Tag Archive for: रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २४१

‘अंतरात्म्या’ची प्राप्ती किंवा ‘ईश्वर’ प्राप्ती हा पूर्णयोगाचा पाया असला आणि त्याविना रूपांतरण शक्य नसले तरी, पूर्णयोग म्हणजे केवळ ‘अंतरात्म्या’च्या प्राप्तीचा किंवा ‘ईश्वर’ प्राप्तीचा योग नाही. तर तो व्यक्तीच्या रूपांतरणाचा योग आहे.

या रूपांतरणामध्ये चार घटक असतात. आंतरात्मिक खुलेपणा, अज्ञेय प्रांत ओलांडून जाणे किंवा अज्ञेय प्रांतामधून संक्रमण करणे, आध्यात्मिक मुक्ती, आणि अतिमानसिक परिपूर्णत्व. या चार घटकांपैकी कोणताही एक घटक जरी साध्य झाला नाही तरी हा योग अपूर्ण राहतो.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 367-368)

साधना, योग आणि रूपांतरण – २४०

दिव्य जीवनासाठी फक्त उच्चतर मानसिक चेतनेच्या संपर्कात येणे पुरेसे नसते. ती फक्त एक अनिवार्य अशी अवस्था असते. दिव्य जीवनासाठी अधिक उच्च आणि अधिक शक्तिशाली स्थानावरून ‘दिव्य शक्ती’चे अवतरण होणे आवश्यक असते.

पुढील सर्व गोष्टी सद्यस्थितीत अदृश्य असलेल्या शिखरावरून अवतरित होणाऱ्या ‘शक्ती’विना अशक्यप्राय आहेत :
१) उच्चतर चेतनेचे अतिमानसिक प्रकाश आणि शक्तीमध्ये रूपांतरण,
२) प्राण आणि त्याच्या जीवनशक्तीचे विशुद्ध, विस्तृत, स्थिरशांत, दिव्य ऊर्जेच्या शक्तिशाली आणि उत्कट साधनामध्ये रूपांतरण,
३) तसेच स्वयमेव शरीराचे दिव्य प्रकाश, दिव्य कृती, सामर्थ्य, सौंदर्य आणि हर्ष यांच्यामध्ये रूपांतरण

‘ईश्वरा’प्रत आरोहण या एका गोष्टीबाबत इतर योग आणि पूर्णयोग यांमध्ये साधर्म्य आढळते परंतु पूर्णयोगामध्ये केवळ आरोहण पुरेसे नसते तर मन, प्राण, शरीर यांच्या सर्व ऊर्जा रूपांतरित करण्यासाठी ‘ईश्वरा’चे अवतरण होणेदेखील आवश्यक असते.

– श्रीअरविंद (CWSA 31 : 118-119)

साधना, योग आणि रूपांतरण – २३९

(आपल्या व्यक्तित्वामध्ये दोन प्रणाली कार्यरत असतात. एक अध-ऊर्ध्व म्हणजे जडभौतिकापासून ते सच्चिदानंदापर्यंत असणारी प्रणाली आणि दुसरी बाहेरून आत जाणारी म्हणजे बाह्य व्यक्तित्व ते चैत्य पुरुष अशी असणारी केंद्रानुगामी प्रणाली. या दोन्ही प्रणालींचा येथे संदर्भ आहे.)

रूपांतरणासाठी ‘संपूर्ण’ आणि ‘समग्र’ ईश्वराधीनतेची (consecration) आवश्य कता असते. सर्वच प्रामाणिक साधकांची तीच आस असते, नाही का?

‘संपूर्ण’ ईश्वराधीनता म्हणजे ऊर्ध्व-अधर (vertically) अशा पद्धतीने ईश्वराधीन होणे. येथे व्यक्ती सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे अगदी जडभौतिक अवस्थांपासून ते अगदी सूक्ष्म अशा सर्व अवस्थांपर्यंत, सर्वत्र ईश्वराधीन असते.

आणि ‘समग्र’ ईश्वराधीनता म्हणजे क्षितिजसमांतर (horizontally) पद्धतीने ईश्वराधीन होणे. शरीर, प्राण, मन यांनी मिळून ज्या बाह्यवर्ती व्यक्तित्वाची घडण झालेली असते त्या व्यक्तित्वाच्या विभिन्न आणि बरेचदा परस्परविरोधी असणाऱ्या सर्व घटकांमध्ये ईश्वराधीनता असणे म्हणजे समग्र ईश्वराधीन असणे.

