(श्रीअरविंद आणि श्रीमाताजी ह्यांच्या प्रथम भेटीचा अन्वयार्थ उलगडवून दाखविणारी ही सात भागांची लेखमालिका ! ह्या मालिकेमधून श्रीमाताजींच्या व्यक्तिमत्त्वाचाही काही परिचय वाचकांना होईल असा विश्वास वाटतो. धन्यवाद.)

 

 

भाग – ०१

”या देहाच्या भौतिक अस्तित्वाच्या तपशीलाविषयी प्रश्न विचारू नका; त्या दृष्टीने ते महत्त्वाचे नाहीत आणि त्यावर लक्ष केंदित करता कामा नये. संपूर्ण आयुष्यभर, कळत वा नकळत, ईश्वराला मी जसे व्हावे असे वाटत होते तशी मी होत आलेली आहे; मी जे करावे अशी त्याची इच्छा होती, ते ते मी केलेले आहे आणि केवळ तेच महत्त्वाचे आहे…” श्रीमाताजींचे हे विधान, केवळ भौतिकामध्येच रमणाऱ्या आणि त्यामुळे अशा अवतारी व्यक्तींच्या भौतिक जीवनामध्येच रस घेणाऱ्या आपल्यासारख्या लोकांसाठी अतिशय महत्वाचे आहे. श्रीमाताजींचे वरील विधान समोर असतानाही, मग आपण महायोगी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांच्या प्रथम भेटीच्या तपशीलाविषयी माहिती का करून घेत आहोत असा प्रश्न कदाचित एखाद्याला पडू शकेल.

वरवर पाहताना, दोन व्यक्तींची भेट असा दिसणारा हा साधासा प्रसंग, परंतु खोलात शिरून अभ्यास केला तर, ह्या प्रत्यक्ष भेटीच्या आगेमागे अज्ञाताच्या पडद्याआड, बरेच काही घडत होते, असे आपल्या लक्षात येईल. अवतारी व्यक्तींचे संपूर्ण जीवनच ईश्वरत्वाचे आविष्करण या स्वरूपाचे असते. असे असल्याने त्यांच्या अगदी भौतिक तपशीलांमधूनही त्या ईश्वराचेच दर्शन घडत असते. तेव्हा हा लेखनप्रपंचही ह्या भूतलावर ‘ईश्वरी लीला’ कशी कार्यरत असते हे समजावून घेण्याचा एक प्रयत्न आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये.

श्रीअरविंद एके ठिकाणी असे म्हणतात की, “श्रीमाताजींची चेतना आणि माझी चेतना ही एकच आहे, एकच दिव्य चेतना दोघांमध्ये विभागलेली आहे, कारण लीलेसाठी ते आवश्यक आहे. त्यांचे ज्ञान, त्यांची शक्ती, ह्याच्याशिवाय किंवा त्यांच्या चेतनेशिवाय काहीच करता येणार नाही…” एकच दिव्य चेतना श्रीअरविंद आणि श्रीमाताजी या दोघांमध्ये कशी विभागलेली होती, त्या दोन व्यक्तींच्या, नव्हे, दोन शक्तींच्या एकत्र येण्याचे कालौघातील नेमके स्थान काय, महत्त्व काय? ह्या साऱ्या गोष्टींचा विचार आजपासून आपण या लेखात करू.

श्रीअरविंदांचा जीवनेतिहास पाहता असे लक्षात येते की, इ. स. १९०७ ते १९०८ च्या सुमारास अरविंद घोष हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक अग्रणी नाव बनलेले होते. ‘वंदे मातरम्’ मधील त्यांचे लेख आणि त्यांची जाहीर भाषणे ह्यामुळे संपूर्ण भारतात त्यांचे नाव गाजत होते. यानंतर ‘माणिकतोळा बाँबकेस’ प्रकरणात त्यांना अटक झाली. आणि तुरुंगात असतानाच त्यांच्या हाती श्रीमद्भगवद्गीता आली. त्यानुसार साधना सुरु झाली आणि लवकरच त्यांना सर्वांठायी वासुदेवच वसत असल्याचा साक्षात्कार झाला. या साक्षात्काराच्या माध्यमातून हिंदुस्थानातील प्राचीन धर्माची सत्यता अनेकानेक भौतिक आणि आध्यात्मिक तसेच आंतरिक व बाह्य असे सर्व प्रकारचे दाखले देऊन, अनुभव देऊन, अरविंद घोषांना पटवून देण्यात आली होती. आणि त्या साऱ्या अनुभवांमुळे अरविंद घोषांच्या मनातील धर्माविषयीच्या, ईश्वरी अस्तित्वाविषयीच्या सर्व शंका, सर्व संशय हद्दपार झाले होते. तुरुंगातून बाहेर आलेल्या अरविंद घोषांमध्ये आमूलाग्र परिवर्तन घडले होते. ईश्वराचे माध्यम म्हणून काम करीत राहणे हेच त्यांचे आता जीवन बनले होते.

ह्या बाँबकेस प्रकरणामधून सुटका झाल्यानंतर, सुमारे वर्षभराने ईश्वरी आदेशानुसार अरविंद घोष प्रथम चंद्रनगरला आणि तेथून पुढे दि. ०४ एप्रिल १९१० रोजी पाँडिचेरीला येऊन स्थायिक झाले. त्यांच्या राजकीय जीवनाला आता पूर्णविराम मिळणार होता आणि आध्यात्मिक जीवनाचा उदय होत होता. ईश्वराच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न ते करत होते. त्यांच्या राजकीय पटलावरून अचानक नाहिसे होण्यावरून देशभर आश्चर्य, उत्सुकता, गूढता शिल्लक होती, त्या दिवसात अरविंद घोष फारसे कोणालाही भेटत नसत. ते अज्ञातवासात राहत होते. त्यांना येथे येऊन थोडाच कालावधी झाला होता.

त्याच सुमारास पॉल रिचर्ड्स हे पॅरिसमधील बॅरिस्टर, निवडणुकीसाठी फ्रान्सवरून पाँडिचेरीस आले होते. पण त्याबरोबरच भारतातील योगी, ऋषी, मुनी यांना भेटणे हाही त्यांचा या भारतभेटीचा एक प्रधान हेतू होता. पॉल यांचा पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशांतील धर्म व तत्त्वज्ञान यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांना अरविंद घोषांविषयी व त्यांच्या योगाविषयी काही माहिती मिळाली होती. अरविंदांना भेटण्याची त्यांची इच्छा होती. पण त्यांना भेटणे अगदीच अशक्य असेल तर त्यांचे नुसते दर्शन घेण्याची तरी संधी आपल्याला मिळावी अशी इच्छा अरविंदांच्या निकटवर्तियांपाशी पॉल यांनी व्यक्त केली होती. केवळ उत्सुकतेपोटी भेट घेऊ इच्छिणाऱ्या पॉल यांना अरविंदांनी प्रथमत: भेट नाकारली पण निकटवर्तियांच्या बऱ्याच विनवण्यांनंतर अरविंद त्या भेटीला अखेर राजी झाले. पॉल व अरविंद यांच्या झालेल्या दोन भेटींमध्ये राजकारणापासून मानवतेच्या भवितव्यापर्यंत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्या. ज्यांना सुरुवातीला अरविंदांनी भेट नाकारली होती, पण विचारांती काही क्षणांची भेट मंजूर केली होती, त्याच पॉल यांच्याशी बोलताना जणू जन्मोजन्मीची ओळख पटली होती असे जाणवून, त्या दोघांमध्ये दीर्घकाळपर्यंत अनेक विषयांवर चर्चा झाल्या. या भेटीच्या शेवटी निघताना पॉल म्हणाले, “माझी पत्नी माझ्यापेक्षाही अध्यात्मात अधिक प्रगत आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा तिला बरोबर घेऊन येईन.”

ह्याच भेटीत अरविंदांना पॉल यांच्या पत्नीबद्दल म्हणजे मीरा अल्फासा (ज्यांना आज सर्वजण श्रीमाताजी म्हणून ओळखतात) ह्यांच्याबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल, त्यांच्या गूढविद्येच्या अभ्यासाबद्दल माहिती मिळाली. या भेटीचा पॉल रिचर्ड्स यांच्या मनावर खूप परिणाम झाला. पुढे जपानमध्ये श्रोत्यांसमोर पॉल रिचर्ड्स जे बोलले त्यातून या परिणामाविषयी काहीएक अंदाज आपल्याला बांधता येतो. ते म्हणतात, “महान गोष्टींची, महान घटनांची, महान व्यक्तींची, आशिया खंडातील दैवी व्यक्तींची सुवर्णघटिका आता आली आहे. आयुष्यभर मी अशा व्यक्तींचा शोध घेत होतो. मला वाटत होते, अशी माणसे ह्या जगात नसतील तर जग नष्ट होईल. कारण अशा व्यक्ती म्हणजे ह्या जगाचा प्रकाश आहे, उर्जा आहे, जीवन आहे. मला आशिया खंडात अशा प्रकारचे महनीय व्यक्तिमत्त्व भेटले आहे, ते हिंदु आहेत, त्यांचे नाव अरविंद घोष आहे.” हा प्रभाव मनात बाळगतच पॉल रिचर्ड्स जपान येथून फ्रान्सला परतले. (क्रमशः)

