Tag Archive for: रूपांतरण

साधना, योग आणि रूपांतरण – २२३

(‘रूपांतरणा’बाबत श्रीमाताजींनी अगोदर केलेल्या विवेचनातील काही भाग वाचून दाखविला गेला आहे. आणि आता श्रीमाताजी त्यावर भाष्य करत आहेत.)

समग्र रूपांतरण आणि ज्या चेतनेच्या रूपांतरणाचा मी आधी उल्लेख केला होता त्या दोन्हीमध्ये मी फरक का करते? चेतना आणि व्यक्तीच्या इतर भागांमध्ये काय संबंध असतो? हे इतर भाग कोणते? जे जे कोणी योगसाधना करतात त्यांच्याबाबतीत हे चेतनेचे रूपांतरण घडून येते आणि ते ‘ईश्वरी उपस्थिती’विषयी किंवा स्वतःच्या अस्तित्वाच्या ‘सत्या’विषयी जागरूक होऊ लागतात. बऱ्याच जणांना याचा अनुभव आहे, असे मी म्हणत नाहीये पण किमान काही जणांना तरी हा अनुभव आलेला असतो. मग हा अनुभव आणि समग्र रूपांतरण यामध्ये काय फरक असतो?

साधक : समग्र रूपांतरणामध्ये बाह्यवर्ती प्रकृती आणि आंतरिक चेतना या दोन्ही रूपांतरित होतात. व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व, तिच्या सवयी इत्यादी पूर्णपणे बदलून जातात, तसेच तिचे विचार आणि गोष्टींकडे पाहण्याचा तिचा मानसिक दृष्टिकोनही बदलून जातो.

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे पण तुम्ही जर पुरेशी काळजी घेतली नाहीत आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवले नाहीत तर, तुमच्यामध्ये असेही काही असते की ज्यामध्ये कोणतेही परिवर्तन न होता ते तसेच राहिलेले असते. ते नेमके काय असते? तर ती शारीर-चेतना (body consciousness) असते. आता ही शारीर-चेतना म्हणजे काय? त्यामध्ये अर्थातच प्राणिक चेतनेचाही समावेश असतो, म्हणजे येथे शारीर-चेतना ही समग्रत्वाने अभिप्रेत आहे. आणि मग या समग्र शारीर-चेतनेमध्ये शारीरिक मनाचाही (physical mind) समावेश होतो. हे असे मन असते की जे तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या सगळ्या सर्वसामान्य गोष्टींनी व्याप्त असते आणि त्याला प्रतिसाद देत असते. एक प्राणिक चेतनाही (vital consciousness) असते. संवेदना, आवेग, उत्साह आणि इच्छावासना यांबाबतची जाणीव म्हणजे ही चेतना असते. आणि सरतेशेवटी स्वयमेव एक शारीर-चेतना असते, ही भौतिक चेतना असते, ती शरीराची चेतना असते आणि ही चेतना आजवर पूर्णतः कधीच रूपांतरित झालेली नाही.

आजवर सार्वत्रिक, म्हणजे शरीराची एकंदर चेतना रूपांतरित करण्यात आली आहे म्हणजे, व्यक्तीला ज्या गोष्टी अपरिहार्य वाटत नाहीत अशा गोष्टी म्हणजे विचारांची, सवयींची बंधने व्यक्ती झुगारून देऊ शकते. या गोष्टीमध्ये परिवर्तन होऊ शकते, हे परिवर्तन झालेले आहे. परंतु पेशींची जी चेतना आहे त्यामध्ये आजवर कोणतेही परिवर्तन झालेले नाही. पेशींमध्ये एक चेतना असते. त्यालाच आम्ही ‘शारीरिक चेतना’ असे संबोधतो आणि ती चेतना संपूर्णपणे शरीराशी संबद्ध असते.

