Posts

उच्च आणि सत्यतर हिंदुधर्मामध्ये ही दोन प्रकार आहेत – सांप्रदायिक आणि असांप्रदायिक, विध्वंसक आणि समन्वयात्मक. एक स्वत:ला कोणत्यातरी एकाच पैलूला जखडून ठेवतो आणि दुसरा ‘सर्वात्मका’ला मिळविण्याची खटपट करतो.

धर्मविषयक सांप्रदायिक संकल्पना
एखादी संकल्पना, एखादा अनुभव, एखादे मत वा मतप्रणाली, एखादी प्रवृत्ती, कल, एक विशिष्ट गुरु, एखादा निवडक अवतार यांच्याबद्दलच्या राजसिक किंवा तामसिक आसक्तीमधून सांप्रदायिक संकल्पनांचा उदय होतो. त्यांविषयी असलेली ही बांधिलकी असहिष्णु, गर्विष्ठ असते. ती आपल्या तोकड्या ज्ञानाविषयी अभिमान बाळगणारी आणि आपल्याकडे नसलेल्या ज्ञानाविषयी कुत्सित भूमिका घेणारी असते. ती दुसऱ्यांचे कुसंस्कार, अंधश्रद्धा याविषयी बडबड करत राहते आणि स्वत:चे कुसंस्कार आणि अंधश्रद्धा यांविषयी अंध असते. किंवा ती संकल्पना म्हणते, ”माझे गुरु हेच तेवढे खरे एकमेव गुरु आहेत आणि इतर एकतर भोंदू आहेत किंवा कनिष्ठ प्रतीचे आहेत,” किंवा “माझी मानसिकताच फक्त योग्य आहे आणि जे माझा मार्ग अनुसरत नाहीत ते मूर्ख आहेत किंवा पढिक वा अप्रामाणिक आहेत,” किंवा ”माझा अवतार हाच खराखुरा ईश्वर आहे आणि इतर सर्व कनिष्ठ आविष्कार आहेत.” किंवा ”माझी इष्ट देवता हीच ईश्वर आहे आणि इतर देवता ह्या केवळ तिची आविष्करणं आहेत.”

धर्मविषयक समन्वयी संकल्पना
जेव्हा जीव अधिकाधिक उन्नत होत जातो, तेव्हाही तो त्याच्या संकल्पना, अनुभव, मते, प्रकृती, गुरु, इष्ट देवता यांचे अग्रक्रमाने अनुसरण करतो, पण आता तो इतरांकडे अज्ञानी आणि वर्जक दृष्टीने पाहत नाही. तो म्हणतो, “ईश्वराकडे जाणारे अनेक मार्ग आहेत आणि सर्वच मार्ग समानतेनेच ईश्वराकडे जाऊन पोहोचतात. सर्व माणसं, मग ती गुन्हेगार असू देत वा नास्तिक असू देत, सर्वच माझे साधनेतील बंधू आहेत आणि तो ईश्वर प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मार्गाने त्या ‘एकमेवाद्वितीया’कडे घेऊन जात आहे.”

मात्र जेव्हा पूर्ण ज्ञान उदित होते तेव्हा तो स्वत:मध्ये सर्वच अनुभव कवळून घेतो. त्याला उमगते की, सर्वच संकल्पना सत्य आहेत, सर्व मतमतांतरं उपयुक्त आहेत; सर्व अनुभव आणि वृत्तीप्रवृत्ती ह्या वैश्विक अनुभव आणि पूर्णता मिळविण्याची साधने आणि स्तर आहेत; सर्व गुरु हे त्या एका आणि एकमेव गुरुची अपूर्ण माध्यमं वा अवतार आहेत; सर्व इष्टदेवता आणि अवतार हे ईश्वरच आहेत…..

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 551)

संक्रमणकाळात विचारांची अधिकच आवश्यकता असते. क्रांतिकारी कालखंड दोन प्रकारच्या अविचारी, कोणतेही आकलन नसलेल्या, कोणताही विचारविमर्श न केलेल्या मनांना जन्म देतो; एक असे मन की जे जुन्या गोष्टींना, केवळ ते जुने आहे म्हणून चिकटून राहते आणि दुसरे मन अमुक एक गोष्ट केवळ नवीन आहे म्हणून त्याच्या पाठीमागे वेड्यासारखे धावत सुटते. या दोहोंमध्ये स्वयंघोषित मध्यममार्गी माणूस उभा राहतो. तो म्हणतो, जुन्यामधले काहीतरी आणि नवीन मधलेही काहीतरी असे दोन्ही असू दे. या दोन टोकांच्या माणसांपेक्षा हा मध्यममार्गी माणूस काही कमी अविचारी नसतो. तो मध्यममार्गाच्या सूत्राच्या आणाभाका घेतो आणि अशक्य असा ताळमेळ घालू पाहतो. ‘जुन्या बाटल्यांमध्ये नवीन वाईन भरता येत नाही’ असे जेव्हा येशू ख्रिस्त म्हणतात तेव्हा त्याच्या म्हणण्याचा हाच आशय असतो.

