Tag Archive for: साधना

 

(मनुष्याने स्वत:ला उच्चतर चेतनेप्रत समर्पित करायचे हा माणसाच्या चिंताग्रस्ततेवरील एक उपाय आहे, असे श्रीमाताजींनी सांगितले. ते आपण आजवर विचारात घेतले. त्या विवेचनाचा हा संपादित केलेला अंतिम भाग आहे. विषय समजण्यास सोपा जावा या दृष्टीने मराठी भाषांतरामध्ये वाक्यांचा क्रम व मांडणी यामध्ये बदल केला आहे, याची कृपया नोंद घ्यावी.)

सर्व आध्यात्मिक साधनापद्धतींचा प्रारंभ सर्व जबाबदाऱ्या उच्चतर तत्त्वावर सोपवून, त्याला समर्पित होण्याच्या आवश्यकतेपासून होते. अन्यथा शांती लाभणे अशक्य असते. ‘शांततावादी’ (quietist) पद्धत असे त्या साधनापद्धतींचे वर्णन करता येईल.

सर्व प्रकारच्या कृतींना नकार देत, अचल आंतरिक निश्चल-नीरवतेमध्ये बुडी घेण्यावर या शांततावादी पद्धती आधारलेल्या असतात. त्याचे अनुसरण करणाऱ्या व्यक्तींना अचानकपणे अशी जाणीव होते की, शांतीशिवाय कोणताच आंतरिक साक्षात्कार होणे शक्य नाही. आणि म्हणून अगदी स्वाभाविकपणे, त्यांच्या मनात असा विचार येतो की, कधीच न सुटणारे प्रश्न जोपर्यंत त्यांना भेडसावत आहेत आणि जोपर्यंत बाह्य अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये त्यांना जीवन कंठावे लागत आहे, तोपर्यंत त्याना कधीच शांती लाभणे शक्य नाही.’ कारण ते प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक असणारे ज्ञानच त्यांच्यापाशी नाहीये. आणि म्हणून, शांती लाभावी यासाठी त्या शांततावादी साधनापद्धती सर्व प्रकारच्या जीवनाचा परित्याग करतात. (‘शांततावादी’ पद्धतीचे अनुसरण करणाऱ्या माणसांची विचारसरणी ही अशा प्रकारची असते.)

परंतु या अचल (immobile) व स्थिर शांतीपेक्षा (static peace) अधिक उच्च असणारी अशी आणखी एक स्थिती असते. मनुष्याला अशी एक चेतना प्रदान करण्यात आलेली आहे की, ज्यामुळे तो प्रगती करू शकतो, त्याला जे ज्ञात नाही ते तो शोधून काढू शकतो; तो जे अजूनपर्यंत होऊ शकलेला नाही त्यामध्ये तो विकसित होऊ शकतो. आणि हा जो विश्वास असतो तो, व्यक्तीने प्रगती करण्याची इच्छा कायम ठेवावी, सर्व प्रकारच्या चिंता व काळज्यांपासून मुक्त होऊन, फलिताची व परिणामांची कोणतीही काळजी न करता, प्रगतीसाठीचे प्रयत्न चालू ठेवावेत यासाठी पुरेसा असतो. शांततावादी पद्धतींपेक्षा एक पाऊल पुढे टाकणारी ही पद्धत आहे.

हे पुढचे पाऊल म्हणजे (जीवनाचा त्याग न करता, जीवनात राहून) प्रश्नांना सामोरे जाणे. ज्या परमशक्तीला सर्व काही ज्ञात आहे आणि जी तुम्हाला कार्यप्रवृत्त करू शकते, तिच्यावर संपूर्ण विश्वास ठेवून, त्या खात्रीनिशी आणि स्थिरचित्ताने प्रश्नांना सामोरे जायचे. आणि अशा वेळी व्यक्ती (शांततावादी पद्धतीप्रमाणे) कृती करण्याचे सोडून देत नाही तर ती आता, बलशाली आणि गतिशील असणाऱ्या उच्चतर शांतीमध्ये राहून कार्य करू शकते. ईश्वर आपल्याला जीवनामध्ये जो मदतीचा हात देतो त्याचा हा एक नवीन पैलू आहे; व्यक्तीमध्ये ईश्वरी शक्ती कार्यरत असल्याचे हे एक नवीन रूप आहे; किंबहुना आध्यात्मिक साक्षात्काराचा हा एक नवीनच आयाम आहे, असे म्हणता येईल.

