ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

माणूस चिंताग्रस्त का आहे?

 

(माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट करत आहेत. हा भाग काहीसा विस्तृत असल्याने तो क्रमश: देत आहोत.)

मनुष्याकडे जीवन जगत असतानाच स्वतःचे निरीक्षण करण्याची मानसिक क्षमता असल्यामुळे तो इतर प्राण्यांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण ठरतो, हे अगदी उघड आहे. प्राणी सहजस्वाभाविकपणे, आपोआप जीवन जगत असतात. एखाद्या प्राण्याला अपघातामुळे किंवा आजारपणामुळे जरी वेदना सहन कराव्या लागल्या तरी, त्या वेदना तुलनेने कमी असतात. कारण तो प्राणी त्या दुःखाचे निरीक्षण करू शकत नाही किंवा तो स्वतःच्या चेतनेमध्ये त्या वेदनांचे प्रक्षेपण करू शकत नाही किंवा त्यामुळे पुढे काय होईल याची चिंता तो करत बसत नाही. झालेल्या अपघाताविषयी किंवा आलेल्या आजारपणाविषयी तो कोणतेही तर्कवितर्क करत नाही. क्वचित एखाद्या प्राण्याने जीवन जगत असताना समजा स्वतःचे निरीक्षण केलेच तरी, ते नक्कीच अगदी एखाद-दुसरा क्षण इतके किंवा अगदी नगण्य प्रमाणात असणार. म्हणूनच प्राण्यांना कोणतीही चिंता भेडसावत नाही आणि ते शांतपणे जीवन जगू शकतात.

पण मनुष्याच्या जन्माबरोबरच ‘उद्या काय होणार आहे,’ याची एक अखंड चिंता उदयास आली आहे. ही चिंता हे त्याच्या दुःखकष्टाचे एकमेव कारण नसले तरी ते एक मुख्य कारण आहे. स्वतःकडे वेगळे होऊन पाहता येण्याच्या या चेतनेमुळे मनुष्यामध्ये हुरहुर, दुःखदायक कल्पना, चिंता, त्रास, भविष्यातील संकटांची चाहूल या गोष्टी सुरू झाल्या आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून बहुतांशी माणसं, – म्हणजे कमी सचेत, सजग (conscious) असणारी माणसंच नव्हेत तर अतिशय सचेत, सजग असणारी माणसंदेखील – कायमच चिंताग्रस्त होऊन जीवन जगत असतात.

मनुष्य एकीकडे इतका सचेत आहे की, तो या सगळ्यापासून अलिप्त राहू शकत नाही आणि दुसरीकडे, उद्या काय घडून येणार आहे हे त्याला निश्चितपणे ज्ञात होईल, एवढाही तो सचेत नाही. खरोखर, पृथ्वीवरच्या सर्व प्राणिमात्रांमध्ये मनुष्य हा सर्वात दुःखीकष्टी प्राणी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मनुष्याला त्याच्या अशा असण्याची सवय झाली आहे; कारण त्याची ही जी अवस्था आहे ती त्याला त्याच्या पूर्वजांकडूनच वारसारूपाने मिळालेली आहे. खरोखरच ही अत्यंत दयनीय अवस्था आहे. (परंतु मनुष्याला आणखी एक क्षमता प्रदान करण्यात आलेली आहे, त्याचा विचार आपण उद्याच्या भागात करू.) (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

1 day ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

2 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

3 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

4 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

5 days ago

अशक्यतेची जाणीव

  मी आज जे करू शकत नाहीये तो, मी भविष्यात जे करणार आहे त्याचा संकेत…

6 days ago