(आपल्यामधील) चेतना स्वत:ला कोठे ठेवते आणि ती स्वत:ला कोठे केंद्रित करते यावर सारे काही अवलंबून आहे. चेतना जर स्वत: अहंकाराशी संबंधित राहील किंवा अहंकारामध्ये स्वत:ला ठेवेल तर तुम्ही अहंकाराशी एकरूप होऊन जाता. चेतना जर मनाशी संबंधित राहील किंवा तेथे स्वत:ला ठेवेल तर ती मनाशी आणि त्याच्या क्रियांशी, तत्सम गोष्टींशी एकात्म पावेल. चेतना जर बाह्य गोष्टींवरच भर देईल, तर ती बहिवर्ती अस्तित्वामध्येच राहू लागेल आणि आंतरिक मन, प्राण आणि आंतरतम असणाऱ्या चैत्याची तिला विस्मृती होईल. चेतना जर आत वळली आणि तिने तिथे भर दिला तर तिथे ती स्वत:ला ‘आंतरिक पुरुष’ (Inner being) म्हणून ओळखते, किंवा अधिक खोलवर गेली तर ती स्वत:ला ‘चैत्य पुरुष’ (Psychic being) म्हणून ओळखते; जर ती देहाच्या बाहेर असलेल्या पातळ्यांवर चढून गेली तर, ज्या आत्म्याला स्वाभाविकपणेच त्याच्या विशालतेचे आणि मुक्ततेचे भान असते त्या आत्म्याशी तद्रूप होऊन, ती स्वत:ला शरीर, प्राण वा मन म्हणून नव्हे तर, ‘आत्मा’ (self) म्हणून ओळखते.

चेतनेचा भर कशावर आहे त्यावरून सर्व फरक पडतो. म्हणूनच व्यक्तीने स्वत:ची चेतना अंतरंगामध्ये नेण्यासाठी किंवा उर्ध्वगामी करण्यासाठी, ती हृदयामध्ये किंवा मनामध्ये केंद्रित केली पाहिजे.

चेतनेचा हा कल सारे काही ठरवीत असतो. तोच व्यक्तीला मनोप्रधान, प्राणप्रधान, शरीरप्रधान किंवा आत्मप्रधान अशा स्वरुपाचा बनवतो. तोच व्यक्तीला बंधनात अडकवतो किंवा बंधमुक्त करतो; ‘पुरुषा’प्रमाणे साक्षी बनवितो किंवा ‘प्रकृती’प्रमाणे गुंतवून ठेवतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 20-21)

माणसामध्ये नेहमीच दोन भिन्न प्रकारच्या चेतना असतात, एक बहिर्वर्ती चेतना – ज्यामध्ये तो जीवन जगत असतो आणि दुसरी आंतरिक, झाकलेली चेतना की ज्याविषयी त्याला काहीच माहीत नसते. जेव्हा व्यक्ती साधना करू लागते तेव्हा, ही आंतरिक चेतना खुली होऊ लागते आणि व्यक्ती अंतरंगामध्ये जाऊन, तेथे सर्व प्रकारचे अनुभव घेऊ शकते.

व्यक्तीची साधना जसजशी प्रगत होऊ लागते तसतशी व्यक्ती आता अधिकाधिक आपल्या आंतरिक अस्तित्वामध्ये राहू लागते आणि बाह्य अस्तित्व हे अधिकाधिक उथळ वाटू लागते. सुरुवातीला आंतरिक चेतना ही स्वप्नवत भासत असते आणि बाह्य जाणीव ही जाग्रत वास्तव वाटत असते. कालांतराने ही आंतरिक चेतना खरीखुरी वाटू लागते आणि बऱ्याच जणांना मग बाह्य चेतना एखादे स्वप्न किंवा आभास असल्याप्रमाणे किंवा ती काहीशी उथळ व बाह्य असल्याचे जाणवते.

ही आंतरिक चेतना गभीर शांतीचे, प्रकाशाचे, आनंदाचे, प्रेमाचे, ‘ईश्वरा’च्या जवळीकीचे किंवा ‘ईश्वरा’च्या उपस्थितीचे, ‘दिव्यमाते’चे स्थान असल्याचे जाणवू लागते. तेव्हा मग व्यक्ती आंतरिक आणि बाह्य अशा दोन चेतनांविषयी जागृत होऊ लागते.

