Tag Archive for: साधना

 

वाचन आणि अभ्यास या गोष्टी मनाची पूर्वतयारी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, पण त्या गोष्टी म्हणजेच काही योगमार्गामध्ये प्रवेश करण्याची स्वयमेव सर्वोत्तम साधने नाहीत. तर अंतरंगातून होणारे आत्मसमर्पण हे त्यासाठी उत्तम साधन असते. तुम्ही श्रीमाताजींच्या चेतनेशी एकरूप झाले पाहिजे आणि प्रामाणिकपणे आत्म्याच्या अधिपत्याखाली आलेले मन, हृदय आणि संकल्प या गोष्टी (self-consecration) त्यासाठीची साधनं असतात.

श्रीमाताजींनी नेमून दिलेले काम हे त्यासाठी नेहमीच आत्म-निवेदनाचे क्षेत्र मानले जाते. ते काम श्रीमाताजींना अर्पण करण्याच्या भावनेतूनच केले गेले पाहिजे, म्हणजे मग त्या आत्मार्पणाच्या (self-offering) माध्यमातून व्यक्तीला, श्रीमाताजींच्या उपस्थितीची जाणीव होऊ शकेल आणि श्रीमाताजींची शक्ती त्या व्यक्तीमध्ये कार्य करत आहे हे तिला जाणवू शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 246)

 

साधक : मी कोणती गोष्ट सर्वाधिक विकसित केली पाहिजे? आणि मी सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला नकार देण्याची गरज आहे?

श्रीमाताजी : प्रामाणिकपणा विकसित करा. प्रामाणिकपणा म्हणजे ईश्वराच्या मार्गाशी समग्र निष्ठा बाळगणे. जुन्या मानवी सवयींकडे आपला ओढा असतो, त्याला नकार द्या.

*

साधक : मला वैयक्तिकरित्या श्रीअरविंदांना एक सर्वोत्तम गोष्ट अर्पण करायची आहे. मी काय अर्पण करू?

श्रीमाताजी : संपूर्ण प्रामाणिकपणे तुम्ही तुमचे मन त्यांना अर्पण करा.

साधक : श्रीअरविंदांना संपूर्ण प्रामाणिकपणे माझे मन अर्पण करायचे झाले तर, त्यासाठी एकाग्रतेची शक्ती विकसित करण्याची आवश्यकता आहे ना? तर मग ही मौलिक क्षमता विकसित करण्याची एखादी पद्धत मला सांगाल का?

श्रीमाताजी : तुम्ही ज्या वेळी शांतचित्त असू शकाल अशी दिवसभरातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. श्रीअरविंदांचे एखादे पुस्तक घ्या आणि त्यातील एक किंवा दोन वाक्यं वाचा. मग निश्चल-नीरव राहून, त्या वाक्यांमधील गर्भितार्थ जाणून घेण्यासाठी एकाग्रचित्त व्हा. मानसिक निश्चल-नीरवता मिळविण्यासाठी पुरेसे खोलवर जाऊन एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा आणि जोवर तुम्हाला अपेक्षित परिणाम साध्य होत नाही तोपर्यंत याची रोज पुन्हा नव्याने सुरूवात करा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 67), (CWM 12 : 205)

 

अंतःकरणाची शुद्धी ही (आध्यात्मिक साक्षात्कारासाठी) केंद्रभूत आवश्यकता असतेच; पण मन, प्राण, शरीर यांच्या शुद्धीकरणाची देखील आवश्यकता असते. परंतु अंतःकरणाच्या शुद्धीसाठी सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे संपूर्ण प्रामाणिकपणा. कोणतेही ढोंग करता कामा नये. ईश्वरापासून, स्वतःपासून किंवा सद्गुरूपासून कोणतीही गोष्ट लपवून ठेवता कामा नये. स्वतःच्या वृत्ती-प्रवृत्तींचे काटेकोर निरीक्षण केले पाहिजे आणि स्वतःमधील दुष्प्रवृत्तींमध्ये सुधारणा करण्याची साधीसरळ इच्छा बाळगली पाहिजे. या गोष्टींना किती वेळ लागतो हे फारसे महत्त्वाचे नाही. ईश्वरप्राप्ती हेच आपले जीवित-कार्य आहे अशी व्यक्तीने तयारी ठेवली पाहिजे.

