केवळ ईश्वर‌च हवा, अन्य काहीही नको असे या संपूर्ण सृष्टीला वाटले पाहिजे. अन्य कोणाचे नाही तर, फक्त ईश्वराचे‌च आविष्करण करावे असे तिला वाटले पाहिजे. सृष्टी जे सारे काही करत असते, (अगदी तिच्या तथाकथित चुकासुद्धा) त्या साऱ्या गोष्टी म्हणजे फक्त साधनं असतात. समग्र सृष्टीने अपरिहार्यपणे केवळ ईश्वरा‌चेच आविष्करण करावे यासाठी ती साधनं तिला प्रवृत्त करत असतात. अर्थात, सहसा ईश्वर म्हटल्यावर, ‘ईश्वर असा असतो किंवा ईश्वर तसा नसतो’ अशी मनुष्याची जी मर्यादित आणि सीमित धारणा असते त्या ईश्वरा‌चे नव्हे, तर प्रचंड ऊर्जा आणि प्रकाशाची समग्रता‌ हे ज्या ईश्वरा‌चे स्वरूप आहे, त्या ईश्वरा‌चे आविष्करण करावे असे सृष्टीला वाटले पाहिजे.

आता (१९५६ मध्ये झालेल्या अतिमानस अवतरणानंतर) या जगामध्ये खरोखरच दिव्य शक्ती‌ विद्यमान आहे. ईश्वरा‌ची सर्वशक्तिमानता आविष्कृत व्हावी आणि ती ‘आविष्करणयोग्य‌’ (manifestable) ठरावी यासाठी एक नवीन, अद्भुत आणि विस्मयकारक दिव्य शक्ती‌ या जगात अवतरली आहे. आणि तिने स्वत:ला आविष्कृत करणे आवश्यकच आहे.

अवधानपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणानंतर, मी या निष्कर्षाप्रत आले आहे की, ज्याला आम्ही ‘अतिमानस‌’ (Supramental) असे संबोधतो ते अतिमानस हे, या सृष्टीला उच्चतर ‘शक्ती‌’प्रत, जिला आम्ही ‘दिव्य‌’ असे संबोधतो, तिच्याप्रत अधिक संवेदनशील, अधिक ग्रहणशील बनवीत आहे. आपण सद्यस्थितीत जसे आहोत त्याच्या तुलनेत ती शक्ती दिव्य आहे…. हा जो (अतिमानसाचा) दबाव आहे, हे जे अवतरण आहे त्याने, त्या दिव्य शक्ती‌ला प्रतिसाद देण्यासाठी, जडभौतिकास अधिक संवेदनशील आणि अधिक प्रतिसादक्षम (responsive) बनवणे आवश्यकच आहे.

– श्रीमाताजी (CWM 11 : 315)

 

प्रकृतीमध्ये पाषाणातून वनस्पतीकडे, वनस्पतीकडून प्राण्याकडे, प्राण्याकडून मानवाकडे अशा प्रकारे आरोहण करणारा क्रमविकास (evolution) आहे. आजवर ज्ञात असलेल्या या विकासक्रमानुसार, सध्यातरी मानव हा सर्वात वरच्या पायरीवर आहे असे दिसून येते. अर्थातच त्यामुळे, ‘मी या विकासाचा अंतिम टप्पा असून, माझ्यापेक्षा उच्चतर असे या पृथ्वीतलावर काही असणे शक्यच नाही‌’, असा मनुष्याचा समज झाला आहे. आणि हाच त्याचा एक फार मोठा गैरसमज आहे.

त्याच्या शारीरिक प्रकृतीच्या (physical nature) दृष्टीने तो आजही जवळजवळ पूर्णपणे पशूच आहे; विचार करणारा आणि बोलणारा पशू आहे इतकेच. त्याच्या शारीरिक सवयी आणि सहज स्वाभाविक प्रवृत्ती पाहता तो अजूनही प्राणिदशेतच आहे.

अर्थातच अशा अपूर्ण निर्मितीत प्रकृती संतुष्ट राहू शकत नाही यामध्ये शंकाच नाही. प्रकृती एक नवीन जीव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे. पशुच्या तुलनेत मानव जसा आहे तसा, मानवाच्या तुलनेत तो जीव असेल. तो जीव बाह्य आकाराने मानवसदृशच असेल; पण त्याची चेतना मनाहून कितीतरी उच्च स्तरावरची असेल आणि तो जीव अज्ञानाच्या दास्यत्वातून पूर्णपणे मुक्त झालेला असेल.

