Posts

अमृतवर्षा २५

उद्दिष्ट जरी समान असले तरी, विविध साधकांच्या वृत्तीप्रवृत्ती विभिन्न असतात आणि त्यामुळे प्रत्येकाचे मार्गदेखील भिन्नभिन्न असतात. प्रार्थना आणि स्तोत्र या गोष्टी हा सुद्धा ‘ईश्वरा’च्या साक्षात्काराचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु तो मार्ग प्रत्येकालाच भावतो असे नाही. जो साधक ज्ञानमार्गाचा अवलंब करतो तो ध्यान व एकाग्रतेचा अभ्यास करतो. कर्ममार्गी व्यक्तीसाठी कार्याचे समर्पण हा उत्तम मार्ग असतो.

प्रार्थना आणि स्तोत्र हे भक्तीचे एक महत्त्वाचे अंग आहे. मात्र ते सर्वोच्च आहे असे नाही. शुद्ध प्रेम ही भक्तीची सर्वोच्च परिपूर्णता आहे. अशा प्रेमाला, प्रार्थना आणि स्तोत्र या माध्यमातून ईश्वरा’चा खरा आत्मा लाभू शकतो आणि त्यानंतर प्रार्थना आणि मंत्रादींच्या पलीकडे जात, हे शुद्ध प्रेम ‘ईश्वरा’च्या आत्म-भुक्तिमध्ये (self-enjoyment) विरघळून जाते. आणि असे असूनसुद्धा, प्रार्थना व स्तोत्राविना ज्याचे चालू शकते असा भक्तियोगी विरळाच आढळेल. जेव्हा कोणत्याही प्रक्रियांची आणि साधनेची आवश्यकता उरलेली नसते अशावेळीदेखील हृदयातून प्रार्थना आणि स्तोत्र स्फुटित होतात. फक्त एवढेच लक्षात ठेवले पाहिजे की, (योग) मार्ग हा व्यक्तीनिरपेक्ष मार्ग असत नाही; त्यामुळे एखाद्याचा मार्ग हाच दुसऱ्याचा मार्ग असेल असे नाही.

बऱ्याच भक्तिमार्गी लोकांची अशी समजूत असते की, जो प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी करत नाही, त्या गोष्टींमध्ये ज्याला आनंद लाभत नाही, तो माणूस आध्यात्मिक (सत्य धर्माचे पालन करणारा) नसतो. परंतु असे समजणे हे भ्रांतीचे आणि संकुचितपणाचे लक्षण आहे. (गौतम) बुद्ध हे कधीही प्रार्थना व स्तोत्र या गोष्टींमध्ये रममाण झाले नाहीत पण म्हणून ते आध्यात्मिक नव्हते असे कोण म्हणेल बरे? प्रार्थना आणि स्तोत्र इत्यादी गोष्टी भक्तिसाधनेसाठी विकसित झालेल्या आहेत.

– श्रीअरविंद [Writings in bengali : 186]

अमृतवर्षा १८

सातत्याने परिपूर्ण सत्याच्या अधिकाधिक निकट जावे या हेतूने म्हणजेच, हे समग्र विश्व अनंतकाळ प्रगत होत आहे याचे उत्तरोत्तर वाढते ज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने जो कोणी सत्याच्या शोधासाठी प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो; तसेच आजवर त्याला जे सत्य वाटत होते अशा विचारांचा (जर तशीच आवश्यकता असेल तर,) परित्याग करण्यासाठी जो तयार होतो; तो हळूहळू अधिक गहन, अधिक परिपूर्ण आणि अधिक तेजोमय अशा महान विचार-पुंजांच्या संपर्कात येतो.

दीर्घ ध्यानाभ्यासानंतर, मननानंतर, तो शुद्ध बौद्धिक शक्तीच्या महान वैश्विक प्रवाहाच्या थेट संपर्कात येतो आणि त्यानंतर मात्र त्याच्यापासून कोणतेही ज्ञान लपून राहू शकत नाही.

