Tag Archive for: तत्त्वज्ञान

त्याग हा आम्हाला साधन म्हणूनच मान्य होईल; साध्य म्हणून कदापि मान्य होणार नाही; मानवात ईश्वरी पूर्णता प्रकट करणे हे आमचे साध्य आहे व ते सकारात्मक आहे, त्यामुळे त्याग हे नकारात्मक साधन आमचे मुख्य किंवा एकमेव साधन होऊ शकत नाही.

ईश्वराच्या मानवातील आत्मपरिपूर्तीहून वेगळे आणि तिला विरोधी असे जे असेल त्याचा आपण पूर्ण त्याग केला पाहिजे. तसेच या आत्मपरिपूर्तीपेक्षा निम्नतर वा आंशिक अशी जी जी सिद्धी असेल तिचाही आपण क्रमशः त्याग केला पाहिजे.

विश्वातील जीवनावर आपली आसक्ती असता कामा नये. ती जर असेलच तर, तिचा आपण नि:शेष त्याग करावयास हवा. तसेच विश्वातून होणाऱ्या सुटकेविषयी, मुक्तीविषयी, महान आत्मनिर्वाणाविषयीचीही आसक्ती आपल्यामध्ये असता कामा नये. आणि ती असेलच तर, तिचादेखील आपण नि:शेष त्याग केला पाहिजे. हा पूर्ण त्याग आमच्या साध्याला धरून आहे. आम्हाला आसक्ती मुळीच नको आहे; मग ती संसाराविषयी असो वा मुक्तीविषयी असो.

*

आपला त्याग हा आंतरिक त्याग असला पाहिजे हे उघड आहे; आसक्तीमय अशी इंद्रियांची वासना व हृदयाची वासना; विचार आणि आचार यांचा हट्टाग्रह; आणि जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव या तीन गोष्टींचा आपण विशेषेकरून सर्वप्रथम त्याग करणे आवश्यक आहे. आपल्या निम्नतर प्रकृतीशी आपल्याला जखडून ठेवणारी अशी ही तीन बंधने आहेत. ह्या तीन बंधनांचा, आम्ही संपूर्ण त्याग केल्यावर, इतर कोणतेही बंधन आपल्याला बांधू शकत नाही. म्हणून आपण प्रथम आपल्या ठिकाणची आसक्ती आणि वासना पूर्णपणे फेकून दिली पाहिजे.

आसक्ती व वासनाविषयक त्याग :

आपण आसक्ती बाळगावी असे या जगात काहीही नाही; ना संपत्ती ना दारिद्रय, ना सुख ना दुःख, ना जीवन ना मरण, ना मोठेपणा ना लहानपणा, ना दुर्गुण ना सद्गुण; ना मित्र ना पत्नी, ना मुलेबाळे, ना देश, ना आपले कर्तव्य, ना सेवाकार्य, ना स्वर्ग, ना पृथ्वी, ना त्यांच्या आतले काही, ना त्यांच्या पलीकडचे काही. अगदी कशाविषयीही आपल्या ठिकाणी आसक्ती असता कामा नये.
मात्र याचा अर्थ असा नव्हे की, आपण कशावरच प्रेम करू नये, कोणताच आनंद उपभोगू नये; कारण आसक्ती म्हणजे प्रेमातील अहंभाव होय, प्रेम नव्हे. वासना म्हणजे विषयोपभोगाची जी भूक आहे त्यातील संकुचितता व असुरक्षितता आहे; तो वस्तुजातातील दिव्यानंदाचा शोध असत नाही.

आचारविचारांचा हट्टाग्रह :

आपल्या कनिष्ठ प्रकृतीशी आपल्याला बांधून ठेवणाऱ्या तीन बंधनांपैकी पहिल्या बंधनाचा, आसक्ती व वासनारूप बंधनाचा विचार झाला. आता दुसरे बंधन, विचार व आचार यांचा हट्टाग्रह. पूर्णत्व मिळविण्यासाठी ज्याप्रमाणे आपला अहंकारी आग्रह आपल्याला दिव्यकर्ममार्गात सर्वथा टाकून द्यावा लागतो त्याचप्रमाणे दिव्य ज्ञान परिपूर्ण व्हावयास हवे असेल तर तेथेही आपला अहंकारी आग्रह सोडावा लागतो.

जाणिवेच्या केंद्रातील अहंभाव :

उपरोक्त स्व-इच्छा म्हणजे मनातील अहंकारच असतो; की जो स्वत:च्या आवडीनिवडी, स्वत:च्या सवयी, स्वत: केलेल्या विचारांच्या, दृष्टिकोनांच्या, आणि इच्छेच्या भूतकाळातील वा भविष्यातील कल्पनांना घट्ट धरून राहतो. कारण त्या कल्पना वा रचना म्हणजेच तो स्वत: आहे किंवा त्या त्याच्या स्वत:च्या आहेत अशी त्याची धारणा असते. आणि मग त्यातून तो ‘मी’ आणि ‘माझे’ यांचे एक अतिशय नाजूक धाग्यांचे जाळे स्वत:भोवती विणत राहतो आणि एखादा कोळी ज्याप्रमाणे आपल्या जाळ्यात जीवन जगत राहतो तसाच हाही राहू लागतो.