या चेतनेमध्ये परिवर्तन होणे अतिशय कठीण असते कारण ही चेतना सामूहिक सूचनेच्या प्रभावाखाली असते आणि ही सामूहिक सूचना रूपांतरणाच्या पूर्णपणे विरोधी असते. आणि त्यामुळे व्यक्तीला या सामूहिक सूचनेच्या विरोधात संघर्ष करावा लागतो. हा संघर्ष फक्त वर्तमानकालीन सामूहिक सूचनांच्या बाबतीतच करावा लागतो असे नाही तर, संपूर्ण पृथ्वी-चेतनेशी संबंधित असणाऱ्या सामूहिक सूचनेच्या विरोधातही हा संघर्ष करावा लागतो. आणि या पार्थिव मानवी चेतनेचे मूळ मनुष्याची जेव्हा सर्वप्रथम निर्मिती झाली, घडण झाली तेथपर्यंत जाऊन पोहोचते. पेशींना ‘सत्या’ची, जडद्रव्याच्या ‘शाश्वतते’ची उत्स्फूर्तपणे जाणीव होण्यापूर्वी उपरोक्त सामूहिक सूचनांवर मात करावी लागते. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 15 : 292-293)

साधना, योग आणि रूपांतरण – २२२

आपल्याला समग्र रूपांतरण हवे आहे; शरीराचे आणि त्याच्या सर्व क्रियांचे रूपांतरण हवे आहे. पूर्वी जेव्हा ‘रूपांतरणा’विषयी बोलले जात असे तेव्हा तेथे केवळ आंतरिक चेतनेचे रूपांतरणच अभिप्रेत असे. ही सखोल चेतना स्वत:मध्ये शोधण्याचा व्यक्ती प्रयत्न करत असे; हे करत असताना, आंतरिक गतिविधींवरच लक्ष केंद्रित करायचे असल्याने, शरीराला आणि त्याच्या क्रियाकलापांना, ती व्यक्ती एक लोढणं समजत असे; आणि निरुपयोगी गोष्ट म्हणून त्यास ती धुडकावून देत असे.

परंतु, हे पुरेसे नसल्याचे श्रीअरविंदांनी स्पष्ट केले. जडभौतिक जगताने देखील या रूपांतरणामध्ये सहभागी व्हावे आणि त्यानेही या गहनतर ‘सत्या’ची अभिव्यक्ती करावी, अशी त्या ‘सत्या’कडून मागणी होत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. परंतु लोकांनी जेव्हा हे ऐकले तेव्हा त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना असे वाटले की, अंतरंगामध्ये काय घडत आहे याची अजिबात काळजी न करतादेखील शरीर आणि त्याच्या क्रिया यांचे रूपांतरण घडविणे शक्य आहे, अर्थात हे खरे नाही.

हे शारीरिक रूपांतरणाचे कार्य हाती घेण्यापूर्वी, म्हणजे जे सर्वात अवघड असे कार्य आहे ते हाती घेण्यापूर्वी, तुमची आंतरिक चेतना ही सत्यामध्ये दृढपणे प्रस्थापित झालेली असली पाहिजे; म्हणजे मग हे रूपांतरण म्हणजे त्या ‘सत्या’चा चरम आविष्कार असेल, किमान आत्ताच्या घडीपुरता तरी तो चरम असेल.

या रूपांतरणाचा प्रारंभबिंदू असतो ग्रहणशीलता! रूपांतरण प्राप्त करून घेण्यासाठीची ही अत्यावश्यक अट आहे. त्यानंतर चेतनेमध्ये परिवर्तन घडून येते. चेतनेचे हे परिवर्तन आणि त्याची पूर्वतयारी यांची तुलना नेहमी अंड्यातील कोंबडीच्या पिलाच्या घडणीशी केली जाते. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत अंडे जसेच्या तसे दिसत असते, त्यामध्ये काहीही बदल दिसत नाही आणि जेव्हा ते पिल्लू आत पूर्ण विकसित झालेले असते, पूर्णपणे सजीव झालेले असते, तेव्हा ते त्याच्या छोट्याशा चोचीने त्या कवचाला टोचे मारते आणि त्यातून बाहेर पडते. चेतनेच्या परिवर्तनाच्या क्षणीसुद्धा असेच काहीसे घडून येते.

दीर्घ काळपर्यंत काहीच घडत नाही असेच तुम्हाला वाटत असते; तुमची चेतना नेहमीप्रमाणेच आहे, त्यात काहीच बदल झालेला नाही असेच तुम्हाला वाटत असते. तुमच्यापाशी जर का उत्कट अभीप्सा असेल तर तुम्हाला कधीकधी विरोधदेखील जाणवतो; जणूकाही तुम्ही एखाद्या भिंतीवर धडका मारत आहात पण ती काही ढासळत नाही. मात्र जेव्हा तुमची अंतरंगातून तयारी झालेली असते तेव्हा एक शेवटचा प्रयत्न – तुमच्या अस्तित्वाच्या कवचाला धडका मारण्याचा एक प्रयत्न पुरेसा ठरतो आणि मग सर्वकाही खुले होते – आणि तुम्ही एका अन्य चेतनेमध्ये उन्नत झालेले असता.