त्या क्षणापासून धीरगंभीरपणा – मानसिक शांती – ही त्याचा एक भागच बनून जाते. सर्व प्रकारच्या समजुती, सर्व मानवी ज्ञान, सर्व धार्मिक शिकवण, जे सारे कधीकधी खूपच विरोधाभासात्मक वाटते, त्या साऱ्या पाठीमागील गहन सत्य त्याला जाणवते; त्याच्या दृष्टीपासून आता काहीच लपून राहू शकत नाही.

अगदी कोणत्याही त्रुटी, अज्ञान या गोष्टी सुद्धा त्याला आता अस्वस्थ करत नाहीत, कारण असे कोणा एका अज्ञात अधिकारी व्यक्तीने सांगून ठेवले आहे : जो सत्याच्या दिशेने मार्गक्रमण करत असतो त्याला कोणत्याही त्रुटींचा त्रास होत नाही कारण तो हे जाणून असतो की, ”त्रुटी म्हणजे जीवनाचा सत्याच्या दिशेने चाललेला पहिलावहिला प्रयत्न असतो.”

अशा परिपूर्ण धीरगंभीरतेच्या स्थितीप्रत पोहोचणे म्हणजे विचारांच्या शिखरावर जाऊन पोहोचणे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 28]

अमृतवर्षा ०९

सर्वकाही सर्वांचे आहे. ‘एखादी गोष्ट माझी आहे’ असे म्हणणे वा तसा विचार करणे म्हणजे विलगता, विभाजन निर्माण करण्यासारखे आहे, मात्र वास्तवात असे विभाजन नसतेच. सर्वकाही सर्वांचे आहे, आपण ज्यापासून बनलो आहोत ते मूलद्रव्यदेखील सर्वांचे आहे. क्रमश: होत जाणाऱ्या वाटचालीमधील एका टप्प्यावर, ज्या अणुरेणूंच्या समुदायापासून आपली संरचना झालेली आहे, आणि ज्यांच्यापासून उद्या एक वेगळीच संरचना तयार होणार आहे, ते अणुरेणू, ते मूलद्रव्यसुद्धा सर्वांचे आहे.

काही लोकांकडे पुष्कळशी भौतिक साधनसंपत्ती असते, हे खरे आहे. परंतु वैश्विक कायद्याशी सुसंगत राहायचे असेल तर त्यांनी स्वत:ला, ‘आपण त्या संपत्तीचे विश्वस्त आहोत, राखणदार आहोत’, असे मानले पाहिजे. सर्वांच्या हितासाठी त्याचा विनियोग करावा या हेतूने, त्या संपत्तीची व्यवस्था लावण्यासाठी त्यांच्याकडे ती संपत्ती विश्वासाने सोपविण्यात आलेली असतेहे त्यांना माहीत असले पाहिजे.

“एखादी कल्पना ही माझी आहे” असे जे म्हणतात आणि इतरांना त्याचा लाभ घेऊ देण्याची परवानगी देणे म्हणजे आपण फार मोठा परोपकार करत आहेत असा ज्यांचा विचार असतो, ते मूर्ख असतात. कल्पनांचे हे विश्वही सर्वांचे आहे आणि बौद्धिक शक्ती हीदेखील वैश्विक शक्ती आहे.

– श्रीमाताजी [CWM 02 : 103]

अमृतवर्षा ०८

 

आपली मने आणि हृदये, आपले सर्व विचार, आपल्या सर्व कृती या ईश्वराने पूर्णत: व्यापल्या जाव्यात आणि त्या ‘त्या’च्या महान तेजोमयतेने प्रकाशमान व्हाव्यात या हेतूने एक उत्कट अभीप्सा बाळगून, पूर्ण प्रामाणिकता बाळगून, शुभसंकल्प करत, रोज स्वत:ला ‘सत्यसूर्या’प्रत, ‘परमप्रकाशा’प्रत, या विश्वाच्या उगमाप्रत आणि विश्वाच्या बौद्धिक जीवनाप्रत उन्नत करण्याचा एक निश्चय आपण सर्वांनी केला पाहिजे असे मला वाटते.