अंतःकरणाची शुद्धी ही काही साधीसुधी उपलब्धी नाही. आणि म्हणून, ती झाली नाही म्हणून हताश, निराश होण्याचे काही कारण नाही. कारण ज्या गोष्टींमध्ये परिवर्तन केले पाहिजे अशा गोष्टी व्यक्तीला स्वतःमध्ये वेळोवेळी आढळतच राहतात. परंतु व्यक्तीने जर खरी इच्छा आणि योग्य दृष्टिकोन बाळगला असेल तर, अंतरंगातून येणाऱ्या सूचना किंवा अंतःप्रेरणा वाढीस लागतात, त्या अधिक सुस्पष्ट, नेमक्या, अचूक व्हायला लागतात आणि त्यांचे पालन करण्याची व्यक्तीची ताकदसुद्धा वाढीला लागते.

आणि तेव्हा मग, तुम्ही स्वतःबाबत समाधानी होण्याआधी, तो ईश्वरच तुमच्याबाबतीत समाधानी होईल आणि मानवजात ज्या महान गोष्टीचे (परमेश्वराचे), आकलन करून घेण्याची आस बाळगू शकते त्या महान गोष्टीचे मानवजातीला तिची पुरेशी तयारी झालेली नसताना आकलन होऊ नये आणि त्यामुळे तिला धोका पोहोचू नये म्हणून, ईश्वर व साधक यांच्यामध्ये ईश्वरानेच जो पडदा निर्माण केलेला असतो आणि ज्या पडद्याच्या पाठीमागे राहून, तो स्वतःचे व साधकाचे संरक्षण करत असतो तो पडदा आता ईश्वर स्वतःहून हळूहळू दूर करू लागेल.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 43)

 

प्रामाणिकपणा, सचोटी, निःस्वार्थीपणा, कार्याप्रति निरपेक्ष समर्पण, उदात्त चारित्र्य आणि सरळमार्गीपणा हा आपल्या पूर्णयोगाचा अपरिहार्य पाया आहे. हे प्राथमिक गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न जे लोक करत नाहीत ते श्रीअरविंदांचे शिष्य असूच शकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 13 : 123)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

ईश्वरी कृपेबद्दल कोणतीच शंका असू शकत नाही. मनुष्य जर प्रामाणिक असेल तर तो ईश्वरापर्यंत जाऊन पोहोचेलच, हे अगदी खरे आहे. पण म्हणून कोणताही विलंब न होता तो, अगदी लगेच, अगदी सहजपणे ईश्वरापर्यंत पोहोचेल, असा याचा अर्थ होत नाही. ईश्वरप्राप्ती पाच-सहा वर्षातच झाली पाहिजे अशी काहीतरी एक मुदत तुम्ही ठरवत आहात आणि अजूनपर्यंत तसा कोणताच परिणाम तुम्हाला दिसत नाहीये म्हणून तुम्ही (ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच) शंका घेत आहात, हीच तुमची खरी अडचण आहे.

एखादा मनुष्य मूलतः प्रामाणिक असूनसुद्धा साक्षात्कार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी, त्याच्यामध्ये अशा अनेक गोष्टी असू शकतात की, ज्यांमध्ये परिवर्तन व्हावे लागते. त्याच्यापाशी असलेल्या प्रामाणिकपणाने त्याला चिकाटी बाळगण्यासाठी नेहमीच सक्षम बनविले पाहिजे. कारण ईश्वराबद्दलची आस इतर कशानेही मावळत नाही. विलंब, निराशा, कोणती एखादी अडचण किंवा अन्य कोणत्याही गोष्टी यांच्यामुळे ती मावळू शकत नाही.

