ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

साधना आणि एकाग्रता

(श्रीअरविंद यांनी कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांना दिलेल्या पत्रोत्तरामधील काही भाग आपण विचारात घेतला. आज त्याचा पुढील भाग…)

साधनेची पहिली बाजू
तुमच्या अंतरंगातील चेतनेवर एकाग्रता करण्याचा सराव करणे, ही पहिली आवश्यक गोष्ट आहे. सामान्य मानवी मनाच्या गतिविधी पृष्ठस्तरीय असल्यामुळे, या पृष्ठवर्ती चेतनेमुळे खरा आत्मा (real self) झाकला जातो. परंतु या पृष्ठस्तरीय भागाच्या मागील बाजूस, अंतरंगामध्ये दुसरी एक गुप्त चेतना असते आणि तिच्यामध्येच आपल्याला आपल्या खऱ्या आत्म्याची आणि प्रकृतीच्या महत्तर व गहनतर सत्याची जाणीव होऊ शकते. परिणामतः आत्म्याचा साक्षात्कार होऊ शकतो आणि प्रकृतीला मुक्त करून, तिचे परिवर्तन घडवून आणता येऊ शकते. पृष्ठस्तरीय मन शांत करणे आणि अंतरंगात जीवन जगायला सुरुवात करणे, हे या एकाग्रतेचे उद्दिष्ट असते. पृष्ठस्तरीय चेतनेव्यतिरिक्त अन्य अशी जी सत्य चेतना असते तिची दोन मुख्य केंद्रं असतात. एक केंद्र हृदयामध्ये (शारीरिक हृदयामध्ये नाही तर, छातीच्या मध्यभागी असणारे हृदयकेंद्र) आणि दुसरे केंद्र मस्तकामध्ये असते.

एकाग्रतेचा पहिला मार्ग
हृदयकेंद्रामध्ये केलेल्या एकाग्रतेमुळे अंतरंग खुले होऊ लागते आणि या आंतरिक खुलेपणाचे अनुसरण करत करत, आत खोलवर गेल्यास व्यक्तीला अंतरात्म्याचे किंवा व्यक्तिगत दिव्य तत्त्वाची म्हणजे चैत्य पुरुषाची (psychic being) जाणीव होते. चैत्य पुरुषासमोर असलेला पृष्ठवर्ती चेतनेचा पडदा दूर झाल्यामुळे (unveiled) चैत्य पुरुष मग अग्रभागी यायला सुरुवात होते, तो प्रकृतीवर शासन करू लागतो, प्रकृतीला आणि तिच्या सर्व हालचालींना सत्याच्या दिशेने वळवू लागतो, ईश्वराच्या दिशेने वळवू लागतो आणि जे जे काही ऊर्ध्वस्थित आहे, ते अवतरित व्हावे म्हणून त्याला साद घालतो. त्यामुळे त्याला ईश्वराच्या उपस्थितीची जाणीव होते. त्या सर्वोच्चाप्रत चैत्य पुरुष स्वतःला समर्पित करतो आणि जी महत्तर शक्ती व चेतना आपल्या ऊर्ध्वस्थित राहून, आपली वाट पाहात असते, तिचे आपल्या प्रकृतीमध्ये अवतरण व्हावे यासाठी तो तिला आवाहन करतो. ईश्वराप्रत स्वतःला समर्पित करत, हृदयकेंद्रावर (अनाहत केंद्रावर) एकाग्रता करणे आणि हृदयातील ईश्वराच्या उपस्थितीची व आंतरिक खुलेपणाची अभीप्सा बाळगणे हा पहिला मार्ग आहे आणि ते जर करता आले, तर ती स्वाभाविक सुरुवात म्हटली पाहिजे. कारण एकदा का त्याचे परिणाम दिसू लागले की मग, या मार्गाने केलेल्या वाटचालीमुळे, आध्यात्मिक मार्ग हा, दुसऱ्या मार्गाने केलेल्या वाटचालीपेक्षा अधिक सोपा आणि अधिक सुरक्षित होतो.

