Tag Archive for: व्यावहारिक जीवन

लोक काय करतात, काय विचार करतात किंवा काय म्हणतात यामुळे व्यथित होणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे आणि व्यक्तीचे संपूर्ण अस्तित्व, फक्त ईश्वराच्याच प्रभावाखाली आले नसल्याचा आणि ते पूर्णतः ईश्वराभिमुख झाले नसल्याचा तो पुरावा आहे. मग अशा वेळी, प्रेम, सहिष्णुता, समंजसपणा, धीर या सगळ्या गोष्टींनी युक्त असे ईश्वरी वातावरण स्वतःबरोबर बाळगण्याऐवजी, दुसऱ्याच्या अहंकाराला प्रत्युत्तर म्हणून कठोरपणा आणि दुखावलेल्या भावनांनिशी व्यक्तीचा अहंकारच स्वत: बाहेर उफाळून येतो आणि त्यामुळे विसंवाद अधिकच वाढीस लागतो. ईश्वराचे विभिन्न व्यक्तींबाबत विविध पद्धतीने कार्य चालू असते, हे अहंकाराला कधीच उमगत नाही आणि व्यक्तीने स्वतःच्या अहंकारी दृष्टिकोनातून गोष्टींचे मूल्यमापन करणे, ही एक अशी मोठी चूक असते की ज्यामुळे, गोंधळच वाढीला लागतो. आपण आवेगाने आणि असहिष्णुतेने जे जे काही करतो ते ईश्वरी असू शकत नाही कारण ‘ईश्वर’ शांती आणि सुसंवादामध्येच कार्य करतो.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 279)

मी याआधीही सांगितले आहे की, भांडणतंटे, एखाद्याशी संबंध तोडून टाकणे हा साधनेचा भाग असू शकत नाही; ज्या संघर्षाविषयी आणि मतभेदांविषयी तुम्ही बोलत आहात ते म्हणजे बाह्य जगामध्ये, प्राणिक अहंकार (vital ego) जसे परस्परांना भिडतात, तसलाच प्रकार आहे. …एका साधकाचे दुसऱ्या साधकाशी जे संबंध असतात त्या नात्यामध्ये सुसंवाद, सदिच्छा, सहिष्णुता, समता या आवश्यक अशा आदर्श गोष्टी आहेत. व्यक्तीने सगळ्यांमध्ये मिसळलेच पाहिजे असे नाही, पण जर का व्यक्ती आपलीआपली एकटीच राहात असेल तर तो एकांतवास फक्त साधनेसाठीच असला पाहिजे, इतर कोणत्या प्रेरणा त्यामागे असता कामा नयेत; तसेच त्यात श्रेष्ठत्वाची किंवा इतरांविषयीच्या तिरस्काराची भावनादेखील असता कामा नये.

…एखाद्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने जर त्याच्यामध्ये किंवा तिच्यामध्ये कोणत्याही कारणाने, अवांछित प्राणिक भावना उदयाला येत असल्याचे आढळले तर, जोपर्यंत तो किंवा ती या दुर्बलतेवर मात करत नाही तोपर्यंत, एक विवेकी बाब म्हणून, तो किंवा ती त्या संगतीपासून स्वतःला निश्चितपणे दूर करू शकतात. परंतु सार्वजनिक संबंध तोडून टाकणे, संबंध वर्ज्य करण्याचे अवडंबर करणे, या व अशासारख्या गोष्टींचा समावेश आवश्यक बाबींमध्ये करण्यात आलेला नाही. इतर भावनांप्रमाणेच विश्वासघाताच्या भावनांवरदेखील मात केली पाहिजे. या गोष्टींबाबत पुष्कळसा वैचारिक गोंधळ असतो; कारण त्यामध्ये प्राणिक गोष्टींचा शिरकाव होतो आणि गोष्टींकडे पाहण्याच्या योग्य दृष्टिकोनामध्ये बाधा निर्माण होते. शुद्ध आध्यात्मिक प्रेरणेतून, प्रामाणिकपणे केली जाणारी गोष्टच फक्त योगसुसंगत असते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347-348)

भांडणतंटे आणि संघर्ष हे योगाची बैठक नसल्याचे लक्षण आहे आणि ज्यांना खरोखरच योगसाधना करण्याची प्रामाणिक इच्छा आहे त्यांनी या गोष्टींच्या वर उठायला शिकले पाहिजे. कलह, वादंग वा भांडणाचे कोणतेही कारण नसताना संघर्ष न करणे हे अगदीच सोपे आहे; पण जेव्हा असे कोणतेतरी कारण असते आणि दुसरी बाजू अगदी असह्य असते किंवा अविवेकी असते तेव्हा व्यक्तीला स्वतःच्या प्राणिक प्रकृतीच्या वर उठण्याची संधी मिळते.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 347)

