व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

कर्म आराधना – ०३

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते. या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे. हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे. माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 134)

कर्म आराधना – ०२

(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…) सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो. असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये. असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये. असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील. ‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही. असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही. असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल. हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 382)

कर्म आराधना – ०१

प्रस्तावना

श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक आदर्शानुसार सेवा करण्यावर भर नसून, ईश्वराची सेवा करण्यावर भर आहे. मानवतेची सेवा केल्याने व्यक्ती व्यापक होऊ शकते खरी परंतु, बरेचदा तीच सेवा, आपण इतरांचे कल्याण करत आहोत याची प्रौढी मिरविणाऱ्या राजसिक अहंकारावर पांघरूण घालते. फारफार तर आपल्याला मानवी दशेमध्येच जखडून ठेवणारा तो एक सात्त्विक भ्रम ठरू शकतो. परंतु प्रथमत: ईश्वराचे साधन आणि माध्यम बनून, सर्व मानवी संकल्पनांच्या अतीत जाणे, ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत आहे; जेणेकरून मानवाच्या माध्यमातून ‘ईश्वरा’ला या पृथ्वीवर ‘स्वतःच्या’ वैभवाचा वर्षाव करता येईल. आपल्या समग्र अस्तित्वाने केलेल्या ‘प्रार्थनेमध्ये आणि आराधनेमध्ये’ कर्माचे रूपांतर केल्यानेच ही गोष्ट चांगल्या रीतीने करता येते. ‘ईश्वरा’ची सेवा केल्याने, आपली मानवी चेतना ही गतिमान ‘दिव्य चेतने’च्या आणि तिच्या रूपांतरकारी शक्तीच्या संपर्कात येते. आजपासून आपण “कर्म आराधना” या मालिकेद्वारे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारधनाच्या माध्यमातून पूर्णयोगातील ‘कर्म’ हा पैलू समजावून घेणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुमच्या क्षुल्लक अहंकाराला, तुम्ही तुमच्या सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 175)

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण दाखवितो, सांत्वनपर संदेश आणतो….
…अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते.
*
उगवणारी प्रत्येक उषा ही प्रगतीच्या नव्या शक्यता दृष्टिपथात आणते.
*
भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उष:प्रभेप्रत स्वत:स खुले करा, तुमच्यासमोर एक तेजोमय पथ उलगडेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 44 & 15 : 74, 97)

श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगाच्या महान साहसामध्ये जर त्यांचे अनुसरण करायचे असेल तर, व्यक्तीकडे योद्ध्याची जिगर असावी लागते आणि आता तर, जेव्हा श्रीअरविंद आपल्यातून भौतिकदृष्टया निघून गेले आहेत तेव्हा तर व्यक्ती शूरवीरच असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 184)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. येथे तुम्ही पूर्णतः स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वत:च्या ताकदीनिशी योगाला सुरुवात करता. तुम्ही तुमच्या शक्तीच्या प्रमाणात उन्नत होता, प्राप्ती करून घेता. पण येथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा जर का तुम्ही खाली पडलात तर तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाऊन, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो. दुसरा मार्ग समर्पणाचा, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे.… रामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर माकडाच्या पिल्लाचा नाहीतर मांजराच्या पिल्लाचा मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, पिल्लाने तिला घट्ट पकडलेच पाहिजे, नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू ! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते, त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला पकडावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत करायचा असतो.

जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात, तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका… जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 4-5)

मी नेहमी ऊर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे सौंदर्य, शांती, प्रकाश आहेत; ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी अभीप्सा बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा.