तुम्ही पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहात कारण तुम्ही तुमच्या मनाला पुन्हा त्याच्या अज्ञानामध्ये, शंकेखोरपणामध्ये सक्रिय होण्यास मुभा दिली आहे. परिणामी, अगदी साधीसरळ आणि अगदी सुप्रस्थापित असणारी अशी जी आध्यात्मिक सत्यं आहेत ती तुम्ही नाकारू पाहात आहात. आंतरिक ज्ञान मिळण्याची वाट पाहण्याऐवजी तुम्ही (ईश्वरच अस्तित्वात नाही असे) ठरवून मोकळे होत आहात. या साऱ्या गोष्टी तुमच्यामधून काढून टाका आणि तुम्ही ईश्वरप्राप्तीसाठी जे प्रयत्न करत आहात ते तसेच अविचलपणे करत राहा. त्यासाठी किंवा चेतना खुली होण्यासाठी किती वेळ लागत आहे, तो कमी आहे की जास्त आहे, याचा कोणताही विचार तुम्ही करू नका. ईश्वरप्राप्तीसाठी साधना करण्याचा तुम्ही निर्धार केला होतात (याचे स्मरण ठेवा.) तो निर्धार कायम ठेवा. म्हणजे मग भलेही सावकाशपणे का होईना, पण एक ना एक दिवस तुमची चेतना खुली होईल आणि प्रकाश अवतरेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 116–117)

 

(एका साधकाची अशी समजूत झाली आहे की, त्याच्यामध्ये असलेल्या अपूर्णतांमुळे तो योगमार्गासाठी अपात्र आहे. त्याने तसे श्रीअरविंदांना कळविले आहे. त्यावर श्रीअरविंदांनी दिलेले हे उत्तर…)

अपूर्णता असल्या आणि अगदी कितीही अपूर्णता असल्या किंवा त्या कितीही गंभीर स्वरूपाच्या असल्या तरीही, योगमार्गातील प्रगतीसाठी अपूर्णता या कधीही कायमचा अडथळा ठरू शकत नाहीत. एकच अडथळा हा कायमस्वरूपी अडथळा ठरू शकतो आणि तो म्हणजे अप्रामाणिकपणा. अर्थात हा अडथळासुद्धा कायम राहण्याची गरज नाही कारण त्यामध्येसुद्धा परिवर्तन करता येते. अपूर्णता हा जर योगमार्गातील अडथळा असता तर कोणताही मनुष्य योगमार्गामध्ये यशस्वी होऊ शकला नसता; कारण प्रत्येक जणच अपूर्ण असतो…

योगसाधनेमध्ये एकच गोष्ट अंतिमतः महत्त्वाची असते आणि ती म्हणजे प्रामाणिकपणा. आणि त्याबरोबर आणखी एक गोष्ट महत्त्वाची असते, ती म्हणजे मार्गावर टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारा धीर. अर्थात बरेच जण धीर नसतानासुद्धा ध्येयापर्यंत पोहोचू शकतात. कारण, साधकामध्ये बंडखोरीची भावना असली किंवा अधीरता, नैराश्य, विषाद, थकवा या गोष्टी असल्या किंवा काही काळासाठी त्याची श्रद्धा गमावल्यासारखी झाली तरी किंवा, साधकाच्या मनावर त्या गोष्टींचे मळभ आणि धुके आलेले असतानादेखील, साधकाच्या बाह्यवर्ती ‘स्व‌’पेक्षा अधिक सामर्थ्यशाली असणारी शक्ती, आत्मशक्ती किंवा जिवाला ईश्वरप्राप्तीची जी निकड वाटते ती प्रेरणा या गोष्टी ते मळभ बाजूला सारून, त्याला त्याच्या ध्येयाच्या दिशेने घेऊन जातात.