*

भाग – ०२

पॉल यांची पत्नी मीरा अल्फासा या लहानपणापासूनच अंतर्मुख होत्या, त्यांना त्या अगदी पाच वर्षांच्या असल्यापासून आध्यात्मिक अनुभव येत असत. अकरा-बारा वर्षांच्या असताना त्यांना जे आंतरात्मिक अनुभव आले होते, त्या अनुभवांच्या दरम्यान त्यांचा अनेक गुरुंशी परिचय झाला होता. उत्तरोत्तर त्यांची साधना अधिकाधिक प्रगत होत होती. त्याच काळात येणाऱ्या आंतरात्मिक अनुभवामधील एका व्यक्तिमत्त्वाशी त्यांचे नाते अधिकाधिक गहिरे होत गेले. ‘कृश अंगकाठीची परंतु अत्यंत तेज:पुंज, तरतरीत व्यक्ती, तांबूससोनेरी वर्ण, छाती उघडी, छातीवर रुळणारी दाढी, वाढलेले केस, धोतराचे एक टोक खांद्यावर टाकलेले,’ अशी एक भारतीय वाटावी अशी व्यक्ती मीरा यांच्या दृष्टीला दिसत असे. अशा पोशाखातील कोणत्याही भारतीयाला मीरा यांनी तोपर्यंत पाहिलेले नव्हते. भारताविषयी त्यांना तेव्हा फारशी माहितीही नव्हती. असे असूनसुद्धा, त्यांना ध्यानावस्थेत वारंवार या व्यक्तीचे दर्शन घडत असे. त्या व्यक्तीला ‘श्रीकृष्ण’ असे संबोधावे असे त्यांच्या अंतरात्म्याने त्यांना सुचविले होते. ही व्यक्ती मीरा यांना भविष्यात एकत्रितपणे करावयाच्या कार्याविषयी काही ना काही सांगत असे. ध्यानावस्थेत जेव्हा या व्यक्तीचे दर्शन घडत असे त्यावेळी मीरा, अगदी हिंदु पद्धतीप्रमाणे त्यांना नमस्कार करत असत. त्याचा अर्थही त्यांना त्यावेळी कळत नसे. मीरा यांच्या दृष्टीने, ध्यानावस्थेत घडणारे हे दर्शन म्हणजे भविष्याचे सूचन होते. ध्यानावस्थेत दिसणाऱ्या या व्यक्तीशी, आपली या भौतिक जगतामध्येही एक ना एक दिवस गाठ पडणार आहे, हे त्यांना त्यांच्या अंतर्मनातून माहीत होते. जाणिवेमध्ये खोलवर हे दृश्य सातत्याने त्यांची सोबत करत राहिले.

पॉल रिचर्ड्स जेव्हा भारतातून फ्रान्समध्ये परतले तेव्हा, कोणी थोर गुरु भेटल्याच्या आनंदाने ते भारावलेले होते. आपल्याला ध्यानात जे दृश्य वारंवार दिसते तसे, भारतात त्यांना कोणी भेटले का, हे जाणून घेण्यास मीरा उत्सुक होत्या. पण रिचर्ड्स यांनी दाखविलेले अरविंद घोषांचे छायाचित्र पाहिल्यावर देखील, त्यांना त्या छायाचित्रामध्ये फारसे काही वेगळेपण जाणवले नाही. अंतर्यामी सातत्याने मार्गदर्शन करणारी व्यक्ती, जिला त्या ‘कृष्ण’ असे संबोधत होत्या, ती हीच असावी, याची यत्किंचितही ओळख त्यांना ते छायाचित्र पाहून पटली नाही.

परंतु, एवढे मात्र खरे की, त्यानंतर पॉल व मीरा रिचर्ड्स यांच्याबरोबर अरविंद घोष यांचा पत्रव्यवहार होत राहिला. पॉल रिचर्ड्स आणि अरविंद घोष यांची पहिली भेट झाली त्याकाळात, अरविंद यांच्याबरोबर जी काही मोजकी माणसं राहत होती, त्यातील एक म्हणजे श्री नलिनीकान्त गुप्ता. या काळातील काही आठवणी त्यांनी सांगितल्या आहेत. ते म्हणतात, “स्वत: श्रीअरविंदांनीच एकदा आम्हाला सांगितले की, त्या (मीरा रिचर्डस) पॅरिसच्या असून, फार मोठ्या अनुग्रहित अशा साधिका आहेत.” अरविंदांनी मोतीलाल रॉय यांना लिहिलेल्या पत्रातही म्हटले आहे, “अशी काही माणसे आहेत की, जी थिऑसॉफिकल किंवा तत्सदृश इतर विचारसरणीमुळे वाहवत गेलेली नाहीत. अशा युरोपियन दुर्मिळ योग्यांमध्ये पॉल व मीरा रिचर्ड्स यांची गणना होते, माझा त्यांच्याशी गेल्या चार वर्षांपासून भौतिक आणि आध्यात्मिक पातळीवरील पत्रव्यवहार चालू आहे.”

तिकडे पॅरिसमध्ये मीरा यांच्या जीवनात काय चालू होते, त्यांच्या आजवरच्या जीवनात काय घडून आले होते हे, समजावून घेणेही उद्बोधक ठरेल. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मीरा यांना आपल्या कार्याची जाणीव होती. कोणाच्याही मार्गदर्शनाशिवाय आणि मदतीशिवाय त्यांना ईश्वरी अस्तित्वाशी ऐक्य साधणे शक्य झाले होते. त्यानंतर पुष्कळ वर्षांनी स्वामी विवेकानंदांचे ‘राजयोग’ हे पुस्तक त्यांच्या वाचनात आले. जी गोष्ट साध्य व्हायला काही वर्षे लागली असती, ती गोष्ट या पुस्तकामुळे काही महिन्यातच साध्य झाली. यानंतर म्हणजे इ. स. १८९८ ते १९०२ या दरम्यानच्या काळात, त्यांच्या हाती श्रीमद्भगवद्गीतेचे भाषांतर आले. ते देणाऱ्या श्री ज्ञानेंद्रनाथ चक्रवर्ती यांनी त्यांना असे सांगितले की, ‘यातील श्रीकृष्ण हा ईश्वराचे प्रतीक समज, असा ईश्वर जो तुझ्या हृदयांतर्यामी आहे.’ यामुळे मीरा यांच्या आंतरिक जीवनात एक प्रकारची गतिमानता आली.

त्यापुढील काळात त्यांच्या भौतिक जीवनाचा विचार करता विवाह, त्यानंतर आंद्रे ह्या एकुलत्या एका मुलाचा जन्म इ. घटना घडून आल्या होत्या. पुढे म्हणजे वयाच्या पंचविशीत असताना, मीरा पोलिश गूढविद्याशास्त्रज्ञ मार्क थिऑन आणि त्यांची पत्नी यांच्या सहवासात आल्या. त्यांच्याकडून घेतलेल्या शिक्षणाच्या आधारावर त्या गूढविद्येत पारंगत झाल्या. अल्जेरियातून गूढविद्येचे हे शिक्षण घेऊन परतल्यावर, त्यांनी आपल्या घरीच ‘आयडिया’ नावाचे एक मंडळ काढले होते. सत्यशोधनाचे कार्य हाती घेतलेल्या आणि भविष्यातील मानवजातीविषयी काही उदात्त स्वप्नं बाळगणाऱ्या आणि ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी धडपडणाऱ्या बारा लोकांचा हा एक गट होता. दर बुधवारी ही मंडळी मीराच्या पॅरिसमधील राहत्या घरी जमत असत. आणि स्वप्न वास्तवात कशी आणता येतील, स्वत:वर विजय कसा मिळविता येईल, आंतरिक आणि बाह्य जीवनात एकात्मता कशी आणता येईल इ. विषयांवर गंभीरपणे चर्चा करत असत. एक विषय दिला जाई. पुढील आठवड्यात सर्वांनी त्या विषयाचा विचार करून येणे अपेक्षित असे. मीरादेखील स्वत: काही लिखाण करत असत आणि सर्वात शेवटी ते वाचून दाखवत असत.

त्यांचे त्याकाळातील विचार हे योगी श्रीअरविंदांच्या विचारसरणीशी कसे मिळतेजुळते होते हे समजून घेणेही येथे प्रस्तुत ठरावे. १९१२ मध्ये त्या लिहितात, “प्रगतीशील अशा वैश्विक सुसंवादाच्या उदयासाठी प्रयत्न करणे, हेच सर्वसाधारणत: ध्येय असले पाहिजे. सर्वांतर्यामी एकच असलेली दिव्यता, सर्वांच्या ठिकाणी जागृत करून, सर्वांच्या द्वारा दिव्यत्वाचा आविष्कार करवून, मानवी एकता साध्य करणे हा, या पृथ्वीवर हे ध्येय प्राप्त करण्याचा उपाय आहे. दुसऱ्या शब्दांत सांगावयाचे तर, आपणा सर्वांच्या अंतरंगात असलेले, देवाचे साम्राज्य प्रस्थापित करून, त्याद्वारा एकता निर्माण करावयाची आहे. त्यासाठी अत्यंत उपयुक्त असे पुढील कार्य आपल्याला करावयाचे आहे – १) व्यक्तिश: प्रत्येकाने स्वत:मधील ईश्वराच्या सान्निध्याची जाणीव करून घेऊन, त्याच्याशी स्वत: तादात्म्य अनुभवावयाचे.

