ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

जीवन जगण्याचे शास्त्र – ०५

(सहजस्फूर्त असण्याचे महत्त्व काय असते याबाबत श्रीमाताजींनी केलेले विवेचन आपण गेल्या दोन भागात पाहिले. त्या आता त्याच संदर्भातील अधिक बारकावे उलगडवून दाखवत आहेत.)

आता प्रश्ना असा निर्माण होतो की, “सहजस्फूर्त (spontaneous) कसे व्हायचे?”

“सहजस्फूर्त असण्यासाठी तुम्ही संपूर्णतया साधे असले पाहिजे.” आणि त्यातून मग पुन्हा आणखी एक प्रश्न निर्माण होतो की, संपूर्णतया साधे कसे बनायचे?

“संपूर्णतया साधे बनण्यासाठी तुम्ही पूर्णतया प्रामाणिक (sincere) असले पाहिजे.”

आणि आता पुन्हा प्रश्न निर्माण होतो, पूर्णतया प्रामाणिक बनायचे म्हणजे काय?

“पूर्णतया प्रामाणिक असणे म्हणजे तुमच्या व्यक्तित्वामध्ये कोणतीही दुफळी नको किंवा कोणतीही विसंगती अथवा कोणताही विरोधाभास नको.”

तुमचे व्यक्तित्व जर तुकड्यातुकड्यांनी बनलेले असेल तर त्या तुकड्यांमुळे तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक प्रकारची दुफळी तयार होते. हे तुकडे केवळ वेगवेगळेच असतात असे नाही तर, बऱ्याचदा ते परस्पर विसंगत असतात. उदाहरणार्थ, तुमच्यामधील एक भाग दिव्य जीवनाची आस बाळगत असतो; ईश्वराला जाणण्याची, त्याच्याशी ऐक्य पावण्याची, त्याच्यासमवेत पूर्णतया जीवन जगण्याची आस बाळगत असतो. आणि त्याच वेळी तुमच्यामधील दुसरा एक भाग मात्र असा असतो की, जो इच्छावासना, आसक्ती बाळगून असतो. त्यांना तो भाग ‘गरजा’ असे संबोधतो आणि तो भाग या गोष्टींच्या नुसत्या प्राप्तीची अभिलाषाच बाळगतो असे नाही तर, त्या गोष्टी मिळाल्या नाहीत तर तो अस्वस्थसुद्धा होतो. इतर कोणत्याही विसंगतीपेक्षा ही विसंगती सर्वात जास्त सुस्पष्ट असते.

अशा आणखीही काही विसंगती असतात. उदाहरणार्थ, व्यक्तीला ईश्वराप्रति संपूर्ण समर्पण करण्याची इच्छा असते, ईश्वरी संकल्पाला आणि ईश्वराच्या मार्गदर्शनाला पूर्णपणे शरण जावे अशी तिची इच्छा असते. आणि जेव्हा तसा खरोखरच अनुभव येतो तेव्हा आपण कोणीच नाही, आपण काहीच करू शकत नाही, इतकेच काय पण जर ईश्वर अस्तित्वात नसता तर आपण जगूच शकलो नसतो आणि काहीच करू शकलो नसतो, आपण कोणीच नसतो… हा अनुभव व्यक्तीला येतो. (व्यक्ती जेव्हा ईश्वराप्रति खरोखरच प्रामाणिकपणे आत्मदान करण्याचा प्रयत्न करते तेव्हा, योगमार्गावर येणारा हा सार्वत्रिक अनुभव असतो.)

वास्तविक, संपूर्ण आत्मदानाच्या मार्गावरील एक साहाय्य या भूमिकेतून तो अनुभव आलेला असतो. परंतु हा अनुभव येतो तेव्हा, तुमच्या व्यक्तित्वामध्ये एक भाग असा असतो की, जो अचानक भयंकर बंड करून उठतो आणि म्हणतो, “पण का? मला ‘मी’ म्हणून अस्तित्वात राहायचे आहे, मी पण कोणीतरी आहे, मला सर्व गोष्टी स्वतःच करायच्या आहेत, मला माझे (स्वतंत्र) व्यक्तिमत्त्व हवे आहे.” आणि मग स्वाभाविकपणे, पहिल्या भागाने (आत्मदान केलेल्या भागाने) जे काही केले होते ते दुसऱ्या भागाकडून नामशेष केले जाते. ही उदाहरणे अपवादात्मक आहेत असे नाही तर, हे असे नेहमी घडत असते. मी तुम्हाला यासारखी, व्यक्तित्वातील परस्परविरोधाची अगणित उदाहरणे सांगू शकते. म्हणजे जेव्हा तुमच्यामधील एखादा भाग पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा, दुसरा भाग आडवा येतो आणि सर्व काही उद्ध्वस्त करून टाकतो. आणि तुम्हाला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 08 : 283-284)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

माणूस चिंताग्रस्त का आहे?

  (माणसाचे जीवन चिंताग्रस्त का आहे आणि त्यावर उपाय काय, हे श्रीमाताजी येथे खुलासेवार स्पष्ट…

18 hours ago

उच्चतर चेतना : प्रस्तावना

  मनुष्य हा पृथ्वीतलावरचा अंतिम टप्पा आहे, अशी बहुधा सर्वांची समजूत असते. परंतु ‘मन हा…

2 days ago

मराठी विकिपीडियावरील नोंदी

नमस्कार वाचकहो, अभीप्सा मासिक, ऑरोमराठी वेबसाईट आणि ज्योतिर्मयी मिडिया हाऊस या उपक्रमांतर्गत आपण श्रीअरविंद आणि…

3 days ago

आपल्याला काय संपादन करायचे आहे?

  असे नावीन्यपूर्ण काय आहे की, जे आपण अद्यापि साध्य केलेले नाही? आपल्याला ‘प्रेम‌’ संपादन…

4 days ago

आपले कार्य काय?

आत्तापर्यंत मनुष्याने जे संपादन केले आहे त्याचीच पुनरावृत्ती करणे हे आपले काम नाही तर, नवीन…

5 days ago

विचार-कणिका

  स्वतःच्या अक्षाभोवती फिरत राहणे हीच मानवी आत्म्याची एकमेव गती नाही. अक्षय प्रकाशमान असणाऱ्या सूर्याभोवती…

6 days ago