Tag Archive for: अभीप्सा

 

फक्त ध्यानामुळेच प्रकृतीमध्ये परिवर्तन होऊ शकते असा आमचा अनुभव नाही किंवा दैनंदिन कर्मव्यवहार आणि बाह्य व्यापार यांच्यापासून निवृत्त होऊन जे परिवर्तन घडवून आणू पाहत आहेत त्यांनाही त्यापासून फार लाभ झाला आहे असे दिसत नाही. किंबहुना अनेक उदाहरणांमध्ये तर ते हानिकारकच ठरले आहे.

प्रकृतीमध्ये परिवर्तन करण्यासाठी काही विशिष्ट प्रमाणात एकाग्रता, हृदयामध्ये आंतरिक अभीप्सा आणि श्रीमाताजींच्या उपस्थितीप्रत चेतनेचे खुलेपण आणि ऊर्ध्वस्थित शक्तीकडून होणारे अवतरण या गोष्टींची आवश्यकता असते. कर्माविना प्रकृतीचे खऱ्या अर्थाने परिवर्तन होऊ शकत नाही. परिवर्तनानंतर लोकांच्या संपर्कामध्ये आल्यावरच त्या व्यक्तीच्या प्रकृतीमध्ये (खरंच) परिवर्तन झाले आहे की नाही याची खरी कसोटी लागते.

व्यक्ती कोणत्याही प्रकारचे काम करत असू दे, त्यामध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ असे काहीही नसते. श्रीमाताजींना अर्पण केली जाणारी आणि त्यांच्यासाठी व त्यांच्या शक्तिनिशी केली जाणारी सर्व कर्मं एकसमान (मोलाची) असतात.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 252)

 

(अगदी बारीकसारीक आध्यात्मिक अनुभवामुळे हुरळून जाणाऱ्या नवोदित साधकांना श्रीमाताजी सांगत आहेत…)

तुम्हाला ईश्वरी अवतरणाचा दाब (pressure) पेलायचा असेल तर तुम्ही खूप सुदृढ, शक्तिशाली असले पाहिजे, नाहीतर तुम्ही विखरून जाल. काही लोकांनी मला असे विचारले, “ईश्वर अजून अवतरित का होत नाही?” तर त्याचे कारण, “अजून तुम्ही (त्याच्या अवतरणासाठी) तयार नाही,” हे आहे. ईश्वराच्या अवतरणाचा एखादा अल्पांश जर तुम्हाला गायला, नाचायला आणि आनंदातिशयाने आरडाओरड करायला लावत असेल तर, तो पूर्णत: अवतरला तर काय होईल?

म्हणूनच आम्ही सांगत असतो की, ज्या लोकांकडे शरीर, प्राण आणि मन यांच्यामध्ये एक भक्कम, सुस्थिर आणि विशाल पाया नसेल त्यांनी ईश्वरी शक्ती खेचू नये. याचे कारण अशा व्यक्ती ते अवतरण पेलू शकणार नाहीत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, ”ईश्वरी शक्ती खाली ओढण्याचा प्रयत्न करू नका त्याऐवजी, शांती आणि स्थिरता धारण करून त्या शक्तीच्या अवतरणाची प्रतीक्षा करा.”

परंतु ज्यांच्याकडे आवश्यक असा पाया आहे, अधिष्ठान आहे त्यांना आम्ही सांगतो की, ”अभीप्सा बाळगा आणि ईश्वरी शक्ती शक्य तितकी अधिकाधिक मिळविण्याचा प्रयत्न करा.” कारण अशा व्यक्तीच विचलित न होता, ईश्वराकडून अवतरित होणाऱ्या शक्ती ग्रहण करू शकतील.

– श्रीमाताजी (CWM 03 : 11)

 

(श्रीअरविंद लिखित पत्रामधून…)

‘शक्तीला प्रवेश करू द्या,’ असे मी जेव्हा तुम्हाला लिहिले तेव्हा त्याचा अर्थ असा होता की, तुम्ही ती शक्ती खेचण्याची आवश्यकता नाही, मात्र तुमच्या संपूर्ण अभीप्सेद्वारे आणि सहमतीद्वारे तुम्ही तिच्या प्रवेशाला हातभार लावला पाहिजे.