२) अस्तित्वाच्या ज्या अवस्था आजवर मानवांमध्ये कधीही जागृत झालेल्या नाहीत, त्या अवस्था व्यक्तीने स्वत:च्या ठिकाणी प्रकट रूपात प्राप्त करून घ्यावयाच्या आणि त्याद्वारा, अजूनही गुप्त राहिलेल्या विश्वशक्तीच्या एका किंवा अनेक प्रवाहांशी पृथ्वीचा संबंध जोडावयाचा.

३) आजच्या आधुनिक मनोवृत्तीला आकलन होणाऱ्या नवीन स्वरूपांत सनातन वाणी जगाला पुनश्च ऐकवावयाची. मानवाच्या सर्व ज्ञानाचा तो समन्वय असेल.

४) सामुदायिकरित्या नूतन मानववंश बहरावा, देवपुत्रांचा वंश निर्माण व्हावा म्हणून योग्य स्थळी आदर्श समाज निर्माण करावयाचा. एकप्रकारे श्रीअरविंदांनी जे कार्य केले, पृथ्वीवर ते कार्य करण्याची जी पद्धती सांगितली, त्याचाच हा पूर्ण आराखडा होता. आणि आश्चर्य म्हणजे, या वेळपर्यंत मीरा व अरविंद यांची प्रत्यक्ष भेट घडून आलेली नव्हती. परंतु आता एव्हाना, मीरा यांच्या मनात भारतभेटीची ओढ दृढतर होण्यास सुरुवात झाली होती. अरविंदांकडून मिळणाऱ्या आंतरिक व बाह्य मार्गदर्शनामुळे, त्यांच्या आंतरिक जीवनास वेग प्राप्त झाला होता, साधना अधिकाधिक प्रगाढ बनत चालली होती. (क्रमशः)

*

भाग – ०३

मीरा यांनी त्यांच्या आंतरिक भावना, संवेदना, विचार व अनुभूती याची नोंद नियमितपणे रोजनिशीत करण्यास सुरुवात केली. दररोज दिवस उजाडण्यापूर्वी, पहाटे पाच वाजता, खोलीत खिडकीशी शाल पांघरून, स्वस्थपणे चिंतनार्थ अन्तर्मुख होऊन बसण्याचा त्यांचा परिपाठ असे. ध्यान संपल्यावर जे काही विचार व अनुभव आले असतील, त्यांची त्या ताबडतोब नोंद करून ठेवत असत. ही दैनंदिनी – म्हणजेच ‘प्रार्थना व ध्यान’, हा त्यांच्या साधनाकाळातील एक महत्त्वाचा दस्तऐवजच आहे. ‘प्रार्थना व ध्यान’ हे पुस्तक म्हणजे त्यांच्या साधनेचे शब्दरूप आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अव्यक्त, निर्गुण, निराकार अशा ईश्वराशी, त्याच्या भेटीसाठी उत्सुक असलेल्या, तरीही त्यासाठी कोणतीही अनाठायी घाई न बाळगता, शांतपणे प्रयत्नशील राहणाऱ्या, सर्वांमध्ये, सर्व घटनांमध्ये ईश्वराचेच रूप पाहणाऱ्या, सच्च्या साधकाचा तो आर्त उद्गार आहे. साधनमार्गावर प्रगत होऊ पाहणाऱ्या सर्व साधकांना उपयुक्त ठरेल असा एक सूर्यप्रकाशित मार्गच, ह्या प्रार्थनांच्या रूपाने इथे जणू आखून दिलेला आढळतो. कोणत्याही टप्प्यावर असलेल्या साधकाला आपापल्या अवस्थेचे जणू प्रतिबिंबच या प्रार्थनांमध्ये पहावयास सापडते. ह्या अवस्था सर्व साधकांच्या बाबत समानच असणार, अर्थात त्या त्या अवस्थेप्रत पोहोचण्याचे प्रत्येक जीवाचे मार्ग भिन्नभिन्न असणार, त्याची देश, काल, परिस्थिती, त्या परिस्थितीचे भौतिक तपशील भिन्नभिन्न असणार. पण त्या मार्गावरून साधक वाटचाल करू लागला की, ते ते टप्पे जरूर त्याच्या आयुष्यात येणार हे मात्र निश्चित. आणि इथेच आपल्याला, ”या देहाच्या भौतिक अस्तित्वाच्या तपशीलाविषयी विचारू नका” असे श्रीमाताजी का म्हणतात त्याचा उलगडा होतो.

ही दैनंदिनी लिहिण्यापाठीमागची त्यांची व्यक्तिगत भावना काय होती हे दि. ०२ नोव्हेंबर, १९१२ साली, त्यांनी लिहिलेल्या प्रार्थनेमध्ये दिसून येते. त्या म्हणतात, “अखिल वस्तुमात्रामध्ये प्रेम, प्रकाश व जीवनरूपाने वसणाऱ्या हे ईश्वरा, माझे संपूर्ण अस्तित्व तत्त्वत: मी तुला अर्पण केले असले, तरीही ते अर्पण सर्वांगीण व सांगोपांग करीत जाणे मला कठीण वाटत आहे. मला हे कळण्यास कित्येक आठवडे लागले की, तुला उद्देशून दररोज प्रार्थना करणे हाच, या ध्यानावस्थेला लिखित स्वरूप देण्याचा खरा उद्देश आहे, त्यातच त्याची सार्थकता आहे. अशा रीतीने तुझ्याशी नेहमी होणाऱ्या संवादांपैकी, अंशभागाला दररोज मी मूर्त स्वरूप देत जाईन; हे आत्म-निवेदन शक्य तितक्या चांगल्या रीतीने मी तुझ्यासमोर करीन… शेवटी एक दिवस असा येईल की, तुझ्याशी मी स्वत:चे एकत्व अनुभवलेले असल्यामुळे तुला सांगावयास असे मजजवळ अधिक काहीच राहणार नाही; कारण त्यावेळी मी ‘तूच’ झालेली असेन. मला जिथे पोहोचले पाहिजे असे माझे गंतव्यस्थान तेच असेल; हाच विजय प्राप्त करण्यासाठी, माझे सर्व प्रयत्न तिकडे अधिकाधिक झुकत राहतील. मी अशा एका दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहे की, ज्या दिवशी मला स्वतःचा उल्लेख ‘मी’ म्हणून करणे शक्य होणार नाही, कारण मी ‘तूच’ झालेली असेन.” मीरा यांचे सारे हर्षविमर्श, चढउतार, भावनांचे आवेग, कल्लोळ, हेलकावे, आशानिराशा, अभीप्सा, दिलासा, साऱ्या साऱ्या गोष्टी एका परमेश्वराला उद्देशूनच व्यक्त होत असत.

इ.स. १९१२ ते १९१४ ह्या दोन वर्षात मीरा यांच्या आंतरिक जीवनात बरेच काही घडत होते. या दोन वर्षांच्या कालावधीत त्यांच्या भौतिक जीवनात काय घडत होते हे आपल्याला फारसे ज्ञात नाही; परंतु त्यांच्या आंतरिक जीवनात काय घडत होते, त्याचा धावता आढावा घेणे निश्चित शक्य आहे. या काळातील त्यांनी केलेल्या प्रार्थनांमध्ये त्यांच्या मनाचे स्वच्छ प्रतिबिंब पडलेले दिसते.

त्यांचे समग्र अस्तित्वच परमेश्वराच्या एकरूपतेची जणू मूर्त अभीप्सा बनले होते. उदबत्तीचा धूर सरळ वर वर जावा त्याप्रमाणे त्यांचे सारे अस्तित्वच ईश्वरोन्मुख झाले होते, ऊर्ध्वगामी बनले होते. जगामध्ये ‘त्या’चा संकल्प कार्यान्वित व्हावा, ‘त्या’च्या तेजाने सारे काही उजळून निघावे, ‘त्या’ची शांती प्रसृत व्हावी, ‘त्या’च्या करुणा प्रेमाचा वर्षाव साऱ्या जगावर व्हावा ह्यासाठी त्यांच्या मनात शुभसंकल्प जरुर निर्माण होत होता. त्या संकल्पपूर्तीची आसही त्यांना होती; पण त्यामध्ये अधीरता नव्हती. कारण त्या परमेश्वराच्या हाती एखाद्या नवजात अर्भकाप्रमाणे त्यांनी स्वत:ला सोपविले होते. बालकाची निश्चिंतता आणि आपल्या मातेविषयी असणारा बालकसदृश असा प्रगाढ विश्वास त्यांच्या मनात वसत होता. मग अधीरता, अस्वस्थता येणार तरी कोठून ? पूर्वी ज्या घटनांनी त्या अस्वस्थ होऊन जात असत, चिंतित होत असत, कष्टी होत असत त्या घटनांकडे, परिस्थितीकडे पाहण्याची एक वेगळीच दृष्टी त्यांच्यामध्ये उमलत होती. जणू ‘सर्व सुखाचे आगरु’ असणारा परमेश्वर त्यांना सांगत होता, ”तुझा प्रत्येक प्रयत्न, प्रत्येक दु:ख, प्रत्येक आनंद, प्रत्येक शोकावेग, तुझ्या हृदयाची प्रत्येक हाक, तुझ्या आत्म्याची प्रत्येक अभीप्सा, सर्वकाही – निरपवादपणे सर्वकाही – तुला जे दुःखदायक वाटते किंवा जे आनंददायी वाटते, जे कुरुप भासते किंवा जे सौंदर्यपूर्ण दिसते ते, या सर्व गोष्टी निश्चितपणे तुला माझ्याकडेच घेऊन येतात.”