– श्रीमाताजी (CWM 09 : 304-305)

(माणसाची चिंताग्रस्तता आणि त्यावरील उपाय याविषयी श्रीमाताजी मार्गदर्शन करत आहेत. त्यातील हा पुढचा भाग…)

आता यापुढे, मनुष्याचे पतन होऊन तो पुन्हा प्राण्याच्या पातळीवर खाली घसरेल आणि त्याने संपादन केलेली चेतना तो गमावून बसेल हे शक्य नाही. आणि म्हणून, त्याच्यापाशी एकच उपाय शिल्लक राहतो. तो ज्या दयनीय परिस्थितीत जीवन जगत आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा आणि जेथे चिंतेची जागा विश्वासपूर्ण समर्पणाने घेतलेली असते व जेथे प्रकाशमान परिणतीची खात्री असते अशा एका उच्चतर स्थितीमध्ये उन्नत होण्याचा एकच मार्ग त्याच्यापाशी उरतो. चेतनेमध्ये (consciousness) परिवर्तन घडवून आणणे हाच तो मार्ग आहे.

खरे सांगायचे तर, ज्याची किल्लीच आपल्यापाशी नाही अशा गोष्टीसाठी आपण जबाबदार असणे, यासारखी दुसरी दयनीय अवस्था नाही. (तशी मनुष्याची अवस्था झाली आहे कारण चिंताग्रस्ततेचा) हा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे असे एखादे मार्गदर्शक सूत्र मनुष्याच्या हाती नाही. प्राण्यांना कोणतेही प्रश्न पडत नाहीत, ते नुसते जगत असतात. ते उपजत प्रेरणेनुसार जीवन जगत असतात. ते त्यांच्या सामूहिक चेतनेवर विसंबून असतात, या चेतनेकडे उपजत ज्ञान असते. आणि ही सामूहिक चेतना प्राण्यांच्या व्यक्तिगत चेतनेपेक्षा अधिक उन्नत असते. पण ती स्वयंचलित, सहजस्वाभाविक असते. प्राण्याला कोणता एखादा संकल्प करण्याची किंवा तो प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. प्राणी सहजस्वाभाविकपणे वागत असतात आणि ते कोणतीही काळजी करत बसत नाहीत. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 304)

 

 

(मनुष्यप्राणी या सृष्टीमधील सर्वात दु:खी जीव असला तरी, त्याच्याकडे असलेल्या एका विशेष क्षमतेमुळे तो चिंतामुक्त होऊ शकतो, ती क्षमता कोणती ते श्रीमाताजी येथे सांगत आहेत…)

मनुष्यामध्ये उच्चतर स्तरावर आरोहण करण्याची आध्यात्मिक क्षमता आहे; त्यामुळे तो त्याच्यामध्ये असलेल्या प्राण्याच्या अचेतनेच्या जागी आध्यात्मिक अतिचेतना (super-consciousness) स्थापित करू शकतो. आणि या क्षमतेमुळे, स्वतःच्या अस्तित्वाचे प्रयोजन काय आहे आणि त्याने केलेल्या प्रयत्नांची परिणती कशामध्ये होणार आहे हे भविष्यवेधी दृष्टीने पाहण्याची क्षमता त्याच्यामध्ये आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्याच्यामध्ये उच्चतर आध्यात्मिक शक्तीवर विचक्षण, स्वच्छ दृष्टीने (clear-sighted) विश्वास ठेवण्याची क्षमतादेखील निर्माण झाली आहे. त्या आध्यात्मिक शक्तीप्रत तो स्वतःच्या समग्र अस्तित्वानिशी समर्पित होऊ शकतो. तो स्वतःच्या जीवनाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी त्या शक्तीवर सोपवून सर्व प्रकारच्या काळज्या, चिंता यांपासून मुक्त होऊ शकतो. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 09 : 303-304)

 

जीवनाचे खरे उद्दिष्ट काय हे जर व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल तर, त्या व्यक्तीने अहंकारी असता कामा नये, तिने आपल्या परम उगमापासून विभक्त होऊन, स्व-मग्न होता कामा नये; तिने अहंभावाचे समूळ उच्चाटन केलेच पाहिजे आणि याचीच खरी आवश्यकता असते. तेव्हाच व्यक्तीला जीवनाचे खरे उद्दिष्ट काय आहे हे ज्ञात होऊ शकते. तिथपर्यंत पोहोचण्याचा हा एकमेव मार्ग आहे. एखाद्या निरूपयोगी वस्त्राप्रमाणे, व्यक्तीचा अहंभाव गळून पडला पाहिजे आणि यासाठी जे प्रयत्न करावे लागतात ते किती सार्थ आहेत हे त्यांच्या परिणामावरून लक्षात येते.

