Posts

शांत, विश्रांतियुक्त झोप घेण्यासंबंधीची ही रात्रीची तपस्या झाल्यानंतर आता दिवसभर करण्याची तपस्या पाहू. Read more

सौंदर्याची तपस्या किंवा साधना आपणांस भौतिक जीवनाच्या तपस्येच्या द्वारा कर्मस्वातंत्र्याप्रत घेऊन जाईल. त्याचा पायाभूत कार्यक्रम म्हणजे सुंदर बांध्याचे, सुसंवादी ठेवणीचे शरीर घडविणे हा असेल. तसेच हालचालींमध्ये चपळ व लवचीक, कृतींमध्ये सामर्थ्यसंपन्न आणि आरोग्य व इंद्रियांच्या कार्याबाबत सुदृढ असे शरीर घडविणे हा असेल. हे सर्व साध्य करून घेण्यासाठी काही विशिष्ट सवयी लावून घेऊन, भौतिक जीवन सुसंघटित करण्यासाठी त्या सवयींचा साहाय्यक म्हणून उपयोग करून घेणे सामान्यतः योग्य ठरेल. कारण नियमित आखीव कार्यक्रमाच्या चौकटीत आपले शरीर अधिक सुगमतेने कार्य करू शकते. Read more

(श्रीमाताजी ‘चार तपस्या व चार मुक्ती’ या पुस्तकातील काही भाग वाचतात.) अंध:कार आणि अचेतनता यांच्यावर ईश्वरी प्रेमशक्तीने आपली पाखर घातली,….वनस्पती-जगतामध्ये या प्रेमाचा स्पष्टपणे प्रादुर्भाव झालेला असतो; आपल्या वाढीसाठी अधिक प्रकाश, अधिक हवा आणि अधिक मोकळी जागा मिळविण्याची वनस्पती व वृक्ष यांच्यामध्ये जी गरज दिसते, ते प्रेमाचेच स्वरूप आहे. फुलांमध्ये दिसणारे त्याचे स्वरूप म्हणजे त्यांच्या प्रेमळ बहरण्यामध्ये सौंदर्य आणि सुगंध यांची उधळण. Read more

इतर काय करतात किंवा ते कोणत्या चुका करतात याच्याशी तुमचा संबंध असता कामा नये, तर स्वत:चे दोष, असावधानता यांकडेच तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे आणि ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुसरी एक सुजाण सूचना अशी की, अशा कोणत्याही गोष्टी, ज्या प्रत्यक्ष कृतीमध्ये कार्यान्वित होत नाहीत, अशा गोष्टींचे वर्णन करताना आपले शब्दपांडित्य खर्च करू नये. कमी बोलावे आणि उत्तम कृती करावी. पोकळ शब्द हे सुगंध नसलेल्या फुलाप्रमाणे असतात.

तुम्ही तुमच्या स्वत:च्या दोषांनी, त्रुटींनी नाउमेद होऊ नका. रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्येसुद्धा अतिशय पवित्र फूल उमललेले आढळून येते. मथितार्थ असा की, ज्यामधून विशुद्ध अशा साक्षात्काराचा जन्मच होणार नाही एवढे त्याज्य काहीही नसते. भूतकाळ कसा का असेना, हातून कोणत्याही चुका का घडलेल्या असेना, माणूस किती का घोर अज्ञानात जगलेला असेना, तरीही प्रत्येकाच्या अंत:करणात खोलवर एक परमोच्च असे पावित्र्य, शुद्धता दडलेली असते की ज्याचे सुंदर अशा साक्षात्कारामध्ये रूपांतर होऊ शकते. केवळ त्याचाच विचार करा, त्यावरच लक्ष केंद्रित करा, इतर सर्व अडचणी, अडथळे, संकटे यांची चिंता करू नका.

जे तुम्ही बनू इच्छिता केवळ त्यावरच लक्ष केंद्रित करा, तुम्ही जे बनू इच्छित नाही ते संपूर्णपणे, शक्य तितके नि:शेषतया विसरण्याचा प्रयत्न करा.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 215)