मनुष्याला हे सत्य अवगत करून देण्यासाठी श्रीअरविंद या पृथ्वीतलावर अवतरले आहेत. मानसिक चेतनेमध्ये जगणारा मनुष्य हा केवळ एक संक्रमणशील जीव आहे; परंतु एक नवी चेतना, ‘सत्य-चेतना‌’ प्राप्त करून घेण्याची क्षमता असणारा आणि एक पूर्णतया सुसंवादपूर्ण, कल्याणकारी, सुंदर, आनंदी आणि पूर्ण जाणीवसंपन्न, सचेत जीवन जगण्याची क्षमता असणारा असा तो जीव आहे, असे श्रीअरविंदांनी सांगितले आहे. ज्या चेतनेला त्यांनी अतिमानस (Supermind) असे संबोधले आहे, ती चेतना (पृथ्वीकरता म्हणून) स्वत:मध्ये प्रस्थापित करण्यासाठी आणि स्वत:भोवती जमलेल्या साधकांना देखील त्या चेतनेची अनुभूती यावी म्हणून त्यांना साहाय्य करण्यासाठी, श्रीअरविंदांनी या पृथ्वीतलावर स्वत:चे संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

– श्रीमाताजी (CWM 12 : 116)

 

हे विश्व म्हणजे केवळ एक जडभौतिक वस्तू नाही तर, ते आध्यात्मिक तथ्य आहे. जीवन म्हणजे काही केवळ शक्तींची क्रीडा नाही किंवा जीवन म्हणजे काही केवळ एक मानसिक अनुभवदेखील नाही; तर गुप्त असणाऱ्या आत्म्याच्या उत्क्रांतीसाठी असलेले ते क्षेत्र आहे.

मानवी जीवन जेव्हा हे सत्य अवगत करून घेईल आणि जेव्हा त्याने त्या सत्याला स्वतःच्या जीवनाची प्रेरक-शक्ती बनवलेली असेल आणि त्या सत्याच्या प्रभावी साक्षात्काराची साधने जेव्हा त्याने शोधून काढलेली असतील तेव्हाच मानवी जीवनाला त्याची सार्थकता गवसेल आणि ते स्वतःच्या अतीत असणाऱ्या कशामध्ये तरी स्वतःचे रूपांतरण करून घेईल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 374)

 

भौतिक विश्वामधील सचेत जीव म्हणून आपल्या अस्तित्वाची नेमकी वास्तविकता काय आहे आणि त्याचा अर्थ काय आहे, याचा शोध घेणे आणि एकदा का तो अर्थ उमगला (म्हणजे अस्तित्वाची सार्थकता कशामध्ये आहे हे समजले) की मग, तो आपल्याला, मानवी किंवा दिव्य भवितव्याप्रत, कोणत्या दिशेने आणि किती दूरपर्यंत घेऊन जाऊ शकतो, याचा शोध घेणे हा आमचा प्रयत्न राहिलेला आहे.

– श्रीअरविंद (CWSA 21 : 1051)

 

(व्यक्ती मूलत: सच्चिदानंद स्वरूप आहे, पण त्यापासून विभक्त झाल्यामुळे व्यक्तीला त्याचे विस्मरण होते आणि त्यामुळे मी अमुक अमुक कोणीतरी आहे, अशी व्यक्तीची समजूत होते. हा विचार आपण काल समजावून घेतला. आज त्याचा उत्तरार्ध…)

परंतु विभक्ततेच्या वळणावळणाच्या मार्गावरून जाऊन, म्हणजेच विभक्ततेचे, विविधतेचे लाभ घेऊन, जर आपण सच्चिदानंद स्वरूपाशी ऐक्य पुनर्स्थापित केले तर, आपल्याला अधिक उच्च प्रतीचे ऐक्य साध्य होईल.

