ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

Categories: समर्पण

आंतरिक स्वच्छता

समर्पण – ३०

श्रीमाताजी : समर्पणाची केवळ सकारात्मक क्रियाच पुरेशी असते असे नाही तर नकाराची नकारात्मक क्रियादेखील तितकीच आवश्यक असते. कारण जोपर्यंत तुम्ही तुमच्या अस्तित्वामध्ये समर्पणाला विरोध करणाऱ्या घटकांना आश्रय दिलेला असतो तोपर्यंत तुम्ही एक स्थिर असे रूपांतरण प्राप्त करून घेऊ शकत नाही. जर तुम्ही तुमच्यामध्ये तमोमय गोष्टी तशाच कायम ठेवल्यात तर त्या गोष्टी काही काळासाठी गप्प बसतील, चुळबुळ करणार नाहीत; इतक्या मुकाट बसतील की तुम्ही त्यांना अजिबात महत्त्व देणार नाही आणि एके दिवशी अचानक त्या पुन्हा जाग्या होतील आणि तुमचे रूपांतरण त्यांचा प्रतिकार करू शकणार नाही. आत्मदानाची सकारात्मक क्रियाच आवश्यक असते असे नाही तर, या आत्मदानाला विरोध करणारी तुमच्यामध्ये जी जी गोष्ट असते, त्या प्रत्येक गोष्टीला नकार देण्याची नकारात्मक क्रियादेखील तितकीच आवश्यक असते. तुम्ही कोणत्याही गोष्टी जशा आहेत तशाच सोडून देता कामा नयेत, किंवा त्यांना तुम्ही कोठेतरी दडवूनही ठेवता कामा नये. अन्यथा पहिली संधी मिळताक्षणी त्या गोष्टी जाग्या होऊन, तुम्ही केलेले सारे कार्य होत्याचे नव्हते करून टाकतील; आणि असे होऊ नये म्हणून तुम्ही त्या गोष्टी दडवून ठेवता कामा नयेत. तुमच्या अस्तित्वाचे असे काही घटक असतात की ज्यांना हे कसे करायचे हे चांगलेच माहीत असते; या दृष्टीने प्राणाचे काही घटक असाधारण असतात. ते एका कोपऱ्यात लपून, गुपचूप बसतात, ते इतके गप्प आणि हालचाल न करता राहतात की तुम्हाला असे वाटते की ते अस्तित्वातच नाहीत; त्यामुळे तुम्ही गाफील राहता; तुम्ही तुमच्या रूपांतरणावर आणि तुमच्या समर्पणावर समाधानी असता. तुम्हाला असे वाटते की सारे काही सुरळीत चालू आहे आणि अचानक, एके दिवशी, कोणतीही पूर्वसूचना न देता, (लहान मुलांच्या खेळण्यात असते त्याप्रमाणे, पेटी उघडताच टुणकन बाहेर पडणाऱ्या गोष्टीप्रमाणे) या गोष्टी उसळून वर येतात आणि तुम्हाला या विश्वातल्या यच्चयावत सगळ्या मूर्खपणाच्या गोष्टी करायला भाग पाडतात. आणि या गोष्टी खूप ताकदवान असतात कारण त्या दबून बसलेल्या असतात – त्या इतक्या दाटीवाटीने एका कोपऱ्यात दबलेल्या स्थितीत राहिलेल्या असतात – त्या जणू काही पुरून टाकलेल्या असाव्यात अशा स्थितीत राहिलेल्या असतात त्यामुळे तुमचे त्यांच्याकडे लक्षही गेलेले नसते; त्या अगदी, अगदी गप्पगार बसलेल्या असतात आणि तुमच्या अनपेक्षितपणे त्या उसळून वर येतात आणि तुम्ही स्वतःलाच म्हणता, “अरेच्चा! मग माझ्या या रूपांतरणाचा काय उपयोग?” – ती तमोमय गोष्ट तिथेच दडून होती आणि म्हणून ही गोष्ट घडून आली होती. हे असेच होते, या गोष्टी स्वतःला इतक्या बेमालूमपणे दडवून ठेवतात, त्या तिथे शिल्लक राहतात, आणि जर का तुम्ही एक चांगला प्रकाशमान असा कंदिल घेऊन त्यांचा शोध घेतला नाहीत तर, ज्या दिवसापर्यंत त्या स्वतःहून बाहेर येऊन जोवर तुमचे कार्य एका मिनिटात उध्वस्त करून टाकत नाहीत, तोवर तुम्हाला त्यांची काही कल्पनाच येत नाही.