मी असे म्हटले होते की ही मूलभूत समतोलाची क्रांती आहे. म्हणजे त्यामध्ये चेतनेचे संपूर्णतः प्रत्युत्क्रमण होते. लोलकामधून प्रकाश जेव्हा बाहेर पडतो तेव्हा जसे होते तसेच येथे होते. किंवा असे म्हणता येईल की, जणूकाही तुम्ही एखादा चेंडू आतून बाहेर वळवता (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) आणि ही गोष्ट चतुर्थ मितीशिवाय (fourth dimension) शक्य नसते. व्यक्ती येथे सामान्य त्रिमिती चेतनेमधून बाहेर पडून, अधिक उच्च अशा चतुर्थ मितीच्या चेतनेमध्ये प्रवेश करते. व्यक्ती अगणित मिती असलेल्या चेतनेमध्ये प्रवेश करते. हा अनिवार्य असा आरंभबिंदू असतो. जोपर्यंत तुमच्या चेतनेची ही मितीच बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला वस्तुमात्रांविषयीची जी वरकरणी दृष्टी असते त्याच स्थितीमध्ये तुम्ही कायम राहता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची अगाधता, गहनता गमावून बसलेले असता.

– श्रीमाताजी (CWM 04 : 18-19)

साधना, योग आणि रूपांतरण – २२१

उत्तरार्ध

चेतनेमध्ये अंशतः झालेल्या परिवर्तनामुळे, एकेकाळी ज्या गोष्टी तुम्हाला हव्याहव्याशा वाटायच्या त्यातील तुमचे स्वारस्य नाहीसे होते. परंतु हे चेतनेमधील ‘परिवर्तन’ असते; आम्ही ज्याला ‘रूपांतरण’ म्हणतो ते हे नव्हे. कारण रूपांतरण हे मूलभूत आणि परिपूर्ण असते, तो काही केवळ बदल नसतो अथवा परिवर्तन नसते, तर ते चेतनेचे प्रत्युत्क्रमण (reversal) असते. म्हणजे यामध्ये व्यक्तीचे अस्तित्व हे जणू काही अंतर्बाह्य पालटते, आणि त्यामुळे व्यक्ती पूर्णतः एका वेगळ्या अवस्थेमध्ये प्रवेश करते.

प्रत्युत्क्रमित झालेल्या या चेतनेमध्ये व्यक्ती ही जीवन आणि वस्तुमात्रांच्या ऊर्ध्वस्थित झालेली असते आणि तेथून त्यांच्याशी व्यवहार करते. ती चेतना प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी असते आणि ती व्यक्तीच्या बाह्यवर्ती सर्व कृतींना तेथून दिशा दर्शन करत असते. उलट सामान्य चेतनेमध्ये व्यक्ती बाहेर आणि खालच्या बाजूस स्थित असते. बाहेरून, खालून ती केंद्रस्थानी पोहोचण्याचा प्रयत्न करत असते आणि असे करत असताना ती स्वतःच्याच अज्ञानाच्या व अंधतेच्या ओझ्यामुळे दबली जाते. त्यांच्या अतीत जाण्यासाठी ती अत्यंत निकराचा प्रयत्न करत असते. वस्तु प्रत्यक्षात कशा आहेत, त्यांचे वास्तव काय आहे याबाबत सामान्य चेतना अज्ञ असते, ती त्यांचे फक्त बाह्य आवरणच पाहू शकते. परंतु खरी चेतना ही केंद्रस्थानी असते, ती वास्तवाच्या हृदयस्थानी असते आणि तिला सर्व गतिविधींच्या उमगाबद्दलची थेट दृष्टी असते. ती अंतरंगामध्ये आणि ऊर्ध्वस्थित वसलेली असल्याने तिला सर्व गोष्टींचा व शक्तींचा उगमस्रोत आणि कार्यकारणभाव ज्ञात असतो.