तेव्हाच खऱ्या अर्थाने गतकाळातील थोर सत्पुरुषाच्या उपदेशाचे अनुसरण करण्याचा लाभ आणि अधिकार आपण प्राप्त करून घेऊ शकू. ते आपल्याला सांगतात की : ”करूणेने ओथंबलेल्या हृदयानिशी, दुःखपीडेमुळे छिन्नविछिन्न झालेल्या या जगाकडे वळा; मार्गदर्शक व्हा आणि जिथे कोठे अज्ञानांधकार सत्ता गाजवीत असेल तेथे प्रकाशदीप प्रज्वलित करा.”

– श्रीमाताजी [CWM 02 : 29]

अमृतवर्षा ०७

 

आपल्या अंतरंगातील ‘देवता’ कधीही सक्ती करत नाही. कोणतीही मागणी करत नाही किंवा भयदेखील दाखवीत नाही; ती स्वत:चेच आत्मदान करते, प्राणिमात्र आणि वस्तुजात यांच्या हृदयांमध्ये ती दडून बसते; आणि ती स्वत:चेच विस्मरण करविते. ती कोणाला दोष देत नाही, की गुणदोषांचे मोजमाप करत बसत नाही. कोणास शाप देत नाही की कोणाची निंदाही करत नाही. तर ती कोणत्याही प्रतिबंधाविना पूर्णत्व आणण्याचे कार्य अथकपणे करत राहते; कानउघडणी न करता सुधारणा घडवून आणण्याचे, उतावीळपणा न करता प्रोत्साहित करत राहण्याचे कार्य अथकपणे करत राहते. व्यक्तीच्या ग्रहणशीलतेनुसार प्रत्येकाला वैभवसंपन्न करण्यासाठी ती अथकपणे झटत राहते.

ती माऊली आहे. तिच्या प्रेमरूपी फळांकरवी ती भरणपोषण करते; सांभाळ करते आणि रक्षण करते; सल्ला देते व सांत्वन करते; कारण ती सर्वकाही जाणते, ती सर्वकाही सहन करू शकते, ती सर्वांच्या चुका पदरात घेते व क्षमा करते; सर्वांविषयी आशा बाळगते आणि सर्वांना सर्व गोष्टींसाठी सुसज्ज करते.

तिने सर्वकाही तिच्या स्वत:मध्येच धारण केलेले असल्यामुळे, जी सर्वांसाठी असू शकत नाही अशी कोणतीच गोष्ट तिच्या मालकीची नसते. तिची सत्ता सर्वत्रांवर चालत असल्यामुळेच ती सर्वांची सेवकही असते. याच कारणासाठी लहान अथवा थोर, जे कोणी तिच्याबरोबर सत्ताधीश होण्याची किंवा तिच्यामधील देवपद मिळविण्याची इच्छा करतात, ते तिच्याप्रमाणे सर्व बांधवांचे सेवक बनून जातात; जुलमी सत्ताधीश बनत नाहीत.

सेवकाची ही विनम्र भूमिका खरोखर किती सुंदर आहे! सर्वांच्या अंतर्यामी असलेल्या ‘ईश्वरा’चे संदेशदूत होणे आणि सर्व वस्तुंना जीवन देणाऱ्या ‘दिव्य प्रेमा’ची अभिव्यक्ती करणे हे ज्यांचे जीवितकार्य आहे त्या सर्वांचीच अशा प्रकारची सेवकाची भूमिका असते.

– श्रीमाताजी [CWM 02 : 42-43]

अमृतवर्षा ०५

 

साधक : आम्हाला सदासर्वकाळ भौतिक परिस्थितीमध्ये अडकवून ठेवणाऱ्या शारीरिक चेतनेमधून आम्ही बाहेर कसे पडावे?

