Tag Archive for: व्यावहारिक जीवन

 

तडजोडविरहित प्रामाणिकपणा हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे. (प्रामाणिकपणाचे आचरण करत असताना कोणत्याही प्रलोभनामुळे विचलित न होणे, उद्दिष्टाबाबत कोणतीही तडजोड न करणे हा आध्यात्मिक सिद्धीचा खात्रीशीर मार्ग आहे.)

ढोंग करू नका – प्रामाणिक व्हा.
(नुसती) आश्वासने देऊ नका – कृती करा.
(नुसती) स्वप्ने पाहू नका – ती प्रत्यक्षात उतरवा.

– श्रीमाताजी (CWM 14 : 66)

 

(एका विभागामध्ये काम करणाऱ्या ‘क्ष’ व्यक्तीबाबत तेथील व्यवस्थापकांनी श्रीमाताजींकडे तक्रार केली आहे आणि त्या व्यक्तीच्या कामचुकारपणाबाबत व अप्रामाणिकपणाबाबत त्याला काही समजावून सांगावे अशी विनंती त्यांनी केली आहे. त्यावर श्रीमाताजींनी दिलेले हे उत्तर…)

अप्रामाणिकपणा हा एक असाध्य दोष आहे असे दिसते आणि त्या दोषामुळे व्यक्तीमधील ईश्वरी कृपेचे कार्यसुद्धा नामशेष झाल्यासारखे होते. या अप्रामाणिकपणामुळेच कालीमातेला या जगामध्ये तिच्या रौद्ररूपाद्वारे हस्तक्षेप करणे भाग पडते.

मी ‘क्ष’सारख्या अप्रामाणिक माणसाला काहीही सूचना करणार नाही कारण तो त्याला ढोंगीपणाने प्रतिसाद देईल आणि तो आत्ता ज्या अंधकारामध्ये बुडालेला आहे, तो अंधकार त्याच्या ढोंगीपणामुळे अधिकच वाढेल.

– श्रीमाताजी (CWM 17 : 343)

 

माणसं नेहमीच जटिल असतात आणि त्यांच्या प्रकृतीमध्ये गुण व दोष परस्परांमध्ये इतके मिसळलेले असतात की, ते वेगळे करता येणे जवळजवळ अशक्य असते. एखादी व्यक्ती जे बनू इच्छिते किंवा इतरांच्या मनात तिच्याविषयी जी प्रतिमा असावी असे तिला वाटते त्यापेक्षा, ती व्यक्ती वास्तवात पूर्णपणे वेगळी असू शकते. कधीकधी त्या व्यक्तीच्या स्वभावाची एक बाजू दिसते, तर कधी तिच्या स्वभावाची दुसरीच बाजू व्यक्त होते किंवा अमुक एका संदर्भात व्यक्ती जशी वागते त्यापेक्षा अगदी भिन्नपणे ती इतरांच्या बाबतीत वागू शकते.

मानवी प्रकृतीच्या दृष्टीने पाहता, पूर्णपणे प्रामाणिक असणे, सरळमार्गी असणे, खुले असणे ही काही साधीसोपी उपलब्धी नाही. केवळ आध्यात्मिक प्रयत्नांनीच ही गोष्ट साध्य होऊ शकते. त्यासाठी व्यक्तीच्या आत्म-परीक्षणात्मक दृष्टीमध्ये निर्मम-वस्तुनिष्ठता असणे आवश्यक असते. तिच्यामध्ये आत्मनिरीक्षणाची स्वसमर्थन न करणारी चिकित्सा आवश्यक असते. बरेचदा भल्या भल्या साधकांकडे किंवा योग्यांकडेदेखील ही क्षमता नसते. केवळ प्रकाशमान अशा ‘ईश्वरी-कृपे‌’मुळेच, साधकाला स्वतःचा शोध लागतो आणि त्याच्यामध्ये ज्या उणिवा असतात, त्या भरून काढून, त्यांचे रूपांतरण घडविण्याची क्षमता केवळ त्या ‘ईश्वरी-कृपे‌’मध्येच असते. (आणि हे सुद्धा केव्हा शक्य होते?) तर, साधक जेव्हा ईश्वरी कार्यासाठी स्वतःला समर्पित करतो आणि तसे करण्यास तो सहमती दर्शवितो तेव्हाच हे घडून येते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 51)