मी पुन्हा एकदा सांगते की, हे प्रत्युक्रमण अचानकपणे घडून येते. तुमच्यामधील काहीतरी खुले होते आणि अचानकपणे तुमचा एका नवीन जगामध्ये प्रवेश झाला असल्याचे तुम्हाला आढळते. प्रारंभी हे परिवर्तन अंतिम आणि निर्णायक स्वरूपाचे असेलच असे नाही. ते परिवर्तन चिरस्थायी रूपात स्थिरस्थावर होऊन, तो तुमचा प्रकृतिधर्म होण्यासाठी कधीकधी अधिक कालावधीची आवश्यसकता असते. परंतु एकदा का हे परिवर्तन घडून आले की मग ते तेथे कायम राहते; तत्त्वतः कायमसाठी ते तेथे स्थिर होते. आणि नंतर मग कशाची गरज असेल तर ती म्हणजे ते परिवर्तन क्रमाक्रमाने व्यावहारिक जीवनाच्या तपशिलात अभिव्यक्त करण्याची!

रूपांतरित चेतनेचे पहिले आविष्करण हे नेहमीच अचानकपणे झाल्यासारखे दिसते. तुमचे एका अवस्थेमधून दुसऱ्या अवस्थेमध्ये, हळूहळू, क्रमाक्रमाने परिवर्तन होत आहे हे तुम्हाला जाणवतही नाही; तर आपण अचानकपणे एका नवीन चेतनेमध्ये जागृत झालो आहोत किंवा नव्याने जन्माला आलो आहोत असे तुम्हाला जाणवते. कोणत्याही मानसिक प्रयत्नांमुळे तुम्ही या अवस्थेपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाही. कारण हे रूपांतरण नक्की कसे असते याची कल्पना मनाच्या साहाय्याने तुम्ही करू शकत नाही. कोणतेच मानसिक वर्णन येथे पुरेसे ठरू शकत नाही. (पूर्णयोगांतर्गत) संपूर्ण रूपांतरणाचा आरंभबिंदू हा असा असतो.

– श्रीमाताजी (CWM 12 : 80-81)

साधना, योग आणि रूपांतरण – २२०

आपल्याला संपूर्ण रूपांतरण अपेक्षित आहे, म्हणजे शरीर आणि त्याच्या सर्व कृती यांचे रूपांतरण आपल्याला अपेक्षित आहे. परंतु अन्य कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी, पहिली पायरी अगदी अनिवार्य असते आणि ती म्हणजे चेतनेचे रूपांतरण. या रूपांतरणासाठी अभीप्सा असणे आणि ती प्रत्यक्षात उतरविण्याचा संकल्प असणे हा अर्थातच आरंभबिंदू आहे, त्याशिवाय काहीच होणे शक्य नाही. परंतु या अभीप्सेबरोबर जर व्यक्तीमध्ये आंतरिक खुलेपणा, उन्मुखता असेल, एक प्रकारची ग्रहणशीलता असेल तर अशी व्यक्ती या रूपांतरित चेतनेमध्ये एका प्रयत्नामध्ये प्रवेश करू शकते आणि स्वतःला तेथे सुस्थिर करू शकते. तसे म्हटले तर, चेतनेमधील हे परिवर्तन काहीसे आकस्मिक (abrupt) असते. म्हणजे जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा ते अचानकपणे घडून येते, जरी या परिवर्तनाची पूर्वतयारी ही संथपणे आणि दीर्घकाळ चालू असण्याची शक्यता असली तरीसुद्धा जेव्हा हे परिवर्तन घडून येते तेव्हा मात्र ते अचानकपणे घडून येते.

