Tag Archive for: साधना

 

साधक : श्रीमाताजींच्या कृपाशीर्वादामुळे, व्यक्तीमध्ये स्थिरचित्तता व समत्व यांचे वरून अवतरण होते का?

श्रीअरविंद : जिवाची अभीप्सा आणि श्रीमाताजींचा कृपाशीर्वाद या दोन्हीमुळे स्थिरचित्तता व समत्व यांचे अवतरण घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 165)

 

व्यक्तीला हृदय-केंद्र, आज्ञाचक्र, मस्तकाच्या वरच्या बाजूस असणारे केंद्र या तीनपैकी ज्या केंद्रावर चित्त एकाग्र करणे सर्वाधिक सुकर असते किंवा व्यक्तीला ज्या केंद्रावर लक्ष एकाग्र केले असता, सर्वात जास्त परिणाम साध्य होतो त्या केंद्रावर तिने चित्त एकाग्र करण्यास हरकत नाही.

०१) हृदयचक्रावरील एकाग्रता

हृदय-चक्रावर एकाग्रता केल्यास ती एकाग्रता-शक्ती ते चक्र (heart-centre) खुले करते आणि चैत्य पुरुषाला (psychic being) झाकणारा पडदा ती अभीप्सेच्या, प्रेमाच्या, भक्तीच्या व समर्पणाच्या शक्तीद्वारे दूर करते. ही शक्ती, मन, प्राण व शरीराचे शासन अंतराम्याने किंवा चैत्य पुरुषाने करावे यासाठी त्याला अग्रस्थानी आणते आणि मन, प्राण व शरीराला ती पूर्णपणे ईश्वराभिमुख करते, त्यांना ईश्वराप्रत खुले करते. तसेच त्यांना ईश्वराभिमुख करण्याच्या आणि खुले करण्याच्या आड जे काही येईल ते सर्व त्यांच्यामधून काढून टाकते. पूर्णयोगामध्ये यालाच ‘आंतरात्मिक किंवा चैत्य रूपांतरण’ (psychic transformation) असे संबोधले जाते.

०२) मस्तकाच्या वरच्या बाजूस असलेल्या केंद्रावर एकाग्रता

शांती, निश्चल-नीरवता आणण्यासाठी, शारीर-जाणिवेपासून आणि मन व प्राणाशी असलेल्या एकत्वापासून मुक्ती मिळविण्यासाठी तसेच उच्चतर चेतनेशी मीलन घडण्यासाठी कनिष्ठ चेतनेचा (मानसिक, प्राणिक व शारिरीक चेतना) मार्ग खुला व्हावा आणि ती चेतना ऊर्ध्वगामी व्हावी तसेच उच्चतर चेतनेच्या (आध्यात्मिक किंवा दिव्य चेतना) शक्ती या मन, प्राण व शरीरामध्ये अवतरित व्हाव्यात म्हणून मस्तकाच्या वरच्या बाजूस (above the head) असलेल्या केंद्रावर एकाग्रता-शक्ती केंद्रित केली जाते. या गोष्टीला पूर्णयोगामध्ये ‘आध्यात्मिक रूपांतरण’ (spiritual transformation) असे संबोधले जाते.

एखाद्या व्यक्तीने जर या प्रक्रियेपासून आरंभ केला तर, ती ऊर्ध्वस्थित शक्ती अवरोहण (descent) करताना, अगदी सर्वात खाली असलेल्या चक्रापर्यंतची सर्व चक्रं खुली करते आणि चैत्य पुरुषास अग्रस्थानी आणते. मात्र हे जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत कनिष्ठ चेतनेच्या अडथळ्यास सामोरे जाण्याचा संघर्ष करावा लागण्याची किंवा अडचणींना तोंड द्यावे लागण्याची बरीच शक्यता असते. दिव्य कार्यामध्ये कनिष्ठ चेतनेची भेसळ होण्याची किंवा दिव्य कार्यास ती नकार देण्याची शक्यता असते. मात्र, एकदा चैत्य पुरुष सक्रिय झाला की हा संघर्ष आणि या अडचणी बऱ्याच कमी होण्याची शक्यता असते.