– श्रीमाताजी (CWM 15 : 88)

साधना, योग आणि रूपांतरण – २३८

फक्त ‘रूपांतरणा’मुळेच पृथ्वीवरील परिस्थितीमध्ये परिवर्तन घडू शकते. एक उच्चतर समतोल आणि एक नूतन प्रकाश घेऊन या पृथ्वीवर अवतरणारी एक नवचेतना, एक नवीन शक्ती, एक नवीन ऊर्जा हीच केवळ या ‘रूपांतरणा’चा चमत्कार साध्य करू शकेल. परंतु त्यासाठी व्यक्तीने पशुवत जगणे थांबविले पाहिजे आणि दिव्य मनुष्य झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २३७

तुम्ही जर मानवी प्रकृतीचे रूपांतरण (transformation) गतिमान दिव्य प्रकृतीमध्ये करू इच्छित असाल तर, कोणतीही कुरबूर न करता, किंवा कोणताही प्रतिकार न करता, स्वत:ला श्रीमाताजींच्या व त्यांच्या शक्तींच्या हाती सोपवा आणि त्यांना त्यांचे कार्य तुमच्यामध्ये कोणत्याही अडथळ्याविना करू द्या. चेतना, घडणसुलभता (plasticity) आणि नि:शेष समर्पण या तीन गोष्टी तुमच्याकडे असल्याच पाहिजेत.

श्रीमाताजी आणि त्यांच्या शक्ती व त्यांचे कार्य याविषयी तुमचे मन, आत्मा, हृदय, प्राण इतकेच काय पण, तुमच्या शरीरातील पेशीसुद्धा सजग असल्या पाहिजेत. कारण, श्रीमाताजी तुमच्यातील अंधकारामध्ये आणि तुमच्या अचेतन भागांमध्ये, अचेतन क्षणांमध्ये देखील कार्य करू शकतात आणि तशा त्या करतात देखील, परंतु जेव्हा तुम्ही जागृत असता आणि त्यांच्याशी चैतन्यमय संपर्क राखून असता तेव्हाची गोष्ट निराळी असते.

तुमची समग्र प्रकृतीच श्रीमाताजींच्या स्पर्शाला घडणसुलभ असली पाहिजे, म्हणजे –
१) स्वयंपर्याप्त (self-sufficient) अज्ञानी मन जसे प्रश्नह विचारत राहते, शंका घेत राहते, विवाद करत बसते आणि ते जसे प्रबोधनाचे व परिवर्तनाचे शत्रू असते, तशी तुमची प्रकृती असता कामा नये.
२) ज्याप्रमाणे माणसातील प्राण स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देत राहतो आणि तो जसा आपल्या हट्टाग्रही इच्छा व दुरिच्छेमुळे, प्रत्येक दिव्य प्रभावाला सातत्याने विरोध करत राहतो, तशी तुमची प्रकृती स्वत:च्याच वृत्तीप्रवृत्तींवर भर देणारी असता कामा नये.
३) माणसाची शारीरिक चेतना जशी अडथळा निर्माण करत राहते आणि ती जशी शरीराच्या अंधकारमय गोष्टींमधील किरकोळ सुखाला चिकटून राहते तशी तुमची प्रकृती ही अडथळा निर्माण करणारी असता कामा नये. तसेच शरीराच्या कंटाळवाण्या दिनचर्येला, आळसाला किंवा त्याच्या जड निद्रेला धक्का पोहोचविणाऱ्या कोणत्याही स्पर्शाच्या विरोधात शारीरिक चेतना जशी आकांडतांडव करते; तशी तुमची प्रकृती ही स्वत:च्या अक्षमतेला, जडतेला आणि तामसिकतेला हटवादीपणे चिकटून राहणारी असता कामा नये.