विचार केव्हाही एखादे सूत्र ठरवीत नाही, आधीच अंदाज बांधत नाही, तर तो प्रत्येक गोष्टीविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करतो, प्रत्येक गोष्टीचे मोजमाप करतो. जर एखादा माणूस म्हणेल की, प्रबुद्ध युरोपाच्या मार्गानुसार तुमच्या सर्व सवयी, संकल्पना बदला तर विचार उत्तर देईल, ”मला आधी विचार करू दे. युरोप हा प्रबुद्ध आहे आणि भारत अडाणी आहे असे मी का गृहीत धरू? कदाचित असेही असू शकेल की, युरोपियन लोक हेच खरे अडाणी असू शकतील आणि भारतीय ज्ञानामध्ये खरेखुरे तथ्य असेल. मला शोधले पाहिजे.” आणि दुसऱ्या बाजूने जर एखादा माणूस म्हणेल, ”भारतीय बन आणि भारतीयांप्रमाणे वाग,” तर विचार म्हणेल, ”भारतीय बनण्यासाठी मला भारतीयांप्रमाणेच वागावे लागेल का याविषयी माझ्या मनात संभ्रम आहे. कदाचित असेही असू शकेल की, भारतीयांना जे अपेक्षित नव्हते तेच आत्ताच्या काळातील या देशातील माणसे बनली असतील. भारतीय संस्कृतीच्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये भारतीय कसे होते हे मला शोधलेच पाहिजे आणि संस्कृतीमधील शाश्वत काय आणि तात्पुरते काय ह्याचा शोध मला घेतलाच पाहिजे. असेही शक्य आहे की, आम्ही गमावलेल्या काही खऱ्याखुऱ्या भारतीय गोष्टी युरोपयिनांकडे असू शकतील.” भारतीय असणे चांगलेच आहे, पण भारतीय असणे म्हणजे ज्ञानाने भारतीय असणे होय, केवळ पूर्वग्रहाने नव्हे.

मानवी समाजाच्या रक्षणासाठी, तसेच व्यक्तीच्या आणि मानवी समूहाच्या परिपूर्णतेसाठी नेमका कोणता आचार उत्तम आहे हे विचार, विवेक आणि ज्ञान यांच्या साहाय्याने ठरविणे ह्यावरच हिंदुधर्माची उभारणी करण्यात आलेली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 01 : 499-500)

बाळाची संकल्पपूर्वक गर्भधारणा ही अतिशय दुर्मीळ अशी बाब आहे. अगणित पालकांमधील अगदी थोडेच पालक असे असतात की ज्यांना बाळ कसे असावे याची थोडीतरी पर्वा असते, अनेकांना हे देखील माहीत नसते की ते जसे आहेत त्यावर बाळ कसे असणार हे अवलंबून आहे. काही थोड्या अभिजनांनाच हे माहीत असते. बऱ्याचदा गोष्टी जशा घडू शकतात तशा घडतात, काहीही होऊ शकते आणि काय घडत आहे ह्याची लोकांना जाणीवच नसते. तेव्हा अशा परिस्थितीत तुम्हाला साहाय्यक ठरेल अशा तऱ्हेचा पुरेसा विशुद्ध असा प्राणिक जीव जन्माला येईल अशी अपेक्षा तुम्ही कशी बाळगू शकता? व्यक्ती जन्माला येताना मृत त्वचा घेऊनच जन्माला आलेली असते, ती स्वच्छ केल्याशिवाय तिला जगण्याची सुरुवातच करता येत नाही.

एकदा का तुम्ही आंतरिक रुपांतरणाच्या दृष्टीने चांगला प्रारंभ केला आणि जर तुम्ही जीवाच्या मुळाशी अवचेतनेपर्यंत प्रवास केला तर – जे तुमच्यामध्ये तुमच्या पालकांकडून, अनुवंशिकतेतून आलेले असते – ते तुम्हाला दिसू लागते. बहुतांशी या सर्वच अडचणी तेथे आधीपासूनच असतात, जन्मानंतरच्या पहिल्या काही वर्षांमध्ये ज्यांची भर पडते अशा गोष्टी फारच थोड्या असतात. आणि अशा गोष्टी कोणत्याही आकस्मिक क्षणीदेखील घडू शकतात; जर तुम्ही वाईट संगतीमध्ये राहिलात, वाईट पुस्तके वाचलीत, तर ते विष तुमच्यामध्ये शिरेल; अशावेळी या गोष्टींचे अवचेतनामध्ये खोलवर उमटलेले ठसे आणि तुमच्या वाईट सवयी यांच्या विरुद्ध तुम्हाला झगडावे लागते.

उदाहरणार्थ, असे काही लोक असतात की ज्यांना खोटे बोलल्याशिवाय तोंडच उघडता येत नाही; ते नेहमीच तसे जाणीवपूर्वक करतात असेही नाही (ते जास्तच घातक आहे.) किंवा असे काही लोक असतात की जे इतरांच्या संपर्कात आले की भांडल्याशिवाय राहूच शकत नाहीत, अशा गोष्टी त्यांच्या अवचेतनेमध्ये खोलवर रुजलेल्या असतात.

जेव्हा तुम्ही चांगली इच्छा बाळगता, तेव्हा बाह्यत: तुम्ही या सर्व गोष्टी टाळण्याचा, शक्य असेल तर त्या दुरुस्त करण्याचा हरप्रकारे प्रयत्न करता, त्यावर तुम्ही काम करता, त्यांच्याशी मुकाबला करता; आणि मग तुम्हाला अशी जाणीव होते की या गोष्टी सारख्या सारख्या वर येत आहेत, जो भाग तुमच्या नियंत्रणावाचून सुटलेला आहे अशा भागातून त्या वर येत आहेत.

पण जर का तुम्ही तुमच्या अवचेतनेमध्ये प्रवेश केलात, तुमच्या चेतनेला त्यामध्ये प्रवेश करू दिलात आणि काळजीपूर्वक पाहू लागलात तर मग तुम्हाला हळूहळू तुमच्या अडचणींचे मूळ, उगम कोठे आहे त्याचा शोध लागतो; तुमचे आईवडील, आजी आजोबा कसे होते हे तुम्हाला कळू लागते आणि एखाद्या विशिष्ट घडीला तुम्ही स्वत:वर ताबा मिळवू शकत नाही तेव्हा तुम्हाला कळते, ”मी असा आहे कारण ते तसे होते.”