मूल अगदी लहान असल्यापासूनच जोपासायला हवा असा एक गुण आहे, तो म्हणजे अस्वस्थ करणारी भावना (uneasiness). जेव्हा एखादी चुकीची गोष्ट हातून घडते तेव्हा स्वाभाविकपणे मनात निर्माण होणारी नैतिक असमतोलाची अस्वस्थ करणारी भावना! अमुक अमुक गोष्टी करावयाच्या नाहीत असे सांगितले असते म्हणून नव्हे किंवा शिक्षेला घाबरूनही नव्हे, तर ती अस्वस्थता स्वाभाविकपणे मनात उत्पन्न होते. उदाहरणार्थ, एखादे मूल खोड्या करून जेव्हा त्याच्या वर्गमित्राला इजा करते तेव्हा, जर ते सहज, स्वाभाविक अशा अवस्थेत असेल तर त्याला अस्वस्थ वाटते. त्याला त्याच्या अस्तित्वाच्या खोल आत कुठेतरी दुःख जाणवते, कारण त्याने जे काही केलेले असते ते त्याच्या आंतरिक सत्याच्या विरूद्ध असते.

व्यक्ती कितीही शिकलेली असो, कितीही विचार करणारी असो, तरीही अंतरंगात खोलवर असे काहीतरी असते की ज्याला पूर्णत्वाची, महानतेची, सत्याची संवेदना असते आणि या सत्याला विरोध करणाऱ्या सर्व प्रकारच्या गतिविधींची दु:खदायक संवेदना असते. आणि अवतीभोवतीच्या निंदनीय अशा उदाहरणांमुळे, बाह्य वातावरणामुळे ते मूल बिघडलेले नसेल, म्हणजेच ते त्याच्या सहज स्वाभाविक अवस्थेमध्ये असेल, तर जेव्हा त्याच्याकडून त्याच्या अस्तित्वाच्या सत्याच्या विरोधी असे काही घडते तेव्हा कोणीही काहीही न सांगता देखील, त्या मुलाला एक प्रकारची अस्वस्थता जाणवते. आणि म्हणून त्या मुलामध्ये टिकून असलेल्या ह्या अस्तित्वाच्या सत्यावरच त्याच्या प्रगतीसाठीचे पुढचे सारे प्रयत्न आधारले गेले पाहिजेत.

…..केवळ एकच सच्चा मार्गदर्शक असतो, तो म्हणजे आंतरिक गुरु, मार्गदर्शक. जर एखाद्या मुलाला अनर्थकारक असे शिक्षण मिळाले तर, त्या शिक्षणाद्वारे ही छोटीशी आंतरिक गोष्टी नाहीशी करण्याचा जोरकस प्रयत्न होतो. आणि कधीकधी हा प्रयत्न इतका यशस्वी होतो की, त्यामुळे त्या आंतरिक मार्गदर्शकाबरोबरचा सर्व संपर्कच व्यक्ती हरवून बसते. आणि त्याचबरोबर चांगले आणि वाईट यांतील फरक ओळखण्याची शक्तीही ती व्यक्ती गमावून बसते. म्हणून मी सांगत असते की, अगदी बालपणापासूनच मुलांना आंतरिक वास्तवाची, अस्तित्वाची जाणीव करून द्यावयास हवी. हे अस्तित्व त्यांच्या अंतरंगात आहे, पृथ्वीच्या अंतर्यामी आहे, विश्वाच्या अंतर्यामी आहे आणि ती मुलं, ही पृथ्वी, हे विश्व ह्या आंतरिक सत्याचे कार्य या नात्यानेच अस्तित्वात आहेत, आणि त्याविना कशाचेच अस्तित्व असू शकणार नाही. आणि हाच विश्वाचा खरा आधार असल्याने, स्वाभाविकपणे हीच गोष्ट विजयी होणार आहे. आणि जोवर ही गोष्ट अस्तित्वात आहे तोवर तिच्या विरोधी अशी कोणतीच गोष्ट टिकून राहू शकणार नाही.

लहान मुलाला तात्विक स्पष्टीकरण देणे गरजेचे नाही, पण त्याला ह्या आंतरिक स्वास्थ्याच्या, समाधानाच्या भावनेचा अनुभव द्यायला हवा. जेव्हा एखादी चुकीची, विरोधी गोष्ट करण्यापासून ती आंतरिक छोटीशी गोष्ट त्याला अडविते, तेव्हा त्याला जो मनस्वी आनंद होतो त्याची जाणीव त्याला करून द्यायला हवी. आणि अशा प्रकारच्या अनुभवावरच सर्व प्रकारचे शिक्षण आधारित असावे. मुलाची अशी धारणा व्हायला हवी की, जर त्याला हे आंतरिक समाधान मिळाले नाही तर, काहीच टिकू शकणार नाही कारण आंतरिक समाधान हीच एकमेव गोष्ट चिरस्थायी आहे.

– श्रीमाताजी
(CWM 04 : 24)