मी येथे फक्त मानसिक दृष्टिकोनात होणाऱ्या परिवर्तनाविषयी बोलत नाहीये तर स्वयमेव चेतनेमधील परिवर्तनाविषयी बोलत आहे. हे अगदी संपूर्ण आणि परिपूर्ण असे परिवर्तन असते, म्हणजे त्याच्या मूलभूत अवस्थेमध्येच एक प्रकारची क्रांती घडून येते. एखादा चेंडू आतून बाहेरच्या बाजूस उघडावा तशी ही प्रक्रिया असते. (म्हणजे येथे चेंडूची आतली बाजू बाहेर आणि बाहेरची बाजू आतमध्ये जाते.) रूपांतरित चेतनेला प्रत्येक गोष्ट नवीन आणि निराळी वाटते; एवढेच नाही तर सामान्य चेतनेला एखादी गोष्ट जशी दिसते त्याच्या जवळजवळ उलट अशा पद्धतीने ती गोष्ट रूपांतरित चेतनेला दिसते. सामान्य चेतनेमध्ये असताना तुम्ही अतिशय संथपणाने, एकापाठोपाठ एक अनुभव घेत घेत, अज्ञानाकडून खूप दूरवर असणाऱ्या आणि बरेचदा संदिग्ध ज्ञानाच्या दिशेने प्रगत होता. परंतु रूपांतरित चेतनेमध्ये मात्र तुमचा आरंभबिंदू ज्ञान हा असतो आणि तुम्ही ज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगत होत जाता. तथापि, ही केवळ एक सुरुवात असते. कारण आंतरिक रूपांतरणाचा परिणाम म्हणून बाह्यवर्ती चेतना, बाह्यवर्ती सक्रिय व्यक्तित्वाचे विविध स्तर आणि विविध घटक हे संथपणे आणि क्रमाक्रमाने रूपांतरित होतात. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 12 : 80)

साधना, योग आणि रूपांतरण – २१९

चेतना ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिकरित्या आंतरिक चेतनेमध्ये राहून, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे अशा रीतीने शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे की ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरणासाठी सज्ज होऊ शकेल आणि ‘दिव्य ज्ञान’, ‘दिव्य संकल्प’ आणि ‘दिव्य प्रेम’ यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे पूर्णयोगाचे पहिले ध्येय आहे.

योगिक चेतना विकसित करणे म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, ब्रह्मांड-पुरुषाविषयी आणि ब्रह्मांड-शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ‘ईश्वरा’शी एकत्व पावणे, हे पूर्णयोगाचे दुसरे ध्येय आहे.

‘अधिमानसा’च्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेद्वारे (supramental consciousness), परात्पर ‘ईश्वरा’च्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे, हे पूर्णयोगाचे तिसरे ध्येय आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 20)

साधना, योग आणि रूपांतरण – २१४

आध्यात्मिकीकरण (Spiritualisation) म्हणजे उच्चतर शांती, शक्ती, प्रकाश, ज्ञान, विशुद्धता, आनंद इत्यादीचे अवतरण. या गोष्टी ‘उच्च मना’पासून ‘अधिमानसा’पर्यंतच्या (Higher Mind to Overmind) कोणत्याही उच्च स्तराशी संबंधित असू शकतात. कारण त्यांपैकी कोणत्याही स्तरावर ‘आत्म्या’चा साक्षात्कार होऊ शकतो.

आध्यात्मिकीकरणाद्वारे व्यक्तिनिष्ठ रूपांतरण घडून येते. यामध्ये साधनभूत प्रकृतीचे इतपतच रूपांतरण घडते की जेणेकरून त्या प्रकृतीकडून, ‘विश्वात्म्या’ला जे कार्य करून घ्यायचे असते त्याचे ती (सुयोग्य) साधन होऊ शकेल. हे होत असताना अंतरंगातील आत्मा स्थिर, मुक्त आणि ‘ईश्वरा’शी एकत्व पावलेला असा राहतो.

परंतु हे व्यक्तिगत रूपांतरण अपूर्ण असते. जेव्हा ‘अतिमानसिक’ परिवर्तन (Supramental change) घडून येते तेव्हाच साधनभूत ‘प्रकृती’चे संपूर्ण रूपांतरण होऊ शकते. तोपर्यंत प्रकृती अनेक अपूर्णतांनी भरलेली असते. परंतु उच्चतर स्तरावरील आत्म्याला त्याने काही फरक पडत नाही कारण तो या सर्वापासून मुक्त असतो, त्याच्यावर या गोष्टींचा कोणताही परिणाम होत नाही. आंतरिक पुरुष देखील अगदी आंतरिक शरीरापर्यंत मुक्त आणि अप्रभावित राहू शकतो. ‘अधिमानस’ हे परिणामकारक ‘दिव्य ज्ञाना’च्या कार्याच्या मर्यादांच्या, ‘दिव्य शक्ती’च्या कार्याच्या मर्यादांच्या अधीन असते. ते आंशिक आणि मर्यादित ‘दिव्य सत्या’दी गोष्टींच्या अधीन असते. केवळ ‘अतिमानसा’मध्येच संपूर्ण ‘सत्-चेतना’ (Truth consciousness) व्यक्तीमध्ये अवतरित होऊ शकते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 404)

साधना, योग आणि रूपांतरण – २१३

‘दिव्य चेतने’च्या विविध अवस्था असतात. त्याचप्रमाणे रूपांतरणाच्या देखील विविध अवस्था असतात.