प्रश्न : एखादी व्यक्ती अगदी उत्तुंग अभीप्सा बाळगत असेल तरी तिच्याही बाबतीत असे घडू शकते का?

श्रीमाताजी : अभीप्सा ही अत्यंत दक्ष असली पाहिजे. मला योगसाधना अशा काही व्यक्ती माहीत आहेत (थोड्याथोडक्या नव्हेत तर, योगसाधना करणाऱ्या पुष्कळशा व्यक्ती) की त्यांच्याबाबतीत, जेव्हा जेव्हा ते अतिशय उत्कट अशी अभीप्सा बाळगत असत, आणि जेव्हा ती अभीप्सा अतिशय तीव्र होऊन त्यांच्या त्या अभीप्सेला प्रतिसाददेखील मिळत असे, त्या त्या प्रत्येक वेळी, अगदी त्याच दिवशी किंवा फार फार तर दुसऱ्या दिवशी, त्यांच्या चेतनेची पूर्णपणे पिछेहाट होत असे आणि त्यांनी ज्याची अभीप्सा बाळगली असे, अगदी नेमकी त्या विरूद्ध गोष्ट त्यांच्या सामोरी येत असे. बरेचदा या गोष्टी सातत्याने घडून येतात. अशी जी माणसं असतात त्यांनी केवळ सकारात्मक बाजूच विकसित केलेली असते. त्यांनी अभीप्सेलाच एक प्रकारची साधना बनवलेली असते, ते मदतीची याचना करतात, ते उच्चतर शक्तींच्या संपर्कात येण्याचा प्रयत्न करतात, ते त्यामध्ये यशस्वीही होतात, त्यांना तसे अनुभवही येतात; परंतु त्यांनी त्यांची स्वतःची खोली स्वच्छ करण्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलेले असते. ती खोली पूर्वी होती तशीच अस्वच्छ राहिलेली असते आणि त्यामुळे अर्थातच, जेव्हा त्यांना आलेले ते अनुभव नाहीसे होतात तेव्हा ती अस्वच्छता आधीपेक्षाही अधिक तीव्रतेने उसळून वर येते.

व्यक्तीने स्वतःची खोली स्वच्छ करण्याकडे कधीही दुर्लक्ष करता कामा नये, ते खूप महत्त्वाचे असते; बाह्य स्वच्छतेइतकीच, निदान तेवढीतरी आंतरिक स्वच्छता महत्त्वाची असते.

– श्रीमाताजी
(CWM 04:358-359)

श्रीमाताजी

श्रीमाताजींची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व फ्रेंच भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १८

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा…

2 hours ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १७

(उत्तरार्ध) आंतरिक ‘सूर्य‌’ शोधण्यासाठी तुम्ही अंतरंगामध्ये पुरेसे खोलवर गेले पाहिजे, त्या सूर्याच्या तेजोप्रवाहामध्ये स्वतःला प्रवाहित…

1 day ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १६

पृथ्वीवरील जीवन परिपूर्ण करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे या जीवनाकडे इतक्या उंचीवरून पाहायचे की, जेथून व्यक्तीला…

2 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १५

हृदयापासून असलेली अभीप्सा आणि (परमेश्वराचा) अंत:करणपूर्वक केलेला साधा, सरळ, प्रामाणिक धावा ही एक अतिशय महत्त्वाची…

3 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १४

तुमचे वैयक्तिक मोल कितीही असू दे किंवा तुम्हाला व्यक्तिगतरित्या कोणताही साक्षात्कार झालेला असू दे, पहिला…

4 days ago

अध्यात्मजीवनाची पूर्वतयारी – १३

आपल्या 'मी'ला अस्तित्व नसून, केवळ परम चेतना‌, परम संकल्पशक्ती‌ हीच अस्तित्वात आहे, हे जाणणे यामध्ये…

5 days ago