तुमच्या कडे लक्ष ठेवून असणारा, तुमची मार्गावर तयारी करून घेणारा असा पुरेसा जागृत चैत्य पुरुष जर तुमच्यामध्ये असेल तर तो तुमच्याकडे तुम्हाला साहाय्यक ठरतील अशा गोष्टी, माणसे, पुस्तके, परिस्थिती खेचून आणू शकतो. कोणा परोपकारी, कृपाळू इच्छेमुळेच जणू घडले असावेत असे छोटे छोटे योगायोग घडून येतात आणि तुम्हाला काही सूचना, काही मदत, निर्णय घेण्यासाठी काही आधार पुरविण्यात येतात आणि तुम्ही योग्य दिशेला वळवितात.

पण एकदा का तुम्ही निर्णय घेतला, तुमच्या जीवाचे सत्य शोधून काढायचे एकदा का तुम्ही ठरविलेत, तुम्ही त्या मार्गावरून प्रामाणिकपणे वाटचाल करावयास सुरुवात केली तर, तुमच्या प्रगतीसाठी मदत व्हावी म्हणून जणू कोणीतरी संगनमताने सारे घडवीत आहे असे वाटू लागते.

आणि जर तुम्ही काळजीपूर्वक निरीक्षण केलेत तर हळूहळू तुम्हाला तुमच्या अडचणींचे मूळ दिसू लागते : “ओह! हा दोष माझ्या वडिलांमध्ये होता तर, अरेच्चा, ही तर माझ्या आईची सवय आहे; खरंच, माझी आजी अशी होती, माझे आजोबाही असे होते.” असे तुम्हाला जाणवू लागते. किंवा मग तुम्ही लहान असताना जिने तुमची काळजी घेतली होती अशी कोणी तुमची आया असेल, किंवा तुम्ही ज्यांच्याबरोबर खेळलात, बागडलात ती तुमची बहीणभावंडे असतील, तुमचे मित्रमैत्रिणी असतील, यांच्यात किंवा त्यांच्यात काहीतरी असलेले तुम्हाला तुमच्यामध्ये सापडेल.

पण जर तुम्ही प्रामाणिक राहिलात तर या सगळ्या गोष्टी तुम्ही शांतपणे पार करू शकाल, असे तुम्हाला आढळून येईल. आणि कालांतराने ज्या बंधांनिशी तुम्ही जन्माला आला होतात ते सारे बंध, त्या साऱ्या साखळ्या तुम्ही तोडाल आणि तुमच्या मार्गावर अगदी मुक्तपणे पुढे जाल.

जर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्त्व बदलायचे असेल तर तुम्ही हे केलेच पाहिजे. नेहमीच असे सांगितले जाते की एखाद्याची प्रकृती बदलणे अशक्य आहे; सर्व तत्त्वज्ञानाची पुस्तके, अगदी योग सुद्धा असेच सांगतो, तुम्हाला असेच सांगितले जाते की “तुम्ही तुमची प्रकृती बदलू शकत नाही कारण तुमच्या जन्माबरोबरच ती आलेली असते, तुम्ही तसेच आहात.”

पण हे पूर्णपणे चुकीचे आहे, मी खात्रीपूर्वक सांगू शकते की हे खोटे आहे. पण तुमची प्रकृती, तुमचा स्वभाव बदलण्यासाठी खूप अवघड गोष्ट करावी लागते. तुम्हाला तुमची प्रकृती केवळ बदलावयाची नसते तर तुमच्या पूर्वजांची प्रकृती बदलावयची असते. तुम्ही त्यांच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही कारण त्यांचा तसा कोणताही हेतू नसतो, पण तुम्हाला तुमच्यामध्ये ती बदलावयाची असते.

त्या गोष्टी ज्या त्यांनी तुम्हाला दिलेल्या असतात, तुमच्या जन्माबरोबर जणू या छोट्या भेटवस्तूच तुम्हाला मिळालेल्या असतात – त्या बदलावयाच्या असतात. या गोष्टींचा मूळ, खरा धागा मिळविण्यात जर का तुम्ही यशस्वी झालात, आणि जर तुम्ही त्यावर चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम केलेत तर एखाद्या अवचित क्षणी तुम्ही त्यापासून मुक्त व्हाल; ते सारे काही तुमच्यापासून गळून पडलेले असेल आणि तुम्ही कोणत्याही ओझ्याविना एका नवीन जीवनाची सुरुवात करण्यास सक्षम झालेले असाल.

तेव्हा तुम्ही कोणी एक नवीनच व्यक्ती असाल, एका नवीन स्वभावाने, नवीन प्रकृतीनिशी एक नवीन जीवन जगत असाल. आणि जर तुम्ही मागे वळून पाहिलेत तर तुम्ही म्हणाल, ”हे शक्य नाही, मी असा कधीच नव्हतो.”

– श्रीमाताजी
(CWM 04 : 260-262)

(श्रीअरविंदांना त्यांच्या पूर्वजीवनाविषयी एका शिष्याने प्रश्न विचारला होता, त्याला उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रातील हा मजकूर.)