प्रथम असते ते आंतरात्मिक रूपांतरण (psychic transformation). यामध्ये सर्व गोष्टी ‘ईश्वरा’शी आंतरात्मिक चेतनेच्या माध्यमातून संपर्कात असतात.

नंतर असते ते आध्यात्मिक रूपांतरण (spiritual transformation). यामध्ये सर्व गोष्टी वैश्विक चेतनेमधील ‘ईश्वरा’मध्ये विलीन होतात.

तिसरे असते ते अतिमानसिक रूपांतरण (supramental transformation). यामध्ये सर्व गोष्टींचे दिव्य विज्ञानमय चेतनेमध्ये अतिमानसिकीकरण होते.

या अंतिम रूपांतरणाबरोबर मन, प्राण आणि शरीर यांचे संपूर्ण रूपांतरण (संपूर्णपणाच्या माझ्या संकल्पनेनुसार) होण्यास सुरुवात होते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 414)

साधना, योग आणि रूपांतरण – २१०

चैत्य पुरुषाचे, अंतरात्म्याचे स्थान हृदयामध्ये खोलवर असते, अगदी खोलवर असते. सामान्य भावभावना, ज्या पृष्ठवर्ती स्तरावर असतात; त्या स्तरावर चैत्य पुरुषाचे स्थान नसते. परंतु चैत्य पुरुष अग्रस्थानी येऊ शकतो आणि अंतरंगामध्ये स्थित असतानादेखील तो पृष्ठवर्ती स्तराला (मन, प्राण व शरीर) व्यापून राहू शकतो. त्यानंतर स्वयमेव भावभावना या प्राणिक गोष्टी म्हणून शिल्लक राहात नाहीत तर त्या आंतरात्मिक भावभावना आणि जाणिवा बनतात. अग्रस्थानी आलेला चैत्य पुरुष त्याचा प्रभाव सर्वत्र पसरवू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ, मनाच्या संकल्पनांमध्ये रूपांतरण घडविण्यासाठी तो मनाला प्रभावित करू शकतो किंवा शरीराच्या सवयी व त्याच्या प्रतिक्रियांमध्ये रूपांतर घडविण्यासाठी शरीराला देखील प्रभावित करू शकतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 340-341)

साधना, योग आणि रूपांतरण – १९५

उत्तरार्ध

मनुष्य स्वतःच्या प्रयत्नांनी मनुष्यत्वाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. मनोमय जीव, अन्य शक्तीच्या साहाय्याविना, स्वत:च्या शक्तीद्वारे स्वतःचे अतिमानसिक चैतन्यामध्ये परिवर्तन करू शकत नाही. मानवी धारकपात्राचे (receptacle) दैवीकरण केवळ ‘दिव्य प्रकृती’च्या अवतरणामुळेच होऊ शकते.

कारण आपल्या मन, प्राण आणि शरीर या गोष्टी त्यांच्या स्वत:च्या मर्यादांनी बांधल्या गेलेल्या असतात आणि त्या कितीही उन्नत झाल्या किंवा कितीही विस्तृत झाल्या तरीही त्या त्यांच्या प्राकृतिक सीमा ओलांडून वर जाऊ शकत नाहीत किंवा त्या सीमांच्या पलीकडे त्या विस्तारित देखील होऊ शकत नाहीत. परंतु असे असूनसुद्धा, मनोमय मनुष्य स्वतःच्या पलीकडे असणाऱ्या अतिमानसिक ‘प्रकाश’, ‘सत्य’ आणि ‘शक्ती’ यांच्याप्रत उन्मुख होऊ शकतो. आणि त्यांनी आपल्यामध्ये कार्य करावे आणि मन जे करू शकणार नाही ते त्यांनी करावे यासाठी तो त्यांना आवाहन करू शकतो. मन जरी स्वप्रयत्नाने, मनाच्या अतीत जे आहे ते होऊ शकत नसले तरी, अतिमानस अवतरित होऊन, मनाचे स्वत:च्या द्रव्यामध्ये रूपांतरण घडवू शकते.

