‘परमानंद’ हे विश्वाचे रहस्य
मनुष्य आणि ईश्वर यांच्या भेटीचा अर्थ नेहमीच, मनुष्यामध्ये ईश्वरत्वाचा प्रवेश आणि अंतर्भाव तसेच मनुष्याचे दिव्यत्वामध्ये आत्म-विलीनीकरण (self-immergence) असा होतो. परंतु ते विलीनीकरण म्हणजे लोप पावणे नव्हे. निर्वाण ही या या शोधाची आणि धडपडीची आणि दुःखभोगाची तसेच ब्रह्मानंदाची परिपूर्ती असूच शकत नाही. निर्वाण हाच जर या लीलेचा अंत असता, तर या लीलेचा कधी आरंभच झाला नसता.
‘परमानंद’ हे रहस्य आहे. विशुद्ध आनंद अनुभवण्यास शिका म्हणजे मग तुम्हाला ‘ईश्वर’ काय आहे याचे ज्ञान होईल.
मग या सर्वाच्या आरंभी (विश्वाच्या आरंभी) काय घडले होते? तर, अस्तित्वाच्या निखळ आनंदासाठी ‘सत्’ने (Existence) स्वतःला बहुगुणित केले आणि स्वतःला अगणित प्रकारे स्वतःचाच शोध लागावा यासाठी त्याने स्वत: अगणित रूपाकारांमध्ये बुडी घेतली.
आणि या गोष्टीचा मध्य काय आहे? विभाजन हे बहुविध एकतेच्या दिशेने प्रयत्नशील असते; अज्ञान हे वैविध्यपूर्ण प्रकाशांचा महापूर अनुभवण्यासाठी परिश्रम करत असते आणि अकल्पनीय अशा आनंदाचा स्पर्श लाभावा म्हणून वेदना प्रयत्न करत असते. कारण (विभाजन, अज्ञान आणि वेदना) या सर्व गोष्टी म्हणजे काळोख्या आकृत्या आणि विकृत स्पंदने असतात. (या सर्व गोष्टी म्हणजे विश्वाच्या वाटचालीतील एक मधलाच टप्पा आहेत.)
आणि मग या सर्व गोष्टींची (विश्वाची) परिसमाप्ती काय असणार आहे? मधाला जर स्वतःची आणि त्याच्या सर्व मधुकणांची चव एकत्रितपणे चाखता आली आणि सारे मधुकण जर एकमेकांची चव चाखू शकले आणि त्यातील प्रत्येक मधुकण जर समग्र मधाच्या पोळ्याची चव चाखू शकला तर काय होईल? अगदी तशीच, ईश्वराची आणि मनुष्यातील आत्म्याची आणि या विश्वाची परिसमाप्ती (मधुर) होईल.
‘प्रेम’ हा मुख्य स्वर आहे, ‘हर्ष’ हे संगीत आहे, ‘शक्ती’ ही जणूकाही तंतुवाद्याची तार आहे, ‘ज्ञान’ हा वादक आहे, अनंत ‘सर्वात्मक ईश्वर’ हा संगीतकार आहे आणि तोच श्रोता आहे. पण आत्ता आपल्याला फक्त काही प्रारंभिक विसंवादी सूरच तेवढे कानी पडत आहेत. (मात्र हे लक्षात घेतले पाहिजे की,) ते जेवढे तीव्र असतील तेवढाच पुढील सुमेळसुद्धा (harmony) अधिक महान असणार आहे. आपण (एक दिवस) दिव्य आनंदाच्या गाभ्यापाशी जाऊन पोहोचणार आहोत हे निश्चित!
– श्रीअरविंद (CWSA 13 : 203-204)
- राष्ट्रउभारणीचे कार्य - October 15, 2026
- प्रथम खरे भारतीय व्हा - October 14, 2026
- राष्ट्र म्हणजे काय? - October 13, 2026