श्रीमाताजी : त्यासाठी अनेक मार्ग आहेत. बौद्धिक, भावनिक, कलात्मक आणि आध्यात्मिक मार्ग आहेत. आणि साधारणपणे, ज्याला जो मार्ग सर्वाधिक सोपा वाटतो तो मार्ग त्याने अवलंबणे कधीही चांगले. कारण सर्वात अवघड असे जे आहे त्यापासून सुरुवात करायची म्हटले तर हाती काहीच लागणार नाही. आणि इथेच आपण श्रीअरविंदांनी ‘The Synthesis of Yoga’ या ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग किंवा कर्ममार्ग यांच्यापाशी परत येऊन पोहोचतो. यातील कर्ममार्ग हा प्रामुख्याने तुम्हाला भौतिक जीवनाशी जोडून ठेवतो आणि त्यामध्येच मुक्तीचा शोध घेण्यास प्रवृत्त करतो. कदाचित हा सर्वात परिणामकारक पण सर्वात अवघड असा मार्ग आहे.

बहुतांशी मुमुक्षू लोकांना ध्यानाचा, एकाग्रतेचा मार्ग, या भौतिक जीवनापासून दूर राहण्याचा, भौतिक क्रियाकलापांचा परित्याग करण्याचा मार्ग हा कर्ममार्गापेक्षा निश्चितपणे सोपा वाटतो. पण, ते भौतिक चेतनेला, ती जशी आहे तशीच सोडून देतात, तिच्यामध्ये कोणतेही परिवर्तन घडवून न आणता, तशीच सोडून देतात; या मार्गामध्ये, व्यक्ती जोवर एखाद्या साधु वा संन्याशाप्रमाणे सक्रिय जीवन बाजूला सारत नाही आणि सदासर्वदा ध्यानामध्ये निमग्न राहत नाही तोवर तिला काहीच साध्य होत नाही. म्हणजेच, व्यक्तित्वाचा एक संपूर्ण भाग कधीच रूपांतरित होत नाही, तो तसाच शिल्लक राहतो. रूपांतरण करणे हा त्यांच्याकडे मार्गच नसतो, तर शरीराला नकार देऊन, त्या शरीरातून शक्य तितक्या त्वरेने बाहेर पडणे हाच केवळ एक मार्ग त्यांच्याकडे असतो. पूर्वी योगसाधनेमध्ये हेच अभिप्रेत असे आणि साहजिकच ते अधिक सोपे होते. पण आपल्याला जे हवे आहे ते हे नाही.

आपल्याला शारीरिक, भौतिक चेतनेचे रूपांतरण हवे आहे, त्याला नकार देणे येथे अभिप्रेत नाही. आणि येथेच श्रीअरविंदांनी अगदी थेट आणि अगदी परिपूर्ण असा ‘ईश्वरा’प्रत नेणारा समर्पणाचा मार्ग सुचविलेला आहे. क्रमश: अधिकाधिक समग्र होत जाणारे आणि भौतिक क्रियाकलापांचा व भौतिक चेतनेचादेखील समावेश करून घेणारे समर्पण. आणि व्यक्ती ते करण्यामध्ये यशस्वी झाली तर शरीर किंवा जडभौतिक हे मार्गातील धोंड न ठरता, साहाय्यक बनते.

 

– श्रीमाताजी [CWM 08 : 299-300]

अमृतवर्षा ०२

 

चेतनेचा प्रवाह दुतर्फा असतो. प्रथम आरोहण असते; तुम्ही जडभौतिक चेतनेमधून बाहेर पडून, उच्चतर चेतनेच्या श्रेणीमध्ये स्वत:चे उन्नयन करता. निम्नतर श्रेणीमधून उच्चतर श्रेणीमध्ये होणारे हे आरोहण, उच्चतराने निम्नतर श्रेणीमध्ये अवतरित व्हावे अशी त्याला साद घालत असते. जेव्हा तुम्ही पृथ्वीच्या वर उठता, उन्नत होता तेव्हा, तुम्ही या पृथ्वीच्या वर असणारे असे काहीतरी खाली उतरवता – कोणतातरी प्रकाश, किंवा रूपांतरकारी अशी कोणतीतरी शक्ती, किंवा जुन्या प्रकृतीचे रूपांतरण घडवून आणण्याकडे जिचा कल असतो अशा शक्तीचे तुम्ही अवतरण घडवता.