मनुष्याने आपल्या विवेकशील सहमतीने आणि जागरूक समर्पणाने, अतिमानसिक ‘शक्ती’ला जर तिच्या स्वतःच्या गहन व सूक्ष्म अंतदृष्टीनुसार आणि लवचीक अंतःशक्तीनुसार कार्य करण्यास मुभा दिली तर, ती अतिमानसिक ‘शक्ती’, संथपणाने किंवा वेगाने, आपल्या सद्यकालीन अर्ध-परिपूर्ण प्रकृतीचे दिव्य ‘रूपांतरण’ घडवून आणेल.

या अवतरणामध्ये, या कार्यामध्ये धोका होण्याची आणि आपत्तीजनक पतन होण्याची शक्यता असते. अवतरित होणाऱ्या शक्तीचा जर मानवी मनाने किंवा प्राणिक इच्छेने ताबा घेतला आणि स्वतःच्या संकुचित व चुकीच्या कल्पनांनी किंवा सदोष व अहंकारी आवेगांनी त्यांचा वापर करण्याचा प्रयत्न केला, (आणि हे काही प्रमाणात अटळसुद्धा असते;) तर जोपर्यंत कनिष्ठ मर्त्य प्रकृती ही महत्तर अशा अमर्त्य प्रकृतीच्या मार्गापैकी थोडाफार भाग तरी आत्मसात करत नाही, तोपर्यंत धडपडणे, किंवा विचलित होणे, कठीण आणि वरकरणी पाहता, दुर्लंघ्य वाटणारे अडथळे येणे, आघात होणे, दुःखभोग सहन करावे लागणे यांपासून सुटका नसते; एवढेच नव्हे तर संपूर्ण पतन होणे किंवा मृत्युमुखी पडणे याचीदेखील शक्यता असते. जेव्हा मन, प्राण आणि शरीर ‘ईश्वरा’प्रत जाणीवपूर्वक समर्पित व्हायला शिकतात, तेव्हाच फक्त ‘योगमार्ग’ सोपा, सरळ, जलद आणि सुरक्षित बनू शकतो.

आणि हे समर्पण आणि उन्मुखता ही फक्त ‘ईश्वरा’प्रतच असली पाहिजे, ती अन्य कोणाप्रत असता कामा नये. कारण आपले अंधकारमय मन आणि आपल्यामधील अशुद्ध प्राणशक्ती या गोष्टी, अ-दैवी आणि विरोधी शक्तींना समर्पित होण्याची शक्यता असते. एवढेच काय, पण चुकून त्या विरोधी शक्तींनाच ते ‘दैवी शक्ती’ समजण्याचीदेखील शक्यता असते. अन्य कोणतीच चूक याच्या इतकी घातक असू शकणार नाही. त्यामुळे आपले समर्पण हे अंध असता कामा नये, तसेच ते कोणत्याही प्रभावाप्रत किंवा सर्वच प्रभावांप्रत जडसुस्त निष्क्रियतेने शरणागती पत्करत आहे असेही असता कामा नये; तर ते समर्पण प्रामाणिक, सचेत, दक्ष आणि त्या एकमेवाद्वितीय आणि सर्वोच्चाप्रति एकनिष्ठ असले पाहिजे.

कितीही कठीण असले तरीही, ईश्वराप्रत आणि ‘दिव्य माते’प्रत आत्म-समर्पण, हेच आपले एकमात्र प्रभावशाली साधन असले पाहिजे आणि तेच आपले एकमेव कायमसाठीचे आश्रयस्थान असले पाहिजे. दिव्य मातेप्रति आत्मसमर्पण याचा अर्थ असा की, आपली प्रकृती तिच्या हातामधील एक साधन झाले पाहिजे, आणि आपला आत्मा हा त्या दिव्य मातेच्या कुशीमधील बालक झाले पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 12 : 170-171)

साधना, योग आणि रूपांतरण – १८३

(श्रीअरविंद येथे पारंपरिक योग व पूर्णयोग यातील फरक स्पष्ट करत आहेत.)

