Tag Archive for: व्यावहारिक जीवन

समर्पण – ४८

व्यक्ती जर संपूर्ण समर्पणाच्या स्थितीत असेल आणि तिने स्वत:चे सर्वस्व समर्पित केले असेल, जर तिने त्या ‘ईश्वरी कृपे’स स्वत:ला देऊ केले असेल आणि त्या कृपेला जे योग्य वाटते ते तिने आपल्या बाबतीत करावे, अशी त्या व्यक्तीची भावना असेल तर ते त्याहूनही अधिक चांगले! पण त्यानंतर मात्र ईश्वरी कृपेने असे का केले अन् तसे का केले, असे प्रश्न तिला विचारता कामा नयेत. व्यक्तीने असे म्हणता कामा नये की, “मला असे असे होईल असे वाटले होते, म्हणून मी तसे केले,” कारण व्यक्तीला खरोखरच काहीतरी हवे असेल आणि त्या भावनेने साद घालायची असेल तर जे काही हवे, जसे हवे ते अगदी साधेपणाने, प्रामाणिकपणाने शब्दांत मांडणे केव्हाही चांगले. त्यानंतर, ‘ईश्वरी कृपा’ ते तसे करायचे किंवा नाही ते ठरवेल; पण कोणत्याही परिस्थितीत, व्यक्तीने तिला काय अपेक्षित आहे ते स्पष्टपणे मांडणे केव्हाही चांगले; त्यात काही गैर नाही.

केलेली विनंती मान्य केली जात नाही आणि व्यक्ती बंड करते, तेव्हा मात्र गोष्टी बिघडून जातात. तेव्हा अर्थातच सारे काही बिनसते. आणि हाच तो क्षण असतो जेव्हा व्यक्तीने समजून घेतले पाहिजे की, व्यक्तीची जी इच्छा असते, आकांक्षा असते, ती नेहमीच प्रबुद्ध असेल असे नाही. तसेच केलेली मागणी ही त्या व्यक्तीसाठी हितावहच असेल असेही नाही. अशा घडीला व्यक्तीने थोडेसे अधिक समंजस होऊन म्हटले पाहिजे, “ईश्वरा, जशी ‘तुझी’ इच्छा.” पण जोवर व्यक्तीला आतून काही आवडीनिवडी व अग्रक्रम असतात तोवर तिने ते शब्दांमध्ये मांडण्यात गैर असे काही नाही. ती अगदी स्वाभाविक अशी क्रिया आहे.

उदाहरणार्थ, जर एखाद्याने वेडेपणा केला असेल, काहीतरी चूक केली असेल आणि तशी चूक परत होऊ नये असे त्या व्यक्तीला खरोखर, मनापासून वाटत असेल, तर तशी विनवणी करण्यामध्ये काही गैर आहे, असे मला वाटत नाही. आणि खरंतर, व्यक्तीने अगदी सच्चेपणाने, आंतरिक सचोटीने तशी विनवणी केली तर तिची ती प्रार्थना मंजूर केली जाण्याची खूपच शक्यता असते. तुम्हाला विरोध करणे हे ईश्वराला आवडते, असा तुम्ही विचार करता कामा नये. त्याला तसे करण्यामध्ये कोणताही रस नसतो. तुमच्यासाठी काय हिताचे आहे हे तुमच्यापेक्षा त्याला अधिक चांगले समजते; परंतु अगदी अनिवार्य असेल तेव्हाच तो तुमच्या अभिलाषेला विरोध करतो. अन्यथा तुम्ही जे काही मागाल ते द्यायला तो नेहमीच तयार असतो.

– श्रीमाताजी
(CWM 08 : 254-255)

साधारणपणे शंभर वर्षे किंवा त्याहूनही अधिक काळ समस्त मानवजात एका आजाराने ग्रासली आहे आणि तो आजार दिवसेंदिवस अधिक पसरत चाललेला दिसत आहे आणि आता तर आपल्या काळात त्याने उग्र रूप धारण केले आहे; त्याला आपण ‘उपयुक्ततावाद’ म्हणतो. माणसं आणि वस्तू, परिस्थिती आणि कृती, उपक्रम या गोष्टी जणूकाही केवळ त्याच दृष्टिकोनातून बघितल्या जातात आणि जोखल्या जातात असे वाटते. जर एखादी गोष्ट उपयुक्त नसेल तर तिला काही मोलच नसते. जे अजिबात उपयुक्त नाही त्यापेक्षा काहीतरी जे उपयुक्त आहे ते निश्चितच अधिक चांगले आहे. पण यासाठी उपयुक्त म्हणजे काय यावर आधी आपले एकमत व्हावे लागेल – उपयुक्त कोणासाठी, उपयुक्त काय आणि कशासाठी ? ह्याची व्याख्या करावी लागेल.