आणि मग व्यक्ती या मार्गावर एकाकी नसते. (मी या मार्गावर एकाकी, एकटी नाही असा) विश्वास जर व्यक्तीमध्ये असेल तर, तिला साहाय्य मिळत राहते. तुम्ही एक क्षणभर जरी ईश्वरी कृपे‌च्या संपर्कात आलात तर ती कृपा, तुम्हाला तिच्यासोबत घेऊन जाते, त्या मार्गावरून तुमची वाटचाल द्रुतगतीने घडवून आणते. त्वरा केली पाहिजे याची तुम्हाला आठवणसुद्धा राहत नाही इतक्या सहजस्वाभाविक रितीने ती ते सारे घडवून आणते. तुमचा क्षणभर जरी त्या ईश्वरी कृपे‌शी संपर्क आला असेल तर, ती गोष्ट विस्मरणात जाऊ नये यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. मग तेव्हा एखाद्या बालकाच्या निर्व्याज साधेपणाने, निष्पापपणाने म्हणजे ज्यामध्ये कोणतीही जटिलता नसते अशा निष्पापपणाने तुम्ही त्या ईश्वरी कृपे‌स आत्मदान करा आणि ईश्वरी कृपे‌नेच सारे काही करावे यासाठी तिच्याप्रत खुले व्हा.

प्रतिकार करणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, विरोधी गोष्टींवर विश्वास ठेवू नका. तुमच्यामध्ये एक सच्चा, खराखुरा विश्वास असला पाहिजे. ज्यामुळे तुम्ही कोणताही हिशोब न करता, कोणतीही सौदेबाजी (bargaining) न करता, स्वतःचे आत्मदान करण्यास प्रवूत्त होता असा विश्वास तुमच्या ठायी असला पाहिजे. विश्वास ठेवा. मग त्या विश्वासापोटी तुम्ही ईश्वराला असे म्हणता की, “मी ही गोष्ट तुझ्यावर सोपवितो आहे. माझ्यासाठी तेवढे करशील ना?” आणि हाच सर्वोत्तम मार्ग असतो.

– श्रीमाताजी (CWM 09 : 426-427)

 

 

निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला जाणणे आणि समग्रतया ईश्वर‌च होऊन जीवन जगणे यासाठी असलेली उत्कट अभीप्सा हाच तो अग्नी आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 74)

(श्रीमाताजी येथे ‘श्रीऑरोबिंदो इंटरनॅशनल सेंटर ऑफ एज्युकेशन’ या श्रीअरविंद-आश्रमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. हे मार्गदर्शन आबालवृद्ध सर्वांनाच उपयुक्त ठरू शकेल.)

आपण इथे एका नूतन चेतनेच्या (अतिमानासिक चेतनेच्या) बहरासाठी आणि एका नवीन जीवनासाठी स्वतःला घडविण्यासाठी आलो आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला म्हणजे, जे जे कोणी शिकू इच्छितात त्या सर्वांना सांगत आहे की, नेहमी अधिकाधिक आणि उत्तमात उत्तम असे शिकत राहा. म्हणजे एक दिवस तुम्ही त्या नूतन शक्तीप्रत स्वतःला खुले करण्यास सक्षम व्हाल आणि त्याद्वारे ती नूतन शक्ती या जडभौतिक स्तरावर आविष्कृत होण्याची शक्यता निर्माण होईल. त्यासाठी हा शारीरिक शिक्षणाचा कार्यक्रम आहे आणि तुम्हाला त्याचा विसर पडता कामा नये.

तुम्ही येथे का आहात याचे खरे कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की, आपल्याला शक्य तितके परिपूर्ण साधन व्हायचे आहे; ईश्वरी इच्छा या जगामध्ये अभिव्यक्त करण्याचे साधन आपल्याला व्हायचे आहे आणि साधनं जर परिपूर्ण व्हायची असतील तर त्यांची जोपासना केली पाहिजे; ती शिक्षित, प्रशिक्षित केली पाहिजेत; ती विकसित केली पाहिजेत. ती साधनं पडीक किंवा खडकाळ जमिनीसारखी ठेवता कामा नयेत. हिऱ्याला पैलू पाडल्यानंतरच त्याचे सौंदर्य खुलून दिसते. तुमच्याबाबतीतही अगदी तसेच आहे.

अतिमानसिक चेतनेच्या आविष्करणासाठी तुमचे शरीर हे एक परिपूर्ण साधन व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्याची जोपासना केली पाहिजे. ते पीळदार बनविले पाहिजे, त्याच्यावर संस्करण केले पाहिजे; त्याच्यामध्ये ज्या उणिवा, कमतरता आहेत त्या भरून काढल्या पाहिजेत आणि त्याच्यामध्ये आधीपासूनच ज्या क्षमता आहेत त्या परिपूर्ण करत नेल्या पाहिजेत.