…जेव्हा सच्चिदानंद हे एकले एकच (absolute) होते, तेव्हा त्या एकत्वाची जाणीव होणार तरी कोणाला? ते एकत्व काय आहे हे समजून घेण्यासाठी म्हणून का होईना, तसे एकत्व नसलेली अशी कोणतीतरी प्रतिमा आपल्यापाशी पाहिजे, कशाचे तरी रूप आपल्यासमोर पाहिजे. आणि मला वाटते विश्वाच्या अस्तित्वाचे हेच रहस्य आहे. कदाचित ईश्वर‌च स्वतःला जाणून घेऊ इच्छित होता, म्हणून त्याने स्वतःला स्वतःपासून विभक्त केले आणि त्याने स्वतःला न्याहाळले आणि आता, स्वतःच्या पूर्ण ज्ञानानिशी, तो स्वतःच्या अस्तित्वाची शक्यता स्वतःच उपभोगू इच्छित आहे. आणि ही गोष्ट अधिक स्वारस्यपूर्ण आहे.

– श्रीमाताजी (CWM 07 : 237)

 

(पूर्वार्ध)

व्यक्तीमध्ये म्हणजे व्यक्तीच्या अंतरंगामध्ये जर ईश्वरा‌चे अस्तित्व नसते तर, व्यक्तीला ईश्वरा‌ची जाणीव कधीच होऊ शकली नसती; ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. पण याच गोष्टीकडे तुम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिलेत तर, ‘तुमच्या अंतरंगामध्ये ईश्वर‌ आहे तसेच तुमचे वास्तव्य ईश्वरा‌मध्ये आहे,’ याचे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, तसे जाणवते, जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा साक्षात्काराच्या दिशेने दार किंचितसे उघडले गेलेले असते, किलकिले झालेले असते.

नंतर कधीतरी जर व्यक्तीमध्ये अभीप्सा निर्माण झाली, ईश्वरा‌ला जाणून घेण्याची आणि ईश्वर‌च होण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, ते किंचितसे उघडलेले दार, व्यक्तीचा त्यातून आतमध्ये प्रवेश होण्याइतके उघडले जाते आणि एकदा आत प्रवेश झाला की मग, व्यक्तीला आपण कोण आहोत याची जाणीव होते.

अगदी नेमकी हीच गोष्ट श्रीअरविंद सांगत आहेत की, सत्‌‍, चित, आनंद यांच्यापासून विभक्त झाल्यामुळेच, व्यक्तीला स्वत:च्या मूळ रूपाचे विस्मरण झाले आहे. तिला ‘स्व’चे विस्मरण झाले आहे. व्यक्तीला वाटते की, मी अमुक कोणीतरी आहे, म्हणजे असे की, मी मुलगी आहे, मुलगा आहे, मी पुरुष आहे, स्त्री आहे, कुत्रा आहे, घोडा आहे किंवा मी म्हणजे एखादा दगड, समुद्र, सूर्य आहे इत्यादी. ‘मी स्वत: ईश्वर आहे,’ असा विचार करण्याचे सोडून, इतर सर्व गोष्टी म्हणजे मी आहे, असा व्यक्ती विचार करत असते. व्यक्तीने खरोखरच, आपण तो एकमेवाद्वितीय ईश्वर‌ आहोत याची जाणीव जर कायम ठेवली असती तर, मग अशा व्यक्तीच्या दृष्टीने विश्वाचे वेगळे असे अस्तित्वच शिल्लक राहिले नसते. विश्वाचे अस्तित्व असण्यासाठी विभक्तीकरणाची ही घटना अटळच आहे असे दिसते, अन्यथा ईश्वर‌ (मूळ रूपात) जसा होता तसाच (अव्यक्त) नेहमी राहिला असता. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 07 : 236-237)

 

प्रत्येक जीव हा त्या विधात्या‌प्रमाणे (Creator) सचेत झाला पाहिजे, हे या सृष्टीचे ध्येय आहे, असे आपण म्हणू शकतो. अनंततेची चेतना, शाश्वततेची चेतना – जी सर्वशक्तिमान असते, ती ‘चेतना‌’ (Consciousness) हेच या सृष्टीचे ध्येय आहे. तिला आपण ‘ईश्वर‌’ असे संबोधतो. प्रत्येक कणाकणामध्ये ही ‘चेतना‌’ आहे, प्रत्येक अंशमात्रामध्ये हीच ‘चेतना‌’ सामावलेली आहे.

हे जग विभक्ततेतून निर्माण झाले आहे आणि या विभक्ततेमध्येच ते ‘शाश्वत‌’ स्वतःला आविष्कृत करत असते.

– श्रीमाताजी (CWM 11 : 289)

 

 

साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे?

