(आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे इतिकर्तव्यता झाली असे मानण्याची एक सहज-प्रवृत्ती आढळून येते, ही गोष्ट श्रीमाताजींनी निदर्शनास आणून दिली आहे. तो भाग आपण काल विचारात घेतला. येथे ही प्रवृत्ती कितपत यथार्थ आहे याचा परामर्श त्या घेत आहेत. तो विचार आज समजावून घेऊ…)

परमेश्वर‌ जेव्हा आविष्कृत झाला तेव्हा (आत्मसाक्षात्कार, मुक्ती, निर्वाण आणि लय) हेच त्याचे ध्येय होते आणि हेच त्याचे प्रयोजन होते, असे खरोखरच तुम्हाला वाटते का?

जर का तसे असते तर, ही अखिल सृष्टी, हे आविष्कृत झालेले अखिल विश्व म्हणजे एक अतिशय विचित्र थट्टा ठरली असती. या सृष्टीमधून जर बाहेरच पडायचे असते तर मग या सृष्टीचा आरंभच का झाला असता?

आजवर जो इतका संघर्ष केला, इतक्या हालअपेष्टा सोसल्या, हे जे काही निर्माण केले त्या सगळ्याचा काय उपयोग? कारण वरकरणी पाहता तरी ते अत्यंत शोकात्म आणि नाट्यमय दिसत आहे. हा सगळा खटाटोप काय फक्त लौकिकातून पारलौकिकात कसे जायचे हे शिकविण्यासाठीच केला गेला आहे? आणि मग जर का तसेच असते तर या सगळ्याचा आरंभच झाला नसता तर बरे झाले असते, नाही का?

पण व्यक्तीने जर या साऱ्याचा मुळातून विचार केला आणि तिने केवळ अहंकारच (egoism) नाही तर, अहंभावदेखील (ego) नष्ट केला; तिने जर हातचे काहीही राखून न ठेवता, अगदी पूर्णपणे व निरपेक्षपणे आत्मदान केले, तर ईश्वरी‌ योजनेच्या आकलनाची क्षमता तिच्यामध्ये येते. आणि मग तिला हे ज्ञान होते की, हे सर्व म्हणजे काही निव्वळ थट्टा नाहीये किंवा तुम्ही जिथून आरंभ केला होता, तिथेच काहीसे घायाळ होऊन परत याल, असा हा एखादा त्रासदायक मार्गदेखील नाहीये. उलट, अखिल सृष्टीला अस्तित्वाचा आनंद, अस्तित्वाचे सौंदर्य, अस्तित्वाची महानता, उदात्त जीवनाचे राजवैभव शिकविण्यासाठी आणि त्या आनंदाची, त्या सौंदर्याची, त्या महानतेची सदोदित प्रगमनशील असणारी आणि निरंतर होत जाणारी वृद्धी शिकविण्यासाठी, या सृष्टीची निर्मिती झाली आहे हे त्या व्यक्तीला उमगते.

आणि हे समजल्यावर मग मात्र प्रत्येक गोष्टीला अर्थ प्राप्त होतो. तेव्हा मग आजवर जो संघर्ष केला, दुःखभोग सहन केले त्याचा पश्चात्ताप व्यक्तीला होत नाही. उलट आता, दिव्य ध्येय (आत्म-साक्षात्कारानंतर त्याच्या आधारे प्रकृतीचे रूपांतरण) साध्य करण्यासाठी व्यक्तीच्या अंगी उत्साह संचारतो आणि मग अशी व्यक्ती त्या दिव्य ध्येयप्राप्तीच्या आणि विजयाच्या निश्चितीने त्या साक्षात्काराकडे झेपावते.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

 

बरेचदा असे होते की, व्यक्ती आत्मशोधासाठी, आत्म्याशी ऐक्य पावण्यासाठी आवश्यक असणारे सर्व आंतरिक प्रयत्न करते आणि आत्म्याने आपल्या जीवनाचे संचालन करावे यासाठी त्याला वावदेखील देते. प्रत्यक्षात व्यक्तीला जेव्हा त्या आत्म्याचा शोध लागतो तेव्हा त्यामुळे एक प्रकारची अद्भुत मोहिनी निर्माण होते. त्याचा परिणाम म्हणून, व्यक्ती अगदी सहज-स्वाभाविकपणे पहिली गोष्ट स्वतःला सागंते ती अशी की, “मला जे हवे होते ते आता मला मिळाले आहे, मला अपरिमित आनंद गवसला आहे.” आणि त्यानंतर आपला कशाशीच काही संबंध नाही अशा प्रकारची एक वृत्ती तिच्यामध्ये निर्माण होण्याची शक्यता असते.