परमेश्वरी दिव्य शक्तीचे माध्यम होण्याचा मीरा अल्फासा सर्वतोपरी प्रयत्न करू पाहत होत्या. दैनंदिन जीवन जगत असताना त्यांच्यावरील रोजच्या व्यावहारिक जबाबदाऱ्या संपल्यावर, त्या पूर्णपणे परमेश्वर आणि त्याची सेवा यामध्ये सर्वस्वी तल्लीन होऊन जात होत्या. स्वत:ची इच्छा त्याच्या इच्छेमध्ये मेळवून टाकण्याच्या प्रयत्नात त्या होत्या. हाती आलेले काम अधिकाधिक परिपूर्ण व्हावे, बिनचूक व्हावे, ते काम म्हणजे जणू ईश्वरी शक्तीचे आविष्करण व्हावे यासाठी त्यांची सारी धडपड असे. पण त्यांना कधीतरी हेही जाणवून गेले की, कृती करण्यातील, तिच्या अभिव्यक्तीमागील धडपड नाहीशी व्हायला हवी. ती कृती सहज, स्वाभाविक घडावयास हवी. अन्यथा ही धडपड, प्राणशक्तीवर ठेवलेला हा अनाठायी विश्वास, हाच कर्ममार्गातील अडथळा ठरू शकतो. तत्काळ फलप्राप्तीची चटक आणि काम चांगले करण्याच्या उत्साहाच्या भरात वाहवत जाऊन कृती, योग्य मार्गापासून दूर जाण्याचा धोका असतो हे त्यांना उमगले.

एके दिवशी ध्यानावस्थेत मीरा यांना अनुभव आला की, असीम आनंदाने त्यांचे हृदय भरून गेले आहे. आनंदगानाच्या अद्भुत लहरी अंगोपांगातून उसळत आहेत. परमेश्वराच्या संजीवक अस्तित्वाच्या जाणीवेने त्या भारल्या गेल्या होत्या. त्यांना कळेनासे झाले, सारे विश्व ‘मी’ आहे की मी ‘विश्व’ बनले आहे ? सर्व विश्वात आणि स्वत:मध्येही तो ईश्वरच ओतप्रोत भरला आहे असा अनुभव त्यांना आला. अविद्या हेच सर्व दु:खाचे मूळ आहे आणि ईश्वराला अभिमुख होणे, त्याच्याशी एकत्व पावणे, त्या परमेश्वरामध्ये निवास करणे, त्याच्यासाठीच सर्व जीवन वेचणे यातच परम आनंद साठविलेला आहे, याची रोज नित्यनवी प्रचीती त्यांना येत होती. मावळत्या प्रत्येक दिवसागणिक, परमेश्वराच्या एकरूपतेसाठी त्या अधिकाधिक उन्मुख होत होत्या. सुगंधित उदबत्तीच्या धवल धूम्रवलयाप्रमाणे त्यांच्या हृदयातून एक मूक स्तवन वर वर उसळत होते. त्या मनोमन म्हणत होत्या, “हे दिव्य स्वामिन्, हा दिवस म्हणजे तुझ्या दिव्य संकल्पाला केलेले अधिक पूर्ण आत्मार्पण, तुझ्या कार्याला केलेले अधिक सर्वांगीण आत्मदान, अधिक संपूर्ण आत्मविस्मृति, महत्तर ज्ञान आणि विशुद्धतर प्रेम यांची सुसंधी ठरेल अशी कृपा कर… आमचा सारा अहंकार आणि क्षुद्र गर्व, लोभ आणि अपूर्ण ज्ञान यांचा निरास कर म्हणजे, त्यामुळे तुझ्या दिव्य प्रेमाने प्रदिप्त होऊन, आम्ही जगाचे मार्गदर्शक दीप बनू शकू.”

दिवसेंदिवस त्यांच्या मनातील समर्पणाची भावना अधिकाधिक प्रगाढ आणि सखोल होत चालली होती. बाह्य जीवनात कधी असेही काही घडून जात असे की, सूर्यावर जसे अभ्र यावे तसे क्षणकाल त्यांचे मन काळजीने, चिंतेने झाकोळून जात असे. पण तसे झाल्यावर त्यांची दृष्टी लगेच ‘अंतर्यामी’कडे वळे आणि जाणवे, घटनांकडे स्थूल, सामान्य दृष्टीने पाहण्याच्या सवयीपासून आपली अजूनही सुटका झालेली नाही, त्याचेच हे द्योतक आहे. पण परत, ह्या साऱ्यापासून मुक्तता देण्याचे सामर्थ्य खऱ्या अर्थाने ज्याच्याकडे आहे ‘त्या’च्याकडे मीरा यांची दृष्टी वळत असे आणि त्या नि:शंक होऊन जात असत. (क्रमशः)

*

भाग – ०४

जीवनाच्या प्रवाहाने एक वेग घेतला होता, एका निश्चित क्षणाच्या दिशेने हा सारा प्रवाह गतिमान होत होता, तो क्षण मीरा यांचे संपूर्ण आयुष्यच बदलवून टाकणारा होता. आज त्यांच्या मनात संमिश्र भावना दाटून आल्या होत्या. पॅरिसच्या घरात, आजवर ज्या टेबलापाशी बसून साऱ्या प्रार्थना मीरा यांनी शब्दबद्ध केल्या होत्या, त्या टेबलापाशी बसण्याचा त्यांचा आज शेवटचा दिवस होता. सारी खोली एका अनुनूभूत अशा पावित्र्याने भरून गेली होती. अंतर्मुख अशा अवस्थेत, मीरा त्या टेबलाशी बराच वेळ तशाच बसून राहिल्या. समोर त्यांच्या दैनंदिनीची पाने फडफडत होती. त्यांनी आत्तापर्यंत जे लिहिले होते ती सारी पाने वाऱ्याच्या एका झोताबरोबर उलटली गेली.

आता त्यांच्या समोर होते एक कोरे पान… ज्यावर भविष्य लिहिले जाणार होते.. केवळ त्यांचेच भवितव्य नाही… तर साऱ्या पृथ्वीचेच भवितव्य… कारण एवढ्या दिवसाच्या प्रार्थनेने, ध्यानाने, साधनेने त्या स्वत:च्या उरल्याच होत्या कोठे? त्या बनल्या होत्या पृथ्वीवरील समस्त जीवजातांच्या प्रतिनिधी. पर्जन्यवृष्टीसाठी आसुसलेल्या धगधगीत पृथ्वीमातेचे त्या जणू मूर्त रूप बनल्या होत्या. तप्त जमिनीवर पाण्याचा हलकासा शिडकावा व्हावा, ते पाणी क्षणार्धात जमिनीत मुरुन जावे आणि अधिक पाण्याच्या आशेने त्याच जमिनीतून नि:श्वास बनून तप्त धूळ, धग परत वर उसळावी; आता परतेन ते पर्जन्यवृष्टी बनूनच या आशेने; तशीच काहीशी आज मीरा यांची मनोवस्था होती. परमेश्वरी अस्तित्वाच्या अधूनमधून होणाऱ्या जाणिवेने, साक्षात्काराने काही काळ त्यांच्या मनात तृप्ती जरुर जाणवून जाई. पण त्या क्षणकालच टिकणाऱ्या अनुभूतीतून, त्या परमेश्वरभेटीची आस अधिक तीव्र होई. असे सारे चालू होते.

ऐहिक म्हणता येतील अशा त्यांच्या साऱ्या वस्तू, राहते घर पॅरिसमध्येच ठेवून त्यांना आता प्रवासाला निघायचे होते. त्यांचाही त्यांनी निरोप घेतला. या साऱ्या वस्तू यादेखील ईश्वरी चेतनेचे आविष्करण करत असतात, हा होता त्यांचा अनुभव. आणि म्हणूनच त्या त्यांची अतिशय व्यवस्थित काळजी घेत असत. वस्तुंची हेळसांड, मोडतोड, त्यांच्याकडे दुर्लक्ष हे त्यांना कधीच आवडत नसे. परंतु आज निरोपाच्या वेळी त्यांना हेही कळले होते की, या ऐहिक वस्तुंमध्ये मन गुंतणे बरे नाही. भविष्यात काय लिहून ठेवले आहे हे त्यांना त्या क्षणी माहीत नव्हते, आणि जाणून घेण्याची त्यांना इच्छाही नव्हती. येणारा भविष्यकाळ ऐहिकापासून अधिक निर्लिप्त, अधिक प्रकाशपूर्ण, अधिक प्रेमपूर्ण आणि परमेश्वराशी संपूर्णतया समर्पित असावा, एवढीच त्यांची अभीप्सा होती. हा भौतिक प्रवास ही एका नवीन आंतरिक जीवनप्रवासाची सुरुवात ठरावी, अशी त्यांची मनोमन इच्छा होती.