जर कोणाला लौकिकतेचा त्याग करून, फक्त पारलौकिकतेची निवड करावयाची असेल, आणि त्यात त्याला शांती लाभत असेल तर त्याने तसे खुशाल करावे. शांती लाभावी म्हणून, लौकिकतेचा त्याग करणे मला स्वत:ला आवश्यक वाटले नाही. माझ्या परिघामध्ये मी भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही विश्वांचा समावेश करावा आणि केवळ स्वत:च्या मुक्तीसाठी नव्हे तर, येथील दिव्य जीवनासाठी, दिव्य चेतना आणि दिव्य शक्ती लोकांच्या अंत:करणात व या पार्थिव जीवनात स्थापित करण्याचा प्रयत्न करावा, या दिशेने मी माझ्या योगाकडे वळलो असे मला आढळून आले.

हे ध्येय, इतर ध्येयांसारखेच एक आध्यात्मिक ध्येय आहे असे मला वाटते आणि या जीवनात लौकिक, पार्थिव गोष्टींचा मागोवा घेणे, त्यांचा जीवनात समावेश करणे यामुळे, आध्यात्मिकतेला काळिमा फासला जाईल किंवा त्याच्या भारतीयत्वाला काही बाधा येईल असे मला वाटत नाही. माझा तरी वास्तवाचा आणि या विश्वाचे, वस्तुंचे, ईश्वराचे स्वरूप, याविषयीचा हा अनुभव व दृष्टिकोन राहिलेला आहे. हे त्यांबाबतचे जवळजवळ संपूर्ण सत्य असल्यासारखे मला वाटते आणि म्हणूनच त्याचे अनुचरण करणे ह्याला मी पूर्णयोग म्हणतो.

अर्थातच, एखाद्याला पूर्णतेची ही संकल्पना मान्य नसेल आणि ती तो नाकारत असेल किंवा या लौकिक जीवनाचा संपूर्णतया परित्याग करून, पारलौकिक जीवनावर भर देणाऱ्या आध्यात्मिकतेवर तो विश्वास ठेवत असेल तर तसे करण्यास तो मोकळा आहे, पण तसे असेल तर माझा योग करणे त्याला अशक्य होईल.

माझ्या योगामध्ये, परमात्मलोकाचा, आपल्या भूलोकाचा आणि या दरम्यानच्या सर्व जगतांचा आणि त्यांच्या आपल्या जीवनावरील व भौतिक जगतावर होणाऱ्या संभाव्य परिणामांचा आणि त्यांच्या पूर्ण अनुभवांचा समावेश होतो.

पण हेही शक्य आहे की, आधी केवळ परमपुरुषाच्या साक्षात्कारावर भर द्यायचा किंवा त्याच्या एखाद्या अंगावर भर द्यायचा, जसे की, आपला आणि आपल्या कर्मांचा स्वामी असलेल्या विश्वाधिपती कृष्ण, शिव यांच्या साक्षात्कारावर भर द्यायचा आणि या योगासाठी आवश्यक असे परिणाम साध्य करून घ्यावयाचे आणि नंतर (दिव्य जीवनाकडे वाटचाल आणि आत्म्याचा भौतिक जीवनावर विजय हे ध्येय जर एखाद्याने स्वीकारलेले असेल तर) त्याच्या पूर्ण परिणामांकडे वळणे शक्य आहे. वस्तुविषयक हा अनुभव, अस्तित्वविषयक हे सत्य आणि हा दृष्टिकोन यामुळेच ‘दिव्य जीवन’ आणि ‘सावित्री’ लिहिणे मला शक्य झाले.

ईश्वराचा, पुरुषोत्तमाचा साक्षात्कार ही निश्चितच आवश्यक गोष्ट आहे. पण प्रेम, श्रद्धा, भक्ती यांतून त्या ईश्वराकडे वळणे, स्वत:च्या कर्मांच्या द्वारे त्याची सेवा करणे आणि केवळ बौद्धिक जाणिवेने नव्हे तर, आध्यात्मिक अनुभूतीच्या माध्यमातून त्याला जाणणे ह्यादेखील पूर्णयोगाच्या मार्गावरील आवश्यक गोष्टी आहेत.

– श्रीअरविंद
(CWSA 35 : 234-235)

मानसिक अस्तित्वाच्या आणि चैत्य प्राणाच्या शुद्धिकरणाच्या द्वारे, आध्यात्मिक मुक्तीसाठी लागणारी भूमी तयार करण्याचे काम केले जात असते – खरे तर शरीर आणि शारीरिक प्राण यांची शुद्धी देखील संपूर्ण सिद्धीसाठी आवश्यक असते पण तूर्तास शारीरिक शुद्धीचा प्रश्न आपण बाजूला ठेवू.

मुक्तीसाठी आवश्यक पूर्वअट आहे ती म्हणजे शुद्धी. सकल शुद्धी ही एक प्रकारची सुटका असते, मुक्ती असते; कारण शुद्धी म्हणजे बंधनात टाकणाऱ्या, बांधून ठेवणाऱ्या, अपूर्णता आणि गोंधळ यांनी अंधकार निर्माण करणाऱ्या गोष्टी फेकून देणे असते.

इच्छा-वासनांच्या शुद्धिमुळे चैत्य प्राणाची मुक्ती साध्य होते, चुकीच्या भावभावना आणि त्रासदायक प्रतिक्रिया यांच्या शुद्धीकरणातून हृदयाची मुक्ती साधली जाते. इंद्रिय-मनाच्या मळभ आणणाऱ्या संकुचित विचारांच्या शुद्धिकरणातून बुद्धीची मुक्ती साधली जाते आणि केवळ बौद्धिकतेच्या शुद्धीतून विज्ञानाची (Gnosis) मुक्ती साधली जाते. पण ह्या साऱ्या साधनभूत मुक्ती आहेत.

आत्म्याची मुक्ती ही अधिक व्यापक आणि अधिक मूलभूत स्वरुपाची असते; ही मुक्ती म्हणजे मर्त्यतेच्या मर्यादांमधून बाहेर पडून, चैतन्याच्या अमर्याद अशा अमर्त्यतेत खुले होणे असते.