वास्तविक, आजवर ज्यांना ज्यांना आत्मशोध लागलेला आहे त्या सर्वांच्या बाबतीत बहुतांशी असेच काहीसे झालेले आहे. एवढेच नव्हे तर, काहींनी या अनुभवावर आधारित साक्षात्काराचे जणू एक तत्त्वज्ञानच तयार केले आणि त्यांनी सांगून ठेवले आहे की, “एकदा का तुम्हाला आत्मशोध लागला की मग सारे काही साध्य झाले. मग करण्यासारखे अन्य काही शिल्लक राहत नाही, तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचलेले असता आणि तोच मार्गाचा अंतिम टप्पा असतो.”

खरंतर, आत्म-साक्षात्कारानंतरची, पुढील वाटचाल करण्यासाठी अपार धैर्याची आवश्यकता असते. एकदा का व्यक्तीला आत्मशोध लागला की मग त्याचा आत्मा निर्भय योद्धा झाला पाहिजे. आपल्या स्वतःच्या आंतरिक हर्षाने आत्मतृप्त होऊन, व्यक्तीने विश्राम घेता कामा नये. इतरांचे दुःख पाहिल्यावर – मी जे प्रयत्न केले आहेत तेच प्रयत्न इतरांनीदेखील केले पाहिजेत, त्यांनी तसे प्रयत्न केले तर एक ना एक दिवस ते सुद्धा (मी प्राप्त करून घेतलेल्या) या अवस्थेला जाऊन पोहोचतील, त्यांनासुद्धा माझ्यासारखाच आंतरिक हर्ष लाभेल, अशी समजूत करून घेऊन – त्या व्यक्तीने स्वसंतुष्ट राहता कामा नये. फार फार तर अशी व्यक्ती स्वतःच्या आंतरिक ज्ञानाच्या अवस्थेमध्ये राहून, ‘महान परोपकारी‌’ वृत्तीने आणि ‘प्रगाढ करुणे‌’ने इतरांना तेथपर्यंत पोहोचण्यासाठी साहाय्य करू शकते. आणि मग जेव्हा प्रत्येकालाच आत्मसाक्षात्कार होईल तेव्हा या जगाचा अंत होईल आणि तसे झाले की, ज्यांना दुःखभोग नकोसे वाटतात त्यांचे दुःखभोग संपतील असे म्हणून, ती व्यक्ती स्वतःची समजूत करून घेऊ शकते. मात्र… येथेच खरी मेख आहे. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 09 : 425-426)

 

 

निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला जाणणे आणि समग्रतया ईश्वर‌च होऊन जीवन जगणे यासाठी असलेली उत्कट अभीप्सा हाच तो अग्नी आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 74)

 

जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वरा‌चे अपयश असते. परंतु त्यामुळे ‘प्रकृती‌’ मात्र समाधानी होते आणि अशा जिवांची संख्या वाढविण्यामध्ये आनंद मानते. कारण, प्रकृती टिकून राहील आणि तिचे साम्राज्य दीर्घकाळ चालत राहील अशी ग्वाही ते जीव देत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 208)

 

जो मनुष्य सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतुने, म्हणजेच हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे, याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतुने जो प्रयत्नशील असतो आणि गरज भासल्यास, आजवर त्याला जे ‘सत्य‌’ म्हणून वाटत होते त्या विचारांचा परित्याग करण्यासाठी जो तयार असतो, तो मनुष्य हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचारांच्या संपर्कात येतो.