बाह्य चेतना ही आंतरिक चेतनेच्या समकक्ष चेतनेमध्ये परिवर्तित व्हावी आणि तिचे साधन बनावी; बाह्य चेतना देखील शांती, प्रकाश, ‘ईश्वरी’ ऐक्याने परिपूर्ण व्हावी याविषयी व्यक्ती जागृत होऊ लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 89)

आपण आपल्या चेतनेच्या पृष्ठभागावरच जीवन जगत असल्याने, आपल्याला केवळ या पृष्ठवर्ती चेतनेचेच भान असते. ही पृष्ठवर्ती चेतना (माणसामधील सर्वसाधारण जाग्रत मन) म्हणजेच आपण आहोत, समग्रत्वाने आपण आहोत असे आपल्याला वाटत असते, कारण आपण केवळ त्या पृष्ठवर्ती भागावरच जाग्रत असल्याने आपल्याला फक्त त्याचीच जाणीव असते.

पण अंतरंगामध्ये, आंतरिक अस्तित्व आणि बाह्यवर्ती अस्तित्व यांच्या दरम्यान गूढतेची किंवा विस्मृतीची एक प्रकारची भिंत असते; एक आंतरिक अस्तित्व (Inner being) – आंतरिक मन, प्राण, शरीर असते आणि आंतरतम भागामध्ये चैत्य पुरुष (an Inmost or Psychic being) असतो; मात्र आपण या साऱ्यांविषयी अनभिज्ञ असतो. तेथून पृष्ठभागावर जे जे काही येते फक्त त्याचीच जाणीव आपल्याला असते; त्याचा उगम कोठे आहे किंवा ते पृष्ठभागावर कोठून, कसे आले याविषयी आपल्याला काहीच माहीत नसते.

‘योगसाधने’तून ती भिंत हळूहळू ढासळू लागते आणि आपल्याला आपल्यातील आंतरिक आणि आंतरतम अशा अस्तित्वाची जाणीव होऊ लागते. असे केल्यामुळे आपल्यामध्ये जी एक नवीन ‘योगमय’ चेतना निर्माण होते त्या चेतनेला सभोवती असलेल्या वैश्विक चेतनेशी आणि वर असलेल्या उच्चतर आध्यात्मिक चेतनेशी थेट संपर्क साधणे शक्य असते.

ज्याप्रमाणे व्यक्तीकडे स्वत:ची अशी चेतना असते, त्याचप्रमाणे वैश्विक चेतना, वैश्विक ‘अस्तित्व’, वैश्विक ‘मन’, वैश्विक ‘प्राण’, वैश्विक भौतिक जाणीवयुक्त ‘प्रकृती’ देखील असते. आपण आपल्या बाह्य शारीर अस्तित्वामध्येच कोंडून पडल्यामुळे आपण त्या साऱ्याविषयी अनभिज्ञ असतो.

आंतरिक जागृतीमुळे आणि ऊर्ध्वमुख विकसनामुळे वैश्विक चेतना, वैश्विक ‘प्रकृती’, वैश्विक ‘आत्मा’ आणि त्याच्या हालचालींविषयी आपण जागृत होतो; आपली चेतना व्यापक होऊन, आपण त्या वैश्विक चेतनेशी तद्रूप होऊ शकतो. वैश्विक ‘प्रकृती’च्या शक्ती सातत्याने आपल्यावर कार्य करत असतात. वैश्विक प्रकृतीच्या शक्ती कशा कार्य करतात याची आपल्याला कल्पनादेखील नसते किंवा आपल्यावर चालणाऱ्या त्यांच्या कार्यावर आपण नियंत्रणही ठेवू शकत नाही. विश्वप्रकृतीविषयी सचेत झाल्यानेच आपण त्यांचे कार्य ओळखू शकतो आणि त्यावर नियंत्रणही मिळवू शकतो.

– श्रीअरविंद
(CWSA 28 : 19-20)

साधनेची मुळाक्षरे – ३४

प्रश्न : पूर्णयोग म्हणजे काय?