जे मानववंश स्वत:ला सुसंस्कृत समजतात त्यांची अशी समजूत असते की, जे जे काही पैशाला आकर्षित करून घेऊ शकते, पैसा मिळवू शकते, पैसा उत्पन्न करू शकते ते ते उपयुक्त होय. प्रत्येक गोष्टीचा निर्णय व मूल्यमापन आर्थिक दृष्टिकोनातूनच केले जाते. ह्यालाच मी ‘उपयुक्ततावाद’ म्हणते. आणि हा आजार खूपच संसर्गजन्य आहे कारण या रोगापासून अगदी लहान मुलांचासुद्धा बचाव होऊ शकलेला नाही.

ज्या वयात मुलांनी सौंदर्य, महानता, पूर्णत्व यांची स्वप्ने पाहावयास हवीत, त्या वयात आजची मुले केवळ पैशाची स्वप्ने पाहू लागली आहेत आणि त्यांना चिंता आहे ती हा पैसा मिळवायचा कसा ह्याची.

म्हणून जेव्हा ती मुले अभ्यासाचा विचार करीत असतात, तेव्हा सर्वात जास्त ती ह्याच गोष्टीचा विचार करीत असतात की त्यांना काय उपयोगी पडू शकेल. काय केले असता, मोठे झाल्यावर त्यांना त्यातून भरपूर पैसा कमावता येतील.

त्यांच्या लेखी एकच गोष्टी सर्वाधिक महत्त्वाची ठरते ती म्हणजे परीक्षेत यशस्वीरित्या उत्तीर्ण होण्यासाठी स्वत:ची तयारी करणे; कारण पदविका, प्रमाणपत्र, विविध पदव्या यांच्या साहाय्यानेच केवळ त्यांना चांगले हुद्दे प्राप्त होऊ शकतील आणि ते त्यातूनच भरपूर पैसा कमावू शकतील.

त्यांच्या लेखी अभ्यासाचा इतर कोणताच हेतू नसतो, त्याव्यतिरिक्त त्यांना अभ्यासात काही स्वारस्यही नसते.

ज्ञानासाठी ज्ञान मिळविणे, प्रकृती आणि जीवनाचे रहस्य जाणून घेण्यासाठी अभ्यास करणे, जाणिवेचा विकास घडविण्यासाठी स्वतः शिकणे, स्वत:च स्वत:चा स्वामी बनण्यासाठी स्वयंशिस्त लावणे, स्वत:च्या दुर्बलता, अक्षमता व अज्ञान यांवर मात करणे, अधिक उदात्त व विशाल, अधिक उदार व अधिक सच्च्या अशा ध्येयाच्या दिशेने मार्गप्रवण होणे…. या साऱ्याचा आजची मुले क्वचितच विचार करतात आणि या साऱ्या गोष्टींना ते फार आदर्शवादी, कल्पनारम्य असे मानतात. व्यावहारिक बनणे, पैसा कसा कमवावयाचा हे शिकणे आणि त्यासाठी स्वत:ला तयार करणे फक्त ह्याच गोष्टी त्यांच्या लेखी महत्त्वाच्या असतात.

…जे अधिक उन्नत आणि चांगल्या जीवनाची आकांक्षा बाळगतात, जे ज्ञान व पूर्णत्वासाठी तहानलेले असतात, येणाऱ्या अधिक पूर्ण सत्य अशा भविष्यकाळाची जे आतुरतेने वाट पाहतात केवळ अशाच व्यक्ती येथे आम्हाला हव्या आहेत.

इतरांसाठी बाहेरील जगामध्ये भरपूर जागा आहे.

– श्रीमाताजी
(CWM 12 : 351-352)

एक गोष्ट महत्त्वाची आहे; ती अशी की, एक असे म्हातारपण आहे की, जे नुसत्या वाढत जाणाऱ्या वयापेक्षादेखील जास्त भयानक आणि जास्त खरे आहे ते म्हणजे : विकसित होण्याची व प्रगती करण्याची अक्षमता.