आणि मग, ज्या गोष्टी वेगवेगळ्या होत्या, एकमेकींशी असंलग्न होत्या, एकमेकींपासून विलग होत्या; जसे की, तुमच्यामधील उच्चतर आणि निम्नतर स्तर, तुमच्या व्यक्तित्वाचे आंतरिक आणि बाह्य स्तर या गोष्टी आता एकत्रित येऊ लागतात, हळूहळू त्या एकमेकांमध्ये मिसळू लागतात आणि कालांतराने एका सुसंवादामध्ये एक सत्य बनून, एकरूप होतात. ज्याला ‘चमत्कार, चमत्कार’ असे म्हणतात ते असे घडून येतात.

विश्व हे चेतनेच्या अगणित स्तरांचे बनलेले आहे आणि त्या प्रत्येक स्तराचे, त्या प्रतलाचे स्वत:चे असे काही खास नियम असतात, कायदे असतात; एका स्तराचे कायदे दुसऱ्या स्तराला लागू पडत नाहीत. ‘चमत्कार’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून, अचानकपणे घडून आलेले अवतरण असते; एका वेगळ्या स्तरावरील चेतनेचे आणि तिच्या शक्तींचे उसळून येणे असते. बहुधा या प्राणिक शक्ती असतात आणि त्यांचे या जडभौतिक स्तरावर अवतरण होते. जडभौतिक यंत्रणेवर उच्चतर स्तरावरील यंत्रणेकडून वर्षाव होतो. जणू काही एका वीजकल्लोळाद्वारे आपल्या सामान्य चेतनेचे ढग भेदले जातात आणि त्यामध्ये उच्चतर शक्तींचा, गतिविधींचा, प्रवाहांचा वर्षाव होतो.

त्या परिणामाला आपण ‘चमत्कार’ म्हणतो. कारण आपल्याला अचानक झालेला बदल दिसतो; आपल्या सामान्य कक्षेमधील निसर्गकायद्यामध्ये आकस्मिक हस्तक्षेप झालेला आपल्याला दिसतो पण आपल्याला त्याचा क्रम, ती व्यवस्था, त्याचे कारण काय हे काहीच कळत नाही, दिसू शकत नाही कारण त्या चमत्काराचा स्रोत हा एका वेगळ्या स्तरावर असतो.

आपल्या जडभौतिक जगामध्ये त्यापलीकडील जगतांचा असा हस्तक्षेप होणे ही फार काही असामान्य घटना नाही, किंबहुना अशा घटना या नित्याच्या असू शकतात;  आपल्याला त्या घटना पाहण्याची दृष्टी असेल आणि त्यांचे निरीक्षण कसे करावे याची जाण जर आपल्याला असेल तर असे पुष्कळ चमत्कार आपल्याला पदोपदी दिसू शकतील. विशेषत: उच्चतर स्तरावरील वैभवाचे, पृथ्वी-चेतनेमध्ये अवतरण घडवून आणण्यासाठी जे प्रयत्नशील असतात त्यांच्याबाबतीत तर ती नित्याची बाब असू शकते.

 

– श्रीमाताजी [CWM 03 : 30-31]

अमृतवर्षा ०१

साधक : खरेखुरे स्वातंत्र्य अस्तित्वातच नाही का? प्रत्येकच गोष्ट ही पूर्णपणे पूर्वनिर्धारित असते का, अगदी स्वातंत्र्य सुद्धा पूर्वनिर्धारित असते का ? प्रारब्धवाद हेच सर्वोच्च रहस्य आहे का?

श्रीमाताजी : स्वाधीनता आणि प्रारब्ध (Freedom and fatality) स्वातंत्र्य आणि निश्चयवाद (liberty and determinism) या गोष्टी म्हणजे चेतनेच्या भिन्नभिन्न पातळ्यांवर प्राप्त होणारी सत्य आहेत. त्या दोहोंना समान पातळीवर आणून, परस्परांविरोधात उभे करण्यास मनाला भाग पाडणारे जर कोणी असेल तर ते अज्ञानच असते.