०३) आज्ञाचक्रावरील एकाग्रता

आज्ञाचक्रावर एकाग्रता करणे म्हणजे तेथील चक्र खुले करणे, आंतरिक मन व आंतरिक दृष्टी मुक्त करणे तसेच आंतरिक किंवा योगिक चेतना आणि तिचे अनुभव व तिच्या शक्ती मुक्त करणे. येथूनसुद्धा व्यक्ती ऊर्ध्वमुख होत खुली होऊ शकते आणि निम्नतर स्तरांवर असणाऱ्या चक्रांवर कार्य करू शकते. परंतु, या प्रक्रियेमध्ये व्यक्ती अध्यात्माविषयीच्या स्वतःच्याच मानसिक काल्पनिक रचनांमध्ये बंदिस्त होऊन राहण्याचा धोका असतो. तसे झाले तर, ती त्यातून बाहेर पडून, समग्र आध्यात्मिक अनुभूतीच्या आणि ज्ञानाच्या मोकळ्या वातावरणात न येण्याचा आणि परिणामतः अस्तित्वामध्ये व प्रकृतीमध्ये समग्र परिवर्तन न होण्याचा धोका संभवतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 307)

(एका साधकाने विचारलेल्या प्रश्नावरील उत्तर श्रीअरविंदांनी त्यांच्या सचिवांना सांगितले आहे आणि सचिव श्रीअरविंदांच्या वतीने लिहीत आहेत.)

तुम्ही लिहिलेल्या पत्राच्या उत्तरादाखल श्रीअरविंद तुम्हाला असे सांगत आहेत की, तुम्ही हृदयकेंद्रामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करू शकता आणि त्यांना साद घालू शकता. त्यांचे स्मरण करा आणि तुमचे सर्व विचार, तुमच्या सर्व कृती आणि तुमचे संपूर्ण जीवन श्रीमाताजींना अर्पण करा, समर्पित करा. तुम्हाला वाटले तर तुम्ही त्यांच्या नामाचा जप करू शकता. तुमचे अस्तित्व विशुद्ध करण्यासाठी आणि तुमच्या प्रकृतीमध्ये बदल घडवण्यासाठी तुम्ही त्यांना साद घालू शकता.

किंवा प्रथमतः श्रीमाताजींची स्थिरता, शांती आणि नंतर त्यांची शक्ती, त्यांचा प्रकाश आणि त्यांचा आनंद वरून खाली अवतरित व्हावेत म्हणून तुम्ही तुमच्या मस्तकाच्या वरदेखील ध्यान करू शकता. या गोष्टी नेहमीच मस्तकाच्या वर (above the head) असतात. त्या मानवी मनाच्या दृष्टीने अतिचेतन अशा असतात. अभीप्सा आणि एकाग्रतेच्या साहाय्याने मन त्याबाबत सचेत बनू शकते आणि आधार (मन, प्राण आणि शरीर) त्यांच्याप्रत खुला होऊ शकतो; परिणामी त्या गोष्टी खाली उतरून मन, प्राण आणि शरीर यांमध्ये प्रवेश करू शकतील.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 154-155)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

उन्मुखता किंवा खुलेपणा ही गोष्ट काही अगदी सुरुवातीपासूनच पूर्णत्वाला पोहोचलेली असते असे नाही. सुरुवातीला अस्तित्वाचा एखादा भाग उन्मुख होतो आणि चेतनेचे इतर भाग हे अजूनही बंद किंवा अर्धवट उन्मुख झालेले असतात; ते सर्वच्या सर्व भाग खुले व्हावेत म्हणून व्यक्तीने अभीप्सा (aspire) बाळगणे आवश्यक असते.

अगदी सर्वोत्तम आणि प्रगत साधकांमध्ये देखील पूर्ण खुलेपण येण्यासाठी काही कालावधी लागतो. तसेच एखादा साधक अध्यात्ममार्गाच्या वाटचालीमध्ये आड येणाऱ्या गोष्टी कोणताही संघर्ष न करताच सोडू शकला आहे, असेही आढळत नाही.

आणि त्यामुळे, अडीअडचणीच्या वेळी तुम्ही श्रीमाताजींकडे मदतीसाठी साद घातलीत तर ती त्यांच्या कानी पडणार नाही, असे समजू नका. मानवी प्रकृतीच्या अडीअडचणी श्रीमाताजी जाणतात आणि त्याच तुम्हाला या साऱ्यामधून बाहेर पडण्यासाठी साहाय्य करतील. धीर धरा, त्यांच्यापाशी नेहमी प्रार्थना करत राहा. तसे केलेत तर, प्रत्येक अडचणीनंतर तुमची प्रगती होईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 156-157)

 

ईश्वरी प्रभावासमोर स्वत:ला खुले, उन्मुख करणे हा पूर्णयोगाचा समग्र सिद्धान्त आहे. ईश्वरी प्रभाव तुमच्या ऊर्ध्वस्थित असतो आणि एकदा का तुम्ही त्याबाबत सचेत (conscious) होऊ शकलात तर मग, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्याला आवाहन करायचे असते. तो प्रभाव तुमच्या मनामध्ये व शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या आणि कार्य करणाऱ्या शक्तीच्या रूपाने अवतरतो; तो आनंदरूपाने अवतरतो; ईश्वरी उपस्थिती म्हणून, साकार किंवा निराकार रूपात तो अवतरतो. त्याविषयी सचेत होईपर्यंत व्यक्तीने त्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे; तसेच तिने खुलेपणासाठी, उन्मुखतेसाठी (opening) आस बाळगणे देखील आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 106)