कोळ्याला जसा त्याच्या जाळ्यावर केलेला आघात रुचत नाही, त्याचप्रमाणे कोणी धक्का दिलेला ह्या अहंकारी मनाला रुचत नाही, त्याचा ते द्वेष करते. कोळ्याला स्वत:च्या जाळ्याहून निराळ्या जाळ्यात राहावे लागल्यास परकेपणा वाटतो, त्याप्रमाणे अहंकारी मन नव्या दृष्टिकोनाकडे नव्या रचनांकडे, नव्या स्वप्नांकडे नेले गेले की, त्याला परकेपणा वाटतो, त्याला दु:ख होते. ही आसक्ती मनातून अजिबात काढून टाकली पाहिजे.

जगासंबंधाने व जीवनासंबंधाने असलेली आपली सामान्य वृत्ती आपण टाकून दिली पाहिजे; जागृत न झालेले मन या सामान्य वृत्तीला स्वभावधर्म असे समजून चिकटून राहते; परंतु आपण येथेच थांबता उपयोगी नाही; आपण निर्माण केलेल्या कोणत्याही मानसिक रचनेला, बुद्धिप्रधान विचारपंथाला, धार्मिक मतवादाला किंवा तार्किक सिद्धांताला आपण बांधलेले राहता कामा नये; मनाचे व इंद्रियांचे जाळे आपण तोडूनच टाकले पाहिजे. पण तेथेही आपण थांबता कामा नये; विचारकाचे जाळे, धर्मवाद्यांचे जाळे, धर्मसंस्थापकांचे जाळे थोडक्यात ‘शब्दांचे’ व ‘कल्पनांचे’ जाळे यापासून आपण स्वत:ला दूर केले पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 329)

पारंपरिक ज्ञानमार्ग व पूर्णज्ञानाचा मार्ग :

जीवात्म्याने शांत परमात्म्यात, परमशून्यात किंवा अनिर्वचनीय केवलांत विलीन व्हावे म्हणून पारंपरिक ज्ञानमार्ग नकाराचा, दूरीकरणाचा पाढा वाचीत जातो. ‘हे शरीर म्हणजे मी नव्हे’, ‘हा प्राण म्हणजे मी नव्हे’, ‘ही इंद्रिये म्हणजे मी नव्हे’, ‘हे हृदय म्हणजे मी नव्हे’ आणि ‘हे विचार म्हणजे देखील मी नव्हे’ असे म्हणत तो क्रमाक्रमाने ह्या साऱ्यांना दूर सारतो. मात्र पूर्णज्ञानाचा मार्ग असे मानतो की, आपण जीवात्म्यांनी संपूर्ण आत्मपरिपूर्ती गाठावी अशी ईश्वरी योजना आहे. आणि म्हणून, आपण एकच गोष्ट दूर करावयाची आहे : ती म्हणजे, आपली स्वत:ची नेणीव (unconsciousness), आपले अज्ञान आणि आपल्या अज्ञानाचे परिणाम.

अस्तित्वाचा खोटेपणा : आमच्या अस्तित्वाचे ‘मी’ म्हणून वावरणारे खोटे रूप आम्ही दूर करावे, म्हणजे आमच्या ठिकाणी आमच्या खऱ्या अस्तित्वाला अभिव्यक्त होता येईल;

प्राणाचा खोटेपणा : केवळ वासनेची धाव या रूपात व्यक्त होणारा प्राणाचा खोटेपणा आणि आमच्या भौतिक अस्तित्वाने यंत्रवत त्याच त्या फेऱ्यात फिरत राहणे हे आम्ही दूर करावे. हे खोटे रूप दूर केले म्हणजे, ईश्वरीय शक्तीत वसणारा आमचा खरा प्राण व्यक्त होईल, अनंताचा आनंद व्यक्त होईल.

इंद्रियांचा खोटेपणा : भौतिक दिखाऊपणा आणि संवेदनांची द्वंद्वे यांच्या आधीन झाल्यामुळे आलेला इंद्रियांचा खोटेपणा दूर केला तर, आपल्यातच दडलेली अधिक महान इंद्रियशक्ती, वस्तुमात्रांमध्ये असलेल्या दिव्यत्वाप्रत खुली होऊ शकते आणि त्यांना तसाच दिव्य प्रतिसाद देऊ शकते.

हृदयाचा खोटेपणा : वासना-विकारांनी व द्वंद्वात्मक भावभावनांनी कलुषित झालेल्या आमच्या हृदयाचा खोटेपणा दूर केला की, अधिक खोलवर असणारे हृदय अखिल जीवमात्रांविषयीच्या अपार दिव्य प्रेमानिशी खुले होते; अनंत ईश्वराने आपल्याला प्रतिसाद द्यावा अशी अपरिमित तळमळ त्याला वाटू लागते.

विचारांचा खोटेपणा : अपूर्ण सदोष मानसिक रचना, अरेरावीचे होकार-नकार, संकुचित आणि एकांगी केंद्रीकरणे ही आमच्या विचाराची खोटी संपदा असते, ही दूर केली म्हणजे तिच्या मागे असलेली थोर ज्ञानशक्ती; ईश्वराच्या खऱ्याखुऱ्या स्वरूपास, जीवात्म्याच्या, प्रकृतीच्या, विश्वाच्या खऱ्याखुऱ्या रूपास उन्मुख होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 291-292)

व्यक्तिगत मोक्षाच्या इछेचे स्वरूप कितीही उदात्त असले तरी, ती एक प्रकारची वासनाच असते आणि ती अहंभावातून निर्माण झालेली असते. आपल्या व्यक्तित्वाची कल्पना प्रामुख्याने आपल्या समोर असते; आपल्याला व्यक्ती म्हणून वैयक्तिक हिताची, वैयक्तिक कल्याणाची इच्छा असते; दुःखापासून सुटका व्हावी अशी एक व्यक्ती म्हणून आपली तळमळ असते; जन्म-मृत्युच्या फेऱ्यातून सुटका व्हावी अशी आपल्या मनात तीव्र इच्छा उत्पन्न होते; आणि यातूनच मोक्षाची कल्पना निर्माण होते; अर्थात ही कल्पना हे अहंभावाचे अपत्य आहे.