चेतना ही काही एकच एक एकसंध अशी वास्तविकता नसते, तर ती खूप जटिल असते; एखादे सरळसोट प्रतल असल्यासारखी ती नसते; तर ती बहुआयामी असते. एका बाजूला सर्वोच्च उंचीवर ‘अव्यक्त परात्पर’ असते तर सर्वात खाली ‘जडद्रव्य’ असते आणि या दोहोंच्या दरम्यान, म्हणजेच सर्वोच्च उंची आणि निम्नतम खोली यांच्या दरम्यान चेतनेच्या स्तरांच्या अगणित छटा असतात.

जडभौतिकाच्या प्रतलावर आणि सामान्य चेतनेच्या स्तरावर तुमचे हातपाय बांधलेले असतात. तेथे तुम्ही प्रकृतीच्या यंत्रणेचे गुलाम असता; तुम्ही कर्मबंधांनी बद्ध झालेले असता, आणि तेथे जे जे काही घडते ते, जे आधी घडून गेले आहे त्याचा काटेकोर परिणाम असतो. तेथे स्वतंत्र कृतीचा व कर्माचा आभास असतो पण वास्तविक, इतर जण जे काही करत असतात त्याच गोष्टी तुम्ही करत असता, या जगतामध्ये प्रकृतीच्या लौकिक व्यापारांचे तुम्ही केवळ प्रतिध्वनी असता, प्रकृतीच्या वैश्विक यंत्राच्या रहाटगाडग्यावर तुम्ही असहाय्यपणे फिरत राहता.

पण हे असेच असायला पाहिजे असे मात्र नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे स्थान बदलू शकता; तुम्ही खाली असण्याऐवजी, या अजस्त्र यंत्रणेखाली चिरडून जाण्याऐवजी, किंवा कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाली करत राहण्याऐवजी, तुम्ही वर उठू शकता आणि वरून पाहू शकता; आणि तुमच्या चेतनेमध्ये परिवर्तन घडवून त्यायोगे, वरकरणी अपरिहार्य भासणारी परिस्थिती आणि बंधवत वाटणारी स्थिती यामध्ये बदल घडवून आणणाऱ्या सुकाणूचा तुम्ही ताबा घेऊ शकता.

एकदा का तुम्ही त्या रहाटगाडग्याच्या वर उठलात आणि वर भरभक्कमपणे उभे राहिलात तर तुमच्या असे लक्षात येते की, तुम्ही मुक्त आहात. तुम्ही सर्व प्रकारच्या सक्तींपासून मुक्त आहात. तुम्ही आता केवळ एक अगतिक साधन राहत नाही; इतकेच नव्हे, तर तुम्ही आता एक सक्रिय असे माध्यम बनता. आता तुम्ही तुमच्या कर्मफलांनी बद्ध राहत नाही; तर, तुम्ही त्या कर्मफलांमध्ये बदलसुद्धा घडवून आणू शकता.

एकदा का तुम्ही या साऱ्याकडे शक्तींची लीला या दृष्टीने पाहू लागलात; एकदा का तुम्ही या शक्तींचा उगम जेथे आहे त्या चेतनेच्या स्तरावर जाऊन पोहोचलात, आणि त्या गतिमान अशा शक्ति-उगमाशी तद्रूप झालात की मग, तुम्ही केवळ एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे हालचाल करणारे राहात नाही तर तिची सूत्रे हालविणाऱ्यांपैकी एक बनता.

कर्माच्या चक्रातून बाहेर पडून दिव्य गतिविधींमध्ये प्रवेश होणे हेच खरंतर योगसाधनेचे उद्दिष्ट असते. योगसाधनेच्या साहाय्याने तुम्ही प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामधून बाहेर पडता. प्रकृतीच्या यांत्रिक चक्रामध्ये तुम्ही केवळ एक अज्ञानी गुलाम असता; असहाय्य, अगतिक असे साधन असता, अशा यांत्रिक चक्रामधून योगसाधनेच्या आधारे तुम्ही बाहेर पडता आणि एका निराळ्या स्तरावर चढून जाता; तेथे तुम्ही ‘उच्चतर नियती’च्या कार्याचे जागरूक सहभागीदार आणि क्रियाशील माध्यम बनता.