योगाभ्यासामध्ये सर्व प्रकारच्या आसक्तींवर मात करून, फक्त ईश्वराभिमुख होण्याचा संकल्प अंतर्भूत असतो. प्रत्येक पावलागणिक ईश्वरी कृपेवर विश्वास ठेवणे, विचारांना सातत्याने ईश्वराभिमुख करणे आणि सतत आत्मार्पण करत राहणे जेणेकरून अस्तित्व खुले होईल आणि श्रीमाताजींच्या शक्तीचे कार्य आधारामध्ये (मन, प्राण व शरीरामध्ये) सुरू असल्याची जाणीव होऊ शकेल, ही योगामधील प्रमुख गोष्ट असते.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 166)

आंतरिक अस्तित्वाने ऊर्ध्वमुख होत, ईश्वराची प्रार्थना करत, त्याला अत्यंत आर्ततेने साद घालणे म्हणजे अभीप्सा! दिव्य सत्यासाठी, दिव्य चेतनेसाठी, शांतीसाठी, आनंदासाठी, ज्ञानासाठी, दिव्य शक्तीच्या अवतरणासाठी किंवा व्यक्तीच्या प्रयत्नांचे जे कोणते तत्सम ध्येय असेल त्यासाठी आत्यंतिक आर्ततेने घातलेली साद, केलेला धावा म्हणजे अभीप्सा!

– श्रीअरविंद (CWSA 29 : 56-57)

(”ईश्वराकडून जे काही तुम्हाला प्राप्त झाले होते त्यावर लक्ष केंद्रित न करता, तुम्ही ते व्यर्थ जागी खर्च केलेत आणि त्यामुळे तुम्ही ते गमावून बसलात,” असे श्रीमाताजींनी एका साधकाला सांगितले. ते ऐकल्यावर तो साधक चिंतनमग्न झाला. तेव्हाचा त्याचा तो अनुभव तो साधक पुन्हा श्रीमाताजींना सांगत आहे…)

साधक : तुमचे उत्तर ऐकल्यावर मी गंभीर झालो आणि मला असे वाटले की, मी निदान आजतरी शांत, निश्चल-नीरव (silent) राहिले पाहिजे. पण निश्चल-नीरवतेचे काही क्षण गेल्यानंतर माझ्यामधीलच दुसरा एक भाग मला सांगू लागला की, “ही काही खरी निश्चल-नीरवता नाहीये, त्यामध्ये फारसा आनंद व उत्साह नाहीये. त्यामुळे ती निश्चल-नीरवता नसून, ते प्राणाचे असमाधान आहे.” आणि मग मला असे वाटले की, दुसरा भाग जे सांगत आहे ते बरोबर आहे.

श्रीमाताजी : दोन्ही गोष्टी काही अंशी बरोबर आणि काही अंशी चुकीच्या आहेत. अवतरित होणारी शक्ती निश्चल-नीरवतेमध्ये, एकाग्रतापूर्वक ग्रहण करणे कधीही योग्यच, परंतु प्राणाला त्याच्या लहरीप्रमाणे वागू न दिल्यामुळे त्याचा जो त्रागा होतो त्यातून, ती नीरवता किंवा एकाग्रता आलेली असता कामा नये. तसेच ही एकाग्रता आणि निश्चल-नीरवता फक्त शांतिमयच असणे पुरेसे नाही तर त्यामध्ये एक प्रकारचा अतिशय उत्कट आनंदही असला पाहिजे. असे असेल तर ती एकाग्रता, ती निश्चल-नीरवता ही खरी आणि विशुद्ध आहे, असे तुम्ही गृहीत धरायला हरकत नाही.

– श्रीमाताजी (CWM 17 : 54)

 

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे दिसत नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते हानिकारकच ठरले आहे.

प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टींची आवश्यकता असते. कर्माविना प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनानंतर लोकांच्या संपर्कामध्ये आल्यावरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये (खरंच) परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असू दे, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. श्रीमाताजींना अर्पण केली जाणारी आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या शक्तिनिशी केली जाणारी सर्व कर्मं एकसमान (मोलाची) असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

ईश्वराकडे जाण्याचा ‘ध्यान’ हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग (short cut) आहे, असे म्हणता येणार नाही. कारण, जरी तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. ध्यानामुळे जोवर ईश्वरी शक्तीचे अवतरण (descent) घडून येत नाही तोवर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही; आणि तसे झाल्यानंतरही फक्त पायाच तेवढा लवकर रचला जातो; पण नंतर त्यावर ध्यानाद्वारे मोठ्या परिश्रमाने एक भव्य इमारत उभारावी लागते. ध्यान अगदी आवश्यक असते; पण ध्यान हा जवळचा मार्ग आहे असे काही म्हणता येणार नाही.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 212)