अहंभावाचा पाया पूर्णपणे नष्ट करण्यासाठी, व्यक्तिगत मोक्षाच्या इच्छेच्या वर उठणे आवश्यक असते. आपण जर ईश्वर-प्राप्तीसाठी धडपडत असू, तर ती धडपड केवळ ईश्वरासाठीच असली पाहिजे, अन्य कोणत्याही कारणासाठी नव्हे; कारण आपल्या जीवाला आलेली ती परमोच्च हाक असते, आपल्या चैतन्याचे ते सर्वात गहन असे सत्य असते.

*

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर तो ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील आपल्या कवेत घेतो; असा हा ‘पूर्णयोग’ व्यक्तिगत मोक्ष किंवा सुटका एवढ्यापुरता मर्यादित राहूच शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो. या विश्वातील त्याचे दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 269-70)

पूर्णयोगाचा मार्ग फार दीर्घ आहे; आपल्यातील आणि जगातील ईश्वराला आपली सर्व कर्मे त्यागबुद्धीने, यज्ञबुद्धीने समर्पित करणे हे या मार्गावरील पहिले पाऊल आहे; हा मनाचा आणि हृदयाचा दृष्टिकोन आहे, त्याचा आरंभ करणे हे फारसे अवघड नाही, परंतु तो दृष्टिकोन पूर्ण मन:पूर्वकतेने अंगीकारणे आणि तो सर्वसमावेशक करणे फार अवघड आहे.

या मार्गावरील दुसरे पाऊल म्हणजे, कर्मफळावर असणारी आपली आसक्ती सोडून देणे हे आहे. त्यागाचे खरे, अटळ, अतिशय इष्ट असे फळ, एकमेव आवश्यक असे फळ म्हणजे ईश्वराने आमच्यामध्ये प्रकट व्हावे आणि आम्हामध्ये दिव्य जाणीव व दिव्य शक्ती यावी हे आहे; हे फळ मिळाले म्हणजे बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला मिळतीलच मिळतील. हे दुसरे पाऊल म्हणजे आपल्या प्राणिक अस्तित्वातील, आपल्या वासनात्म्यातील, वासनामय प्रकृतीतील अहंभावप्रधान इच्छेचे रूपांतर हे होय; कर्मसमर्पण-वृत्तीहूनही रूपांतराची ही गोष्ट फारच अवघड आहे.

या मार्गावरील तिसरे पाऊल, केंद्रस्थ अहंभावाचे उच्चाटन आणि एवढेच नव्हे तर, ईश्वरी साधन झाल्याच्या अहं संवेदनेचे देखील उच्चाटन हे आहे. हेच रूपांतर सर्वात अधिक अवघड असते; आणि जोपर्यंत पहिली दोन पावले उचलली जात नाहीत तोपर्यंत हे रुपांतर पूर्णपणे होऊ शकत नाही. आणि जोपर्यंत अहंभाव नष्ट करून, वासनेचे मूळच उखडून फेकले जात नाही तोपर्यंत, म्हणजेच ह्या तिसऱ्या कळसरूपी पावलाची जोड मिळत नाही तोपर्यंत, आधीच्या दोन पावलांचे कार्यसुद्धा पूर्ण होत नाही.

जेव्हा हा क्षुद्र अहंभाव प्रकृतीतून मुळापासून दूर केला जातो तेव्हाच साधकाला स्वत:च्या वर असणाऱ्या त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव होऊ शकते; ईश्वराचे सामर्थ्य आणि ईश्वराचा एक अंशभाग असे त्याचे स्वरूप असते. साधकाला ह्या खऱ्या अस्तित्वाची ओळख होते तेव्हाच तो ईश्वरी-शक्तीच्या इच्छेव्यतिरिक्त असणाऱ्या इतर सर्व प्रेरक-शक्तींचा व प्रेरणांचा त्याग करतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 247)

आम्ही जो उच्चस्थानी जाण्याचा प्रयत्न करीत असतो, त्या प्रयत्नात सुरुवातीलाच वासनेचा हीन घटक प्रवेश करतो, आणि हे स्वभाविकच आहे. ह्या हव्यासमय प्राणशक्तीचा वा वासनात्म्याचा स्वीकार करायचा झालाच तर तो स्वीकार रुपांतर करण्याच्या हेतूनेच आम्ही करावयास हवा. आरंभीच त्याला ही शिकवण द्यावी लागते की, दुसऱ्या सर्व वासना त्याने दूर कराव्यात आणि ईश्वरप्राप्तीचाच एकमेव ध्यास बाळगावा.

