ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

वैश्विक प्रेमाची महान शक्ती

(चैत्य दृष्टिकोनातून माणसापेक्षा एखादे गुलाबाचे फुलदेखील किती चांगले असू शकते ते श्रीमाताजींनी सांगितले, हे आपण बघितले. आज त्याचा उत्तरार्ध पाहू.)

तुम्ही एक जरी पुढचा टप्पा सचेतपणे वर चढून गेलात आणि ते गुलाबाचे फूल जी गोष्ट अजाणतेपणे करते, ते जर तुम्ही सचेतपणे (consciously) केलेत तर, मग ते कितीतरी पटीने अधिक चांगले होईल. खरंतर, कोणताही हिशोब न ठेवता, केवळ अस्तित्वाच्या आनंदासाठी सौंदर्य उमलून येणे ही गोष्ट सहजस्वाभाविक असली पाहिजे. ही गोष्ट फुलाप्रमाणेच माणसामध्येही असली पाहिजे. लहान मुलांमध्ये कधीकधी ही गोष्ट आढळून येते. (मात्र कधीकधीच, नेहमी नाही.) दुर्दैवाने, पालकांच्या आणि वातावरणाच्या प्रभावामुळे मुलं अगदी लहान असतानाच स्वार्थीपणा शिकतात.

परंतु आपल्यापाशी जे आहे किंवा आपण जे काही केले आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळावे अशी इच्छा बाळगणे, ही जगातील सर्वांत वाईट गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट आता अत्यंत सार्वत्रिक झाली आहे. ती आता इतकी सार्वत्रिक झाली आहे की, माणसाचा तो जणू सहजस्वभावच बनला आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडण्याच्या आणि त्यातून लाभ मिळवण्याच्या या प्रवृत्तीमुळे व्यक्ती ईश्वरी प्रेमापासून जेवढी दूर जाते तेवढी ती दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने दूर जात नाही.

फुलांचे उमलणे म्हणजे त्यांच्या प्रेमाचे रूप असते. जेव्हा एखादे गुलाबाचे फूल सूर्याच्या दिशेने उमलते तेव्हा खचितच, ते जणू स्वतःचे सौंदर्य प्रदान करण्याच्या गरजेतून उमलत असते. माणसाच्या आकलनापलीकडचे आहे हे सारे. कारण ती फुलं जे काही करत असतात त्याचा ती विचार करत बसत नाहीत. (तो त्यांचा स्वभावधर्म असतो.)

कृती करत असताना स्वतःकडे पाहण्याची म्हणजे, स्वतःचा विचार करण्याची जी वृत्ती (स्वत:चा स्वार्थ साधण्याची) माणसामध्ये आहे ती वृत्ती, तो नेहमी सर्वत्रच उपयोगात आणत असतो. माणसाला माहीत असते की, तो काहीतरी करत आहे. पण प्राणी मात्र तसा विचार करत बसत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रेम हे माणसाच्या प्रेमासारखे नसते. आणि फुलांबाबत बोलायचे झाले तर ती त्याबाबतीत सचेत नसतात. स्वतःच्या चेतनेविषयी सचेत होण्यासाठी लागणारी चेतना त्यांच्यामध्ये नसते; तर ती एक सहजस्फूर्त, स्वाभाविक प्रक्रिया असते. पण त्या सर्वांमध्ये एक महान शक्ती, महान वैश्विक चेतना आणि वैश्विक प्रेमाची महान शक्ती कार्यरत असते आणि त्यामुळेच या साऱ्या गोष्टी सौंदर्यपूर्णतेने बहरून येतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 241)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

सहजस्वाभाविक, निरपेक्ष कृती

आंतरात्मिक चेतनेच्या अनेकविध सुंदर रूपांमधील नि:स्वार्थी, निरपेक्ष कृती हे या जगातील एक सर्वोत्तम रूप आहे.…

1 day ago

चैत्य पुरुषाचा शोध

‘सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि फक्त ईश्वराप्रति अभिमुख होण्याची इच्छा या गोष्टी म्हणजे चैत्य पुरुष…

2 days ago

सार्वभौम चेतनेचा शोध

मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही)…

3 days ago

पूर्णयोगासाठी आवश्यक असणारी तयारी

  पूर्णयोगासाठी व्यक्तीची तयारी असणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ 'पूर्णयोगाची क्षमता असणे’ असा नसून…

4 days ago

दिव्य-सत्याचा शोध

  तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्या'चा शोध घेण्याची आणि त्या ‘सत्या’चे…

5 days ago

चैत्य पुरुष म्हणजे काय?

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…

6 days ago