मीरा यांना आता ओढ होती ती ‘त्या’ ला भेटण्याची. मनात भावना होती, मी ज्याला ‘कृष्ण’ म्हणून संबोधते तो कृष्ण मला या भारतभेटीत गवसेल का? नुकत्याच उगवणाऱ्या सूर्याचा कोवळा किरण जवळच्या खिडकीतून आत डोकावला आणि गभीर आनंदाने त्यांचे मन पुन्हा एकदा भरून गेले. त्या लगबगीने उठल्या. आजच त्यांना त्यांच्या पतीसमवेत, पॉल रिचर्ड्स यांच्या सोबत प्रवासाला निघायचे होते. पॉल रिचर्ड्स यावेळी स्वत: भारतातील फ्रेंच वसाहतीतील निवडणूक लढवू इच्छित होते. दोघांचे उद्दिष्ट भिन्न असले तरीही, दोघांनाही भारतभेटीची तीव्र ओढ लागली होती. जिनिव्हाला जाण्यासाठी ते दोघे समुद्रमार्गे निघाले होते. ‘कागा मारू’ या जपानी बोटीतून सफर करीत असताना काहीतरी अघटित असे घडले असावे. तो तपशील आपल्याला ज्ञात नाही. आज आपल्याला ज्ञात आहे तो मीरा यांना या घटनेतून झालेला बोध. परमेश्वरी संरक्षककवचाचा अनुभव त्यांना तेथे आला. अगदी भौतिकातसुद्धा क्रूरतेवर, हिंसेवर परमेश्वरी माधुर्याने, शांतीने, प्रेमाने समर्थपणे मात करता येते, ह्याचा अनुभव त्यांना आला होता. परमेश्वरी शक्तीची, त्याच्या सर्वसमर्थतेची अभूतपूर्व जाणीव त्यांना या प्रसंगात झाली होती. परमेश्वराच्या आश्वासक, संरक्षक सोबतीमुळे त्या आता अधिकच आश्वस्त, निर्धास्त झाल्या होत्या. या संरक्षक कुशीत, बोटीवरील सर्वांनाच त्या पांघरु पाहत होत्या. परमेश्वराच्या उबदार कुशीचा अनुभव घेणाऱ्या या लोकांमध्ये दिव्य चेतनेचा काही अंश जागृत व्हावा, हीच होती त्यांची मनीषा !

वरवर कितीही अशांती, अस्वस्थता, अंध:कार, दुःख, अज्ञान असले तरीही, त्यातूनही मीरा यांना त्या प्रवाहाच्या खालून वाहणाऱ्या एका उबदार अंत:प्रवाहाची जाणीव होती. त्या अतिशय प्रसन्न मन:स्थितीत जहाजाच्या डेकवर उभ्या होत्या. दृष्टी पोहोचेल तिथे त्यांना अथांग समुद्रच दिसत होता. आणि दिसत होते त्या समुद्रावर डौलाने विहरणारे त्यांचे जहाज. त्या साऱ्याकडे साक्षीभावाने पाहत असताना त्यांना भासत होते की, ‘हे जहाज म्हणजे जणू परमेश्वराच्या वैभवाची ग्वाही देण्यासाठी तरंगत असलेले मंदिर आहे.’ त्यांच्यासाठी ते अद्भूत शांतीचे धामच बनले होते. आणि बरोबरच आहे, ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती’ अशी अवस्था प्राप्त झाल्यावर घर काय, जहाज काय, एखादा अनोळखी देश काय, एखादा नवखा प्रांत काय, परमेश्वराच्या लेकराला ‘हे विश्वचि माझे घर’ हा अनुभव आला नाही तरच नवल. पाणी कापत जाणारे जहाज पुढे जात असताना त्याच्यामागे, पाण्यावर प्रकाशरेषा उमटवते त्याप्रमाणे, आपल्याकडून घडणाऱ्या भौतिकातील अगदी छोट्यातल्या छोट्या कृतीतूनदेखील परमेश्वरी अस्तित्वाच्याच खुणा दिसून याव्यात, अशी त्यांची अभीप्सा होती. परमेश्वराचे, त्याच्या दिव्य इच्छेचे आपण स्वत: प्रकाशदूत बनावे, निष्ठावान संदेशवाहक बनावे यासाठी मीरा ईश्वराला आत्यंतिक तळमळीने विनवीत होत्या. (क्रमशः)

*

भाग – ०५

परमेश्वरी अस्तित्वाच्या नित्यनूतन होणाऱ्या जाणिवेने मीरा यांचे मन त्याच्याविषयीच्या कृतज्ञतेने भरून येत असे. अजूनही अव्यक्त, निर्गुण, निराकार पण पडद्याआडून स्वत:च्या अस्तित्वाची सातत्याने जाणीव करून देणाऱ्या एका दिव्य अस्तित्वासमोर, त्या मनोमन नतमस्तक होत असत. कुरुपतेचे सौंदर्यात, अंध:काराचे प्रकाशात रूपांतर करणाऱ्या, अज्ञानातून ज्ञान आणि अहंकारातून चांगुलपणा उदयास आणणाऱ्या, सर्वसमर्थ परमेश्वररूपी जादुगाराच्या किमयेचे त्यांना नवल वाटत असे. स्वत:च्या सीमित बुद्धीने उद्याची काळजी करीत बसण्यापेक्षा, त्याच्या इच्छेशी स्वत:ची इच्छा जुळवून घेणे किती सुखदायक असते, ह्याचा अनुभव त्या हरघडी घेत होत्या. जीवनाच्या कक्षा विस्तारवणारा, क्षितिज रुंदावणारा हा अनुभव होता. अपूर्णतेने, अर्धवटपणाने भरलेल्या आजच्या या घडीला तरी परिपूर्णत्व (Perfection) मूर्त स्वरूपात येणे, ही अशक्यप्राय वाटणारी घटना आहे, हे त्यांना जाणवले; तरीही परिपूर्णतेच्या दिशेने प्रयत्नशील राहणेही तितकेच गरजेचे आहे, हेही त्यांना पुन्हा एकवार प्रतीत झाले. कधी त्यांच्याही मनावर अस्वस्थतेचे सावट दाटून येई.

पण त्या अस्वस्थ क्षणांकडे अलिप्तपणे, साक्षीभावाने पाहत असताना त्यांना एकदा जाणवले की, अमुक एका प्रसंगात मी असे करायला हवे होते, असे वागायला हवे होते असा विचार करत बसण्यापेक्षा, आपले अस्तित्व त्या त्या प्रसंगात ईश्वराशी जोडलेले नव्हते, म्हणून तेव्हा तसे घडले, असा विचार करणे अधिक आवश्यक आहे. त्यांना जाणवले की, सर्वाधिक गरज जर कशाची असेल तर, ती त्या शाश्वत चेतनेशी अधिकाधिक निश्चित आणि पूर्णत्वाने एकत्व साधण्यासाठी प्रयत्न करण्याची !

स्वत:च्या विचारवस्तुशी पूर्ण एकत्व ही काय गोष्ट असते, याचा अनुभव त्यांना नुकताच आला होता. आणि याचा पूर्णत्वाने व अधिक स्थायी असा अनुभव घेण्यासाठी, साधनेला अधिक वेळ देणे आवश्यक आहे, असे त्यांना जाणवून गेले. ही सुसंधी आपल्याला आता भारतात मिळेल, ही भारतभेटीकडून त्यांची एक अपेक्षा होती. अर्थात जर आपण ईश्वराच्या आविष्करणासाठी सुयोग्य आहोत, अशी ‘त्या’ला आपल्याविषयी खात्री वाटत असेल, तरच तसे घडेल हेही त्या जाणून होत्या. सध्याची त्यांची प्रगती ही जरी खूप वेगाने घडत नसली तरी, ती लवकरच दोलायमानता संपविणारी असेल, याची त्यांना पूर्ण जाणीव होती.

कारण प्रवासाला निघाल्यापासून रोजच त्यांना उत्तरोत्तर वाढत जाणाऱ्या ईश्वरी हस्तक्षेपाची चढतीवाढती जाणीव होत होती. त्या विनवत होत्या, “हे दिव्य गुरुदेवा ! आम्हाला पृथ्वीतलावरील आमच्या जीवितकार्याची अधिकाधिक चांगल्या रितीने समज यावी आणि ते कार्य फलद्रूप होण्यासाठी लागणाऱ्या आमच्यातील सर्व शक्ती, ऊर्जा, सर्व क्षमता सुयोग्य रितीने उपयोगात आणता याव्यात, यासाठी तू आम्हाला वरदान दे. आमच्या विचार, कृती, भावना, आणि हृदयाच्या आंतर-हृदयातही तुझीच सार्वभौम उपस्थिती अभिव्यक्त व्हावी, यासाठी मी प्रार्थना करीत आहे.” ही प्रार्थना मनातून प्रस्फुरित होत असतानाच, त्यांना जाणवून गेले की, आता अशी विभक्तपणाने प्रार्थना करणेही दुष्कर बनत चालले आहे. कारण आपल्या रूपाने नव्हे तर, आपल्यामध्येच ‘तो’ जगतो, आपल्या बुद्धीने ‘तो’च विचार करतो, आपल्या माध्यमातून ‘तो’च ह्या चराचरावर प्रेम करतो; मीरा यांना अधिकाधिक तीव्रतेने हे अनुभवास येत होते. या एकत्वामुळे मुग्ध होऊन जावे असाच तो अनुभव होता.