हा महत्त्वाचा मुद्दा साधल्यावर त्याला दुसरी शिकवण अशी द्यावी लागते की, त्याने आस बाळगावी परंतु ती स्वतःच्या वैयक्तिक लाभासाठी बाळगू नये, तर विश्वात पसरलेल्या ईश्वरासाठी आणि आम्हात असलेल्या ईश्वरासाठी धरावी.

जरी या योगमार्गात आम्हाला सर्व प्रकारचे आध्यात्मिक लाभ मिळण्याची खात्री असली, तरी आपला कोणताही आध्यात्मिक लाभ हे आपण आपले उद्दिष्ट ठेवू नये; तर आमच्यामध्ये आणि इतरांमध्ये जे महान कार्य करावयाचे आहे त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

ज्या आगामी उच्च आविष्काराने, विश्वात इश्वरेच्छेची वैभवपूर्ण परिपूर्ती होणार आहे, त्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी. ज्या सत्याची प्राप्ती आम्हाला करून घ्यावयाची आहे, जे आमच्या जीवनात आम्हाला व्यक्त करावयाचे आहे आणि जे आम्हाला सिंहासनावर कायमचे बसवावयाचे आहे, त्या सत्यावर आपली दृष्टी खिळवून ठेवावी.

वासनात्म्याला शेवटी हे शिकविणे आवश्यक आहे की, त्याने केवळ ‘योग्य उद्दिष्टासाठी’च धडपड करायची आहे असे नाही तर, ही धडपड त्याने ‘योग्य रीतीनेही’ करावयाची आहे, पण ही गोष्ट त्याला अतिशय जड जाणारी आहे. कारण योग्य रीतीने साधना करणे हे योग्य उद्दिष्टासाठी साधना करण्याहून, वासनात्म्याला अवघड आहे. त्याला शेवटी हेही शिकवणे जरूर आहे की, त्याला इच्छा बाळगायचीच असेल तर ती स्वतःच्या अहंभावी मार्गाने बाळगू नये, तर ईश्वरी मार्गाने बाळगावी.

आता त्याने स्वतंत्र विभक्तपणे इच्छा बाळगू नये. मला पसंत असेल त्याच प्रकारे परिपूर्ती व्हावी, माझे जे स्वामीत्वाचे स्वप्न आहे ते पूर्ण व्हावे, माझी जी योग्य आणि इष्ट यासंबंधाची कल्पना आहे तीच मान्य केली जावी असा आग्रह त्याने धरू नये. आपल्या इच्छेहून महान असलेली ईश्वरी इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास त्याने बाळगावा, त्याने अधिक ज्ञानपूर्ण, नि:स्वार्थी मार्गदर्शनाची वाट पाहावयास संमती द्यावी.

सामान्य वासनेला या प्रकारची शिकवण व शिस्त लागली तर तिचे दिव्य वासनेत रूपांतर होऊ शकेल; सामान्य वासना ही माणसाला त्रास देणारी, अनेक प्रकारे ठेचा खावयास लावणारी, स्वास्थ्यनाशक, तापदायक वस्तू आहे; तिला वर सांगितल्याप्रमाणे शिस्त लागली तर तिजमध्ये दिव्य रूपांतराची पात्रता येईल.

सामान्य वासना आणि सामान्य तळमळ यांचीच उच्च व दिव्य रूपेही असतात. सर्व प्रकारची तृष्णा आणि अनुरक्ती, आसक्ती यांच्या पलीकडे आत्माचा एक विशुद्ध आनंद असतो, परमसिद्धीप्राप्तीच्या वैभवात विराजमान होऊन बसलेल्या दिव्य आनंदाचा एक संकल्प असतो.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 84)

समग्र अस्तित्व - ईश्वराचे साधन

 

आमच्या योगमार्गात पहिली जरुरीची गोष्ट ही आहे की, आमच्या मनाची जुनी केंद्रभूत सवय आणि दृष्टी पार मोडून काढावयाची; ही सवय आणि दृष्टी बहिर्मुख असते; बाह्य विश्वव्यवस्थेत आपला स्वतःचा विकास करावा, आपली स्वतःची तृप्ती करून घ्यावी, आपले स्वतःचे हितसंबंध सांभाळावे, ह्यावरच जुन्या सवयीचे व दृष्टीचे लक्ष खिळलेले असते. म्हणून मनाचे हे जुने वळण व दृष्टी पार मोडून काढणे ही आमच्या योगात पहिली जरुरीची गोष्ट मानली जाते. मनाच्या ह्या बहिर्वर्ती सवयीची व दृष्टीची जागा – जिला फक्त ईश्वरच दिसतो आणि ईश्वरप्राप्तीसाठीच जिची धाव असते अशा – सखोल श्रद्धेने व दृष्टीने घेणे हे या योगामध्ये आवश्यक असते.

दुसरी जरुरीची गोष्ट ही असते की, आमच्या निम्नतर अस्तित्वाने या नव्या श्रद्धेला आणि महत्तर दृष्टीला आपली निष्ठा अर्पण करावी, किंवा आम्ही त्यास तसे करावयास लावावे. आमच्या सर्व प्रकृतीने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे; नवदृष्टिहीन इंद्रियरूप मनाला भौतिक जग आणि त्यातील वस्तू यांजहून जे आंतरिक जग कितीतरी कमी सत्य वाटते, त्या आंतरिक जगासाठी आमच्या प्रकृतीच्या प्रत्येक अंगाने, आणि प्रत्येक व्यापाराने पूर्ण आत्मसमर्पण करावयास हवे. आमच्या सर्व अस्तित्वाने – आमचा आत्मा, मन, इंद्रियगण, हृदय, इच्छा, प्राण, शरीर या सर्वांनी आपल्या सर्व शक्ती इतक्या पूर्णतेने, अशा रीतीने ईश्वरचरणी समर्पित करावयास हव्यात की, ज्यायोगे आमचे समग्र अस्तित्व हे ईश्वराचे सुयोग्य साधन होईल.

