अतिमानसाचे कार्य
केवळ ईश्वरच हवा, अन्य काहीही नको असे या संपूर्ण सृष्टीला वाटले पाहिजे. अन्य कोणाचे नाही तर, फक्त ईश्वराचेच आविष्करण करावे असे तिला वाटले पाहिजे. सृष्टी जे सारे काही करत असते, (अगदी तिच्या तथाकथित चुकासुद्धा) त्या साऱ्या गोष्टी म्हणजे फक्त साधनं असतात. समग्र सृष्टीने अपरिहार्यपणे केवळ ईश्वराचेच आविष्करण करावे यासाठी ती साधनं तिला प्रवृत्त करत असतात. अर्थात, सहसा ईश्वर म्हटल्यावर, ‘ईश्वर असा असतो किंवा ईश्वर तसा नसतो’ अशी मनुष्याची जी मर्यादित आणि सीमित धारणा असते त्या ईश्वराचे नव्हे, तर प्रचंड ऊर्जा आणि प्रकाशाची समग्रता हे ज्या ईश्वराचे स्वरूप आहे, त्या ईश्वराचे आविष्करण करावे असे सृष्टीला वाटले पाहिजे.
आता (१९५६ मध्ये झालेल्या अतिमानस अवतरणानंतर) या जगामध्ये खरोखरच दिव्य शक्ती विद्यमान आहे. ईश्वराची सर्वशक्तिमानता आविष्कृत व्हावी आणि ती ‘आविष्करणयोग्य’ (manifestable) ठरावी यासाठी एक नवीन, अद्भुत आणि विस्मयकारक दिव्य शक्ती या जगात अवतरली आहे. आणि तिने स्वत:ला आविष्कृत करणे आवश्यकच आहे.
अवधानपूर्वक आणि काळजीपूर्वक केलेल्या निरीक्षणानंतर, मी या निष्कर्षाप्रत आले आहे की, ज्याला आम्ही ‘अतिमानस’ (Supramental) असे संबोधतो ते अतिमानस हे, या सृष्टीला उच्चतर ‘शक्ती’प्रत, जिला आम्ही ‘दिव्य’ असे संबोधतो, तिच्याप्रत अधिक संवेदनशील, अधिक ग्रहणशील बनवीत आहे. आपण सद्यस्थितीत जसे आहोत त्याच्या तुलनेत ती शक्ती दिव्य आहे…. हा जो (अतिमानसाचा) दबाव आहे, हे जे अवतरण आहे त्याने, त्या दिव्य शक्तीला प्रतिसाद देण्यासाठी, जडभौतिकास अधिक संवेदनशील आणि अधिक प्रतिसादक्षम (responsive) बनवणे आवश्यकच आहे.
– श्रीमाताजी (CWM 11 : 315)
- अतिमानसाचे कार्य - July 11, 2026
- श्रीअरविंद यांचा संदेश - July 10, 2026
- विश्वाच्या अस्तित्वाचे रहस्य - July 7, 2026