काही विचारप्रणालींनुसार, मुक्ती म्हणजे सर्व प्रकृतीला नाकारणे, शुद्ध केवल अस्तित्वाची एक शांत स्थिती, निर्वाण किंवा विलोपन, आपल्या प्राकृतिक अस्तित्वाचे कोणत्यातरी अव्याख्येय अशा केवलामध्ये विलयन करणे हे होय. परंतु परमानन्दामध्ये निमग्न होऊन त्यातच राहणे, निष्क्रिय शांतीची विशालता, आत्म-विलोपनाद्वारे होणारी सुटका किंवा त्या ‘केवला’मध्ये स्वत:ला बुडवून टाकणे हे काही आमचे ध्येय नाही. फार फार तर, मुक्तीचा गर्भितार्थ आम्ही असा घेऊ शकतो की, आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी अपरिहार्य आणि सिद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या प्रकारच्या सर्व अनुभवांमध्ये सामायिक असणारा आंतरिक बदल यातून दर्शविला जातो.

तेव्हा आपल्याला असे दिसून येईल की, मुक्तीमध्ये नेहमीच दोन गोष्टी अध्याहृत असतात – तिला नकारात्मक आणि सकारात्मक अशा दोन बाजू असतात – पहिली म्हणजे अस्वीकार करणे आणि दुसरी म्हणजे ग्रहण करणे. मुक्तीची नकारात्मक बाजू म्हणजे महत्त्वाच्या बंधांपासून सुटका, कनिष्ठ आत्म-प्रकृतीच्या प्रधान-गाठींपासून सुटका; तर सकारात्मक बाजू म्हणजे अधिक उच्चतर अशा अध्यात्मिक अस्तित्वाकडे उन्मीलित होणे किंवा त्या उच्चतर अस्तित्वामध्ये विकसित होणे.

पण ह्या प्रधान-गाठी आहेत तरी कोणत्या – मन, हृदय, चैत्य जीवनशक्ती ह्यांच्या साधनभूत गाठींच्या अधिक सखोल अशा वळणा-वाकणापेक्षा भिन्न अशा कोणत्या गाठी आहेत त्या? भगवद्गीतेमध्ये आपल्यासाठी त्यांचा निर्देश करण्यात आला आहे आणि इतकेच नव्हे तर, गीतेमध्ये त्यांचा वारंवार, जोरकसपणे उल्लेख केलेला आहे; त्या चार गोष्टी म्हणजे इच्छा-वासना, अहंकार, द्वैत, आणि प्रकृतीचे त्रिगुण; कारण गीतेनुसार, वासनारहितता, अहंकार-विरहितता, मन, आत्मा व चैतन्य यांचा समतोल आणि निस्त्रैगुण्य (त्रिगुणातीत) ह्या चार गोष्टी असणे म्हणजे स्वतंत्र असणे, मुक्त असणे होय. गीतेमधील हे वर्णन आपण स्वीकारायला हरकत नाही कारण ह्या विस्तृत वर्णनामध्ये सर्व महत्त्वाच्या बाबींचा समावेश झालेला आहे.

मुक्तीची सकारात्मक बाजू म्हणजे, आत्म्यामध्ये वैश्विकता असणे, ईश्वराच्या चैतन्याशी विश्वातीत ऐक्य साधणे, सर्वोच्च दिव्य प्रकृतीने संपन्न असणे – म्हणजे असे म्हणता येईल की, ईश्वरासारखे होणे किंवा आपल्या अस्तित्वाच्या कायद्याने त्याच्याशी एकत्व पावणे. मुक्तीचा संपूर्ण व सर्वांगीण अर्थ हा असा आहे आणि चैतन्याची परिपूर्ण मुक्ती देखील ह्यातच आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 674-675)

ईश्वर किंवा पुरुषोत्तम हा विश्वपुरुष देखील आहे; आणि ह्या विश्वाशी असलेली आपली सर्व नाती ही साधने असून, या साधनांद्वारे आपण या विश्वपुरुषाशी आपले नाते प्रस्थापित करण्याची तयारी करत असतो. विश्वाच्या आपल्यावर होणाऱ्या क्रियांना आपण ज्या भावनांनी प्रतिक्रिया देतो, त्या सर्व भावना वस्तुत: या विश्वपुरुषाला, ईश्वराला उद्देशूनच असतात.

आरंभी या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नसते; मात्र आपले ज्ञान जसजसे वाढते तसतसे आपण जाणीवपुर:सर ईश्वरालाच आपल्या भावनांचा विषय करतो आणि अशा रीतीने ईश्वराशी आपले जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होते. आपण ईश्वराशी एकता साधण्याच्या उद्देशाने जसजसे ईश्वराच्या अधिकाधिक निकट जातो तसतसे आपल्या भावनांतील मिथ्यत्वाचे व अज्ञानाचे दोष गळून पडतात.

आणि मग आपल्याला उमगते की, आपल्या सर्व भावनांना ईश्वरच प्रतिसाद देत असतो; आपण प्रगतीच्या ज्या टप्प्यावर जसे असू त्या त्या टप्प्यानुसार तो आपल्याला स्वीकारतो, जवळ घेतो आणि आपल्या भावनांनुसार प्रतिसाद देतो. जर ते तसे नसते, जर तो आपल्याला मदत करत नसता तर, आपल्याला त्याच्याशी अधिकाधिक निर्दोष संबंध प्रस्थापित करता आले नसते; हेही आपल्याला उमगते.