हे घडवून आणणे हे काही सोपे काम नाही; कारण जगातील प्रत्येक वस्तू एका ठाम चाकोरीतून चालत असते; ही चाकोरी, ही सवय हाच तिचा कायदा असतो; कोणत्याही वस्तूला आमूलाग्र बदल नको असतो; ती अशा बदलाला विरोध करते आणि पूर्णयोग तर जी क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करतो, त्या क्रांतीहून कोणताही बदल अधिक आमूलाग्र असू शकत नाही.

पूर्णयोगाचा अभ्यास करीत असताना प्रकृतीच्या प्रत्येक अंशाला केंद्रभूत श्रद्धेकडे, इच्छेकडे सतत ओढून आणावे लागत असते. उपनिषदांच्या भाषेत सांगावयाचे झाले तर, प्रत्येक विचाराला व ऊर्मीला ही आठवण करून द्यावी लागते की, “येथे लोक ज्याची ईश्वर म्हणून उपासना करत आहेत तो ‘ईश्वर’ नसून; तो ईश्वर ‘तेथे’ आहे.”

प्राणातील प्रत्येक तंतू, जे जीवन आजवर आपले स्वाभाविक जीवन म्हणून मानत आला आहे, त्या जीवनाचा आत्यंतिक त्याग करण्यास त्याने मान्यता द्यावी यासाठी त्याला समजावून सांगितले पाहिजे. मनाने आपले मनपण टाकून द्यायला हवे आणि त्याच्या पलीकडे असलेल्या तत्त्वाच्या प्रकाशाने प्रकाशमय व्हावयास हवे. प्राणाने आपले रूप बदलून अत्यंत व्यापक, शांत व समर्थ असे नवे रूप घ्यावयास हवे; आपले जुने, आंधळे, तळमळ करणारे, संकुचित रूप व आपल्या जुन्या क्षुद्र उर्मी आणि वासना नव्या रूपातील प्राणाला आपल्या म्हणून ओळखता येणार नाहीत इतकी नवीनता त्याच्या नव्या रूपात यावी लागते.
शरीरालादेखील परिवर्तनाच्या प्रक्रियेतून जावे लागते; आज ते, म्हणजे मार्गातील अडथळा ठरणारी धोंड आहे किंवा ‘हे हवे’ ‘ते हवे’, असा ओरडा करणारा पशु आहे; हे आपले रूप टाकून त्याला आत्म्याचा सुबुद्ध सेवक व्हावे लागते, आत्म्याचे तेजस्वी साधन व्हावे लागते, आत्म्याचे जिवंत रूप व्हावे लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23 : 72-73)

आम्ही जो ईश्वर पूजतो तो केवळ दूरची विश्वातीत वस्तू नाही, तर तो अर्धवट झाकलेला प्रकट ईश्वर आहे; तो आमच्याजवळ, या आमच्या जगात येथे आत्ता उपस्थित आहे.

जीवन हे ईश्वराच्या अभिव्यक्तीचे असे क्षेत्र आहे की, जे अजून पूर्णतेस गेलेले नाही. येथे जीवनात, पृथ्वीवर, या शरीरात – ‘इहैव’ असा उपनिषदांचा आग्रह आहे – आम्हाला ईश्वरावरील पडदा दूर करून त्याला प्रकट करावयाचे आहे. त्याचा सर्वातीत मोठेपणा, प्रकाश आणि माधुर्य या गोष्टी आमच्या जाणिवेला येथे वास्तव वाटतील असे करावयाचे आहे. तो आम्हाला आमच्या जाणिवेत आमचा म्हणून आणावयाचा आहे आणि त्या प्रमाणात व्यक्त करावयाचा आहे.

सर्वथा परिवर्तित करता यावे यासाठी आम्ही जीवन, आज जसे आहे तसे स्वीकारावयाचे आहे; असा स्वीकार केल्याने आमच्या संघर्षामध्ये अधिक भर पडेल; पण त्या संघर्षापासून, अडचणींपासून पळ काढण्यास आम्हाला मनाई आहे.

या अडचणीमुळे आम्हाला जे विशेष परिश्रम होतात त्या परिश्रमांची खास भरपाई आम्हाला पुढे लाभते, ही त्यात समाधानाची गोष्ट आहे. आमचा पूर्णयोगाचा मार्ग वाकडातिकडा व खडकाळ असतो आणि मार्ग चालण्याचे परिश्रम नको इतके त्रासदायक व गोंधळ उडवणारे असतात.