*

अतिमानसिक प्रकाश ‘हटातटाने’ खाली आणणे, खाली खेचणे हे निश्चितच चुकीचे आहे. अतिमानस ही बलपूर्वक मिळविण्याची गोष्ट नाही. योग्य वेळ येईल तेव्हा ते स्वतःहून आपोआप उमलून येईल. पण हे घडून येण्यापूर्वी, बरेच काही करावे लागेल आणि ते धीराने, कोणतीही घाईगडबड न करता करावे लागेल.

*

चक्कर येणे, दुर्बलता किंवा अस्वस्थता या गोष्टी असता कामा नयेत. तुमच्यामध्ये अशी लक्षणे आढळत आहेत याचा अर्थ असा की, शरीराकडून आत्मसात केल्या जाणाऱ्या शक्तीपेक्षा, अधिक शक्ती (Force) शरीरामध्ये खेचली जात आहे. अशा वेळी, अडथळा निघून जाईपर्यंत आणि योग्य संतुलन निर्माण होईपर्यंत, तुम्ही विश्रांती घेतली पाहिजे.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 480-481)

 

निश्चल-नीरव हृदयामध्ये एक असा दीप तेवत असतो की, जो कधीच विझू शकणार नाही. ईश्वराला जाणणे आणि समग्रतया ईश्वर‌च होऊन जीवन जगणे यासाठी असलेली उत्कट अभीप्सा हाच तो अग्नी आहे.

– श्रीमाताजी (CWM 14 : 74)

 

जे जीव ईश्वरप्राप्तीची अभीप्सा बाळगत नाहीत ते जीव हे ईश्वरा‌चे अपयश असते. परंतु त्यामुळे ‘प्रकृती‌’ मात्र समाधानी होते आणि अशा जिवांची संख्या वाढविण्यामध्ये आनंद मानते. कारण, प्रकृती टिकून राहील आणि तिचे साम्राज्य दीर्घकाळ चालत राहील अशी ग्वाही ते जीव देत असतात.

– श्रीअरविंद (CWSA 13 : 208)

तुम्ही जर सचेत अभीप्सेच्या स्थितीमध्ये असाल आणि अगदी प्रामाणिक असाल तर, तुमच्या सभोवताली असणाऱ्या सर्व गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुमच्या अभीप्सेला साहाय्यक ठरतील अशा रितीनेच रचल्या जातील. त्या तुमच्या प्रगतीसाठी साहाय्यक ठरतील म्हणजे, एकतर एखाद्या नवीन गोष्टीशी त्या तुमचा संपर्क साधून देतील किंवा तुमच्या प्रकृतीमधील जी गोष्ट नाहीशी होणे गरजेचे होते अशी एखादी गोष्ट त्या काढून टाकतील. ही बाब काहीशी लक्षणीय असते.

तुम्ही खरोखरच जर अभीप्सेच्या उत्कट स्थितीमध्ये असाल तर, ही अभीप्सा प्रत्यक्षात येण्यासाठी अगदी प्रत्येक परिस्थिती साहाय्यभूत ठरते. सभोवतालची प्रत्येक गोष्ट, अगदी प्रत्येक गोष्ट जणू काही एका अतिशय परिपूर्ण व असीम चेतनेने तुमच्याभोवती गुंफली जाते. तुम्ही तुमच्या बाह्यवर्ती अज्ञानामुळे कदाचित ती ओळखू शकणार नाही आणि परिस्थिती जे रूप धारण करून तुमच्या समोर उभी ठाकते ती पाहून, तुम्ही कदाचित तिला विरोधही कराल, तक्रार कराल, ती परिस्थिती बदलविण्याचा प्रयत्न कराल; परंतु काही काळाने, जेव्हा तुम्ही काहीसे अधिक प्रगल्भ होता आणि जेव्हा तुम्ही व ती घटना यांमध्ये काही कालावधी गेलेला असतो, तेव्हा तुम्हाला जाणीव होते की, तुम्हाला आवश्यक असणारी प्रगती घडविण्यासाठी तेव्हाची ती परिस्थिती अगदी तशीच असणे भाग होते. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की, एक संकल्प, परम सद्भाव हाच तुमच्या सभोवार सर्व गोष्टींची रचना करत असतो आणि ती परिस्थिती स्वीकारण्याऐवजी तुम्ही तिला प्रतिकार करत राहिलात, कितीही तक्रार करत राहिलात तरीही, अगदी त्याच घडीला तो सद्भाव सर्वांत प्रभावीपणे कार्य करत असतो.