 

…एखाद्या व्यक्तीने तुम्हाला तुमचा एखादा दोष दाखविला तर, त्याने तुम्हाला जणू एखादा खजिनाच दाखविला असे समजावे. म्हणजे याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये एखादा दोष आढळतो किंवा तुमच्यामध्ये आकलनक्षमतेचा अभाव असल्याचे आढळते; एखादी अक्षमता, दुर्बलता आढळते; अप्रामाणिकपणा किंवा प्रगतीपासून रोखणारे असे काही तुम्हाला तुमच्यामध्ये आढळते, तेव्हा जणू काही एखादा अद्भुत खजिनाच सापडला आहे, असे तुम्हाला वाटले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 03 : 220-221)

साधक : प्रामाणिक असणे आणि निष्ठावान असणे यामध्ये काही फरक आहे का?

श्रीमाताजी : हो, या दोन गोष्टी भिन्न आहेत. अर्थात, मला वाटतं की, प्रामाणिक नसताना निष्ठावान असणे आणि निष्ठावान नसताना प्रामाणिक असणे या दोन्ही गोष्टी अतिशय अवघड असतात. पण मला अशा काही व्यक्ती माहीत आहेत की, ज्या निष्ठावान होत्या पण त्यांच्याकडे प्रामाणिकपणाचा अभाव होता. याच्या उलट म्हणजे प्रामाणिक असूनही निष्ठा नसणे, हे मात्र फारसे दुर्मिळ नाही. एक गुण असेल तर पाठोपाठ दुसरा दुसरा येतोच असे नाही. पण हे उघड आहे की, सचोटी, ऋजुता, निष्ठा आणि प्रामाणिकपणा या गोष्टी एकमेकींशी घनिष्ठपणे संबंधित असतात.

साधक : एखाद्या गोष्टीशी वा व्यक्तीशी संबंधित असणारी निष्ठा ही सीमित भावना असते ना? यापेक्षा प्रामाणिकपणा अधिक व्यापक असतो ना?

श्रीमाताजी : हो, बरोबर आहे. निष्ठेमध्ये एक प्रकारच्या श्रेणीबद्ध संबंधाचा अंतर्भाव होतो, म्हणजे येथे कोणाशी तरी किंवा कोणत्यातरी वस्तुशी निष्ठा असते. त्यामध्ये एक प्रकारचे परस्परावलंबित्व असते. दिलेला शब्द पाळणे, स्वतःचे कर्तव्य अत्यंत काटेकोरपणे बजावणे म्हणजे निष्ठा, अशी सर्वसामान्य समजूत आहे. व्यक्ती अरण्यामध्ये एकटीच जीवन व्यतीत करत असेल तर ती परिपूर्ण प्रामाणिकपणाचे आचरण करू शकते, परंतु निष्ठेचे आचरण मात्र तुम्हाला सामाजिक जीवनातच करता येते, इतर लोकांशी संबंधित असतानाच करता येते. अर्थात, एखादी व्यक्ती ईश्वरी उपस्थितीप्रत आंतरिक श्रद्धायुक्त कृतीने पूर्णपणे समर्पित असेल तर ती त्या उपस्थितीशी एकनिष्ठ असू शकते.

– श्रीमाताजी (CWM 15 : 299-300)

साधेसरळ असणे (Straightforwardness) म्हणजे व्यक्तीने स्वतःशी व ईश्वराशी अगदी प्रामाणिकपणाने, सचोटीने वागणे आणि आचरणामध्ये कुटिलता न बाळगणे.