श्रीअरविंद : संपूर्ण ‘ईश्वरी’-साक्षात्काराचा, संपूर्ण ‘आत्म’-साक्षात्काराचा, आपल्या अस्तित्वाच्या आणि चेतनेच्या संपूर्ण परिपूर्तीचा, आपल्या प्रकृतीच्या संपूर्ण रूपांतरणाचा हा मार्ग आहे. आणि त्यामध्ये अन्यत्र कोठेतरी असणाऱ्या शाश्वत परिपूर्णतेकडे परत जाणे नव्हे तर, येथील जीवनाचे संपूर्ण परिपूर्णत्व अभिप्रेत आहे. हे उद्दिष्ट आहे, आणि त्याच्या कार्यपद्धतीमध्ये सुद्धा तीच परिपूर्णता आहे, कारण कार्यपद्धती परिपूर्ण असल्याखेरीज उद्दिष्टाची समग्रता साध्य होऊ शकत नाही. या पद्धतीमध्ये आपण ज्याचा साक्षात्कार करून घेऊ इच्छितो त्या ईश्वराप्रत आपल्या अस्तित्वाचे, प्रकृतीचे तिच्या सर्व घटकांसहित, मार्गांसहित, गतिविधींसहित आत्मदान, उन्मुखता असणे, आणि त्या ईश्वराकडे पूर्णत्वाने वळणे अंतर्भूत आहे. आपले मन, हृदय, प्राण, शरीर, आपले बाह्य, आंतरिक आणि अंतरतम अस्तित्व, आपल्या सचेतन घटकांप्रमाणेच आपले अतिचेतन आणि अवचेतन घटकदेखील अशा प्रकारे देऊ केले पाहिजेत; हे सारे घटक साक्षात्काराचे आणि रूपांतराचे क्षेत्र झाले पाहिजेत, हे सारे घटक म्हणजे माध्यमं झाली पाहिजेत, त्यांनी प्रदीपनामध्ये आणि मानवाच्या दिव्य चेतनेमधील व प्रकृतीमधील परिवर्तनामध्ये सहभागी झालेच पाहिजे. हे ‘पूर्णयोगा’चे स्वरूप आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 358)

साधनेची मुळाक्षरे – २८

समाधी ही वर्ज्य करायला हवी अशी गोष्ट नाही – पण ती अधिकाधिक सजग करणे आवश्यक असते.

*

‘ईश्वरा’च्या संपर्कात असण्यासाठी समाधी अवस्थेमध्येच असले पाहिजे, असे काही आवश्यक नसते.

*

वाचत असताना किंवा विचार करत असताना, मस्तकाच्या शीर्षस्थानी किंवा मस्तकाच्या वर असणारे स्थान, ‘योगिक’ एकाग्रता करण्यासाठी योग्य आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 30 : 250), (CWSA 30 : 250), (CWSA 29: 311)

विचार शलाका – ०५

पूर्वीच्या योगांच्या तुलनेत ‘पूर्णयोग’ नवीन आहे : व्यक्तीने केवळ स्वतःसाठी, स्वतःपुरता ईश्वराचा साक्षात्कार करून व्यक्तिगत सिद्धी प्राप्त करून घ्यावी हे येथे उद्दिष्ट नाही. व्यक्तीने केवळ अति-वैश्विक उपलब्धीच नव्हे तर येथील पृथ्वीचेतनेसाठी, वैश्विक अशी काही प्राप्ती करून घ्यावी हेही येथे अपेक्षित आहे. आजवर या पृथ्वी-चेतनेमध्ये, अगदी आध्यात्मिक जीवनामध्येसुद्धा सक्रिय नसलेली किंवा सुसंघटित नसलेली अतिमानसिक (supramental) चेतनेची शक्ती आणणे आणि ती शक्ती सुसंघटित करणे आणि ती थेटपणे सक्रिय होईल हे पाहणे, ही गोष्टसुद्धा साध्य करून घ्यायची आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 400)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३३

पूर्णयोगाच्या प्रक्रियेच्या तीन अवस्था आहेत; त्या एकमेकींपासून वेगळ्या ओळखता येण्यासारख्या नाहीत किंवा त्या पूर्ण वेगळ्याही नाहीत; परंतु त्या एका विशिष्ट प्रमाणात क्रमबद्ध आहेत.

प्रथम, स्वतःच्या अतीत जाण्याची आणि ईश्वराशी संपर्क साधण्याची पात्रता येण्यासाठी किमान अगदी प्राथमिक प्रयास केले पाहिजेत ही पहिली पायरी. जे अतीत आहे आणि ज्याच्याशी आपण ऐक्य साध्य केले आहे त्याचा, आपले समग्र जाणीवयुक्त अस्तित्व रूपांतरित व्हावे म्हणून आपण आपल्या स्वतःमध्ये स्वीकार करणे ही दुसरी पायरी; आणि या रूपांतरित मनुष्यत्वाचा दिव्य कार्यकेंद्र म्हणून विश्वात उपयोग करणे, ही तिसरी पायरी होय.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 58)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ३०

…येथे धैर्याचा अर्थ ‘परम साहसाविषयीची आवड असणे’ असा आहे. आणि परम साहसाची ही आवड म्हणजे ‘अभीप्सा’ (Aspiration). अशी अभीप्सा जी, तुमचा पूर्णपणे ताबा घेते आणि कोणताही मागचा पुढचा विचार न करता, हातचे काहीही राखून न ठेवता, परतीच्या साऱ्या शक्यता नसतानाही, तुम्हाला ‘ईश्वरी’ शोधाच्या ‘महान साहसा’साठी झोकून देण्यास प्रवृत्त करते; ईश्वर-भेटीसाठीच्या महान साहसासाठी आणि त्याहूनही अधिक महान अशा ‘ईश्वरी साक्षात्काराच्या साहसा’साठी तुम्हाला झोकून देण्यास प्रवृत्त करते.

