साधना, योग आणि रूपांतरण – १०६
तुम्ही ज्या सर्व अडचणींचे वर्णन करत आहात त्या बहुतेक सर्वच माणसांच्या बाबतीत अगदी स्वाभाविक असतात. एखादी व्यक्ती ध्यानाला शांतपणे बसलेली असते तेव्हा ‘ईश्वरा’चे स्मरण राखणे आणि ‘ईश्वरी उपस्थिती’ची जाणीव ठेवणे हे तुलनेने सोपे असते; पण व्यक्तीला कामामध्ये व्यग्र राहावे लागत असेल तर तसे करणे तिला अधिक कठीण असते. कर्मामधील चेतना आणि ईश-स्मरण या गोष्टी टप्प्याटप्यानेच यायला हव्यात, त्या एकदम एकाचवेळी साध्य होतील अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये, कोणालाच ते तसे एकदम साध्य होत नाही.
ते दोन मार्गांनी घडते पहिला मार्ग म्हणजे, तुम्ही श्रीमाताजींचे स्मरण ठेवण्याचा आणि तुम्ही जेव्हा काहीतरी काम करत असता तेव्हा प्रत्येक वेळी ते कर्म अर्पण करण्याचा अभ्यास केलात (म्हणजे कर्म करत असताना सर्वकाळ असे नव्हे, पण, कर्मारंभी किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा स्मरण होईल तेव्हा असा अभ्यास केला) तर मग ती गोष्ट हळूहळू सोपी आणि प्रकृतीला सवयीची होऊन जाते.
दुसरा मार्ग म्हणजे, ध्यानामुळे आंतरिक चेतना विकसित होऊ लागते. ही चेतना एकाएकी किंवा अचानकपणे चिरस्थायी होत नाही तर ती, कालांतराने, आपोआप अधिकाधिक चिरस्थायी बनत जाते. कार्यकारी असणाऱ्या बाह्यवर्ती चेतनेहून विभिन्न असणाऱ्या या चेतनेची तुम्हाला जाणीव होऊ लागते. प्रथमतः कर्म करत असताना तुम्हाला या विभिन्न चेतनेची जाणीव होत नाही, पण जेव्हा कर्म थांबते तेव्हा लगेचच तुम्हाला असे जाणवते की, ती चेतना पूर्ण वेळ मागून तुमच्याकडे लक्ष ठेवून होती; नंतर मग कर्म चालू असतानादेखील तिची जाणीव होऊ लागते, जणू तुमच्या अस्तित्वाचे दोन भाग आहेत, अशी तुम्हाला जाणीव होते. एक अस्तित्व निरीक्षण करत आहे आणि मागे राहून आधार पुरवीत आहे तसेच श्रीमाताजींचे स्मरण करत आहे आणि दुसरे अस्तित्व कर्म करत आहे, अशी तुम्हाला जाणीव होते. असे जेव्हा घडते तेव्हा खऱ्या चेतनेसह कर्म करणे अधिकाधिक सोपे होते.
– श्रीअरविंद (CWSA 29 : 259)
अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा…
ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या…
जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद…
आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे…
(उत्तरार्ध...) बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची…
तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती…