पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन
साधक : पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य काय आहे?
श्रीमाताजी : ईश्वराचा साक्षात्कार करून घेण्यासाठी व्यक्ती या पृथ्वीवर आलेली असते, हेच पृथ्वीवरील जीवनाचे औचित्य आहे. हे प्रयोजन नसेल तर भौतिक अस्तित्व म्हणजे एक अप-रूप, विकारित रूप (monstrosity) ठरेल.
जर हे परमोच्च प्रयोजन नसते, म्हणजे ईश्वराचा पुनर्शोध घेणे, ईश्वरच होणे, ईश्वराला आविष्कृत करणे आणि या भौतिक जीवनात देखील ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे, हे जर पृथ्वीवरील जीवनाचे प्रयोजन नसते तर, आत्ता हे जीवन जसे आहे तसे ते विकारित रूप ठरेल.
साहजिकच आहे की, माणसं जितकी जास्त अजाण असतात तितके आत्ता मी जे सांगितले ते त्यांना समजणे कठीण जाते. कारण अशी माणसं (जीवनाकडे, स्वत:कडे) वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. ती यांत्रिकपणे, सवयीनुसार जीवन जगत असतात; म्हणजे स्वतःच्या जीवनाच्या पद्धतीबद्दल माणसं जागरूक नसतात किंवा त्याकडे ती अलग होऊन वस्तुनिष्ठपणे पाहू शकत नाहीत. पण जसजशी त्यांची चेतना वृद्धिंगत होत जाते तसतसे, सद्यस्थितीतील जीवन हे किती भयावह नरक आहे, हे त्यांना जाणवू लागते.
आणि जेव्हा हे जीवन कोणत्या दिशेने चालले आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हाच मग ते त्याचा स्वीकार करतात, त्यांना जीवनाचे प्रयोजन समजते. मगाशी मी जीवनाचे जे प्रयोजन सांगितले आहे तेच जीवनाला स्वीकारार्ह बनवते. ते जर जीवनाचे प्रयोजन नसेल तर, जीवन हे खरोखरच एक भयंकर आपत्ती ठरेल.
– श्रीमाताजी (CWM 08 : 119-120)
- खरी आणि विशुद्ध निश्चल-नीरवता - August 15, 2026
- ईश्वरी अवतरणाचा दाब - August 12, 2026
- चालत्या गाड्याला खीळ… - August 11, 2026