‘पुढे काय होईल?’ याविषयी एक क्षणभरही शंका उपस्थित न करता, मागे वळून न पाहता या साहसामध्ये तुम्ही स्वतःला झोकून देता.

…धैर्य आणि अभीप्सा या गोष्टी हातात हात घालून नांदतात. खरीखुरी अभीप्सा ही धैर्ययुक्त असते.

– श्रीमाताजी

(CWM 08 : 40-41)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – २३

आमचा योग हा रूपांतरणाचा योग आहे; हे रूपांतरण म्हणजे संपूर्ण चेतनेचे रूपांतर आहे; तसेच ते संपूर्ण प्रकृतीचे, तिच्या मस्तकापासून ते पायापर्यंत, तिच्या अगदी गुप्त आंतरिक घटकांपासून, ते तिच्या अगदी दृश्य बहिर्वर्ती हालचालींपर्यंतच्या प्रत्येक भागाचे रूपांतर आहे. हा बदल काही केवळ नैतिक नाही किंवा ते धार्मिक परिवर्तन नव्हे, किंवा संतत्व वा संन्यासमार्गी संयमदेखील नव्हे, उदात्तीकरण नाही किंवा, जीवनाचे व प्राणिक प्रवृत्तींचे दमनही आम्हाला अभिप्रेत नाही; किंवा ते काही गौरवीकरण नाही, अथवा कठोर असे नियंत्रणदेखील नाही; किंवा भौतिक अस्तित्वालाच नकार देणेही, अभिप्रेत नाही. अल्पतेकडून अधिकतेकडे, कनिष्ठाकडून उच्चतेकडे, पृष्ठवर्ती जाणिवेकडून सखोल चेतनेप्रत होणारा बदल आम्हाला अभिप्रेत आहे. सर्वाधिक महान, सर्वोच्च, सखोलतम असे संभाव्यकोटीतील रूपांतर आम्हाला अभिप्रेत आहे. तसेच समग्र अस्तित्वाचे त्याच्या साधनसामग्रीनिशी संपूर्ण परिवर्तन आणि क्रांती अभिप्रेत आहे; प्रत्येक तपशीलाचे अस्तित्वाच्या आजवर प्रत्यक्षीभूत न झालेल्या दिव्य प्रकृतीमध्ये रूपांतर होणे, हे आम्हाला अभिप्रेत आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 371)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १६

आपल्या समग्र अस्तित्वाने त्याच्या सर्व घटकांसहित आणि आपल्या अस्तित्वाने सर्वथा, ‘दिव्य सद्वस्तु’च्या समग्र चेतनेमध्ये प्रविष्ट होणे आणि आपल्या जीवात्म्याने व तत्त्वाने आपण वास्तविक जे आहोत, त्या ‘दिव्य सद्वस्तु’चे साधन आणि आविष्करण बनावे म्हणून, आपल्या वर्तमान अज्ञानी आणि मर्यादित प्रकृतीचे दिव्य प्रकृतीमध्ये परिवर्तन घडविणे, हीच आपल्या अस्तित्वाची परिपूर्ण परिपूर्ती आहे आणि हाच ‘पूर्णयोग’ आहे.

विचारी मनाच्या मार्गाने, किंवा हृदयाच्या मार्गाने किंवा कर्मामधील इच्छेच्या मार्गाने किंवा मानसिक प्रकृति-द्रव्याच्या परिवर्तनाद्वारे किंवा देहांतर्गत असलेली प्राण-शक्ती (Vital force) मुक्त करून, त्या दिव्यत्वामध्ये प्रविष्ट होणे पुरेसे नाही; हे एवढेच पुरेसे नाही. या साऱ्या गोष्टी एकत्रितपणे करून ते परिवर्तन घडविले पाहिजे. आणि खुद्द आपल्या इंद्रियांमधील तसेच शारीर-चेतनेमधील, अगदी जडभौतिक अचेतनापर्यंतच्या परिवर्तनाद्वारे, सर्वकाही त्या ‘ईश्वरा’विषयी सजग आणि त्या ईश्वरासमवेत दीप्तिमान झालेच पाहिजे. ईश्वराशी ऐक्य पावणे, ईश्वरामध्ये आणि त्याच्यासोबत जगणे, ईश्वरासमवेत त्याच्या प्रकृतीचेच होणे, हे आपल्या योगाचे उद्दिष्ट असले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356-357)