला अगदी साक्षात्कारपर्यंत घेऊन जाऊ शकते.

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

 

व्यक्ती तरुण असो किंवा वृद्ध असो, तिने जर प्रगती केली नाही तर तिला कंटाळा येतो. प्रगती करण्यासाठीच आपण या पृथ्वीवर आलो आहोत. प्रगतीविना हे जीवन किती कंटाळवाणे होऊन जाईल! बरेचदा जीवन एकसुरी, नीरस असते. त्यामध्ये काही मजाच नसते. ते बरेचदा सुंदरही नसते. परंतु तुम्ही त्या जीवनाकडे जर प्रगती करण्याचे क्षेत्र म्हणून पाहिलेत तर मग मात्र प्रत्येक गोष्ट बदलून जाते, प्रत्येक गोष्ट स्वारस्यपूर्ण बनते आणि मग कंटाळा या गोष्टीला जागाच राहत नाही.

पुढच्या वेळी जेव्हा कधी तुम्हाला कंटाळा येईल तेव्हा काहीच न करता वेळ वाया घालवण्यापेक्षा हा कंटाळा कशामुळे येत आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यातही तुमच्याकडे जर निरीक्षण क्षमता असेल आणि तुम्ही खरोखरच (कंटाळा म्हणजे नक्की काय हे) समजून घ्यायचा प्रयत्न केलात तर तुम्हाला लवकरच असे लक्षात येईल की, जणू एक प्रकारचा चमत्कार झाला आहे आणि आता तुम्हाला कंटाळवाणे वाटत नाहीये. हा उपाय प्रत्येक गोष्टीबाबतच लागू पडतो.

कधीकधी काही विशिष्ट परिस्थितीमध्ये, प्रत्येक गोष्टच उदासवाणी, कंटाळवाणी, वेडेपणाची वाटू लागते. त्याचा अर्थ असा की तुम्हीदेखील त्या परिस्थितीइतकेच कंटाळवाणे झाला आहात आणि त्यातून हे दर्शविले जाते की, तुम्ही तेव्हा प्रगती करत नसता. ही कंटाळवाणेपणाची जणू एक लाट असते. या कंटाळवाणेपणासारखी, आपल्या जीवनाच्या प्रयोजनाशी विरोधी असणारी अशी अन्य कोणतीच गोष्ट असू शकत नाही. अशा वेळी तुम्ही प्रयत्नपूर्वक स्वतःला असे सांगितले पाहिजे की, “मला आलेल्या या कंटाळ्याचा अर्थ असा आहे की, मला काहीतरी नवीन शिकले पाहिजे, मी माझ्यामध्ये काहीतरी प्रगती केली पाहिजे, माझ्यामधील जडत्वावर विजय मिळविला पाहिजे, माझ्यातील एखाद्या दुर्बलतेवर मी मात केली पाहिजे.”

कंटाळा ही चेतनेची सुस्ती असते. त्यावरील उपाय तुम्ही तुमच्या स्वतःमध्येच शोधण्याचा प्रयत्न केलात तर, तो कंटाळा त्वरित नाहीसा होऊन जाईल. बरेचदा लोकांना जेव्हा कंटाळवाणे वाटते तेव्हा चेतनेमध्ये एक पायरी उन्नत होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, ते एक पायरी खाली घसरतात. ते आधी जिथे होते त्यापेक्षाही अजून एक पायरी खाली उतरतात आणि मूर्खपणाच्या गोष्टी करत राहतात, त्यांचा कंटाळवाणेपणा घालविण्यासाठी ते काहीतरी अचकटविचकट गोष्टी करत राहतात. आपले मनोरंजन करण्याच्या नावाखाली ते स्वतःला एका धुंदीमध्ये, नशेमध्ये बुडवून टाकतात; स्वतःची तब्येत बिघडवून घेतात आणि मेंदू मृतवत करून टाकतात; विचारशक्ती गमावून बसतात. स्वतःचे असे पतन करण्याऐवजी जर त्यांनी स्वतःचे उन्नयन केले तर, त्यांनी प्रगती करण्याच्या या संधीचा सदुपयोग केला असे म्हणता येईल.
(उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 74)

 

तारुण्य हे, व्यक्ती किती वयाची आहे यावर अवलंबून नसते, तर ते प्रगती करण्याच्या आणि विकसित होण्याच्या तिच्या क्षमतेवर अवलंबून असते. प्रगती करणे म्हणजे व्यक्तीमध्ये असलेल्या क्षमता तिने सातत्याने अधिकाधिक परिपूर्ण करत नेणे आणि विकसित होत जाणे म्हणजे स्वतःच्या क्षमता व स्वतःचे सामर्थ्य सतत वाढवत नेणे.

व्यक्तीचे वय वाढले आहे म्हणजे ती आता वृद्ध झाली आहे असे समजणे चुकीची आहे. व्यक्ती जर अक्षम झाली असेल किंवा ती प्रगती करण्यास आणि विकसित होण्यास नकार देत असेल तरच ती वृद्ध होते. वीस वर्षांची म्हातारी माणसं आणि सत्तर वर्षांची काही तरुण माणसं मला माहीत आहेत. जीवनात आता आपण स्थिरस्थावर व्हावे आणि तरुणवयात केलेल्या कष्टांची फळे चाखावीत असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; करण्यासारखे जे काही होते ते आता करून झाले आहे आणि जे काही साध्य करायचे होते ते आता साध्य झाले आहे, असे व्यक्तीला ज्या क्षणी वाटू लागते; थोडक्यात म्हणजे, व्यक्ती परिपूर्णत्वाच्या मार्गावर वाटचाल करण्याचे किंवा प्रगती करण्याचे ज्या क्षणी थांबविते त्या क्षणीच तिची परागती आणि तिचे वार्धक्य निश्चित झालेले असते.

व्यक्तीला जर खरी पद्धत गवसली असेल आणि तिच्या शरीराला योग्य रितीने प्रशिक्षित करण्यात आले असेल तर, शरीराची प्रगती करत राहण्यास किंवा शरीराच्या सामर्थ्यामध्ये वाढ करत नेण्यास कोणतीच सीमा नसते, हे व्यक्ती स्वतःच्या शरीराला शिकवू शकते. आपण इथे (श्रीअरविंद आश्रमात) ज्या गोष्टींवर प्रयोग करू इच्छितो त्यांपैकी हा एक प्रयोग आहे. आपल्याला वार्धक्याबद्दलच्या प्रचलित असणाऱ्या सर्व प्रकारच्या सामूहिक समजुती मोडीत काढायच्या आहेत आणि मानवी क्षमता कल्पनातीत प्रमाणात विस्तारता येतात, याचा आदर्श जगापुढे ठेवायचा आहे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 257)

 

श्रीअरविंद हे भूतकाळाशी किंवा इतिहासाशीदेखील संबंधित नाहीत. श्रीअरविंद म्हणजे प्रत्यक्षात येणारा भविष्यकाळ आहेत. तुम्हाला जर मागे रेंगाळत राहिलेले पांथस्थ होऊन जगायचे नसेल तर, वेगवान प्रगतीसाठी आवश्यक असणाऱ्या शाश्वत तारुण्याचा तुम्ही आश्रय घेतला पाहिजे.
• श्रीमाताजी (CWM 12 : 211-212)

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)