खाली, या विश्वातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 68)

श्रीमाताजी : तुम्ही तुमचे सर्व नातेसंबंध हे तुमच्या आंतरिक निवडीच्या स्वातंत्र्यानुसार नव्याने निर्माण केले पाहिजेत. तुम्ही ज्या परंपरेमध्ये जन्माला आला आहात किंवा मोठे झाला आहात ती परिस्थिती तुमच्यावर वातवारणाच्या दबावाने किंवा सामान्य मनाद्वारे वा इतरांच्या निवडीद्वारे लादण्यात आलेली आहे. तुमच्या मौनसंमतीमध्ये देखील सक्तीचा एक भाग असतो. धर्म हा देखील माणसांवर लादण्यात येतो, त्याला धार्मिक भीतीच्या सूचनेचा, वा कोणत्यातरी आध्यात्मिक किंवा इतर संकटाच्या धमकीचा आधार असतो. ईश्वराशी तुमचे जे नाते असते त्याबाबतीत मात्र अशा प्रकारची कोणतीही बळजबरी चालत नाही. ते नाते स्वेच्छेचे असावे, ती तुमच्या मनाची आणि हृदयाची निवड असली पाहिजे. आणि ती निवड उत्साहाने आणि आनंदाने केलेली असली पाहिजे. ते कसले आले आहे ऐक्य की, ज्यामध्ये व्यक्ती भयकंपित होते आणि म्हणते, ”माझ्यावर सक्ती करण्यात आली आहे, मी काहीच करू शकत नाही !” सत्य हे स्वत:सिद्ध असते आणि ते जगावर लादता कामा नये. लोकांनी आपला स्वीकार करावा, अशी कोणतीही गरज सत्याला भासत नाही. ते स्वयंभू असल्यामुळे लोक त्याविषयी काय बोलतात किंवा लोकांची त्यावर निष्ठा आहे की नाही, यावर त्याचे अस्तित्व अवलंबून असत नाही. पण ज्याला धर्माची स्थापना करावयाची असते त्याला मात्र अनेक अनुयायी असावे लागतात. एखाद्या धर्मामध्ये जरी खरीखुरी महानता नसली तरी, कितीजण त्या धर्माचे अनुयायी आहेत त्या संख्येवर लोक त्या धर्माची ताकद आणि महानता ठरवितात. मात्र आध्यात्मिक सत्याची महानता ही संख्येवर अवलंबून नसते. मला एका नवीन धर्माचा प्रमुख माहीत आहे, जो त्या धर्माच्या संस्थापकाचा मुलगा आहे. तो एकदा म्हणाला की, “अमुक धर्माची जडणघडण होण्यासाठी इतकी शतकं लागली आणि तमुक धर्माला अमुक इतकी शतकं लागली, पण आमच्या धर्मात मात्र गेल्या पन्नास वर्षातच चाळीस लाखांपेक्षा अधिक अनुयायी आहेत, तेव्हा बघा आमचा धर्म केवढा श्रेष्ठ आहे !” एखाद्या धर्माच्या महानतेचे मोजमाप हे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असू शकते, पण जरी अगदी एकही अनुयायी लाभला नाही तरीही सत्य मात्र सत्यच असते. जेथे मोठमोठा गाजावाजा चाललेला असतो तेथे माणसं खेचली जातात; पण जिथे सत्य शांतपणे आविष्कृत होत असते, तेथे कोणीही फिरकत नाहीत. जे स्वत:च्या मोठेपणाचा दावा करतात, त्यांना जोरजोरात सांगावे लागते, जाहिरात करावी लागते, अन्यथा त्यांच्याकडे लोक मोठ्या संख्येने आकर्षित होणार नाहीत. पण लोक त्याविषयी काय म्हणतात याची पर्वा न करता काम केले असेल, तर ते फारसे विख्यात नसते आणि साहजिकच, लोक त्याकडे मोठ्या संख्येने वळत नाहीत. पण सत्याला मात्र जाहिरातबाजीची गरज नसते, ते स्वत:ला दडवून ठेवत नाही पण स्वत:ची प्रसिद्धीदेखील करत नाही. परिणामांची चिंता न करता, आविष्कृत होण्यातच त्याची धन्यता सामावलेली असते, ते प्रशंसा मिळावी म्हणून धडपडत नाही किंवा अप्रशंसा टाळत नाही, जगाने त्याचा स्वीकार केला काय किंवा त्याच्या कडे पाठ फिरवली काय, सत्याला त्याने काहीच फरक पडत नाही.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 82-84)