एकाग्रतेचा दुसरा मार्ग
हा दुसरा मार्ग म्हणजे मस्तकामध्ये, मानसिक चक्रामध्ये करायची एकाग्रता. त्यामुळे जर पृष्ठस्तरीय मनामध्ये शांतता येऊ शकली तर, आतील, व्यापक, अधिक गहन असे आंतरिक मन (inner mind) खुले होते. हे मन आध्यात्मिक अनुभूती आणि आध्यात्मिक ज्ञान ग्रहण करण्यास अधिक सक्षम असते.

मात्र मस्तकामध्ये चेतनेची एकाग्रता करणे हा, त्याहूनही वर असणाऱ्या केंद्राप्रत चढून जाण्याच्या तयारीचा केवळ एक भाग असतो, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. अन्यथा व्यक्ती कदाचित स्वतःच्या मनामध्ये आणि त्याच्या अनुभवांमध्येच बद्ध होण्याची शक्यता असते. किंवा व्यक्ती आध्यात्मिक विश्वातीतामध्ये (spiritual transcendence) उन्नत होऊन, तेथे जीवन जगण्याच्या ऐवजी, फार फार तर, ऊर्ध्वस्थित सत्याचे केवळ प्रतिबिंबच प्राप्त करून घेऊ शकते.

म्हणून एकदा का येथे एकाग्रता साध्य झाली की मग मात्र, व्यक्तीने निश्चल-निरव मानसिक चेतना ही, मनाच्या वर जे जे ऊर्ध्वस्थित आहे त्याप्रत खुली करणे आवश्यक असते. कालांतराने चेतना ऊर्ध्व दिशेने वाटचाल करत आहे अशी व्यक्तीला जाणीव होते आणि सरतेशेवटी, आजवर चेतना ज्या झाकणामुळे शरीरामध्येच बद्ध होऊन राहिली होती, त्या झाकणाच्या पलीकडे ती चढून जाते. तेथे मस्तकाच्या वर असलेले केंद्र तिला गवसते, तेथे ती अनंतत्वामध्ये मुक्त होते. तेथे ती चेतना विश्वात्म्याच्या, दिव्य शांतीच्या, दिव्य प्रकाशाच्या, दिव्य शक्तीच्या, दिव्य ज्ञानाच्या, दिव्य आनंदाच्या संपर्कात येते आणि त्यामध्ये प्रवेश करते आणि प्रकृतीमध्येही या गोष्टींचे अवतरण अनुभवास यावे म्हणून, ती त्या गोष्टींशी एकरूपच होऊन जाते. अविचलतेसाठी अभीप्सा बाळगत, मस्तकामध्ये एकाग्र होणे आणि आत्म्याचा व ऊर्ध्वस्थित ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे हा एकाग्रतेचा दुसरा मार्ग आहे.

काही जणांना मानसिक एकाग्रता सोपी वाटते; तर काही जणांना हृदयकेंद्रावर एकाग्रता साधणे अधिक सोपे जाते; काही जणांना या दोन्ही केंद्रांवर आलटूनपालटून एकाग्रता करणे शक्य होते. परंतु जर एखाद्याला हृदय केंद्रापासून सुरुवात करणे शक्य झाले, तर ते अधिक इष्ट असते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 06-07)

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

आपले जीवितकार्य

(कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र आपण काल विचारात घेतले. आज आपण…

2 days ago

कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र

(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, वुड्रो विल्सन यांच्या कन्या कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन या श्रीअरविंद लिखित ‘एसेज…

3 days ago

आत्मदानाचा अर्थ

  (बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये लिहिलेल्या…

4 days ago

आध्यात्मिक चेतना

(श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना एक पत्र…

5 days ago

तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी

  तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच…

6 days ago

सत्यशोधनाची प्रामाणिक इच्छा

  (अंतरात्म्याचा आवाज कसा असतो, आणि मन व प्राण यांचे आवाज कसे असतात, हे आपण…

7 days ago