• श्रीमाताजी (CWM 06 : 176)

 

(एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

आम्हाला (मला व श्रीमाताजींना) तुमच्यामध्ये नेहमीच एक प्रकारची गहन अभीप्सा असल्याचे आणि त्या अभीप्सेमध्ये प्रामाणिकपणा असल्याचे आढळून आले आहे. आणि तीच सतत तुम्हाला आमच्या निकट संपर्कात ठेवते. जिथे अशा प्रकारची अभीप्सेची गहनता असते, प्रामाणिकपणा असतो आणि अशी निकटता आढळते तिथे व्यक्ती (ईश्वरी शक्तीप्रत) हळूहळू खुली होत जाणार हे निश्चित असते. आणि तुमच्यामध्ये तर हा खुलेपणा आधीपासूनच अस्तित्वात आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या साधनेबाबत चिंता किंवा काळजी करण्याचे काहीच कारण नाही, असे मला वाटते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 52)

 

अध्यात्म-साधनेसाठी प्रामाणिकपणा अगदी अत्यावश्यक असतो आणि कुटिलता ही कायमस्वरूपी अडथळा असते. सात्त्विक प्रवृत्ती ही आजवर नेहमीच आध्यात्मिक जीवनासाठी अतिशय सुयोग्य मानण्यात आली आहे. तसेच सात्त्विकतेमुळे आध्यात्मिक जीवनाची पूर्वतयारी होते, असेही मानले जाते. तर राजसिक प्रकृती इच्छाआकांक्षाच्या आणि आवेगांच्या भाराखाली दबून गेलेली असते.

त्याच बरोबर हेही खरे आहे की, आध्यात्मिकता ही द्वंद्वातीत असते आणि त्यासाठी ऊर्ध्वमुख असणाऱ्या अभीप्सेची सर्वाधिक आवश्यकता असते. आणि ही अभीप्सा सात्त्विक प्रवृत्तीच्या व्यक्तीइतकीच राजसिक प्रवृत्तीच्या व्यक्तीमध्येही निर्माण होऊ शकते. एखादी सात्त्विक प्रवृत्तीची व्यक्ती जशी तिच्या सद्गुणांच्या अतीत जाऊ शकते तशीच, राजसिक प्रवृत्तीची व्यक्तीही तिच्या अवगुणांच्या, इच्छाआकांक्षांच्या अतीत होऊन, दिव्य शुद्धता, दिव्य प्रकाश आणि दिव्य प्रेमाकडे वळू शकते.

अर्थात, अशी राजसिक प्रवृत्तीची व्यक्ती जेव्हा स्वतःच्या कनिष्ठ प्रकृतीवर विजय मिळवेल आणि स्वतःमधून ती कनिष्ठ वृत्ती काढून टाकेल तेव्हाच ही गोष्ट घडून येईल. कारण अशी व्यक्ती जर पुन्हा एकदा त्याच कनिष्ठ प्रकृतीमध्ये जाऊन पडली, तर ती मार्गभ्रष्ट होण्याची शक्यता असते किंवा अगदीच काही नाही तर, जोपर्यंत ती व्यक्ती त्या कनिष्ठ प्रकृतीमध्ये रमलेली असते तोपर्यंत तरी तिची आंतरिक प्रगती खुंटते.