मानव ईश्वराकडे कोणत्याही भावनेने जावो, ईश्वर त्याचे स्वागत करतो व त्याच्या भक्तीला ईश्वरी प्रेमाने प्रतिसाद देतो. अस्तित्वाचे जे कोणते घटक, जे कोणते गुण व्यक्ती ईश्वराला समर्पित करतात, त्या त्या घटकांच्या आणि त्या त्या गुणांच्या माध्यामातून ईश्वर त्या व्यक्तींना विकसित करतो, त्यांना प्रोत्साहित करतो, त्यांच्या प्रगतीचे नियमन करतो. त्यांचा मार्ग सरळ असो वा वळणावळणाचा, तो ईश्वर त्यांना स्वत:कडेच घेऊन जातो.

– श्रीअरविंद
(CWSA

भक्ती आणि ज्ञान यांचे परस्परांविषयीचे गैरसमज हे अज्ञानमूलक आहेत; त्याचप्रमाणे कर्ममार्ग कमी दर्जाचा आहे ही या दोन्ही मार्गांची असणारी समजूतही तितकीच अज्ञानमूलक आहे. ज्ञानमार्गी व भक्तिमार्गी म्हणतात की, आध्यात्मिक संपत्ती ही कर्ममार्गापेक्षा श्रेष्ठ दर्जाची आहे; परंतु त्यांचे हे म्हणणेही अज्ञानमूलकच आहे.

अशी एक तीव्र भक्ती, असे एक तीव्र ज्ञान असते की ज्यांना ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप उत्पन्न करणारे वाटते परंतु जोवर ईश्वराच्या जाणिवेशी आमची जाणीव एकत्व पावत नाही, ईश्वराच्या कर्मसंकल्प-शक्तीशी आमची कर्मसंकल्प-शक्ती एकत्व पावत नाही; तोवरच ‘कर्म’ हे बहिर्मुख व विक्षेप करणारे आहे असे वाटते. परंतु एकदा का हे एकत्व साधले की, कर्म हीच ज्ञानाची शक्ती बनते आणि कर्म हाच प्रेमाच्या अभिव्यक्तीचा मार्ग बनतो.

ईश्वराशी एकत्वाची अवस्था म्हणजे ज्ञान असेल आणि या एकत्वाचा आनंद म्हणजे भक्ती असेल तर, त्या एकत्वाचा प्रकाश व माधुर्य यांचे जिवंत सामर्थ्य म्हणजे दिव्य कर्म असे म्हणता येईल. कोणत्याही मानवी प्रेमामध्ये जी एक आस असते, ती तशीच आस व प्रेमाची तीच स्पंदने ईश्वराबद्दलच्या प्रेमातही असतात. प्रियकर आणि प्रेयसी दोघेही जगापासून आणि इतर सर्वांपासून दूर कोठेतरी, हृदयाच्या गुह्यतम कोपऱ्यामध्ये दडून, ऐक्याच्या निरपवाद आनंदामध्ये निमग्न राहू इच्छितात. तीच कदाचित भक्तिमार्गावरीलही एक अपरिहार्य अशी मनोवस्था असू शकते.

पण ज्या विशाल अशा प्रेमाची परिपूर्ती ज्ञानामध्ये झालेली असते ते प्रेम हे, हृदयाच्या अंतरगृहातील आनंद आणि बाह्य जग यांच्यात कोणताही भेद किंवा विरोध आहे असे मानत नाही. तर उलट, बाह्य जग हे त्या प्रियकराचे, ईश्वराचे धाम आहे, सर्व प्राणिमात्र हे ईश्वराचेच अस्तित्व आहे असे ही व्यापक भक्ती मानते; आणि व्यापक भक्तीची ही जी दिव्य दृष्टी आहे त्या दिव्य दृष्टीत दिव्य कर्माचा आनंद आहे आणि दिव्य कर्माचे समर्थन आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 551)

परिपूर्ण झालेले प्रेम ज्ञानाला वगळत नाही तर, उलट तेच प्रेम स्वत: ज्ञान मिळवून देते आणि ज्ञान जेवढ्या प्रमाणात पूर्ण असते तेवढ्या प्रमाणात प्रेमाची शक्यता अधिकाधिक समृद्ध होते…

भगवद्गीतेमध्ये भगवंत असे सांगतात की, ”भक्तीमुळे एखादा भक्त ‘मला’ माझ्या सर्व प्रमाणात आणि माझ्या महानतेनिशी जाणू शकतो आणि तो जर याप्रमाणे ‘मला’ माझ्या अस्तित्वाच्या तत्त्वानिशी जाणेल तर, तेव्हा तो माझ्यामध्ये सामावू शकेल.”

प्रेम हे जर ज्ञानविरहीत असेल तर, ते तीव्र व जोरदारही असू शकेल; पण ते आंधळे, ग्राम्य, आणि बव्हंशी वेळा भयंकरही असू शकेल. हे ज्ञानविरहीत प्रेम ही मोठी ताकद असू शकते, परंतु ते खूप मोठी धोंडसुद्धा ठरू शकते; प्रेम ज्ञानदृष्ट्या सीमित असेल तर उत्साहाच्या भरात, संकुचितपणाच्या जोशात ते स्वत:चीच अवहेलना करते, परंतु, पूर्ण ज्ञानाभिमुख झालेले प्रेम हे ईश्वराशी अमर्याद आणि संपूर्ण ऐक्य घडवून आणते.