ज्या क्षणी तुम्ही वाटचाल करणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही प्रगत होणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही स्वत:ला अधिक चांगले बनविणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही शिकणे वा वाढणे थांबविता, ज्या क्षणी तुम्ही तुमच्यामध्ये रुपांतर घडविणे थांबविता, तेव्हा तुम्ही खरोखरच वृद्ध बनता म्हणजे असे म्हणता येईल, की विघटनाच्या दिशेने तुमचा प्रवास सुरु होतो.

अशी काही तरुण माणसे असतात, की जी वृद्ध असतात आणि असे काही वृद्ध असतात की, जे तरुण असतात. जर तुम्ही तुमच्यामध्ये प्रगतीची आणि रूपांतरणाची ज्वाला सोबत बाळगलीत, जर तुम्ही जागरुकपणे पुढे वाटचाल करण्यासाठी म्हणून, तुम्हाकडे असलेल्या सर्वाचा त्याग करण्याची तयारी ठेवलीत, जर तुम्ही नवीन प्रगतीसाठी, नवीन सुधारणेसाठी, नवीन रुपांतरणासाठी नेहमीच खुले असाल, तर तुम्ही चिरंतन तरुण आहात. पण तुम्ही आजवर जे काही मिळविलेले आहे, त्यामध्ये समाधानी होऊन आरामशीर बसलात तर; आपण ध्येयाप्रत जाऊन पोहोचलो आहोत आणि आता करण्यासारखे काहीही उरले नाही, आता फक्त केलेल्या प्रयत्नांची, कष्टांची फळे चाखावयाची अशी तुमची भावना झाली असेल तर… तर तुमच्या निम्म्याहून अधिक गोवऱ्या स्मशानात जाऊन पोहोचल्या आहेत असे समजावे. खरेतर, हीच आहे जर्जरता आणि हाच आहे मृत्यू.

जे करावयाचे शिल्लक राहिले आहे त्याच्या तुलनेत आजवर जे केले आहे, ते नेहमीच अपुरे असते.

मागे पाहू नका. पुढे, नेहमीच पुढे पाहा आणि नेहमीच पुढे चालत राहा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 238)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते.आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत….

केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, आंतरिक मार्गदर्शक….

जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्ट नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24-25)

स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुमच्या क्षुल्लक अहंकाराला, तुम्ही तुमच्या सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 175)

तुम्हाला जर बरे व्हायचे असेल तर दोन अटी आहेत. पहिली अट अशी की, तुम्ही भीती बाळगता कामा नये, अगदी निर्भय राहायला हवे. आणि दुसरी अट अशी की, तुमच्यामध्ये ईश्वरी संरक्षणाबद्दल पूर्ण श्रद्धा असली पाहिजे. ह्या दोन गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 15: 141)

एकत्व – ११

 

नेहमी ईश्वराच्या अस्तित्वामध्ये जीवन जगा, ते ईश्वरी अस्तित्वच तुमचे संचालन करत आहे आणि तुम्ही जे काही करत आहात ती प्रत्येक गोष्ट त्या ईश्वराकडूनच केली जात आहे ह्याची जाणीव बाळगून जगा. तुमच्या सर्व हालचाली, गतिविधी म्हणजे केवळ मानसिक कृती नव्हे तर, प्रत्येक विचार, प्रत्येक भावना, इतकेच काय पण तुमच्या अगदी सामान्यातिसामान्य, खाण्यापिण्यासारख्या अगदी बाह्य गोष्टीसुद्धा त्या ईश्वरालाच समर्पित करा. जेव्हा तुम्ही जेवण करत असाल तेव्हा, तुम्हाला असे जाणवले पाहिजे की, तो ईश्वरच तुमच्या माध्यमातून अन्नग्रहण करत आहे. जेव्हा अशा रीतीने तुम्ही तुमच्या सगळ्याच हालचाली ह्या एका अस्तित्वामध्ये एकत्रित कराल, तेव्हाच तुम्ही विभिन्नतेमध्ये जगण्याऐवजी एकात्मतेमध्ये जगू लागाल.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 23-24)

जग जसे आहे तसे आहे. जग क्षुद्रतेने आणि अंधकाराने भरलेले आहे; त्याला तुम्हास अस्वस्थ करण्याची मुभा देऊ नका. केवळ ईश्वरच प्रकाश आणि व्यापकता, सत्य आणि करुणा आहे. म्हणून त्या ईश्वराचाच आश्रय घ्या आणि जगाच्या क्षुद्रतेविषयी काळजी करू नका; केवळ ईश्वराची उपस्थिती, त्याच्या शांती व निश्चलतेसहित तुमच्यामध्ये बाळगा.