तरीपण काही मार्ग चालून झाल्यावर, आमचा मार्ग पुष्कळ सुकर होतो. कारण एकदा आमची मने केंद्रभूत दर्शनावर, दृश्यावर ठामपणे स्थिरावली आणि आमची इच्छाशक्ती आमच्या एकमेव साध्यासाठी परिश्रम करण्यास तयार झाली, म्हणजे मग जीवन आम्हाला मदत करू लागते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 74)

वरची उच्चतर दिव्य प्रकृती, खालच्या निम्नतर अदिव्य प्रकृतीवर समग्रपणे रूपांतराचे कार्य करते तेव्हा या कार्याच्या तीन बाजू असतात.आणि त्या सर्वच महत्त्वाच्या आहेत. या कार्याची पहिली बाजू : योगाच्या विशेष विशिष्ट पद्धतीत जसा ठरावीक क्रम असतो, जशी ठरावीक पद्धती असते त्याप्रमाणे दिव्य प्रकृती एखाद्या ठरावीक पद्धतीनुसार व एखाद्या ठरावीक कार्यक्रमानुसार काम करत नाही. दिव्य प्रकृती स्वैर विखुरलेल्या स्वरूपात कार्य करते; मात्र हे तिचे कार्य विशिष्ट योजनेनुसार चाललेले असते आणि ते क्रमाने अधिकाधिक तीव्र (सघन) होत जाते; ज्या व्यक्तीत दिव्य प्रकृती कार्य करीत असते त्या व्यक्तीच्या वृत्तीवर, स्वभावावर तिच्या कार्याचे स्वरूप अवलंबून असते – तिच्या प्रकृतीत दिव्य प्रकृतीला काही अनुकूल गोष्टी सापडतात, तसेच तेथे शुद्धिकरणाला व पूर्णत्व सिद्धीला विघ्नकारक अशाहि काही गोष्टी सापडतात – या अनुकूल प्रतिकूल गोष्टी विचारात घेऊन दिव्य प्रकृती आपल्या कार्याचे स्वरूप निश्चित करीत असते. तेव्हा, एका अर्थाने प्रत्येक माणूस या मार्गात आपली स्वतंत्र योगपद्धती वापरीत असतो…. दिव्य प्रकृती अदिव्य प्रकृतीवर जे कार्य करीत असते त्याची दुसरी महत्त्वाची बाजू आता पाहू. दिव्य प्रकृतीची प्रक्रिया सर्वांगीण, पूर्ण स्वरूप असल्याने, आमच्या प्रकृतीला जशी आहे तशी ती मान्य करते; आमच्या भूतकालीन विकासाच्या क्रमात ही आमची प्रकृती घडलेली असते; या प्रकृतीतील कोणताही महत्त्वाचा घटक ही दिव्य प्रकृती आपले कार्य करताना बाजूला काढीत नाही, टाकून देत नाही; दिव्य प्रकृतीचे काम आमच्या प्रकृतीत दिव्य रुपांतरण घडवून आणण्याचे असते, आमच्या प्रकृतीच्या झाडून सर्व घटकांना रूपांतरित होण्यास ही दिव्य प्रकृती भाग पाडीत असते. जणू एक समर्थ कारागीर आमच्यातील प्रत्येक घटक व घटना घेऊन त्यांचे रुपांतरण घडवून आणीत असतो. दिव्य पातळीवरील ज्या गोष्टी आमची अदिव्य प्रकृती गोंधळलेपणातून अभिव्यक्त करू पाहते, त्याचे स्वच्छ, स्पष्ट रूपात परिवर्तन झालेले आम्हाला पहावयास मिळते. हा आमचा अनुभव क्रमाने वाढत जातो, सारखा वाढत जातो. आणि असा तो वाढत असता आमच्या लक्षात ही गोष्ट येते की, आमची खालची प्रकृती अशी तयार केली गेली आहे की, तिच्यामधील, तिच्या आविष्कारामधील प्रत्येक गोष्ट, मग ती दिसावयास कितीही विकृत, हीन, क्षुद्र असो, ती दिव्य प्रकृतीच्या सुमेळातील कोणत्या तरी घटकांचे व घटनेचे प्रतिबिंब आहे. आता दिव्य प्रकृतीच्या आमच्या अदिव्य प्रकृतीवरील कार्याची तिसरी बाजू पहावयाची. आमच्यातील ही दिव्य शक्ती सर्व जीवन व्यवहार आपल्या पूर्णयोगाचे साधन म्हणून वापरते. आमचा जागतिक परिसराशी घडणारा प्रत्येक बाह्य संपर्क, आमचा या परिसरातील प्रत्येक बाह्य अनुभव, मग तो कितीही क्षुद्र किंवा कितीही आपत्तीजनक असो, तरीही दिव्य शक्ती आपल्या कार्यासाठी त्याचा वापर करते; आणि आमचा प्रत्येक आंतरिक अनुभव, दूर लोटावेसे वाटणारे दुःख (most repellent) किंवा अतिशय लज्जास्पद अधःपातदेखील पूर्णत्वाच्या मार्गावर आम्ही टाकलेले पाऊल बनतो. आमचे आंतरिक डोळे उघडलेले असतात आणि आमच्या आतील ईश्वराचा व्यवहार पाहून, जगातील ईश्वराचा व्यवहार कसा चालतो ते आम्ही ओळखू शकतो. अंधकारात, अज्ञानात असलेल्यांना ज्ञान, प्रकाश पुरविणे, दुबळे व पतित यांना सामर्थ्य पुरविणे, दुःखितांना व शोकग्रस्तांना सुख देणे, ही ईश्वराची जगातील योजना आहे हे आम्हाला त्याचे आमच्यातील कार्य बघून कळू लागते. ईश्वराची कार्यपद्धती खालच्या व वरच्या म्हणजेच, अदिव्य व दिव्य कार्यात एकाच प्रकारची आहे हे आम्हाला कळते. एवढेच की खाली, प्रकृतीतील अवचेतनाच्या द्वारा कार्य चालते; ते मंद गतीने व आम्हाला नकळत होत असते. वरचे कार्य जलद चालते, ते आम्हाला जाणवते, ते आत्मजाणीवयुक्त असते आणि या सर्वाच्या पाठीमागे ईश्वरी शक्तीच काम करीत आहे अशी जाणीव ईश्वराचे माध्यम झालेल्या साधकाला असते.