नि:शेष समर्पण आणि तुमच्या आंतरिक व बाह्य अस्तित्वाचे समर्पण हे तुमच्या प्रकृतीच्या सर्व भागांमध्ये ही घडणसुलभता घडवून आणेल. वरून प्रवाहित होणाऱ्या प्रज्ञा आणि प्रकाश, शक्ती, सुसंवाद आणि सौंदर्य, पूर्णता या साऱ्या गोष्टींप्रत तुम्ही सातत्याने खुले राहिलात तर, तुमच्यामधील सर्व घटकांमध्ये चेतना जागृत होईल. इतकेच काय पण तुमचे शरीरसुद्धा जागृत होईल आणि सरतेशेवटी, त्याची चेतना ही त्यानंतर अर्धचेतन चेतनेशी एकत्व न पावता, अतिमानसिक अतिचेतन शक्तीशी एकत्व पावेल; आणि तिची ऊर्जा ही वरून, खालून, चोहोबाजूंनी शरीराला अनुभवास येईल आणि एका परमप्रेमाने व आनंदाने ते शरीर पुलकित होऊन जाईल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 24-25)

साधना, योग आणि रूपांतरण – २३४

(एका साधकाने श्रीअरविंदांना असे सांगितले की, काही जणांना असे वाटते की, ‘आध्यात्मिक’ आणि ‘अतिमानसिक’ या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. त्यावर श्रीअरविंद यांनी दिलेले हे उत्तर…)

तसे जर असते तर, आजवर युगानुयुगे होऊन गेलेले ऋषीमुनी, भक्त, योगी, साधक हे सारे ‘अतिमानसिक जीव’ होते असे म्हणावे लागेल आणि मग अतिमानसाविषयी मी आजवर जे काही लिहिले आहे ते अगदी उथळ, निरुपयोगी, आणि अनावश्यक ठरेल. आध्यात्मिक आणि अतिमानसिक या दोन्ही गोष्टी समानच असतील तर मग ज्या ज्या कोणाला आध्यात्मिक अनुभव आलेले असतील ते सारेजण म्हणजे अतिमानसिक जीव आहेत असे होईल. आणि मग हा आश्रम (श्रीअरविंद-आश्रम) किंवा भारतातील प्रत्येक आश्रमच अतिमानसिक जिवांनी ओसंडून वाहत आहेत, असे म्हणावे लागेल.

व्यक्तीची इच्छा असेल तर आध्यात्मिक अनुभव हे आंतरिक चेतनेमध्ये स्थिरस्थावर होऊ शकतात; आणि त्यानंतर ते तिच्यामध्ये बदल घडवून, तिचे रूपांतरण करू शकतात. सर्वत्र ‘ईश्वर’च असल्याचा साक्षात्कार व्यक्तीला होऊ शकतो, सर्वांमध्ये ‘आत्मा’ आणि ‘आत्म्या’मध्ये सर्वकाही असल्याचा अनुभव तिला येऊ शकतो. विश्वात्मक ‘शक्ती’ या साऱ्या गोष्टी घडवीत आहे; आपण ‘ब्रह्मांडगत आत्म्यामध्ये किंवा आनंदमय भक्तीमध्ये किंवा ‘आनंदा’मध्ये विलीन होत आहोत अशी व्यक्तीला प्रचिती येऊ शकते.

मात्र, व्यक्ती ‘प्रकृती’च्या बाह्य सक्रिय भागांमधील जीवन बुद्धीच्या साहाय्याने किंवा फारफार तर अंतःस्फूर्त मनाच्या (intuitive mind) साहाय्याने विचार करत, मानसिक इच्छेच्या साहाय्याने संकल्प करत, प्राणाच्या पृष्ठवर्ती स्तरावर हर्ष व शोकाचा अनुभव घेत, शरीरात राहून शारीरिक आजारपणं आणि वेदना भोगत, जीवनसंघर्ष करत, शेवटी आजार व मृत्यु असे जीवन कंठत राहू शकते आणि सहसा हे असेच चालू राहते. यामध्ये जर का काही परिवर्तन होणे शक्य असेल तर ते फारफार तर एवढेच असू शकते की, व्यक्ती ‘प्रकृती’मधून बाहेर पडून पूर्णपणे ‘आत्म्या’मध्ये विलीन होत नाही तोपर्यंत तरी, उपरोक्त सर्व गोष्टी म्हणजे ‘प्रकृती’चा अपरिहार्य भाग आहे असे मानून, ‘अंतरात्मा’ या सगळ्याकडे विचलित न होता किंवा भांबावून न जाता, परिपूर्ण समत्वाने पाहू शकतो.

परंतु हे म्हणजे मला अभिप्रेत असणारे ‘रूपांतरण’ नव्हे. मला अभिप्रेत असणारे रूपांतरण म्हणजे ज्ञानाची एक निराळीच शक्ती आहे, ती निराळीच इच्छाशक्ती आहे, भावभावना आणि सौंदर्याचे ते एक आगळेवेगळे प्रकाशमान परिमाण आहे, शारीरिक चेतनेची ती एक निराळीच घडण आहे. आणि या साऱ्या गोष्टी अतिमानसिक परिवर्तनानेच (supramental change) घडून येणे आवश्यक आहे.