मीरा यांनी आत्तापर्यंत गीता, धम्मपद यांचे चिंतन केले होते; योग आणि भक्तिसूत्रे अभ्यासली होती. कैवल्य आणि ईशावास्य उपनिषद ह्यांचा अनुवादही त्यांनी केलेला होता. भारताविषयी, तेथील भावभोळ्या लोकांच्या ईश्वरप्रेमाच्या अनेक कथा, आख्यायिका त्यांनी ऐकल्या होत्या. इतकी समर्पणशील लोकं, इतकी अध्यात्मसंपन्न लोकं ज्या भूमीत राहतात, त्या भूमीच्या दिशेने त्यांचे जहाज पुढे सरकत होते. भारतात येण्यापूर्वी, बुद्धाची भूमी असणाऱ्या कोलंबोतही, त्यांनी एक दिवसाचा मुक्काम केला. श्रीलंकेच्या या भेटीत तेथील बौद्ध धर्मगुरु धर्मपाल यांचीही त्यांच्याशी भेट झाली. कोलंबोहून समुद्रमार्गे प्रवास करत, धनुष्कोटी येथे त्या येऊन पोहोचल्या. तेथून पुढे विल्लुपूरमला बोटमेलने आल्या. त्यांनी विल्लुपूरला आगगाडी बदलली आणि ती गाडी पाँडिचेरीच्या दिशेने धावू लागली. गेली चार वर्षे मीरा ज्यांच्या मानसिक आणि आध्यात्मिक संपर्कात होत्या त्यांना म्हणजे अरविंद घोष यांना त्या आज प्रथमच भेटणार होत्या. त्या सुवर्णक्षणाची त्या आतुरतेने वाट पाहत होत्या. (क्रमशः)

*

भाग – ०६

तरुणवयातील श्री अरविंद घोष

तरुणवयातील श्री अरविंद घोष

अरविंद घोषांनी आपल्या निकटवर्तियांना, (जे त्यांच्याबरोबर देशासाठी क्रांतिकार्यात सहभागी झाले होते, जे सध्या त्यांच्याबरोबर राहत होते), सांगितले होते कि, ”फ्रान्सच्या उच्चस्तरीय सांस्कृतिक वर्तुळातील दोन व्यक्ती योगसाधना करण्यासाठी, आपल्या येथे येणार आहेत.” त्यामुळे सर्वांच्याच मनात या दोन पाहुण्यांच्या भेटीची उत्सुकता दाटली होती. अरविंदांच्या राहत्या घराची अवस्था तेव्हा कशी होती? तर पाहुणे भेटीला येणार म्हणून, त्या घराची तात्पुरती डागडुगी करून घेण्यात आली होती. घरात होते एक जुने टेबल, एक आरामखुर्ची, आणि चारपाच घडीच्या खुर्च्या ही एवढीच संपत्ती. ब्रह्मचाऱ्यांसारखे जीवन जगणाऱ्या या सर्वांना पैशांची अत्यंत चणचण जाणवत होती. हातातोंडाची मिळवणी करताना नाकीनऊ यावेत अशी आर्थिक परिस्थिती होती.

परंतु त्याचवेळी अरविंदांची आध्यात्मिक अवस्था काय होती? ह्या वेळेपर्यंत म्हणजे १९१४ साल उजाडेपर्यंत अरविंदांना, त्यांचा ‘पूर्णयोग’ ज्या चार साक्षात्कारांवर आधारलेला आहे, त्यापैकी दोन साक्षात्कार झालेले होते. जानेवारी १९०८ मध्ये, महाराष्ट्रीय योगी श्री. विष्णु भास्कर लेले यांच्या मार्गदर्शनाखाली, अरविंदांना देशकालातीत अशा ब्रह्माचा साक्षात्कार झालेला होता. जगाचे मिथ्यत्व त्यांच्या अनुभवास आले होते. नंतरचा साक्षात्कार होता विश्वात्मक ब्रह्माचा. अलिपूरच्या तुरुंगात ‘वासुदेवम् सर्वमिती’ हा साक्षात्कार त्यांना झाला होता. उर्वरित दोन साक्षात्कारांच्या दिशेने आवश्यक अशी साधना अलिपूरच्या तुरुंगातच सुरु झाली होती. एकाचवेळी अक्रिय आणि सक्रिय असणाऱ्या ब्रह्माचा साक्षात्कार अजून बाकी होता. तो साधनामार्ग आणि अतिमानसाच्या पातळ्या यांचे अचूक दिग्दर्शन त्यांना तुरुंगातच झाले होते. आणि आता पाँडिचेरी येथे त्यानुसार मार्गक्रमण चालू होते.

योगी श्री. लेले यांच्याच शिकवणुकीनुसार, त्यांनी स्वत:च्या आंतरिक आणि बाह्य जीवनातील घटनांसाठी, केवळ अंतर्यामीच्या दिव्य शक्तीवर, म्हणजेच ‘श्रीकृष्णा’वर विसंबून राहायला सुरुवात केली होती. त्याच्याच आदेशानुसार, राजकारणातून निवृत्ती स्वीकारलेल्या अरविंदांनी, आता पाँडिचेरीत आल्यापासून, योगमार्गातील सप्तचतुष्टयाचा साधनाक्रम हाती घेतला होता. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आलेला होता.

श्रीअरविंदांच्या भेटीला येण्यापूर्वी मीरा यांची आवश्यक अशी आध्यात्मिक पूर्वतयारी झालेली होती. चेतनाशक्ती, तिची क्रियाशीलता, तिची कार्यकारी शक्ती या गोष्टी त्यांना स्वत:ला ज्ञात झाल्या होत्या. प्राणिक व मानसिक विकासाने उच्चतम पातळी गाठलेली होती. ही अशी अवस्था होती की, जिथे त्यांना समजले होते की, सर्व संकल्पना खऱ्या आहेत, त्यांचा समन्वय करता येणे शक्य आहे आणि त्या समन्वयाच्या पलीकडे आहे सत्य आणि उज्ज्वल असे काहीतरी ! आणि त्याहीपलीकडे आहे चेतना ! श्रीअरविंदांना भेटण्यापूर्वी मीरा ह्या अशा होत्या. योगसाधना सुरु करण्यासाठी लागणारी सारी सारी पूर्वतयारी आधीच झालेली होती. सारे काही सुसज्ज, वर्गीकरण केलेले, सुव्यवस्थित असे होते. ती एक आत्यंतिक सुंदर अशी मानसिक रचना होती.

दिनांक २९ मार्च १९१४. सकाळच्या वेळी श्रीअरविंदांना पॉल रिचर्ड्स भेटून आले होते. मीरा श्रीअरविंदांना दुपारी भेटणार होत्या. वातावरणात एक कुंद गभीरता होती, उत्सुकता होती. येणाऱ्या क्षणाची जणू भविष्यकाळच वाट पाहत बसला होता. हा पुढील सर्व भाग श्रीमाताजींच्याच शब्दांत जाणून घेणे श्रेयस्कर आहे. “मी काही पायऱ्या चढून वर गेले तर पायऱ्या जिथे संपत होत्या तेथे, सर्वात वर ते माझी वाट पाहत उभे होते अगदी तसेच, हुबेहूब दर्शनातल्यासारखे ! ध्यानावस्थेत दिसलेल्या व्यक्तीसारखेच, तोच पेहराव, तीच स्थिती, तीच शरीरयष्टी, माथा काहीसा उन्नत. त्यांनी त्यांची दृष्टी माझ्याकडे वळवली मात्र…. मला त्यांच्या दृष्टीकडे पाहताक्षणीच जाणवले, हेच ते ! क्षणार्धात असे काही घडून आले की, माझे आंतरिक दृश्य व आत्ता समोर असलेले बाह्य दृश्य एकमेकात बेमालूमपणे मिसळून गेले. माझ्या दृष्टीने हा निर्णायक असा सुखद, अद्भुत धक्का होता.”

काय असतील ह्या क्षणी मीरा यांच्या भावना? ते शब्दांत कसे वर्णावे? मौनानेच त्याचा अर्थ जाणून घ्यायचा. मीरा श्रीअरविंदांच्या चरणांपाशी बसून राहिल्या. इतकी वर्षे आपण ज्या व्यक्तीच्या भेटीसाठी आस लावून बसलो होतो, ती व्यक्ती, समोर पुढ्यात बसलेली असताना, धन्यतेच्या भावनेने पापण्या हलकेच मिटल्या गेल्या; मन मात्र त्यांच्यासमोर खुले झाले होते. ह्या पहिल्या भेटीत कोणीच कोणाशी फारसे काही बोलले नाही. परंतु या मौनातच ते बरेच काही बोलले. त्यांना जाणवले की, आपण दोघेही एकाच मार्गाचे वाटसरू आहोत. काही क्षण तसेच ध्यानावस्थेत गेले. मीरा यांच्या मनात अनंत अशा शांतीचे अवतरण घडून आले होते.