स्वतःची चूक ओळखण्याची (आणि ती मान्य करण्याची) इच्छा नसणे आणि अमुक एखादी गोष्ट चुकीची आहे असे श्रीमाताजींनी सांगूनदेखील, त्यांच्याशी प्रतिवाद करत, मीच कसा बरोबर आहे हे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे म्हणजे स्व-समर्थन (Self-justification) करणे.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 54)

नुसते बाहेरून चांगले ‘दिसण्यापेक्षा‌’ प्रत्यक्षात तसे ‘असणे‌’ अधिक बरे. आपला प्रामाणिकपणा जर परिपूर्ण असेल, तर आपण चांगले आहोत असे ‘दाखविण्याची’ गरज भासणार नाही. ‘परिपूर्ण प्रामाणिकपणा‌’ याचा आमचा अर्थ असा की, आपले सर्व विचार, भावना, संवेदना आणि कृती यांमधून अन्य काही नाही तर, आपल्या अस्तित्वाचे केंद्रवर्ती सत्‌‍-तत्त्व‌च (central Truth of our being) आविष्कृत झाले पाहिजे.

– श्रीमाताजी (CWM 12 : 268)

तुम्हाला जेव्हा एखाद्या गोष्टीचा कंटाळा आलेला असतो, तुम्हाला एखादी गोष्ट वेदनादायी किंवा अगदी अस्वस्थ करणारी वाटत असते, अशा वेळी जर तुम्ही काळाच्या (time) अनंततेचा आणि अवकाशाच्या (space) असीमतेचा विचार करायला सुरुवात केलीत, आजवर जे काही घडून गेले आहे आणि येथून पुढे जे घडणार आहे, त्याचा तुम्ही विचार केलात आणि आत्ताचा क्षण हा अनंत काळामधील खरोखरच एका श्वासाइतकाच आहे असा तुम्ही विचार केलात तर, काळाच्या अनंततेमध्ये असणाऱ्या या एका एवढ्याशा क्षणामुळे अस्वस्थ होणे हे तुम्हाला अगदीच हास्यास्पद वाटू लागेल. …खरोखरच, काळाच्या अनंततेमध्ये एका क्षणाचे मोल ते काय? खरोखरच व्यक्तीला हे प्रत्यक्षात उतरवता आले तर….

डोळ्यांसमोर चित्र आणा की, ज्या इवल्याशा पृथ्वीवर आपण वावरत असतो, ते आपण म्हणजे एक किती किरकोळ व्यक्ती आहोत आणि त्यामध्ये चेतनेचा हा एक चिमुकला कण आहे, एक क्षण आहे, ज्यामुळे आत्ता तुम्ही दुखावल्यासारख्या झाले आहात किंवा तुम्हाला तो दु:खद वाटत आहे तो क्षण डोळ्यांसमोर आणा. वास्तविक, हा क्षण तुमच्या अस्तित्वाचा एक अगदी छोटासा क्षण आहे. आणि खुद्द तुम्हीसुद्धा यापूर्वीच्या अनेक प्रसंगांमधून येथवर आलेला असता आणि यापुढेही अनेक गोष्टी घडायच्या असतात. तेव्हा ज्या गोष्टी आत्ता तुमच्यावर एवढा परिणाम करत आहेत त्या अजून दहा वर्षांनी तुम्ही कदाचित पूर्णपणे विसरून गेलेला असाल किंवा जरी अगदी त्या गोष्टी आठवल्याच तर तुम्ही स्वतःच म्हणाल की, “मी या गोष्टीला इतके का बरे महत्त्व दिले होते?”

तुम्हाला खरोखरच जाणवू लागते की, स्वतःला आणि आपल्याबाबतीत जे घडते आहे त्याला इतके महत्त्व देणे, हे किती हास्यास्पद आहे. तुम्ही जर ही गोष्ट अगदी सुयोग्य रितीने केलीत तर, अगदी तीन मिनिटांमध्ये सारे दुःख नाहीसे होईल. इतकेच काय पण एखादी अगदी तीव्र वेदनासुद्धा अशाच पद्धतीने नाहीशी होईल. त्यासाठी एकाग्रता करायची आणि स्वतःला अनंताच्या व काळाच्या पटलावर ठेवायचे. सर्व अस्वस्थता निघून जाते आणि व्यक्ती तिला भेडसावणाऱ्या त्या त्रासदायक गोष्टीपासून मोकळी होते. ही गोष्ट योग्य पद्धतीने कशी करायची हे माहीत असेल तर, व्यक्ती सर्व आसक्तीपासून आणि अगदी निरतिशय दुःखामधून बाहेर पडू शकते. ही पद्धत तुम्हाला तुमच्या क्षुद्र अहंच्या जाणिवेतून त्वरित बाहेर काढते.