– श्रीअरविंद

(CWSA 23 : 46-47)

तंत्रमार्ग व पूर्णयोग - साम्यभेद

 

आम्ही जी समन्वयपद्धती स्वीकारली आहे, त्यामध्ये तंत्रपद्धतीहून वेगळे तत्त्व आहे; योगाच्या शक्यतांचा विचार वेगळ्या तऱ्हेने करून, हे वेगळे तत्त्व आम्ही उपयोगात आणले आहे. तंत्राचे समन्वयाचे साध्य गाठावयास आम्ही वेदांताच्या पद्धतीपासून प्रारंभ केला आहे. तंत्रपद्धतीत शक्ति ही सर्वाधिक महत्त्वाची मानतात, आत्मा गाठावयास शक्तीचा गुरुकिल्लीसारखा उपयोग करतात; आमच्या समन्वयांत आत्मा हा सर्वाधिक महत्त्वाचा आहे; शक्ति उन्नत करावयाचे रहस्य आत्म्याच्या ठिकाणी आम्हाला सापडते.

तंत्रपद्धती तळातून आपल्या कार्याला सुरुवात करते; शिखराकडे ती चढत जाते, व या चढण्यासाठी पायऱ्यांची शिडी करते; ही पद्धती आरंभाला शक्ति (कुंडलिनी) जागृत करण्यावर भर देते, जागृत शक्तीने शरीराच्या नाडीचक्रांतून क्रमश: वर चढावे, ही सहा चक्रे उघडावी यावर जोर देते; ही चक्रे उघडणे म्हणजे आत्म्याच्या शक्तीचे प्रांत क्रमश: खुले करणे असते.

पूर्ण योगामध्ये इतर योगांच्या सामान्य साध्यांत भर घातली जाते. सर्व योगांचे सामायिक साध्य आत्म्याची मुक्ति हे आहे; मानवी आत्मा जो स्वाभाविक अज्ञानात आणि मर्यादित क्षेत्रात पडला आहे, त्याची त्यातून मुक्ति व्हावी, त्याला आध्यात्मिक अस्तित्व लाभावे, त्याची त्याच्या उच्चतम आत्म्याशी अर्थात ईश्वराशी एकता व्हावी, हे सर्व योगांचे सामायिक साध्य आहे; पण त्या योगांमध्ये हे साध्य आरंभीची एक पायरी म्हणून नव्हे तर, ते एकमेव अंतिम साध्य आहे असे मानतात; त्या योगांत आध्यात्मिक अस्तित्वाचा भोग नसतोच असे नाही – तो असतो; पण त्याचे स्वरूप, मानवी व वैयक्तिक अस्तित्वाचे शांत आत्मिक अस्तित्वात विलीन होणे, हे असते किंवा दुसऱ्या उच्च लोकांत आध्यात्मिक भोग भोगणे, हे असते.

तंत्रपद्धती मुक्ति हे आपले अंतिम साध्य मानते; परंतु हे एकच साध्य तिला नसते – तिच्या मार्गात दुसरे एक साध्य तिला असते; आध्यात्मिक शक्ति, प्रकाश, आनंद हा मानवी अस्तित्वांत पूर्णत्वाने यावा व पूर्णत्वाने भोगला जावा हे तिचे मार्गातील साध्य असते; या पद्धतीत परमश्रेष्ठ अनुभूतीचे ओझरते दर्शनहि सापडते : मुक्ति आणि विश्वगत कर्म व आनंद यांचा संयोग या परमश्रेष्ठ अनुभूतीत प्रतीत होतो; या संयोगाला विरोधी आणि या संयोगाशी विसंवादी असणाऱ्या सर्व गोष्टींवर अंतिम विजय साधक मिळवू शकतो, या गोष्टीचे तंत्रपद्धतीला ओझरते दर्शन झाले आहे.

आमच्या आध्यात्मिक शक्यतांसंबंधी ही विशाल दृष्टि घेऊन, आम्ही आमच्या योगाला आरंभ करतो; या दृष्टीत आणखी एका गोष्टीची आम्ही भर घालतो; ही भर घालण्याने, आमच्या योगाला अधिक पूर्ण सार्थकता आणली जाते. ही भर अशी की, आम्ही मानवाचा आत्मा केवळ व्यक्तिभूत, केवळ सर्वातीताशी एकता साधण्यासाठी योग-प्रवास करणारा केवळ व्यक्तिभूत आत्मा आहे, असे मानीत नसून तो विश्वात्मा देखील आहे, सर्व जीवात्म्यांतील ईश्वराशी व सर्व प्रकृतीशी एकता साधण्याचे सामर्थ्य असलेला विश्वव्यापी आत्मा देखील आहे, असे मानतो आणि या विस्तृत दृष्टीला अनुरूप व्यवहाराचा पूर्ण पाठिंबा देतो.