असे प्रेम कर्माशी फारकत घेत नाही, उलट ते दिव्य कर्मामध्ये स्वत:ला आनंदाने झोकून देते. कारण ते ईश्वरावर प्रेम करीत असते आणि त्याच्या सर्व अस्तित्वाशी व त्यामुळे, सर्व जीवामात्रांमधील ईश्वराशी ते एकरूप झालेले असते; आणि त्यामुळे अशा प्रेमाला, जगाकरता काम करणे हा, विविधतेने नटलेल्या ईश्वरावर प्रेम करण्याचा आणि त्याची परिपूर्तता करण्याचा मार्ग वाटतो.

अशाप्रकारे भक्तीच्या, प्रेमाच्या मार्गाने आपण प्रवासाला आरंभ केला की, आपल्या त्रिविध शक्ती (प्रेमशक्ती, ज्ञानशक्ती व कर्म-संकल्पशक्ती) ईश्वराच्या ठिकाणी ऐक्य पावतात; ह्या मार्गाच्या देवदूताला, (All-Lover’s being) ‘सर्व-प्रेममया’च्या अस्तित्वाच्या दिव्य आनंदाचा परमानंद लाभणे ही आपली परिपूर्ती वाटते; त्याला ते त्याचे सुरक्षित धाम वाटते; त्याला ते शाश्वत स्थान वाटते आणि तेच वैश्विक किरणोत्सर्गाचे केंद्रस्थान वाटते.

– श्रीअरविंद
(CWSA 24 : 547)

मनोमय पुरुषाने, वासनात्मक मनाशी असलेले त्याचे सहसंबंध आणि त्याच्याबरोबर झालेले त्याचे तादात्म्य (self-identification) ह्यापासून स्वत:ला विलग करावेच लागते. त्याला असे म्हणावे लागते की, ”हे झगडणारे व यातना भोगणारे, कधी दुःखी तर कधी आनंदी असणारे; कधी प्रेम तर कधी द्वेष करणारे मन म्हणजे मी नव्हे; ते कधी आशावादी असते तर कधी गोंधळलेले असते; कधी रागावते व भिते तर कधी ते खुशीत असते; कधी निराश, नाउमेद असते; अशा प्राणिक वृत्तीप्रवृतीच्या हेलकाव्यांचे व भावनात्मक आवेगांचे बनलेले हे मन म्हणजे मी नव्हे. ह्या सर्व गोष्टी म्हणजे संवेदनात्मक आणि भावनात्मक मनामध्ये प्रकृतीचे जे कार्य चालते ते कार्य आहे, त्या सर्व तिच्या सवयी आहेत, अन्य काही नाही.” या प्रकारे मनोमय पुरुषाने संवेदनात्मक व भावनात्मक मनाशी असलेले आपले ऐक्याचे नाते तोडले, म्हणजे मनोमय पुरुष किंवा मन आपल्या भावनांपासून दूर होते आणि ज्याप्रमाणे ते शरीराच्या क्रिया व अनुभूती दूरून पाहते, त्याचप्रमाणे मनाच्या भावनांकडेही ते दूरून पाहते, ते या भावनांचे निरीक्षक किंवा साक्षी बनते. याप्रमाणे मनात दोन तट पडतात; एक मन भावनात्मक व दुसरे निरीक्षक बनते.

भावनात्मक मनात नानाविध वृत्ती व विकार येत राहतात, प्रकृतीच्या गुणांच्या सवयीनुसार हे घडत राहते; दुसरे निरीक्षक मन हे वृत्तीविकार पाहात राहते; त्यांचा तटस्थपणे अभ्यास करते आणि त्यांना जाणून घेते, परंतु त्यापासून ते अलिप्त असते. निरीक्षक मन भावनात्मक मनाच्या वृत्तीविकारांकडे पाहताना जणू काही मनाच्या रंगमंचावर, स्वत:पेक्षा वेगळ्या व्यक्ती खेळत आहेत अशा दृष्टीने त्यांजकडे पाहते.

प्रथम या वृत्तीविकारांत त्याला रस वाटतो आणि ते तादात्म्याकडे झुकते, जुन्या सवयींमुळे मधूनमधून ते त्यांच्याशी एकरूप होते; नंतर पूर्ण शांती राखून व अनासक्तपणे ते त्यांजकडे पाहू शकते; आणि शेवटी शांतीबरोबर आपल्या शांत अस्तित्वाचा शुद्ध आनंद त्याला लाभतो; आणि ते समोरच्या गोष्टी पाहून स्मित करू लागते. एखादे लहान मूल खेळत असावे आणि त्यात ते स्वत:च हारावे त्याप्रमाणे, भावनात्मक मनाची सुखदुःखे व इतर विकारवृत्ती मिथ्या आहेत हे त्याला पटते.

दुसरी गोष्ट अशी की, आपणच त्या साऱ्याला अनुमती देणारे किंवा नाकारणारे स्वामी आहोत, अनुमंता आहोत ही गोष्ट, निरीक्षक मनाच्या लक्षात येते. अर्थात आपली संमती काढून घेऊन हा खेळ आपण बंद पाडू शकतो हेही त्याला उमगते.

निरीक्षक मनाने संमती काढून घेतली की, एक महत्त्वाची गोष्ट घडते. भावनात्मक मन शांत होते व सामान्यत: शांत राहते; ते सामान्यत: शुद्ध राहते, विकाररूप प्रतिक्रियांपासून सामान्यत: अलिप्त राहते. या प्रतिक्रिया त्याच्या ठिकाणी पुन्हा येतात तेव्हा त्या आतून येत नाहीत, तर बाहेरून येतात – बाहेरून आलेल्या क्रियांना प्रतिक्रिया म्हणून त्या उत्पन्न होतात. ही प्रतिक्रिया देण्याची सवयसुद्धा कालांतराने नष्ट होते आणि भावनात्मक मन पूर्वी टाकून दिलेल्या विकारांपासून पूर्ण मुक्त होते.