– श्रीअरविंद (CWSA 28 : 273-274)

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :

किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.

दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.

तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…

मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

साधना, योग आणि रूपांतरण – २३२

साधक : ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ म्हणजे काय?

श्रीमाताजी : तुम्ही तुमच्या आधीच्या स्थितीमध्ये परत जाऊ शकत नाही असे रूपांतरण जेव्हा तुमच्या चेतनेमध्ये घडते, तेव्हा त्या रूपांतरणास ‘अपरिवर्तनीय रूपांतरण’ असे म्हटले जाते. एक क्षण असा येतो की हे परिवर्तन इतके परिपूर्ण झालेले असते की अशा वेळी मग तुम्ही पूर्वी जसे होतात तसे पुन्हा होणे अशक्यप्राय होऊन जाते.

साधक : परंतु रूपांतरण या शब्दातच अपरिवर्तनीय हा अर्थ सूचित होत नाही का?

श्रीमाताजी : रूपांतरण आंशिकसुद्धा असू शकते. श्रीअरविंद ज्या रूपांतरणाबद्दल सांगत आहेत ते आहे चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal). म्हणजे येथे व्यक्ती स्वतःच्या वैयक्तिक सुखसमाधानांकडे वळलेली असण्याऐवजी आणि अहंकारी असण्याऐवजी, तिची चेतना समर्पित होऊन ‘ईश्वरा’भिमुख झालेली असते. आणि त्यांनी इथे हे स्पष्टपणे सांगितले आहे की सुरुवातीला समर्पण हे आंशिक असू शकते, म्हणजे (अस्तित्वाचे) काही भाग समर्पित आहेत आणि काही भाग समर्पित नाहीत, असे असू शकते. आणि म्हणून जेव्हा समग्र अस्तित्वाने, समग्रपणे, त्याच्या सर्व गतिविधींनिशी, स्वतःचे समर्पण केलेले असते तेव्हा ते समर्पण अपरिवर्तनीय असे असते. तेव्हा ते ‘दृष्टिकोनाचे अपरिवर्तनीय रूपांतरण’ असते.

– श्रीमाताजी (CWM 04 : 356)

साधना, योग आणि रूपांतरण – २३१

रूपांतरणाच्या प्रक्रियेत बाह्य चेतनेचा समावेश असणे हे ‘पूर्णयोगा’मध्ये आत्यंतिक महत्त्वाचे असते. केवळ ध्यानाद्वारे हे रूपांतरण शक्य होत नाही. कारण ध्यानाचा संबंध हा केवळ आंतरिक अस्तित्वाशी असतो. त्यामुळे कर्म हे येथे अनन्यसाधारण महत्त्वाचे ठरते. फक्त ते योग्य वृत्तीने आणि योग्य जाणिवेने केले पाहिजे. आणि तसे जर ते केले गेले तर, कोणत्याही ध्यानाने जो परिणाम साध्य होतो तोच परिणाम अशा कर्मानेदेखील साध्य होतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 221)

साधना, योग आणि रूपांतरण – २३०

चेतना ‘ईश्वरा’प्रत खुली करणे आणि प्रकृतीमध्ये परिवर्तन घडवून आणणे हे साधनेचे उद्दिष्ट आहे. ध्यान किंवा निदिध्यासन हा यांतील एक मार्ग आहे पण ते केवळ एक साधन आहे, भक्ती हे दुसरे साधन, तर कर्म हे आणखी एक साधन आहे.

साक्षात्काराच्या दिशेने पहिले साधन म्हणून योग्यांकडून चित्तशुद्धीची साधना केली जात असे आणि त्यातून त्यांना संतांच्या संतत्वाची आणि ऋषीमुनींच्या अचंचलतेची प्राप्ती होत असे. पण आम्ही प्रकृतीच्या ज्या रूपांतरणाविषयी बोलतो, ते यापेक्षा काहीतरी अधिक आहे; आणि हे रूपांतरण केवळ ध्यानसमाधीने होत नाही, त्यासाठी कर्म आवश्यक असते. कर्मातील ‘योग’ हा अनिवार्य असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 208)