– श्रीमाताजी (CWM 12 : 72-73)

लहान मुलांना भीती का वाटते? कारण ती दुर्बल असतात. त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या मोठ्या माणसांपेक्षा शारीरिकदृष्ट्या ती दुर्बल असतात आणि सहसा ती प्राणिक व मानसिकदृष्ट्या देखील कमकुवत असतात. दुर्बलतेच्या भावनेतून भीती उद्भवते. तथापि, भीतीपासून सुटका करून घेण्याचा एक मार्ग असतो.

ईश्वरी कृपेवर श्रद्धा ठेवणे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये तिने तुमचे संरक्षण करावे म्हणून तुम्ही तिच्यावर विसंबून असणे हा तो मार्ग होय. तुमच्या आत्म्याशी म्हणजे तुमच्या अस्तित्वाच्या सत्याशी असणारा संपर्क तुम्ही वाढवत नेलात तर आणि तुम्ही जो विचार कराल, तुम्ही जे काही बोलाल, तुम्ही जे काही कराल त्या सर्व गोष्टी म्हणजे अंतरंगात असणाऱ्या सत्याची अभिव्यक्ती ठरली पाहिजे असा प्रयत्न जर तुम्ही नेहमीच करत राहिलात तर, तुम्ही जसजसे मोठे होत जाल तसतसे तुम्ही या भीतीमधून बाहेर पडाल.

तुम्ही जेव्हा त्या सत्यामध्येच जाणीवपूर्वक निवास करू लागाल तेव्हा तुमच्या अस्तित्वाच्या कोणत्याही भागातून (शरीराने, प्राणाने किंवा मनाने) तुम्ही कोणत्याही गोष्टीला घाबरणार नाही. कारण तेव्हा तुम्ही या जगाचे संचालन करणाऱ्या वैश्विक सत्याशीच एकात्म पावलेले असाल.

श्रीमाताजी (CWM 12 : 125)

 

प्रामाणिकपणामध्ये विजयाची निश्चिती असते.
*
निरपवाद प्रामाणिकपणा आणि सत्यत्व यामध्येच मुक्ती आहे.

• श्रीमाताजी (CWM 14 : 65, 66, 67)

 

तुमची श्रद्धा, तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमचे समर्पण हे जेवढे अधिक परिपूर्ण असेल तेवढ्या अधिक प्रमाणात कृपा व संरक्षण तुमच्यासोबत असेल. आणि ‘दिव्य माते’चे संरक्षण आणि ‘तिची कृपा’ तुमच्यासोबत असताना, तुमच्या वाटेला जाण्याची हिंमत कोण करू धजावेल किंवा तुम्हाला कोणाची भीती बाळगण्याची गरजच काय? तिच्या कृपेचा आणि संरक्षणाचा थोडासा अंशदेखील तुम्हाला सर्व अडीअडचणी, अडथळे आणि धोके यांमधून पार करू शकतो; तर मग, तिने जर पूर्णतयाच तुम्हाला कवळून घेतले तर, कोणतीही असत्‌‍-शक्ती, मग ती कितीही बलवान का असेना, ती या जगातील असो किंवा इतर अदृश्य जगतांमधील असो, तिची बाधा न पोहोचता, सर्व संकटांपासून मुक्त होऊन, तुम्ही तुमच्या मार्गावरून पूर्ण सुरक्षितपणे वाटचाल करू शकता; कारण तो मार्ग ‘दिव्य माते’चा असतो.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 08)

(श्रीमाताजी येथे सामान्य आघात आणि महाकालीचे प्रहार यातील फरक सांगत आहेत…)

साधक : एखाद्या व्यक्तीला किती आघात सहन करावे लागणार त्यांचे प्रमाण हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते का?

श्रीमाताजी : हो, ते त्या व्यक्तीवर अवलंबून असते. म्हणजे मी म्हटले त्याप्रमाणे ते तिच्या प्रगती करण्याच्या क्षमतेवर, तिच्या सामर्थ्यावर आणि ईश्वरी शक्तीला तिच्याकडून होणाऱ्या प्रतिरोधावर अवलंबून असते. ज्यांना या आघातांची आवश्यकता नसते असे फारच थोडे जण असतात.

साधक : महाकालीच्या आघाताचे स्वरूप कसे असते?

श्रीमाताजी : महाकालीने केलेल्या प्रहारामुळे तुम्हाला खूप आनंद होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या हृदयामध्ये एक गोडशी ऊब जाणवते. तुम्हाला समाधान वाटते.