श्रीमाताजी : ईश्वरा‌चा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती या पृथ्वीवर आलेली असते, हेच पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य आहे. हे प्रयोजन नसेल तर भौतिक अस्तित्व म्हणजे एक अप-रूप, विकारित रूप (monstrosity) ठरेल.

जर हे परमोच्च प्रयोजन नसते, म्हणजे ईश्वरा‌चा पुनर्शोध घेणे, ईश्वर‌च होणे, ईश्वरा‌ला आविष्कृत करणे आणि या भौतिक जीवनात देखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे, हे जर पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन नसते तर, आत्ता हे जीवन जसे आहे तसे ते विकारित रूप ठरेल.

साहजिकच आहे की, माणसं जितकी जास्त अजाण असतात तितके आत्ता मी जे सांगितले ते त्यांना समजणे कठीण जाते. कारण अशी माणसं (जीवनाकडे, स्वत:कडे) वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. ती यांत्रिकपणे, सवयीनुसार जीवन जगत असतात; म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या पद्धतीबद्दल माणसं जागरूक नसतात किंवा त्याकडे ती अलग होऊन वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. पण जसजशी त्यांची चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे, सद्यस्थितीतील जीवन हे किती भयावह नरक आहे, हे त्यांना जाणवू लागते.

आणि जेव्हा हे जीवन कोणत्या दिशेने चालले आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हाच मग ते त्याचा स्वीकार करतात, त्यांना जीवनाचे प्रयोजन समजते. मगाशी मी जीवनाचे जे प्रयोजन सांगितले आहे तेच जीवनाला स्वीकारार्ह बनवते. ते जर जीवनाचे प्रयोजन नसेल तर, जीवन हे खरोखरच एक भयंकर आपत्ती ठरेल.

– श्रीमाताजी (CWM 08 : 119-120)

 

ही जी सृष्टी आहे ती काही ईश्वरा‌ला परक्या असणाऱ्या एखाद्या गोष्टीपासून निर्माण केली गेली नाहीये. तर त्या ईश्वरा‌ने स्वतःमधूनच या सृष्टीची निर्मिती केली आहे. जणू काही तो स्वतःच स्वतःकडे पाहत असावा अशा पद्धतीने म्हणजे, तो स्वतः काय आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी त्याने स्वतःला वस्तुरूपात आणले आहे. एकाग्रतेच्या आंतरिक अक्रिय अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, म्हणजे जेथे सारेच अप्रकट असते अशा अवस्थेमध्ये राहण्याऐवजी, त्याने ‘स्वतःला पाहण्यासाठी‌’ स्वतःलाच स्वतःबाहेर प्रक्षेपित केले आहे. जणू काही स्वतःच्या अंतरंगामध्ये काय काय दडलेले आहे ते तो पाहू इच्छित असावा. म्हणजे स्वतःच्या अंतरंगामध्ये दडलेल्या संभाव्यतांची अनंतता पाहण्याची त्याला इच्छा असावी (आणि म्हणून त्याने ही सृष्टी निर्माण केली आहे.)

– श्रीमाताजी (CWM 05 : 373-374)

(श्रीमाताजीकृत प्रार्थना…)

हे ईश्वरा, तुझ्या दिव्य कायद्या‌चे आणि तुझ्या वैभवा‌च्या भव्यतेचे वर्णन शब्दांत कसे व्यक्त करता येईल? तुझ्या चेतने‌च्या परिपूर्णत्वाचे आणि तुझ्या प्रेमा‌च्या अनंत आनंदाचे वर्णन कोणत्या शब्दात करता येईल? तुझ्या शब्दातीत शांती‌चे वर्णन आम्ही शब्दांत कसे काय करू शकणार? तुझ्या निश्चल-नीरवते‌चे महिमान आणि तुझ्या सर्वशक्तिमान सत्या‌चे ऐश्वर्य अभिव्यक्त करू शकतील असे कोणते शब्द आहेत?

आविष्कृत झालेले हे समग्र विश्वसुद्धा तुझी‌ किमया आणि तुझ्या वैभवाचे वर्णन करण्यासाठी अपुरे आहे आणि काळाच्या शाश्वततेमध्ये, तेच तुझे वैभव शाश्वतरित्या, अधिकात अधिक आणि उत्तमोत्तम रितीने अभिव्यक्त करावे असा प्रयत्न ते विश्व करत आहे.

– श्रीमाताजी (CWM 01 : 306)