– श्रीमाताजी
(White roses : 02)

एकत्व – १०

 

जागतिक परिस्थितीबद्दल श्रीमाताजी येथे बोलत आहेत. – मला आता खात्रीच पटली आहे की, हा सगळा जो गोंधळ चालू आहे तो, आपण आपले दैनंदिन जीवन कसे जगले पाहिजे हे शिकविण्यासाठीच चाललेला आहे. म्हणजे असे की, काय घडणार आहे, कसे होईल, याविषयी व्यग्र न राहता, व्यक्तिने जे कर्म करावयास हवे त्यामध्ये स्वतःला रोज व्यस्त ठेवले पाहिजे. सगळे विचार, पूर्वनियोजनं, व्यवस्था, सारे सारे काही हे या अव्यवस्थेलाच अनुकूल आहेत.

ऊर्ध्वमुख होत, अभीप्सा बाळगत क्षणाक्षणाला जीवन जगणे, त्या त्या क्षणाला जी गोष्ट करणे आवश्यक आहे, केवळ त्याकडेच लक्ष पुरविणे आणि बाकी सारे काही त्या सर्व-साक्षी चेतनेला ठरवू देणे… कितीही व्यापक दृष्टी असली तरी, ह्या गोष्टी आपल्याला कळू शकत नाहीत. आपण त्या आंशिकरित्याच जाणू शकतो, अगदीच आंशिकपणे जाणू शकतो. त्यामुळे आपले लक्ष इकडे किंवा तिकडे वेधले जाते, आणि आणखीही इतर काही गोष्टी असतातच. भयंकर आणि हानीकारक गोष्टींना जास्त महत्त्व दिल्यामुळे, आपण त्यांना अधिकच बळकटी देत असतो.

जेव्हा तुमच्यावर अशा गोंधळाचा आणि अशा प्रकारच्या अव्यवस्थेचा आघात होतो तेव्हा, तुम्ही फक्त एकच गोष्ट केली पाहिजे. जेथे तुम्हाला केवळ एकमेवाद्वितीयाचेच, एकमेव चेतनेचे, एकमेव शक्तिचे दर्शन घडेल अशा चेतनेमध्ये प्रवेश करावयाचा – तेथे केवळ एकमेव एकात्मता आहे. जे जे सर्व काही घडत आहे ते ह्या एकात्मतेमध्येच घडत आहे. आपली सारी क्षुल्लक दृष्टी, जाणकारी, आपली मते हे सगळं सगळं त्या चेतनेच्या तुलनेमध्ये काहीच नाही, या सर्वाला व्यापून असणाऱ्या चेतनेच्या तुलनेमध्ये हे अगदीच अणुवत आहे. त्यामुळे, ज्या कोणाकडे थोडीशीही तर्कबुद्धी असेल त्याला हे समजून येईल की, स्वतंत्र अस्तित्वं निर्माण का झाली. व्यक्तिला हे कळू शकेल की, अभीप्सा बाळगण्यासाठी, अभीप्सा असावी ह्याचसाठी, आत्मदान, समर्पणप्रक्रिया असावी ह्याचसाठी, विश्वास आणि श्रद्धा बाळगता यावी ह्याचसाठी स्वतंत्र व्यक्तित्वं अस्तित्वात आली. वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वांची घडण झाली ती ह्याच कारणासाठी. आणि मग तुम्ही काय करावयास हवे ? तर संपूर्ण सचोटीने, तीव्रतेने तुम्ही तो ईश्वरच व्हावयास हवे.. हेच केवळ आवश्यक आहे.

हीच एकमेव आवश्यक अशी गोष्ट आहे, ही एकच गोष्ट टिकून राहणारी आहे. बाकी सारे काही – स्वप्नातल्याप्रमाणे क्षणभंगुर आहे.
– श्रीमाताजी
(CWM 11 : 184-185)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

भीती म्हणजे मूक संमती असते. तुम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीची भीती बाळगता तेव्हा, तिची संभाव्यता तुम्ही मान्य करता असा त्याचा अर्थ होतो आणि अशा प्रकारे तुम्ही तिचे हात बळकट करत असता. ती अवचेतन संमती असते असे म्हणता येईल. भीतीवर अनेक मार्गांनी मात करता येते. धैर्याचा, श्रद्धेचा, ज्ञानाचा मार्ग हे त्यापैकी काही मार्ग आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14:243-244)