पुढे या प्रसंगाची आठवण सांगताना श्रीमाताजी म्हणतात, ”अशी संपूर्ण शांती लाभावी ह्यासाठी तोपर्यंत मी अनेकदा प्रयत्न केले होते. तशी ती मिळायची देखील. पण त्याविषयीचा विचार बंद करता क्षणीच, सर्व बाजूंनी असंख्य विचार मनात गर्दी करत असत. आणि परत सारे नव्याने सुरु करावे लागत असे.” काय होते ह्या भेटीचे रहस्य? कालाच्या विशाल पटावरील दोन व्यक्तींची ही साधीसुधी भेट नव्हती. दोन शक्तींचे एकत्र येणे होते ते !

श्रीअरविंद आजवर जी साधना करीत आले होते, ती प्रामुख्याने आध्यात्मिक अवतरणाची’ साधना होती; तर मीरा आजवर जी साधना करीत होत्या त्याचे स्वरूप प्रामुख्याने ‘आंतरात्मिक’ होते. श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या भेटीचा नक्की अर्थ काय असावा? ह्याचा वेध घेत असताना डोळ्यांसमोर नकळतपणे तरळून जाते श्रीअरविंदांचे प्रतीक. ऊर्ध्वमुख आणि अधोमुख अशा दिशांनी एकमेकांत मिसळलेले दोन त्रिकोण, ज्यांच्या एकत्रिकरणातून मध्ये तयार होतो एक चौरस, त्या चौरसाकृतीमध्ये पाण्याच्या लाटांवर डौलाने डोलणारे कमलपुष्प. अभीप्सा, समर्पण आणि क्रियाशीलता ह्यांचे मूर्तिमंत प्रतीक अशा श्रीमाताजी; त्यांच्या रूपाने पृथ्वीची, अपरा प्रकृतीची दिव्यत्वाच्या अवतरणाविषयीची अभीप्साच जणू अभिव्यक्त झाली आहे. आणि सत्य, ज्ञान आणि अनंत ह्यांची जणू प्रतिमूर्ती असे योगी श्रीअरविंद ! अभीप्सेला प्रतिसाद देण्यासाठी वरून सत्य, ज्ञान आणि अनंत हेदेखील जणू उत्सुक होते. या दोघांच्या समन्वयातून तयार झालेला चौरस म्हणजे जणू संरक्षित, सुरक्षित असे आश्रमीय जीवन. या आध्यात्मिक प्रयोगशाळेतील जीव हेच जणूकाही पाण्याचे तरंग. आणि ह्या साऱ्या पसाऱ्यातून वर उमललेले ‘अतिमानस’रूपी कमलपुष्प.

भविष्यकाळात पूर्णत्वाला येऊ शकतील अशा ह्या साऱ्या शक्यता ह्या भेटीच्या क्षणाची जणू आतुरतेने वाट पाहत होत्या. ह्या पहिल्या भेटीतच मीरा यांच्या मनातील मानवहितासाठी करावयाचे प्रयत्न, त्याविषयी असलेल्या पूर्वीच्या साऱ्या उन्नत कल्पना एका क्षणातच मागे पडल्या. भविष्याकडे समोर नजर खिळलेली असताना, त्यांना जे दृश्य दिसत होते त्यापुढे ह्या एकेकाळी अतिभव्य, दिव्य, उदात्त वाटणाऱ्या साऱ्या कल्पना फिक्या पडत होत्या. श्रीअरविंदांच्या चरणांशी त्या साऱ्या संकल्पना एकाएकी विलीन होऊन गेल्या होत्या. मीरा कृतकृत्य होऊन स्वत:च्या घरी परतल्या होत्या.

दुसऱ्या दिवशी नेहमीच्या पद्धतीने त्या ध्यानाला बसल्या. मनात विचार होता नुकत्याच झालेल्या भेटीचा. दि. ३० मार्च १९१४, मीरा ह्यांच्या दैनंदिनीतील नोंद – “जे पूर्णतया तुझे साधन बनले आहेत, तुझ्या दिव्य अस्तित्वाची ज्यांना पूर्णतया जाणीव झालेली आहे, त्यांच्या (श्रीअरविंदांच्या) सहवासात असताना, मला हे जाणवले की, मी जे साध्य करण्यासाठी धडपडते आहे, त्यापासून मी अजून कित्येक योजने दूर आहे. माझ्या हृदयकुपीमध्ये मी जे जोपासू शकते ते, कितीही उन्नत, उदात्त, शुद्ध असले तरीही, माझ्या हृदयकुपीमध्ये मी जे जोपासावयास हवे, त्याच्याशी तुलना करता, ते अजूनही अंध:कारमय आणि अज्ञानी अवस्थेत आहे. पण ह्या नव्या जाणिवेमुळे माझी अभीप्सा अधिक तीव्र, जोमदार आणि सामर्थ्यवान झाली आहे. ‘त्या’च्या कार्याशी आणि ‘त्या’च्या इच्छेशी एकत्व पावण्यामध्ये, येणाऱ्या सर्व अडथळ्यांवर मात करण्याची संकल्पशक्ती, माझ्यात उदित झाली आहे. हळूहळू क्षितीज अधिकाधिक सुस्पष्ट होत आहे. मार्ग सुनिश्चित होताना दिसत आहे. आणि आम्ही अधिकाधिक विश्वासाने पुढे पुढे पावले टाकीत आहोत. घोर अंध:कारात बुडालेले आज हजारो लोक आजूबाजूला दिसत असले तरी, ते तितकेसे चिंतेचे कारण नाही; मी ज्यांना काल पाहिले ते (श्रीअरविंद) याच भूतलावर अस्तित्वात आहेत. एक ना एक दिवस अंध:कार प्रकाशात परिवर्तित होईल आणि त्या ईश्वराचे सार्वभौम साम्राज्य या पृथ्वीवर खरोखरीच प्रस्थापित झालेले असेल, ह्याची हमी देण्यास त्यांचे केवळ अस्तित्वच पुरेसे आहे. हे ईश्वरा, या अद्भुताच्या दिव्य रचनाकारा, मी जेव्हा ह्या साऱ्याचा विचार करते तेव्हा, माझे हृदय अतीव आनंदाने आणि कृतज्ञतेने भरून जाते आणि माझ्या आशेला पारावार उरत नाही. माझी भक्ती, अभिव्यक्तीच्या पलीकडील आहे आणि माझी आराधना मौन झाली आहे.” (क्रमशः)

 

भाग – ०७

दुसऱ्या दिवशी मीरा पुन्हा श्रीअरविंदांना भेटावयास गेल्या, त्यावेळी पॉल रिचर्ड्स सोबत होते. पॉल यांची श्रीअरविंदांबरोबर पुढे येऊ घातलेल्या युद्धाविषयी, भवितव्याविषयी चर्चा चालू होती. मीरा यांना त्यात रस नव्हता. चर्चा कानावर पडत होती. ते किती वेळ बोलत होते कोण जाणे? पण त्याकडे मीरा यांचे लक्ष नव्हते. श्रीअरविंदांच्या चरणापाशी त्या केवळ स्तब्ध बसून राहिल्या होत्या. काही वेळाने मीरा यांना जाणवले की, एक शक्ती त्यांच्यात अवतरित होत आहे. शांती, शांतता आणि काहीतरी विराट असा तो अनुभव होता. वरून अवतरलेली ती दिव्य शक्ती त्यांच्या हृदयापाशी येऊन स्थिरावली. चर्चा आटोपल्यावर त्या उठल्या आणि निघाल्या तेव्हा त्यांना जे जाणवले, त्याबद्दल त्या लिहितात, ”आजवरच्या आयुष्यात जपलेल्या, तयार झालेल्या साऱ्या मनोरचना, मानवी जीवनाच्या हितासाठी पाहिलेली सारी सुंदर स्वप्नं, साऱ्या संकल्पना बंद डोळ्यांसमोर ढासळून पडत आहेत. सारे काही निमिषार्धात नाहीसे झाले आहे. मला आता काहीच माहीत नाहीये, समजत नाहीये, मी पूर्णत: कोरी पाटीच झाले होते जणू. ही स्थिती जपण्यासाठी, त्याला धक्का लागू नये यासाठी, मी पुढे आठ-दहा दिवस प्रयत्नशील राहिले. तो अनुभव तसाच टिकून राहावा यासाठी, त्या काळात मी अगदी अत्यल्प बोलत असे. आणि तेही आवश्यक तेवढे अगदी कामापुरतेच.” आता त्यांचे चित्त सहस्त्रदलात नाही तर, त्याच्याही वर असणाऱ्या केंद्राच्या ठिकाणी स्थिरावले होते. आणि तेथूनच त्या जगाचा अनुभव घेत होत्या. नंतरच्या आयुष्यात हा शांतीचा अनुभव त्यांना कधीच सोडून गेला नाही. हे होते श्रीअरविंदांचे सामर्थ्य !

या अनुभवानंतर मीरा लिहितात की, “या अवस्थेत कोणताही विरोध न करता, तुझ्याप्रत संपूर्ण समर्पित व्हायला मी शिकले, जर मी एखाद्या निरागस बालकाप्रमाणे बनण्यास संमती दिली तर, एक नवी शक्यता माझ्यासमोर उलगडताना दिसेल.”