मग दीर्घकाळ केलेल्या ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो विशुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर त्या मनुष्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही. त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही गोष्ट त्याच्या व्यक्तित्वाचा जणू एक भागच होऊन जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवणुकी, जे सारे एके काळी त्याला खूपच विरोधाभासी वाटत असे, त्या साऱ्या पाठीमागे असलेले गहन सत्य आता त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून काहीच लपून राहू शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 02 : 28)

 

 

मनुष्यप्राणी, सामान्यतः जसे जीवन जगतो त्या त्याच्या जीवनाची घडण अर्ध-स्थिर, अर्ध-तरल अशा अतिशय अपरिपूर्णतेने शासित झालेल्या विचारांच्या, बोधाच्या, संवेदनांच्या, भावनांच्या, इच्छावासनांच्या, उपभोगांच्या, कृतींच्या गोळाबेरजेतून झालेली असते. या सर्व गोष्टी बहुतांशी रूढ झालेल्या आणि स्वतःहून पुनरावृत्त होणाऱ्या असतात. त्यातील काही गोष्टीच फक्त गतिशील आणि स्व-विकसित होणाऱ्या असतात, पण (कशाही असल्या तरी) त्या सर्वच्या सर्व गोष्टी पृष्ठवर्ती अहंभोवती केंद्रित झालेल्या असतात. या सर्व कृतींच्या गतिविधींची गोळाबेरीज होऊन, सरतेशेवटी त्यातून आंतरिक वृद्धी होते. या जीवनामध्ये ही वृद्धी अंशतःच दृष्टोत्पत्तीस येते आणि कार्यकारी होते. काही प्रमाणात तिच्यामध्ये येथील जीवनानंतरच्या अनेक जीवनांमधील प्रगतीचे बीज सामावलेले असते.

सचेत जिवाची (conscious being) ही वृद्धी, हा विस्तार, चढतेवाढते आत्म-आविष्करण, जिवाच्या घटकांचा अधिकाधिक सुसंवादी विकास, हा मानवी अस्तित्वाचा संपूर्ण अर्थ आहे आणि संपूर्ण गाभा आहे.

विचार, संकल्प, भावभावना, इच्छावासना, कृती आणि अनुभव यांद्वारे होणाऱ्या चेतनेच्या या अर्थपूर्ण विकसनासाठी आणि सरतेशेवेटी परमोच्च दिव्य आत्मशोधाकडे घेऊन जाण्यासाठी, मनुष्य – मनोमय पुरुष हा या जडभौतिक देहामध्ये प्रविष्ट झाला आहे. बाकी सर्व गोष्टी या एकतर त्यास साहाय्यकारी असतात किंवा त्या गौण असतात; अन्यथा एकतर त्या आनुषंगिक असतात किंवा मग निरुपयोगी असतात. ज्या गोष्टी टिकून राहतात आणि मनुष्याच्या प्रकृतीच्या विकासासाठी आणि त्याच्या वृद्धीसाठी, त्याच्या प्रगमनशील प्रकटीकरणासाठी आणि त्याच्या आत्म्याच्या व चैतन्याच्या शोधासाठी साहाय्यकारी ठरतात फक्त तेवढ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 89-90)

 

मनुष्य‌ आणि ईश्वर‌ यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वा‌चा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे दिव्यत्वा‌मध्ये आत्म-विलीनीकरण (self-immergence) असा होतो. परंतु ते विलीनीकरण म्हणजे लोप पावणे नव्हे. निर्वाण ही या या शोधाची आणि धडपडीची आणि दुःखभोगाची तसेच ब्रह्मानंदाची परिपूर्ती असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा कधी आरंभच झाला नसता.

‘परमानंद‌’ हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे मग तुम्हाला ‘ईश्वर’ काय आहे याचे ज्ञान होईल.

मग या सर्वाच्या आरंभी (विश्वाच्या आरंभी) काय घडले होते? तर, अस्तित्वाच्या निखळ आनंदासाठी ‘सत्‌‍‌’ने (Existence) स्वतःला बहुगुणित केले आणि स्वतःला अगणित प्रकारे स्वतःचाच शोध लागावा यासाठी त्याने स्वत: अगणित रूपाकारांमध्ये बुडी घेतली.

