ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधनेची दुसरी बाजू

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण गेले दोन दिवस विचारात घेतला. आज त्याचा अंतिम भाग…)

साधनेची दुसरी बाजू

साधनेची दुसरी बाजू प्रकृती, मानसिक, प्राणिक व शारीरिक अस्तित्वाशी आणि त्यांच्या गतिविधींशी संबंधित आहे. व्यक्तीचे दोन विसंगत भागात विभाजन होऊ नये यासाठी, व्यक्तीची प्रकृती ही तिच्या आंतरिक साक्षात्काराशी मिळतीजुळती असली पाहिजे; हे येथील तत्त्व आहे. यासाठी अनेक साधना किंवा प्रक्रिया आहेत.

समर्पण साधना

त्यातील एक साधना म्हणजे, स्वतःचे सर्व जीवनव्यवहार ईश्वरार्पण करायचे आणि तुमची प्रकृती उच्चतर शक्तीने हाती घ्यावी आणि तुम्हाला आंतरिक मार्गदर्शन करावे म्हणून तिला साद घालायची. जर आंतरिक आत्म-उन्मीलन (soul-opening) झाले असेल, जर चैत्य पुरुष अग्रभागी आलेला असेल तर मग, फार काही अडचण येत नाही; कारण त्याबरोबरच चैत्य विवेकसुद्धा येतो. सातत्याने सूचना मिळत राहतात, आणि अंततः चैत्य पुरुषाचे शासन सुरू होते. हे शासन तुमच्यामधील सर्व अपूर्णता दाखवून देते आणि शांतपणे, धीराने त्या काढूनही टाकते; त्यामुळे योग्य मानसिक व प्राणिक गतीविधी घडून येतात आणि शारीरिक चेतनेला सुद्धा पुन्हा एक नवीन आकार प्राप्त होतो.

साक्षी भावाची साधना

दुसरी पद्धत म्हणजे मन, प्राण आणि शारीरिक अस्तित्वाच्या साऱ्या हालचालींपासून अलिप्त होऊन मागे उभे राहायचे आणि त्यांच्या सर्व गतिविधी म्हणजे आपल्या सद्अस्तित्वाचा एक भाग आहेत असे न मानता; भूतकाळातील कर्मामुळे आपल्यावर लादल्या गेलेल्या, व्यक्तीमधील सामान्य प्रकृतीच्या नित्य रचना आहेत असे समजायचे. व्यक्ती यामध्ये जितक्या प्रमाणात यशस्वी होते, म्हणजे जितक्या प्रमाणात ती निर्लिप्त होते, आणि मन, प्राण व शरीर आणि त्यांच्या गतिविधी म्हणजेच आपण आहोत असे मानेनाशी होते; तेव्हा व्यक्ती अंतरंगात असणाऱ्या आपल्या आंतरिक अस्तित्वाविषयी (म्हणजे आंतरिक मन, आंतरिक प्राण, आंतरिक शरीर यांविषयी) जागृत होऊ लागते. हे आंतरिक अस्तित्व शांत, स्थिर, अमर्याद आणि अलिप्त असते. त्यामध्ये ऊर्ध्वस्थित असणाऱ्या खऱ्या आत्म्याचे (true Self) प्रतिबिंब दिसते आणि हे अस्तित्व त्या खऱ्या आत्म्याचे थेट प्रतिनिधी असू शकते. अशा या शांत आंतरिक अस्तित्वातूनच मग, जे त्याज्य आहे त्याला नकार देण्यास सुरुवात होते; जे टिकवून ठेवणे आणि ज्यामध्ये रूपांतरण करणे शक्य आहे त्याचा स्वीकार सुरू होतो. परिपूर्णत्वाविषयी अगदी आंतरतम असा संकल्प उदयास येतो किंवा प्रकृतीच्या परिवर्तनासाठी जे आवश्यक आहे तेच प्रत्येक पावलागणिक करता यावे म्हणून दिव्य शक्तीला आवाहन करण्यास सुरुवात होते. त्यातूनच मग आंतरतम अशा चैत्य अस्तित्वाप्रत आणि त्याच्या मार्गदर्शक प्रभावाप्रत किंवा त्याच्या थेट मार्गदर्शनाप्रत मन, प्राण व शरीर खुले होऊ शकतात. बऱ्याच व्यक्तींमध्ये, या दोन्ही पद्धती एकदमच उदयास येतात आणि एकत्रितपणे कार्य करतात आणि शेवटी एकमेकींमध्ये मिसळून जातात. पण व्यक्ती यातील कोणत्याही एका पद्धतीपासूनही सुरुवात करू शकते. जी पद्धत अनुसरण्यास सोपी आहे आणि जी व्यक्तीला अगदी स्वाभाविक वाटते त्या पद्धतीने तिने सुरुवात करावी.

अंततः सर्व प्रकारच्या अडचणींमध्ये जेथे वैयक्तिक प्रयत्न खुंटतात, तेव्हा गुरुच्या मदतीचा उपयोग होऊ शकतो आणि साक्षात्कारासाठी ज्याची गरज असते ती गोष्ट किंवा लगेचची जी कोणती पायरी आवश्यक असते ती गुरूच्या मदतीमुळे प्राप्त होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 07-08)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

साधना आणि एकाग्रता

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण विचारात घेतला. आज…

2 days ago

आपले जीवितकार्य

(कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र आपण काल विचारात घेतले. आज आपण…

3 days ago

कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र

(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, वुड्रो विल्सन यांच्या कन्या कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन या श्रीअरविंद लिखित ‘एसेज…

4 days ago

आत्मदानाचा अर्थ

  (बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये लिहिलेल्या…

5 days ago

आध्यात्मिक चेतना

(श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना एक पत्र…

6 days ago

तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी

  तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच…

7 days ago