या अपूर्व भेटींमध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. मीरा यांनी मानवोद्धारार्थ अनेक योजना मनामध्ये आखल्या होत्या, त्या पूर्णतेस नेण्यासाठी आवश्यक असलेले भौतिक व आध्यात्मिक बलही त्यांच्याजवळ होते आणि त्या बलप्रयोगाची प्रभावी रीतही त्यांना अवगत होती. परंतु एका प्रश्नाचे उत्तर अद्याप त्यांना गवसले नव्हते. मानवजातीचा आजवरचा इतिहास पाहिला तर असे दिसते की, अशा तऱ्हेचे, सर्व प्रकारचे, सर्व देशातले प्रयत्न काही प्रमाणात यशस्वी होऊन कालांतराने, कालौघापुढे ते यश कोठल्या कोठे धुऊन जाऊन पार नाहीसे होते. आपल्या प्रयत्नांचेही असेच होणार काय ? ह्या प्रश्नाचा उलगडा श्रीअरविंदांच्या भेटीमुळे झाला. त्यांनी श्रीअरविंदांना थेट प्रश्न विचारला होता, “या पृथ्वीवर देवराज्य, सत्याचे राज्य स्थापन करण्याचे सर्व प्रयत्न थोड्याशा यशानंतर, पुनरपि धुळीस मिळतात, यापुढेही हे असेच घडत राहणार का?” अत्यंत तळमळीने विचारलेला हा प्रश्न ऐकून श्रीअरविंद गंभीर झाले; स्थिर दृष्टीने त्यांनी मीरा यांच्याकडे पाहिले व घनगंभीर आवाजात ते उद्गारले, “नाही, यावेळी तसे घडणार नाही.”

उगवणारा नित्य नवा दिवस म्हणजे समर्पणाच्या यज्ञातील जणू एक नवी आहुतीच असे, अशाप्रकारे मीरा यांचे जीवन सुरु होते. त्या परमेश्वराला उद्देशून लिहित होत्या, “हा देह हे तुझे माध्यम आहे, माझी इच्छा ही तुझी सेवक आहे, माझी बुद्धी ही तुझे साधन आहे आणि सारे अस्तित्व तुझेच आहे.” अशी भावावस्था जरूर होती. पण तरीही त्यांना जाणवले, स्वत:च्या सीमित व्यक्तिमत्वाच्या कचाट्यातून आपण अजूनही बाहेर पडू शकत नाही. परमेश्वराचे नि:सीम सेवक बनण्याच्या प्रयत्नात नेमके काय आड येत आहे, याचा त्या कसून शोध घेत होत्या. स्वत:ला परमेश्वरापासून विभक्त करणाऱ्या स्वत:तीलच कशापासून तरी स्वत:ची सुटका करण्याविषयी मीरा त्याची करुणा भाकत होत्या. आणि आतून परमेश्वराची वाणी कानावर पडली : “तुला समग्रपणे मृत्यू कसा स्वीकारावा हे आजवर माहीत झालेले नाही. तुझ्यामध्ये नेहमीच अशी कोणतीतरी गोष्ट होती की जी, हे जाणून घेऊ इच्छित होती, साक्षी होऊ पाहत होती, समजून घेऊ पाहत होती. संपूर्णतया समर्पित हो. स्वतःचा विलय कसा करावयाचा, ते शिकून घे; तुला माझ्यापासून विलग करणारा अगदी शेवटचा अडथळा देखील भेदून टाक आणि हातचे काहीही न राखता समर्पणाचे कार्य पूर्णत्वास ने.” मीरा यांची धारणा बघता बघता वैश्विक झाली होती.

संपूर्ण पृथ्वीमातेसाठीच जणू परमेश्वराकडे त्या पसायदान मागत होत्या. त्या म्हणत होत्या, “सारे मत्सर मावळून जाऊ देत, सारे वैमनस्य पुसले जाऊ दे, सारी भीती पळून जाऊ दे, साऱ्या शंका, सारे संशय खंडित होऊ देत. या शहरात, या देशात, या भूतलावर सर्व हृदये, तुझ्या दिव्य रूपांतरकारी प्रेमाने भरून जाऊ देत. चांगुलपणा, न्याय आणि शांती यांची सार्वभौम सत्ता जगावर असू दे. अज्ञानी अहंकारावर मात केली जावो, अंध:कार प्रकाशात परिवर्तित होवो…” आणि अचानक पडदा वर उचलला गेला…

मीरा त्यांच्या दैनंदिनीमध्ये नोंदवतात, “गेल्या काही दिवसांपेक्षा भूतकाळ अधिक जोराने पुसला गेला आहे, मृतवत झाला आहे, नूतन जीवनाच्या किरणांखाली जणू काही पुरला गेला आहे. या वहीची काही पाने चाळत असताना मागे सहज ओझरता दृष्टिक्षेप टाकला असता, या भूतकाळाच्या मृत्यूबद्दल माझी पुरेपूर खात्री झाली आणि मोठा भार कमी झाल्याने हलके वाटून, तुझ्यापुढे, माझ्या दिव्य प्रभूपुढे मी बालकाच्या निरागसतेने, अत्यंत सरलतेने, आडपडदा न ठेवता उभी राहिली आहे… परमेश्वरा, तू माझी प्रार्थना ऐकलीस. तुझ्याजवळ मी जे मागितले ते तू मला दिले आहेस. माझ्यातील ‘मी’ लुप्त झाला आहे; आता फक्त तुझ्याच सेवेस वाहिलेले एक विनीत साधन शिल्लक राहिले आहे. माझे जीवन हाती घेऊन, ते तू तुझेच केले आहेस; माझी इच्छाशक्ती घेऊन, ती तुझ्या इच्छाशक्तीशी जोडली आहेस; माझे प्रेम घेऊन, ते तू तुझ्या प्रेमाशी एकरूप केले आहेस; माझा विचार हाती घेऊन, त्याच्या जागी तुझी चेतना तू भरली आहेस. हा आश्चर्यमग्न देह आपले मस्तक विनम्र करून, मौनयुक्त विनीत भक्तिभावाने, तुझ्या चरणधुलीस स्पर्श करीत आहे. निर्विकार शांतीमध्ये विलसणाऱ्या तुझ्याखेरीज दुसरे काहीही अस्तित्वात उरलेले नाही.”

अशा रितीने संपूर्णत: समर्पित झालेल्या मीरा यांच्याविषयी श्रीअरविंद म्हणतात, “I had never seen anywhere a self-surrender so absolute and unreserved.” यापुढील काळात दिव्य चेतनेचे माध्यम म्हणून कार्य करू पाहणाऱ्या मीरा, योगी श्रीअरविंद, आणि पॉल रिचर्ड्स या त्रयीने मिळून ‘आर्य’ नावाचे मासिक काढावयाचे ठरविले. त्यासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था लावण्याची जबाबदारी मीरा यांनी आपल्या खांद्यावर घेतली. वर्गणीदारांची यादी त्यांनी स्वत: लिहून काढली. त्या जमाखर्च ठेवू लागल्या. ‘आर्य’च्या फ्रेंच आवृत्तीसाठी पॉल रिचर्डस् हे श्रीअरविंदांचे लिखाण फ्रेंचमध्ये अनुवादित करत. त्या कामातही मीरा त्यांना मदत करू लागल्या….

मात्र दि. २२ फेब्रुवारी १९१५ पॉल व मीरा फ्रान्सला जाण्यासाठी निघावे लागले; निमित्त होते पहिल्या महायुद्धाचे. निघण्याच्या आदल्या दिवशीच त्यांचा वाढदिवस होता. मीरा मोठ्या कष्टी अंत:करणाने निरोप घेत होत्या. १५ ऑगस्ट १९१४ पासून सुरु केलेल्या, आर्य मासिकाच्या कामकाजामध्ये आता आपल्या जाण्याने खंड तर पडणार नाही ना, अशी आशंका त्यांना वाटली; दर महिन्याला ६४ पाने लिहिण्याची जबाबदारी आता एकट्या श्रीअरविंदांवर येऊन पडणार, या भावनेने मीरा काहीशा काळजीत पडल्या. परंतु त्याचवेळी श्रीअरविंद जणू त्यांना सांगत होते, “येणाऱ्या वादळवाऱ्याकडे, धुवांधार पावसाकडे पाहण्यापेक्षा, त्याही पलीकडे असलेल्या तेजोमय दिवसांकडे तुम्ही पाहा. तुमची देहमूर्ती उजळवून टाकेल असे आनंदमय भाग्य माझ्या दृष्टीला स्पष्ट दिसले आहे. त्या परमेश्वराच्या कृपेवर भरवसा ठेवून, त्याची इच्छा काय आहे ते समजून घ्या. तुमच्या जीवनाचे गंतव्य अजूनही अप्रकट असले तरी, तुमच्या जीवनाचे नेतृत्व परमेश्वराला करू दे. जे जे काही घडत आहे, त्यामध्ये त्याचेच रूप पाहा. तुम्ही ज्यासाठी जन्माला आल्या आहात, त्याची परिपूर्ती करण्यासाठीच सारे काही घडत आहे.”

श्रीअरविंदांच्या या आश्वासक उद्गाराने मीरा शांत झाल्या आणि आता त्या फ्रान्सला परत निघाल्या ते, पुन्हा कायमस्वरूपी भारतात परतायचे ह्या निश्चयानेच !! पुढे पाच वर्षांनी, दि. २४ एप्रिल १९२० रोजी मीरा अल्फासा उर्फ ‘श्रीमाताजी’ ह्या कायमस्वरूपी वास्तव्यासाठी पाँडिचेरी येथे परतल्या.

(लेखनसीमा…)