मला भांडणे मंजूर नाहीत, हे तुम्ही कधीही विसरता कामा नये आणि दोन्ही बाजू या सारख्याच चुकीच्या असतात, हे तुम्ही कायम लक्षात घेतले पाहिजे. आपल्या भावना, अग्रक्रम, पसंती-नापसंती, आपले आवेग यांवर काबू राखणे ही येथील (आश्रमातील) अनिवार्य अशी शिस्त आहे.

*

व्यक्तीने भांडणाला स्वतःहून सुरुवात केली नसली तरी भांडण करणे हे नेहमीच चुकीचे असते.

*

जेव्हा तुम्ही भांडणाला सुरुवात करता तेव्हा, तुम्ही जणू काही ईश्वरी कार्याविरोधात युद्ध पुकारता.

*

हो, भांडणे करणे ही अगदी दुःखद गोष्ट आहे – त्यांच्यामुळे कार्यामध्ये भयंकर बाधा येते आणि त्यामुळे प्रत्येक गोष्टच अधिक कठीण होऊन जाते.

*

व्यक्तीला स्वतःच्या दोषांबद्दल वाईट वाटणे हे, एक वेळ गरज पडल्यास, स्वतःच्या दोषांमध्ये सुधारणा करण्याच्या संकल्पाचे दृढीकरण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

परंतु इतरांच्या दुराचरणामुळे व्यक्तीला स्वतःला अपमानित झाल्यासारखे वाटणे, याचा आध्यात्मिक जीवनाशी किंवा ईश्वराच्या सेवेशी काही संबंध नाही.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 262-264)

सहानुभूतीपूर्वक आणि निःपक्षपातीपणे इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, ते न्याहाळणे यामध्ये काही अपाय नसतो – मात्र उगाचच टिका करत राहणे, दोष शोधणे आणि इतरांची निंदानालस्ती करणे (बहुतांशी वेळा चुकीच्या पद्धतीने) यामुळे त्या व्यक्तीसाठी आणि इतरांसाठी देखील वाईट वातावरण तयार होते. आणि हा कठोरपणा आणि एवढी ठाशीव निंदानालस्ती कशासाठी? प्रत्येक व्यक्तीमध्ये तिचे स्वतःचे दोष नसतात का? मग असे असताना, दुसऱ्यांचे दोष पाहायचे आणि त्यांची निंदानालस्ती करायची यासाठी इतका उतावीळपणा कशासाठी बरे? कधीकधी एखाद्या व्यक्तीला दुसऱ्याची पारख करावी लागते पण ती घाईघाईने किंवा छिद्रान्वेषी वृत्तीने करता कामा नये.

*

स्वतःच्या तशाच चुका कुशलतेने टाळायचे सोडून, लोकांनी काय करता कामा नये किंवा काय केले पाहिजे, हे सांगण्यामध्ये आणि त्यांच्या कामावर कठोर टिका करण्यामध्ये, माणसं नेहमीच अधिक तत्पर असतात. खरोखरच व्यक्तीला बरेचदा आपल्या स्वतःमध्ये असलेले दोष दिसत नाहीत, पण इतरांमधील दोष मात्र अगदी सहजतेने दिसतात. हे आणि ज्यांचा तुम्ही उल्लेख केलात ते दोष मानवी प्रकृतीमध्ये सर्वत्र आढळून येतात आणि त्यांच्यापासून क्वचितच कोणाची सुटका होते. मानवी मन हे खरंतर स्वतःविषयी जागरूक नसते आणि म्हणूनच व्यक्तीने नेहमीच आपल्या स्वतःमध्ये काय आहे ते पाहणे, त्याचे निरीक्षण करणे आणि अधिकाधिक जागृत होणे, हे योगामध्ये आवश्यक असते.