साधक : व्यक्तीने तशा प्रहाराची इच्छा बाळगली पाहिजे का? की तो प्रहार आपोआपच होतो?

श्रीमाताजी : हो, व्यक्तीला प्रगती करण्याची खरोखरच इच्छा असली पाहिजे, त्या इच्छेमध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. व्यक्तीने खरोखर अगदी प्रामाणिकपणे असे म्हटले पाहिजे, “हो, मला प्रगती करायची आहे”, “काहीही झाले तरी मला प्रगती करायची आहे.” तेव्हा मग महाकालीकडून प्रहार केला जातो. परंतु मी म्हटले त्याप्रमाणे, ज्यामध्ये उत्कट आनंदाची धारणा असते अशा समृद्धीच्या शक्तीसहित तो आघात होतो.

तुम्ही जर एकदा निर्णय घेतला असेल, उदाहरणार्थ, स्वतःमधील एखादी चुकीची सवय थांबविण्याचा तुम्ही निश्चय केला असेल, किंवा तुम्ही जी चूक एकदा केली होती तीच पुन्हा न करण्याचा निश्चय केला असेल किंवा करायला अवघड वा अशक्यप्राय आहे आणि तरीही ती केली पाहिजे, अशी कोणतीतरी गोष्ट करण्याचा निर्णय तुम्ही घेतला असेल आणि असा निर्णय घेऊन, स्वतःच्या इच्छेबाबत तुमच्यापाशी पूर्ण प्रामाणिकपणा असेल तर, अशा वेळी तुम्ही जे करायचे ठरविले आहे तेच करण्यास भाग पाडण्यासाठी तुमच्यावर जर प्रचंड आघात झाला, तर तो आघातच असतो पण तेव्हा तुम्हाला तुमचा गौरव झाल्यासारखे वाटते, तुम्ही आनंदी होता, तुम्हाला हृदयामध्ये काहीतरी भव्योदात्त असे वाटू लागते. (कारण तो महाकालीचा प्रहार असतो.)

निव्वळ बाह्यवर्ती, यांत्रिक, भौतिक चेतनेमध्ये आणि अज्ञानदशेमध्ये जीवन जगत असताना, ज्या ज्या मूर्खपणाच्या गोष्टी तुम्ही करता, त्याचे स्वाभाविक परिणाम म्हणून अटळपणे व अघटितपणे तुमच्यावर होणारे आघात आणि तुम्ही स्वतःवर प्रभुत्व मिळविण्याचा निश्चय केल्यानंतर, तुम्ही ज्या उच्चतर अवस्थेत उन्नत होता आणि काहीही झाले तरी, सत्याच्या चेतनेमध्येच जीवन व्यतीत करायचा तुम्ही निर्धार करता, प्रगतीसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल पण प्रगती करायचीच, असे जेव्हा तुम्ही ठरविता तेव्हा अशा तुमच्या उच्चतर अवस्थेमध्ये, तुमच्यावर होणारे आघात यांमध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते.

या उच्चतर अवस्थेमध्ये तुमच्या बाबतीत ज्या घटना घडतात त्या इतक्या अर्थपूर्ण असतात की, तुम्हाला त्या घटनांमध्ये दीप्तिमान असणारे सत्य स्पष्टपणे दिसून येते; जणू काही तुम्हाला दीपस्तंभ दिसावा त्याप्रमाणे तुमचा मार्ग उजळवून टाकणारा प्रकाश तुम्हाला दिसतो, तो प्रकाश तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि हे सारे तुम्हाला स्पष्टपणे दिसून येते. तुमच्या पाठीवर एखादा धोंडा येऊन कोसळावा त्याप्रमाणे तो आघात तुमचा विनाश करणारा नसतो तर, त्यामध्ये उत्कट दीप्तिमानता असते. आणि म्हणूनच असे म्हटले जाते की, फक्त पहिल्या पायरीवरच प्रयत्नांची खरी आवश्यकता असते. येथे पहिली पायरी म्हणजे त्या अज्ञानदशेच्या पातळीवरून बाहेर पडून तिच्या वर असणाऱ्या पातळीवर चढून जाणे आणि असे झाल्यानंतर मग सारे, सारे काही बदलून जाते. परंतु व्यक्तीने त्या पातळीवरून पूर्णतः बाहेर पडले पाहिजे, तिने तिथेच थांबून राहता कामा नये, व्यक्तीने दोन दगडांवर पाय ठेवता कामा नये, कारण तसे चालत नाही.

– श्रीमाताजी (CWM 06 : 324-326)