ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

भक्तीचे विविध प्रकार

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याविषयी (Self) सचेत होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आत्म्याचे ज्ञान होते. आणि मग, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व म्हणजे आपण आहोत, असे समजण्याची चूक तुम्ही करत नाही. किंवा ती अस्तित्वं म्हणजेच आत्मा, असे समजण्याची चूक तुम्ही करत नाही.

चैत्य पुरुषाविषयी जागृती आल्यावर, ईश्वराविषयी किंवा गुरूविषयी खरी भक्ती उदयाला येते. या भक्तीचे स्वरूप मानसिक किंवा प्राणिक भक्तीपेक्षा वेगळे असते. तुमच्या मनात, गुरूंच्या बौद्धिक किंवा आध्यात्मिक महानतेविषयी प्रचंड आदर असू शकतो किंवा जाण असू शकते; तसे असेल तर गुरूंचे अनुसरण करा आणि मानसिकदृष्ट्या त्यांच्या आज्ञांचे पालन करा. परंतु ही गोष्ट जर निव्वळ मानसिक असेल तर, त्यायोगे तुमची फार प्रगती होईल असे नाही. अर्थात, तसे करण्यात (मानसिकरितीने अनुसरण करण्यात) काही गैर आहे असे नाही. पण फक्त तेवढे केल्यामुळे तुमचे समग्र आंतरिक अस्तित्व (inner being) खुले होत नाही, तर त्यामधून तुमचा ईश्वराशी फारफार तर मानसिक संपर्क निर्माण होतो.

प्राणिक भक्ती (vital Bhakti) एका पाठोपाठ एक मागण्या करतच राहते. ती तिच्या स्वतःच्या अटी ईश्वरावर लादत असते. अशा भक्तीमध्ये भक्त स्वत:ला समर्पित करतो; पण तो ईश्वरावर काही अटी लादतो. अशी भक्ती असलेला भक्त ईश्वराला म्हणतो, “तू किती महान आहेस,” “मी तुझी पूजा करतो,” “आणि आता माझी अमुक एक इच्छा किंवा माझी अमुक एक आकांक्षा तू पूर्ण केलीच पाहिजेस.” “मला महान बनव, मला थोर साधक, एक महान योगी बनव,” इत्यादी.

अ-दिप्त मनसुद्धा (unillumined mind) सत्याप्रत समर्पित होते पण ते देखील स्वतःच्या अटी लादते. असे मन सत्याला म्हणते, “माझा निर्णय, माझे मतच बरोबर आहे, असे तू मान्य कर.” मनाने ज्या रचना तयार केलेल्या असतात, त्या साच्यामध्येच सत्याने स्वतःला सामावून घ्यावे अशी त्याची अपेक्षा असते.

सत्याने माझ्या शक्तीच्या प्राणिक गतिविधींमध्ये स्वतःला झोकून द्यावे, अशी प्राणिक अस्तित्वाची देखील सत्याकडून अपेक्षा असते. प्राणिक अस्तित्व उच्चतर शक्तीस आणि गुरूच्या प्राणिक अस्तित्वासदेखील खेचत राहते. मानसिक आणि प्राणिक ही दोन्ही अस्तित्वं समर्पित होताना, हातचे काही राखून समर्पित होतात.

मात्र आंतरात्मिक भक्ती (Psychic Bhakti) तशी नसते. ती (मन व प्राण यांच्या) पाठीमागे असणाऱ्या दिव्यत्वाच्या संपर्कात असल्यामुळे, तिला खरी भक्ती करणे शक्य असते. आंतरात्मिक भक्ती कोणतीही मागणी करत नाही किंवा ती कोणती गोष्ट हातची राखूनदेखील ठेवत नाही. (दिव्यत्वाच्या संपर्कात असल्यामुळे,) ती स्वतःच्या अस्तित्वावर समाधानी असते. सत्याचे योग्य प्रकारे पालन कसे करावे, हे चैत्य पुरुषाला ज्ञात असते. चैत्य पुरुष ईश्वर किंवा गुरू यांच्याप्रत खऱ्या अर्थाने समर्पित होतो आणि तो स्वतःचे खऱ्या अर्थाने आत्मदान करत असल्यामुळे, तो ईश्वराकडून किंवा गुरूंकडून खऱ्या अर्थाने काही ग्रहणदेखील करू शकतो. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379-380)

 

Latest posts by श्रीअरविंद (see all)
श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

देशभक्तीची भावना आणि योगसाधना

दि. २७ ऑक्टोबर १९६२ देशभक्तीची भावना ही आपल्या योगाशी मिळतीजुळती नाही, असे नाही; उलट, आपल्या…

18 hours ago

पूर्णावतार श्रीअरविंद

  दि. ०६ मार्च १९६२ साधक : कुरुक्षेत्राच्या महायुद्धाला पाच हजार वर्षं होऊन गेली परंतु…

2 days ago

भारताचे उज्ज्वल भवितव्य

१९५७ सद्यस्थितीत कितीही अंधकार दिसत असला तरीही भारताचे भवितव्य उज्ज्वल आहे. - श्रीमाताजी (CWM 13…

3 days ago

भारताचे रक्षण

  १९५५ साधक : भारताचे भारतीयांपासून रक्षण करावे म्हणून मी आपणास प्रार्थना करत आहे. श्रीमाताजी…

4 days ago

एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज

दि.०१ नोव्हेंबर १९५४ (श्रीअरविंदांनी ज्याला 'एकात्म भारताचा आध्यात्मिक ध्वज' असे म्हटले होते त्या ध्वजाची मूळ…

5 days ago

भारताच्या नागरिक श्रीमाताजी

  दि. १५ ऑगस्ट १९५४ भारताचे नागरिक होण्याची, दीर्घकाळ मनात जपलेली माझी इच्छा फलद्रूप होण्याचा…

6 days ago