आणि या गोष्टीचा मध्य काय आहे? विभाजन हे बहुविध एकतेच्या दिशेने प्रयत्नशील असते; अज्ञान हे वैविध्यपूर्ण प्रकाशांचा महापूर अनुभवण्यासाठी परिश्रम करत असते आणि अकल्पनीय अशा आनंदाचा स्पर्श लाभावा म्हणून वेदना प्रयत्न करत असते. कारण (विभाजन, अज्ञान आणि वेदना) या सर्व गोष्टी म्हणजे काळोख्या आकृत्या आणि विकृत स्पंदने असतात. (या सर्व गोष्टी म्हणजे विश्वाच्या वाटचालीतील एक मधलाच टप्पा आहेत.)

आणि मग या सर्व गोष्टींची (विश्वाची) परिसमाप्ती काय असणार आहे? मधाला जर स्वतःची आणि त्याच्या सर्व मधुकणांची चव एकत्रितपणे चाखता आली आणि सारे मधुकण जर एकमेकांची चव चाखू शकले आणि त्यातील प्रत्येक मधुकण जर समग्र मधाच्या पोळ्याची चव चाखू शकला तर काय होईल? अगदी तशीच, ईश्वरा‌ची आणि मनुष्यातील आत्म्याची आणि या विश्वाची परिसमाप्ती (मधुर) होईल.

‘प्रेम‌’ हा मुख्य स्वर आहे, ‘हर्ष‌’ हे संगीत आहे, ‘शक्ती‌’ ही जणूकाही तंतुवाद्याची तार आहे, ‘ज्ञान‌’ हा वादक आहे, अनंत ‘सर्वात्मक ईश्वर‌’ हा संगीतकार आहे आणि तोच श्रोता आहे. पण आत्ता आपल्याला फक्त काही प्रारंभिक विसंवादी सूरच तेवढे कानी पडत आहेत. (मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की,) ते जेवढे तीव्र असतील तेवढाच पुढील सुमेळसुद्धा (harmony) अधिक महान असणार आहे. आपण (एक दिवस) दिव्य आनंदा‌च्या गाभ्यापाशी जाऊन पोहोचणार आहोत हे निश्चित!

– श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)

 

जग ही जिवाची आत्मवंचना (self-delusion) आहे किंवा जग ही सैतानाची निर्मिती आहे असे आम्ही मानत नाही; तर आमच्या दृष्टीने, जग हे ‘ईश्वराचे आविष्करण‌’ (manifestation) आहे. अद्यापि जरी ते अंशतःच आविष्कृत झालेले असले तरी ते प्रगमनशील आणि उत्क्रांतिमय आविष्करण आहे. आणि म्हणून जीवनाचा परित्याग करणे, संन्यास घेणे (renunciation) हे आमच्या दृष्टीने जीवनाचे ध्येय असू शकत नाही किंवा ज्यासाठी या जगाची निर्मिती झाली आहे, त्या जगालाच नकार देणे हे देखील जीवनाचे उद्दिष्ट असू शकत नाही.

– श्रीअरविंद (CWSA 23-24 : 328)

 

(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते, असे का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे, त्यावर श्रीमाताजींनी विस्तृत उत्तर दिले आहे. त्यातील हा अंशभाग…)

