आविष्करण आणि अभिव्यक्ती
(अंतिमत: नेहमी सत्याचाच विजय होतो असे म्हटले जाते पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती विपरीत दिसते, असे का? असा प्रश्न एका साधकाने विचारला आहे, त्यावर श्रीमाताजींनी विस्तृत उत्तर दिले आहे. त्यातील हा अंशभाग…)
जगामध्ये नित्यनिरंतन परिवर्तन होत आहे, अगदी सातत्याने परिवर्तन होत आहे. जग एक क्षणसुद्धा एकसारखे असत नाही. सर्वसाधारण सुसंवाद अधिकाधिक परिपूर्ण रितीने अभिव्यक्त होत राहतो आणि त्यामुळे कोणतीच गोष्ट जशी आहे तशीच कायम राहू शकत नाही. वरकरणी दिसणारे दृश्य अगदी प्रतिकूल दिसत असले तरी हे अखिल विश्व नेहमीच सातत्याने प्रगतिपथावर वाटचाल करत असते. सुसंवाद हा अधिकाधिक सुसंवादी होत आहे आणि सत्य हे ‘आविष्करणा’मध्ये (स्थळकाळनिविष्ट झालेल्या या जगामध्ये, Manifestation) अधिकाधिक प्रत्यक्ष वास्तवात उतरत आहे. परंतु ते समजण्यासाठी, व्यक्तीला समग्रतेने पाहता आले पाहिजे; पण मनुष्य पाहतो ते मात्र… त्याला मानवी क्षेत्रसुद्धा संपूर्णपणे पाहता येत नाही; त्याला केवळ त्याचे स्वतःचे वैयक्तिक क्षेत्र दिसते की जे अगदी छोटे, अगदीच छोटे, अणुवत असते; त्यामुळे त्याला (जगाची सातत्याने प्रगतिपथावर चाललेली वाटचाल) ही गोष्ट समजू शकणार नाही.
जसजसे हे ‘आविष्करण’ स्वतःविषयी अधिकाधिक सचेत होत जात आहे, तसतशी त्याची अभिव्यक्तीसुद्धा अधिकाधिक परिपूर्ण होत आहे आणि ती अधिकाधिक यथातथ्य होत आहे. या दोन्ही गोष्टी हातात हात घालून जात असतात. एकमेकांत सरमिसळ झालेली असल्याप्रमाणे दोहोंमध्ये क्रिया-प्रतिक्रिया घडत असते. ही प्रक्रिया दुहेरी असते आणि ती स्वत:च स्वतःला परिपूर्ण करत नेणारी असते.
– श्रीमाताजी (CWM 11 : 76)
- आविष्करण आणि अभिव्यक्ती - July 13, 2026
- विश्वाचे गंतव्यस्थान? - July 12, 2026
- अतिमानसाचे कार्य - July 11, 2026