– श्रीमाताजी [CWM 06 : 345-346]

आपण खूपच जटिलतेने भरलेल्या वातावरणात राहत असतो, पण नेहमीच एक अशी जागा असते की, जिथे सारेकाही खुले, साधे, सरळ असते; हे अनुभवलेले सत्य मी तुम्हाला सांगत आहे. तुम्ही त्याच त्या परिघात गोल गोल फिरत राहता, धडपड करत राहता, त्यावर काम करत राहता आणि मग कुठेतरी कुंठित झाल्यासारखे होते; आणि अशा वेळी तुमच्या आंतरात्मिक दृष्टिकोनातून (psychic attitude) तुम्हाला एखादा मार्ग गवसतो आणि सारे काही मोकळे होते आणि हे अगदी सहजतेने होते. मला असा अनुभव बऱ्याच वेळेला आलेला आहे.

….श्रीअरविंद नेहमी असे म्हणत असत की, “साधे राहावे, साधे असावे. जे तुम्हाला जाणवते ते साधेपणाने व्यक्त करा. साधे असा! साधे असावे!’’ यावर त्यांचा खूप भर असे. म्हटले तर हे केवळ शब्द आहेत. पण पहिल्यांदा जेव्हा हे शब्द त्यांनी उच्चारले, तेव्हा मला माझ्यासमोर जणू एक प्रकाशमार्गच खुला होताना दिसला आणि सारे काही खूप साधे-सोपे होऊन गेले. ‘एकावेळी एकच पाऊल पुढे टाकायचे आहे, मग दुसरे पाऊल. आपल्याला एवढेच तर करायचे आहे,’ असे मला जाणवून गेले. म्हणूनच ते नुसते शब्द नाहीत तर ती वस्तुस्थिती आहे.

श्रीमाताजी (स्वतःच्या कपाळाकडे निर्देश करत) म्हणतात, सारी जटिलता इथे (मनामध्ये) आहे. खूप जटिल आहे ते, त्याच्याशी जुळवून घेणे खूप अवघड आहे. ‘साधेसरळ असावे,’ असे जेव्हा श्रीअरविंद म्हणाले, तेव्हा काय आश्चर्य! तेव्हा जणू काही त्यांच्या डोळ्यांमधून प्रकाश बाहेर पडत होता. अचानकपणे आपण जणू प्रकाशाच्या बागेतच आलो आहोत असे वाटावे असे काहीसे झाले. जणू काही ती बाग प्रकाशात न्हाऊन निघाली होती. साध्या गोष्टीवर केवढा मोठा भर दिला होता त्यांनी! तुम्हाला जे दिसते, तुम्हाला जे माहीत आहे तेच साधेपणाने बोला, सहजपणाने बोला.

… श्रीअरविंद येथे ज्याला ‘साधेसरळ असणे’ असे म्हणत आहेत, ती एक अगदी आनंददायी उत्स्फूर्तता आहे, सहजता आहे. कृतीमध्ये, अभिव्यक्तीमध्ये, प्रत्येक हालचालीमध्ये, जीवनामध्ये साधे असावे, सरळ असावे. एक आनंदी सहजता! उत्क्रांतीमधील सहजस्वाभाविक व आनंदी अवस्था – ज्याला ते ‘दिव्य’ म्हणतात ती अवस्था – आपण पुनर्प्राप्त करून घ्यावी, अशी श्रीअरविंदांची आपल्याकडून अपेक्षा आहे. …आपण एखाद्या उमलत्या गुलाबाच्या फुलाप्रमाणे सहजसाधेपणाने आनंदी असावे, असे त्यांना अभिप्रेत आहे. आणि मी जेव्हा हे ऐकले, मी जेव्हा हे पाहिले, तेव्हा सुवर्ण प्रकाशाचा जणू एक झराच वाहत होता, जणू एक सुगंधित बाग असावी असे काहीसे ते होते. सारे, सारे, सारे काही खुले झाले होते.