जगामध्ये नित्यनिरंतन परिवर्तन होत आहे, अगदी सातत्याने परिवर्तन होत आहे. जग एक क्षणसुद्धा एकसारखे असत नाही. सर्वसाधारण सुसंवाद अधिकाधिक परिपूर्ण रितीने अभिव्यक्त होत राहतो आणि त्यामुळे कोणतीच गोष्ट जशी आहे तशीच कायम राहू शकत नाही. वरकरणी दिसणारे दृश्य अगदी प्रतिकूल दिसत असले तरी हे अखिल विश्व नेहमीच सातत्याने प्रगतिपथावर वाटचाल करत असते. सुसंवाद हा अधिकाधिक सुसंवादी होत आहे आणि सत्य हे ‘आविष्करणा‌’मध्ये (स्थळकाळनिविष्ट झालेल्या या जगामध्ये, Manifestation) अधिकाधिक प्रत्यक्ष वास्तवात उतरत आहे. परंतु ते समजण्यासाठी, व्यक्तीला समग्रतेने पाहता आले पाहिजे; पण मनुष्य पाहतो ते मात्र… त्याला मानवी क्षेत्रसुद्धा संपूर्णपणे पाहता येत नाही; त्याला केवळ त्याचे स्वतःचे वैयक्तिक क्षेत्र दिसते की जे अगदी छोटे, अगदीच छोटे, अणुवत असते; त्यामुळे त्याला (जगाची सातत्याने प्रगतिपथावर चाललेली वाटचाल) ही गोष्ट समजू शकणार नाही.

जसजसे हे ‘आविष्करण‌’ स्वतःविषयी अधिकाधिक सचेत होत जात आहे, तसतशी त्याची अभिव्यक्तीसुद्धा अधिकाधिक परिपूर्ण होत आहे आणि ती अधिकाधिक यथातथ्य होत आहे. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जात असतात. एकमेकांत सरमिसळ झालेली असल्याप्रमाणे दोहोंमध्ये क्रिया-प्रतिक्रिया घडत असते. ही प्रक्रिया दुहेरी असते आणि ती स्वत:च स्वतःला परिपूर्ण करत नेणारी असते.

– श्रीमाताजी (CWM 11 : 76)

 

साधक : सृष्टीला निश्चित असे ध्येय आहे का? असे एखादे अंतिम गंतव्यस्थान आहे का की, ज्या दिशेने ही सृष्टी मार्गक्रमण करत आहे?

श्रीमाताजी : हे विश्व म्हणजे शाश्वतपणे स्वतःला उलगडवत नेणारी एक प्रक्रिया आहे. त्याचे अमुक एखादे अंतिम गंतव्य किंवा अमुक एखादे ध्येय आहे अशी कोणती एकच एक गोष्ट तुम्ही निर्धारित करू शकत नाही. परंतु एखादी कृती किंवा कार्य करण्याच्या दृष्टीने आणि हे किंवा ते आमचे ध्येय आहे, असे सांगता येण्यासाठी, स्वयमेव अनंत असलेल्या या प्रक्रियेचे आपल्याला काही भाग करावे लागतात. कार्य करत असताना, ज्यावर आपण आपले लक्ष्य निर्धारित करू शकू अशी एखादी गोष्ट उद्दिष्ट म्हणून आवश्यक असते.

चित्र काढत असताना त्याची मांडणी, रंगसंगती यांची निश्चित अशी काही योजना तुमच्याकडे असणे गरजेचे असते. तुम्हाला जे चित्र काढायचे आहे त्यासाठी काही सीमा आखून घेणे आणि ते एका निश्चित चौकटीमध्ये बसविणे आवश्यक असते. मात्र ती सीमा काल्पनिक, आभासी (illusory) असते; ती चौकट हा निव्वळ एक संकेत असतो. चित्रामध्ये नेहमीच कोणत्याही विशिष्ट चौकटीच्या पलीकडे विस्तारित होत जाणारे एक सातत्य असते. आणि चौकटींच्या अनंत मालिकांमध्ये, त्याच परिस्थितीत ते सातत्य चित्रित करता येणे शक्य असते.

आपण म्हणतो की, आमचे हे ध्येय आहे किंवा ते ध्येय आहे परंतु आपल्याला हे ज्ञात असते की, आपले हे ध्येय म्हणजे त्याच्या पलीकडे असणाऱ्या आणखी दुसऱ्या ध्येयाची सुरुवात असते. आणि ते दुसरे ध्येयसुद्धा आपल्याला आणखी एका तिसऱ्या ध्येयाकडे घेऊन जाणार असते. ही मालिका नेहमीच विकसित होत राहते आणि कधीही थाबंत नाही.

– श्रीमाताजी (CWM 03 : 31-32)