आशा व निराशा, सुख व दुःख, आवड आणि निवड, आकर्षण आणि तिटकारा, समाधान व असमाधान, हर्ष आणि विषाद, भय आणि कंप, क्रोध, उद्वेग आणि लाज आणि प्रेमवद्वेष इत्यादी सर्व विकार हे मुक्त झालेल्या चैत्यपुरुषापासून गळून पडतात. सर्वसाधारणपणे जीवाला या अवस्थेतून जावे लागते; परंतु आम्ही मात्र या अवस्थेला अंतिम साध्य मानलेले नाही.

….पूर्णत्वासाठी ही गोष्ट आवश्यक आहे की, मनोमय पुरुषाने ‘प्रकृतीचा स्वामी’ ही स्वत:ची बैठक पुनरपि प्राप्त करून घ्यावी; मनाचा आंतरिक प्रवाह व बुद्धीचा युक्तिवाद थांबवून या पुरुषाचे भागत नाही, त्यांची जागा वरून प्रकाश मिळवणारा सत्य-ज्ञानयुक्त (Truth-Conscious) विचार घेईल अशी व्यवस्था, स्वत:ची इच्छाशक्ती कामी लावून त्याला करावी लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 352-353)

आपल्याला असे आढळून येते की, जर आपण प्रयत्न केला तर, मनामध्ये शरीरापासून अलग होण्याची शक्ती आहे. मन शरीरापासून केवळ कल्पनेनेच नव्हे, तर कृतीनेही अलग होऊ शकते; शरीरापासून ते भौतिक दृष्टीने, किंबहुना प्राणिक दृष्टीनेही अलग होऊ शकते.

शरीरविषयक गोष्टींसंबंधी एक प्रकारची अलिप्त वृत्ती धारण करून, मनाच्या या अलगपणाला आपण ही बळकटी दिली पाहिजे. शरीराचे झोपणे किंवा जागे राहणे या गोष्टींना अनाठायी महत्त्व दिल्यामुळे, त्याच्याबद्दल निष्कारण वाटणारी काळजी आपण सोडून दिली पाहिजे; शरीराचे हालणे-चालणे किंवा विसावा घेणे, शरीराचे सुख किंवा दुःख, त्याचे आरोग्य किंवा अनारोग्य, त्याचा जोर किंवा थकवा, त्याचा आराम किंवा अस्वस्थता यासंबंधाने काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे; शरीर काय खातेपिते यासंबंधानेही काळजी करण्याचे आपण सोडून दिले पाहिजे. आपण आपले शरीर सुस्थितीत ठेवू नये असा ह्याचा अर्थ नव्हे; परंतु अतिरेकी संन्यासी व्रते आपण टाळली पाहिजेत; शरीराची जाणूनबुजून हेळसांड करणे हेसुद्धा आपण टाळले पाहिजे.

इत्यर्थ असा की, आपण भूक, तहान, अस्वस्थता, अनारोग्य या शरीराच्या अवस्थांमुळे आपल्या मनाचा क्षोभ होऊ देऊ नये; शारीरिक आणि प्राणिक प्रवृत्तीचा माणूस शरीरविषयक गोष्टींना जे महत्त्व देतो, ते आपण देऊ नये. द्यायचेच असेलच तर, त्याला दुय्यम स्थान द्यायला हरकत नाही आणि तेही, शरीराचा ‘साधन’ म्हणून उपयोग आहे हे लक्षात ठेऊनच ! शरीर एक साधन आहे म्हणून जे महत्त्व त्याला द्यावयाचे तेही मर्यादित ठेवावे, ते फुगवून त्याला निकडीच्या गोष्टींचे स्वरूप येईल असे करता कामा नये. उदाहरणार्थ, आपण काय खातोपितो यावर मनाची शुद्धता अवलंबून असते अशी वृथा कल्पना आपण करू नये. (एक मात्र खरे की, काही एका अवस्थेमध्ये खाण्यापिण्यासंबंधी नियंत्रणे आपल्या आंतरिक प्रगतीसाठी उपकारक ठरतात.) तसेच, आपले मन वा जीवन केवळ खाण्यापिण्यावरच अवलंबून असते, अशी वृथा कल्पनाही आपण बाळगता कामा नये.

खाणेपिणे ही फक्त एक सवय आहे, निसर्गाने लावलेली ती व्यवस्था आहे; प्रकृतीने मन किंवा प्राण व खाद्यपेय यांजमध्ये एक संबंध निर्माण करून, तो रूढ केला आहे इतकेच; त्यामुळे त्यापेक्षा त्याला अधिक काही मूल्य आहे असे समजण्याची गरज नाही.

वस्तुत: मानसिक व प्राणिक अस्तित्वाच्या उर्जेमध्ये, कोणत्याही प्रकारे घट न होऊ देता, नव्या पद्धतीने, सध्याच्या सवयीच्या उलट पद्धतीने, अन्नसेवनाचे प्रमाण आपण किमान पातळीवर आणू शकतो.

परंतु त्याहीपेक्षा, विवेकपूर्ण प्रशिक्षणाने, मन व प्राण यांना, शारीरिक पोषणाच्या किरकोळ मदतीवर विसंबून ठेवण्यापेक्षा, त्यांचा ज्यांच्याशी अधिक घनिष्ठ संबंध आहे अशा, मानसिक व प्राणिक शक्तीच्या गुप्त झऱ्यांवर विसंबून राहण्याचे प्रशिक्षण देऊन, त्यांना उर्जेच्या अधिक मोठ्या स्त्रोतांकडे वळविता येणे शक्य असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 343-344)