प्राचीन योगांच्या तुलनेत पूर्णयोग पुढील बाबतीत नावीन्यपूर्ण आहे.

१) जगापासून किंवा जीवनापासून निवृत्त होऊन स्वर्ग, निर्वाण यांच्याकडे प्रयाण करणे हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. उलट, हा योग जीवनामध्ये आणि अस्तित्वामध्ये परिवर्तन करण्याचे उद्दिष्ट बाळगतो. ते उद्दिष्ट गौण आणि अनुषंगिक आहे, असे पूर्णयोग मानत नाही तर तो त्यास वैशिष्ट्यपूर्ण आणि केंद्रवर्ती उद्दिष्ट मानतो.

अन्य योगांमध्ये ‘अवतरण’ (descent) असलेच तर, आरोहणाच्या (ascent) मार्गावरील एक घटना म्हणून किंवा आरोहणाचा परिणाम म्हणून ते घडून आलेले असते. अन्य योगांमध्ये ‘आरोहण’ हीच सत्य गोष्ट असते. पूर्णयोगात आरोहण हे अनिवार्य आहे परंतु त्याचा परिणाम म्हणून घडून येणारे ‘अवतरण’ हीच गोष्ट येथे निर्णायक असते आणि अवतरण हेच येथे आरोहणाचे अंतिम उद्दिष्ट मानण्यात आलेले आहे. आरोहणाद्वारे नवीन चेतनेचे अवतरण घडून येणे ही या साधनेनी उमटवलेली मोहोर आहे. ‘तंत्रयोग’ आणि ‘वैष्णव’ या संप्रदायांची परिसमाप्तीसुद्धा जीवनापासून सुटका करून घेण्यामध्ये होते; तर ‘जीवनाची दिव्य परिपूर्ती’ हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे.

(२) व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ‘ईश्वरा’चा साक्षात्कार करून घेऊन, व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी, हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ पारलौकिक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेदेखील येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक चेतनेची (supramental consciousness) शक्ती येथे आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

(३) चेतनेचे आणि प्रकृतीचे संपूर्ण व समग्र परिवर्तन हे पूर्णयोगाचे उद्दिष्ट आहे. ते जेवढे संपूर्ण व समग्र आहे तेवढीच त्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी पूर्वनिर्धारित करण्यात आलेली साधनापद्धतीदेखील तितकीच संपूर्ण व समग्र आहे. पूर्णयोगामध्ये जुन्या पद्धतींचा स्वीकार हा केवळ एक आंशिक क्रिया म्हणूनच केला जातो आणि त्या जुन्या साधनापद्धती त्याहूनही अधिक वैशिष्ट्यपूर्ण असणाऱ्या साधनापद्धतींपर्यंत नेण्यात येतात.

अशी पद्धती पूर्णतः किंवा तिच्यासारखे काही, पूर्वीच्या योगांमध्ये समग्रतया प्रस्तावित केले आहे किंवा अशी काही पद्धती पूर्वीच्या योगांमध्ये अंमलात आणली गेली आहे असे, मला आढळले नाही. मला जर तशी पद्धती आढळली असती तर, मी हा (पूर्णयोगाचा) मार्ग निर्माण करण्यामध्ये माझा वेळ व्यर्थ दवडला नसता. जर हा मार्ग अगोदरच अस्तित्वात असता, निर्धारित करण्यात आलेला असता, अगोदरच त्याचा आराखडा पूर्णतः रेखाटलेला असता, तो चांगला उजळलेला असता, सुरक्षित आणि सर्वांसाठी खुला करण्यात आलेला असता तर मी सुखाने मार्गस्थ होऊन, माझ्या उद्दिष्ट-धामापर्यंत सुरक्षितपणे, त्वरेने पोहोचलो असतो. या शोधामध्ये आणि आंतरिक निर्मितीमध्ये मला तीस वर्षे खर्च करावी लागली नसती. जुन्याच मार्गांवरून पुन्हा एकवार वाटचाल हे आमच्या योगाचे स्वरूप नाही तर आमचा योग म्हणजे एक ‘आध्यात्मिक साहस’ आहे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 400 – 401)