– श्रीमाताजी (Conversation with a Disciple, September 16, 1961)

“ज्याच्याकडे स्वतःच्या मालकीचे काहीच नसते तो आनंदी असतो,” असे म्हटले जाते तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की, त्या मनुष्यामध्ये स्वामित्व-भावना नसते. म्हणजे वस्तू जेव्हा त्याच्यापाशी येतील तेव्हा तो त्यांचा उपयोग करेल, पण तेव्हासुद्धा त्याला ही जाण असेल की, त्या (माझ्या मालकीच्या नसून) त्या परमेश्वराच्या मालकीच्या आहेत आणि म्हणूनच, अगदी त्या त्याच्यापासून दूर झाल्या तरीही त्याबद्दल तो खंत बाळगणार नाही. ज्या ईश्वराने त्याला त्या वस्तू दिल्या होत्या, त्यांचा इतरांना उपभोग घेता यावा म्हणून त्याच ईश्वराने त्या त्याच्याकडून काढून घेतल्या, ही गोष्ट त्याला अगदी सहजस्वाभाविक वाटते. अशा मनुष्याला वस्तुंचा वापर करत असताना आणि त्यांचा अभाव असतानाही सारखाच हर्ष अनुभवास येतो.

जेव्हा त्या वस्तू तुमच्यापाशी असतात तेव्हा ईश्वरी कृपे‌ची देणगी म्हणून तुम्ही त्या स्वीकारता आणि जेव्हा त्या तुम्हाला सोडून जातात किंवा जेव्हा त्या तुमच्याकडून काढून घेण्यात येतात, तेव्हा तुम्ही अपरिग्रहाचा (destitution) हर्ष अनुभवत जीवन जगता. स्वामित्व-भावनेमुळेच तुम्ही गोष्टींना चिकटून राहता, ती भावनाच तुम्हाला गुलाम बनविते. तसे नसते तर या येणाऱ्या-जाणाऱ्या गोष्टींच्या निरंतर घडामोडींमध्येही तुम्ही नेहमीच हर्षभरित जीवन जगू शकला असतात. त्या गोष्टी त्यांच्यासोबत (कृतार्थतेचा आनंद‌ आणि निर्लिप्ततेचा आनंद‌) दोन्हीही घेऊन येतात म्हणजे, जेव्हा त्या गोष्टी तुमच्यापाशी असतात तेव्हा तुम्ही ‘कृतार्थतेचा आनंद‌’ अनुभवू शकता आणि जेव्हा तुमच्यापाशी त्या नसतात तेव्हा तुम्ही ‘निर्लिप्ततेचा आनंद‌’ अनुभवू शकता. (दोन्हीवेळी तुम्ही आनंदच अनुभवू शकता.)

सत्यामध्ये जीवन जगणे; शाश्वता‌शी, खऱ्याखुऱ्या जीवनाशी सायुज्य पावून जीवन जगणे; जो प्रकाश कधीच मावळत नाही अशा प्रकाशात जीवन जगणे म्हणजे आनदं! मुक्त असणे खऱ्या स्वातंत्र्यासहित मुक्त असणे, ईश्वरी संकल्पा‌शी असलेल्या अविचल, नित्य ऐक्याचे स्वातंत्र्य अनुभवणे म्हणजे आनंद!

…जेव्हा स्वतःच्या मालकीचे असे तुमच्याजवळ काहीच नसते तेव्हा तुम्ही विश्वाएवढे विशाल होऊ शकता.

– श्रीमाताजी (CWM 03 : 253-254)