*

प्रत्येकामध्ये असणाऱ्या क्षुद्र अहंकाराला, दुसऱ्यामधील (खरे किंवा खोटे) दोष शोधणे आणि ते दोष खरे आहेत की खोटे आहेत याची पर्वा न करता, त्याविषयी बोलत राहणे आवडते. वास्तविक, अहंकाराला त्यांच्याबाबतीत निर्णय देण्याचा अधिकारच नसतो कारण अहंकारापाशी योग्य दृष्टिकोन किंवा योग्य वृत्ती नसते. स्थिर, निःस्वार्थी, निःपक्षपाती असणारा आणि सर्वांविषयी करुणा व प्रेम बाळगणारा ‘आत्मा’ च प्रत्येक व्यक्तीमधील सामर्थ्य व दुर्बलता योग्य प्रकारे पाहू शकतो, जोखू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 351-352)

एखादी व्यक्ती जोपर्यंत तुमच्या कल्पना आणि तुमच्या मतांशी सहमत होत नाही तसेच तिची कार्यपद्धती तुमच्या कार्यपद्धतीशी मेळ राखणारी नसते, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीशी सुसंवाद साधू शकत नाही, त्यातून सर्व त्रास निर्माण होतात.

तुम्ही तुमची चेतना अधिक विशाल केली पाहिजे आणि हे लक्षात घेतले पाहिजे की, प्रत्येक व्यक्तीचे तिचे तिचे स्वतःचे असे काही नियम असतात. सर्वांच्या इच्छा आणि कृती अगदी एकसारख्याच असल्या पाहिजेत, असा अट्टहास करता कामा नये; तर वैयक्तिक इच्छांच्या आनंददायी एकीकरणामधून, सुसंवाद आणि समजुतदारपणाचा आधार शोधणे आवश्यक असते.

*

आपला विरोधक कसा चुकीचा आहे आणि आपण कसे बरोबर आहोत, हे सिद्ध करण्यातील आपला उतावीळपणा हा प्रगतिशील सुसंवाद प्रस्थापित करण्यातील एक महत्त्वाचा अडथळा असतो.

*

मानसिक संकुचितपणा हा मनुष्यमात्रांमध्ये सर्वात जास्त फैलावलेला आजार आहे. त्यांच्या स्वतःच्या जाणिवेमध्ये जे आहे तेवढेच त्यांना समजू शकते आणि त्याखेरीज अन्य काहीही त्यांना सहन होत नाही.

*

जी व्यक्ती केवळ स्वतःचेच मत विचारात घेते ती अधिकाधिक संकुचित होत जाते.

*

प्रत्येकालाच समाधान देऊ शकेल असा प्रत्येक समस्येवर एक उपाय असतो; परंतु हा आदर्श उपाय शोधण्यासाठी, आपले स्वतःचेच अग्रक्रम इतरांवर लादण्याची इच्छा मनाशी बाळगून तसा प्रयत्न करता कामा नये तर, प्रत्येकालाच त्याची आवश्यकता वाटली पाहिजे.

यासाठी तुमची चेतना विशाल करा आणि सर्वांच्या समाधानाची आस बाळगा.

*

तुम्ही प्रश्नाकडे केवळ तुमच्याच बाजूने पाहता, पण तुम्हाला जर तुमची चेतना विशाल करायची असेल तर, सर्वच बाजूंकडे निःपक्षपातीपणे पाहणे कधीही चांगले. त्यानंतर तुम्हाला असे आढळून येईल की, या दृष्टिकोनाचे खूप फायदे आहेत.

– श्रीमाताजी
(CWM 14 : 266-268)

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते व्यक्तीला दिसते, तिचे गुण दिसतात; आणि कधीकधी तर त्या व्यक्तीमध्ये नसलेले गुणही दिसतात; किंवा तिला जेवढे ते वाटत असतात तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. परंतु नंतर मात्र अति-परिचयामुळे, प्रकृतीमधील ज्या घटकांविषयी आत्मीयता नसते असे इतर घटकदेखील जाणवू लागतात. कधीकधी कल्पनांमध्ये संघर्ष असतो किंवा परस्परविरोधी भावना असतात किंवा कधी कधी दोघांच्या अहंकारांमध्ये संघर्ष असतो. शाश्वत गाढ प्रेम किंवा घट्ट मैत्री असेल तर मात्र परस्परसंबंधांतील या अडचणींवर मात करता येते आणि दोघांमध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य निर्माण होते; पण बहुधा हे असे असत नाही किंवा परस्परांमधील मतभेद इतके विकोपाला गेलेले असतात की, या सामंजस्याच्या वृत्तीला छेद बसतो किंवा कधीकधी अहंकार इतका दुखावला जातो की, त्यामुळे ती सामंजस्याची वृत्ती संकोच पावते. आणि मग अशा वेळी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे अधिकच काटेकोरपणे निरीक्षण करू लागण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याचे दोष अतिरंजित करण्याची किंवा वस्तुतः दुसरी व्यक्ती दुराचारी नसली वा वाईट चारित्र्याची नसली तरीही तिच्यावर तसे दोषारोप करण्याची शक्यता असते; पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाण्याची शक्यता असते, सद्भावना या दुर्भावनांमध्ये, दुरावलेपणामध्ये, कधीकधी तर शत्रुत्वामध्ये किंवा हाडवैरामध्येसुद्धा बदलण्याची शक्यता असते. मानवी जीवनात हे नेहमीच घडत असते. याच्या अगदी उलटदेखील घडते, परंतु ते मात्र इतक्या सहजासहजी घडत नाही. म्हणजे वाईट भावनांचे परिवर्तन सद्भावनांमध्ये, किंवा विरोधाचे रूपांतर सुसंवादामध्ये होणे मात्र इतक्या सहजपणाने घडत नाही. अर्थात दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे वाईट मत किंवा वाईट भावना ही काही या एकाच कारणामुळे निर्माण होते असे नाही. स्वाभाविक तिरस्कार, मत्सर, परस्परांच्या आड येणारे हितसंबंध इ. अनेक कारणांमुळे हे घडून येते.