परंतु धार्मिक आणि आध्यात्मिक इतिहास पाहिला तर त्यामध्ये, मोठमोठ्या गुन्हेगारांचे महान संतांमध्ये किंवा अवगुणी किंवा कमी गुणवान व्यक्तींचे आध्यात्मिक साधकांमध्ये आणि भक्तांमध्ये रूपांतर झाल्याची उदाहरणे वारंवार आढळून आली आहेत. उदाहरणार्थ युरोपमध्ये सेंट ऑगस्टिन, भारतामध्ये (चैतन्य महाप्रभुंचे अनुयायी झालेले) जगाई आणि मधाई, बिल्वमंगल यासारखी अनेक उदाहरणे आहेत.

भलेही एखाद्या माणसाच्या हातून गतकाळात अनेक चुका झालेल्या असतील किंवा त्याला अनेक ठोकरा बसल्या असतील, पण त्यानेसुद्धा जर ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावले तर, ते त्याच्यासाठी कधीच बंद नसतात. (किंबहुना) जो जो कोणी ईश्वराच्या निवासाचे दरवाजे अगदी प्रामाणिकपणे ठोठावतो, त्याच्यासाठी ते कधीच बंद नसतात.

मानवी गुण आणि मानवी दोष म्हणजे अंतरंगात असणाऱ्या ईश्वरी तत्त्वावरील अनुक्रमे तेजस्वी व अंधकारमय आवरणे असतात. पण आत्म्याच्या उंचीप्रत जाताना, जेव्हा ती दोन्ही आवरणे भेदली जातात तेव्हा, ती जळून जाऊ शकतात. (म्हणजेच द्वंद्वातीत असणाऱ्या आत्मतत्त्वाच्या दिशेने चाललेल्या प्रवासात साधकाचे गुण व दोष दोन्ही गळून पडतात.)

– श्रीअरविंद (CWSA 29 : 42)

फक्त दिव्य सत्याचीच इच्छा बाळगणे; दिव्य मातेप्रत स्वतःला अधिकाधिक समर्पित करणे; या एका अभीप्सेव्यतिरिक्त असणाऱ्या सर्व वैयक्तिक मागण्या व वासना यांना नकार देणे; जीवनातील प्रत्येक कृती म्हणजे ईश्वराने दिलेले कार्य आहे हे जाणून, त्याच्या आड कोणताही अहंकार येऊ न देता, ते कार्य करणे आणि ते ईश्वराला समर्पित करणे म्हणजे पूर्णपणे प्रामाणिक असणे. हाच ‘दिव्य जीवना‌’चा पाया आहे.

व्यक्ती एकाएकी पूर्णपणे तशी होऊ शकत नाही. पण जर तिने सातत्याने तशी अभीप्सा बाळगली आणि ईश्वरी शक्तीने साहाय्य करावे म्हणून साध्यासरळ इच्छेने नेहमी आणि अगदी अंतःकरणपूर्वक तिचा धावा केला तर, या (दिव्य) चेतनेमध्ये व्यक्ती अधिकाधिक उन्नत होत राहते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

प्रामाणिकपणामध्ये (sincerity) नुसत्या सचोटीपेक्षा (honesty) बराच अधिक अर्थ सामावलेला आहे. म्हणजे असे की, तुम्ही जे बोलता तेच तुम्हाला अभिप्रेत असते, तुम्ही जे प्रतिपादित करत असता त्याची तुम्हाला जाणीव असते, तसेच तुमच्या संकल्पामध्ये खरेपणा असतो. साधक जेव्हा ईश्वराशी एकरूप होण्याची आणि ईश्वराचे साधन बनण्याची अभीप्सा बाळगत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणाचा अर्थ असा असतो की, त्याला त्याच्या अभीप्सेबाबत खरोखरच गांभीर्य असते व ईश्वराव्यतिरिक्तच्या इतर सर्व इच्छांना किंवा आवेगांना तो नकार देत असतो.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 50)