• श्रीअरविंद (CWSA 31 : 661)

 

पूर्णयोगाच्या मार्गावरून वाटचाल करण्यासाठी तुमच्यामध्ये निर्भय शौर्य असणे आवश्यक आहे. तुम्ही भीतीच्या क्षुल्लक, दुर्बल आणि कुरूप स्पंदनामुळे पूर्णयोगाच्या या मार्गाकडे कधीही पाठ फिरविता कामा नये. तुमच्यापाशी दुर्दम्य धैर्य, परिपूर्ण प्रामाणिकपणा असला पाहिजे. तुम्ही कोणताही विकल्प उपयोगात न आणता किंवा सौदेबाजी न करता संपूर्ण आत्मदान केले पाहिजे. अर्पण करताना त्याच्या मोबदल्यात काहीतरी मिळावे अशी अपेक्षा तुम्ही बाळगता कामा नये. मी स्वतःला ईश्वरार्पित केले तर त्यामुळे माझे संरक्षण होईल या हेतुने तुम्ही ते अर्पण करता कामा नये. तुमच्या श्रद्धेला पुराव्याची आवश्यकता भासता कामा नये. (पूर्णयोगाच्या) मार्गावर प्रगत व्हायचे असेल तर या सर्व गोष्टी अनिवार्य असतात; (कारण) या गोष्टीच तुम्हाला सर्व संकटांमध्ये आश्रय देतात.

* श्रीमाताजी (CWM 15 : 190)

 

तुम्ही समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे स्वीकारलात तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या शिल्लक राहात नाही. फक्त प्रश्न असतो तो प्रामाणिक असण्याचा. तुम्ही जर प्रामाणिक नसाल तर योगसाधनेची सुरुवातच करू नका. मानवी व्यवहारांमध्ये फसवणूक होऊ शकते, पण ईश्वराबरोबरच्या संबंधांमध्ये फसवणुकीची अजिबातच शक्यता नसते. तुम्ही जर विनम्र असाल, अंतरंगातून खुले असाल आणि तुमचे एकमेव उद्दिष्ट ईश्वराचा साक्षात्कार व त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे तुमचे उद्दिष्ट असेल तर तुम्ही (पूर्णयोगाच्या) या मार्गावरून सुरक्षितपणे वाटचाल करू शकाल.

– श्रीमाताजी (CWM 03 : 05)

 

योगमार्गाच्या वाटचालीस प्रारंभ करण्यासाठी पुढील तीन गोष्टी अनिवार्य असतात –

०१) संपूर्ण अस्तित्वामध्ये आणि त्याच्या सर्व गतिविधींमध्ये परिपूर्ण प्रामाणिकपणा.

०२) हातचे काहीही राखून न ठेवता केलेले संपूर्ण आत्म-समर्पण.

०३) स्वतःवर धीराने काम करत राहायचे आणि त्याच वेळी, परिपूर्ण अविचल शांती व समत्व स्थिरावेल असा विजय संपादन करायचा.

• श्रीमाताजी (CWM 14 : 41)

 

कोणत्या गुणामुळे व्यक्ती (योगमार्गासाठी) सुपात्र ठरते किंवा कोणत्या गुणाच्या अभावामुळे ती अपात्र ठरते हे सांगणे तसे कठीण आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये तीव्र कामवासना असेल, किंवा तिच्यामध्ये शंकाकुशंका असतील, किंवा तिची वृत्ती बंडखोर असेल आणि असे असूनदेखील तिला अंतिमतः यश मिळू शकते; तर दुसरी एखादी व्यक्ती अपयशी ठरू शकेल. मात्र, एखाद्या व्यक्तीकडे जर मूलभूत प्रामाणिकपणा असेल, सर्व गोष्टींवर मात करून पुढे जाण्याची इच्छाशक्ती असेल आणि मार्गदर्शन घेण्याची त्या व्यक्तीची तयारी असेल, तर साधनेमधील ते सर्वोत्तम संरक्षण ठरते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 33)