मानवी आत्म्याची वैयक्तिक मुक्ति, आध्यात्मिक अस्तित्व, जाणीव (चेतना), आनंद या बाबतीत ईश्वराशी या आत्म्याची वैयक्तिक एकता (एकरूपता) हे ह्या पूर्ण-योगाचे पहिले साध्य नेहमीच असावे लागते.

योगाचे दुसरे साध्य मुक्त आत्म्याने मुक्तपणे ईश्वराच्या विश्वात्मक एकतेचा भोग घेणे हे असते;

पण या दुसऱ्या साध्यांतून तिसरे एक साध्य निघते ते हे की, ईश्वराच्या द्वारा सर्व जीवांशी जी एकता, त्या एकतेला व्यावहारिक रूप देणे; अर्थात ईश्वराचे मानवतेच्या संबंधांत जे आध्यात्मिक साध्य आहे, त्या साध्याच्या संबंधात सह-अनुभूतिपूर्वक ईश्वराचे सहकारी होणे.

वैयक्तिक योग येथपर्यंत आला म्हणजे, त्याची वैयक्तिकता, विभक्तता निघून जाते, आणि तो सामूहिक योगाचा एक भाग होतो; या सामूहिक योगाचे साध्य मानवजातीचे दिव्य प्रकृतीमध्ये उत्थापन करणे हे असते.

मुक्त वैयक्तिक आत्मा ईश्वराशी आत्मत: व प्रकृतितः एकरूप झाला म्हणजे त्याचे प्राकृतिक अस्तित्व मानवजातीच्या आत्मपूर्णत्वाचे साधन बनते – या साधनाच्या बळावर मानवजातीत ईश्वराची दिव्यता पूर्णपणे बहरू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-614)

तंत्रमार्गातील समन्वय

तंत्रशास्त्र जी साधना उपयोगात आणते ती स्वरूपतः समन्वयात्मक साधना आहे. हे एक महान विश्वव्यापी सत्य आहे की, अस्तित्वाला दोन ध्रुवटोके आहेत आणि या ध्रुवटोकांची मौलिक एकता, हे अस्तित्वाचे रहस्य आहे.

ब्रह्म आणि शक्ति, आत्मा आणि प्रकृति ही ती दोन ध्रुवटोके होत; प्रकृति ही आत्म्याची शक्ति आहे, किंवा असे म्हणणे अधिक सयुक्तिक होईल की, आत्मा शक्तिदृष्टीने प्रकृति हे नाव धारण करतो, प्रकृति या नावाने ओळखला जातो; हे महान सत्य तंत्रशास्त्राने उपयोगात आणले आहे.

तांत्रिक पद्धतीत मानवाच्या प्रकृतीला उन्नत करून, तिला आत्म्याच्या व्यक्त शक्तीचे रूप देणे हे साध्य असते; तंत्र हे मानवाची संपूर्ण प्रकृति हातात घेऊन तिचे आध्यात्मिक रूपान्तरण करू पाहते.

तंत्राच्या साधन-संभारात हठयोगाची जोरदार प्रक्रिया आहे; नाडीचक्रे उघडणे, कुंडलिनी शक्ति जागृत करून ब्रह्माच्या दिशेने या चक्रांतून तिची यात्रा घडवणे ही हठयोगाची प्रक्रिया विशेषेकरून आहे; त्यात राजयोगाची सूक्ष्म शुद्धीकरण, ध्यान, एकाग्रता ही प्रक्रिया आहे; तसेच इच्छाशक्तीचा आधार, भक्तीची प्रेरकशक्ति, ज्ञानसाधनेची गुरुकिल्ली यांचा आपल्या कार्याला गति देण्यासाठी तंत्रशास्त्र उपयोग करते. याप्रमाणे तंत्र-साधना हठादि सर्व योगांच्या भिन्न भिन्न शक्ति आपल्या कार्यासाठी एकत्र करते, परिणामकारक रीतीने एकत्र करते;

परंतु येथेच ती थांबत नाहीं; आणखी दोन दिशांनी तंत्र आपली समन्वयी प्रवृत्ति प्रकट करते; ते सामान्य योगपद्धतीत दोन गोष्टींची भर घालते; मानवी व्यवहाराच्या प्रेरक हेतूंना, मानवी गुणांना व वासनांना तंत्र हातांत घेते व त्यांना कठोर शिस्त लावून, आत्म्याच्या शासनाखाली त्यांनी वागावे अशी व्यवस्था ते प्रथम करते व नंतर ते दिव्य आध्यात्मिक पातळीवर त्यांना घेऊन जाते, त्यांना दिव्य, आध्यात्मिक रूप देते, ही एक गोष्ट.

दुसरी गोष्ट ही की, आपल्या योगसाध्यांत केवळ मुक्तीचा अंतर्भाव न करता भुक्तीचाहि अंतर्भाव ते करते; तंत्रेतर योगपद्धती मुक्ति हे आपले एकमेव साध्य मानतात; भुक्ति म्हणजे आत्मशक्तीने जगाचा उपभोग घेणे हे तंत्रेतर योगांना साध्य म्हणून मान्य नाही. त्यांना साध्याकडे जाताजाता मार्गात उपभोग घेणे, अंशत: प्रसंगाने उपभोग घेणे मान्य आहे. एकंदरीने तंत्राची योग-पद्धति इतर पद्धतींहून व्यापक आहे, धैर्यशाली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 611-612)