व्यक्तीने इतरांकडे शांत-स्थिर भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे; गुण वा दोष यांपैकी कशावरच अतिरिक्त भर देता कामा नये; कोणतीही वाईट भावना नको किंवा कोणता गैरसमज नको वा अन्याय नको; तर एका स्थिर मनाने आणि दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 299-300)

एखादी व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती अशी अपेक्षा करते की, त्या दुसऱ्या व्यक्तीनेही माझ्यावर प्रेम केले पाहिजे आणि ते प्रेमदेखील तिने तिच्या पद्धतीने व तिच्या स्वभावानुसार करता कामा नये तर, माझ्या पद्धतीने व माझ्या इच्छांचे समाधान होईल अशा पद्धतीनेच केले पाहिजे, आणि सहसा व्यक्ती हीच चूक पहिल्यांदा करते. सर्व मानवी दुःखांचे, निराशांचे, हालअपेष्टांचे हेच प्रमुख कारण आहे.

कोणतीही सौदेबाजी न करता, स्वतःला देऊ करणे म्हणजे प्रेम; अन्यथा ते प्रेमच नव्हे. परंतु हे क्वचितच कोणाला उमगले आहे आणि त्याहूनही कमी प्रमाणात प्रत्यक्षात आचरले गेले आहे.

– श्रीमाताजी
(CWM 17 : 370)

असे एक प्रेम असते की, ज्यामध्ये भावना या चढत्यावाढत्या ग्रहणशीलतेनिशी आणि वाढत्या एकात्मतेनिशी ईश्वराभिमुख झालेल्या असतात, हे प्रेम ‘ईश्वरा’कडून जे काही प्राप्त होत असते त्याचा इतरांवर वर्षाव करत असते, पण तो वर्षाव कोणत्याही परतफेडीची अपेक्षा न करता, अगदी मुक्तपणे करत असते. तुम्ही तसे करण्यास जर सक्षम असाल तर तेव्हा मग, तो प्रेमाचा सर्वोच्च आणि सर्वाधिक समाधान देणारा मार्ग असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 291)

खरे प्रेम एकच असते आणि ते प्रेम म्हणजे ‘ईश्वरी प्रेम’; प्रेमाची इतर सर्व रूपं म्हणजे त्या ईश्वरी प्रेमाची विरूपे असतात, त्या प्रेमाची संकुचित, मर्यादित रूपं असतात. अगदी भक्ताचे देवावरील प्रेम हे सुद्धा एक प्रकारे प्रेमाचा ऱ्हासच असतो, कारण ते बरेचदा अहंकाराने कलंकित झालेले असते. परंतु, व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासारखी बनण्याकडे तिचा स्वाभाविक कल असतो त्यामुळे, भक्त जर का प्रामाणिक असेल तर, तो ज्याची पूजाअर्चना करतो त्या ‘ईश्वरा’सारखा तो बनू लागतो आणि अशा प्रकारे त्याचे प्रेम हे अधिकाधिक शुद्ध होत जाते. व्यक्तीचे ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती ‘ईश्वर’च आहे असे समजून त्याची भक्ती करावी, हा एक उपाय म्हणून बरेचदा सांगितला जातो, पण जोवर व्यक्तीचे हृदय आणि विचार हे विशुद्ध होत नाहीत तोवर ही गोष्ट त्याला खेदजनक अधोगतीकडे घेऊन जाण्याची शक्यता असते.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 297)