– श्रीमाताजी [CWM 03 : 29-30]

श्रीअरविंद बडोद्यामध्ये प्राध्यापक होते तेव्हा श्री. के. एम. तथा कन्हैयालाल मुन्शी हे त्यांचे विद्यार्थी होते. तेव्हा विद्यार्थीदशेत असताना, मुन्शी यांनी श्रीअरविंदांना प्रश्न विचारला होता, “राष्ट्रवादाची भावना कशी विकसित करता येईल?”

 

श्रीअरविंदांनी भिंतीवरील भारताच्या नकाशाकडे निर्देश करत म्हटले, “या नकाशाकडे पाहा. यामध्ये भारतमातेचे रूप पाहण्याचा प्रयत्न करा. शहरं, पवर्तराजी, नद्या, जंगले या साऱ्यांनी मिळून तिचा देह तयार होतो. या देशामध्ये राहणारी माणसं म्हणजे या देहातील जिवंत पेशी आहेत. आपले साहित्य म्हणजे तिची स्मृती व वाणी आहे. तिच्या संस्कृतीचा गाभा हा तिचा आत्मा आहे. मुलांच्या आनंदामध्ये आणि स्वातंत्र्यामध्ये तिची मुक्ती आहे. भारत ही एक ‘सचेतन माता’ आहे असा भाव ठेवून तिच्याकडे पाहा, तिचे ध्यान करा आणि नवविधा भक्तीच्या योगाने तिचे पूजन करा….

 

पुढील काळात याच कन्हैयालाल मुन्शी यांनी राष्ट्रभावनेतून ‘भारतीय विद्या भवन’ची स्थापना केली.

 

‘भारत  – एक दर्शन’ ही मालिका येथे समाप्त होत आहे.

 

(Mother’s Chronicles, Book Five by Sujata Nahar)

हा असा काळ आहे की जेव्हा, अखिल विश्वाप्रमाणेच भारतासाठीसुद्धा, त्याची भावी नियती आणि त्याच्या पावलांचे वळण हे शतकासाठी म्हणून आत्ता दमदारपणाने निर्धारित केले जात आहे, आणि हे निर्धारण म्हणजे काही कोणत्या एखाद्या सामान्य शतकासाठीचे निर्धारण नव्हे तर, हे शतक स्वतःच मुळात असे एक महान निर्णायक वळण आहे की, ज्या शतकामध्ये मानवसृष्टीच्या आंतरिक आणि बाह्य इतिहासाच्या दृष्टीने प्रचंड उलथापालथी व्हायच्या आहेत.

 

आपण आत्ता ज्या कृती करू त्यानुसार, आपल्या त्या कर्माची मधुर फळे आपल्याला प्रदान केली जाणार आहेत आणि आत्ताच्या या निर्णायक क्षणी देण्यात आलेली अशा प्रकारची प्रत्येक हाक ही आपल्या नागरिकांच्या आत्म्याला देण्यात आलेली एक संधी असणार आहे. तसेच ती एक निवड असणार आहे आणि त्याचबरोबर, ती एक कसोटीदेखील असणार आहे.

 

आपण अशी आशा करूया की, ती हाक प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या सर्वोच्च उंचीपर्यंत जाऊन पोहोचावी आणि त्याच्या पारड्यात ‘नियतीच्या स्वामी’चे अगदी उघडपणाने झुकते माप पडावे.

 

– श्रीअरविंद [CWSA 01 : 413]

 

*

 

भारताचे भविष्य अगदी सुस्पष्ट आहे. भारत हा जगत्गुरू आहे. जगाची भावी संरचना ही भारतावर अवलंबून असणार आहे. भारत हा एक जिवंत आत्मा आहे. भारत हा जगामध्ये आध्यात्मिक ज्ञानाचे मूर्त रूप साकार करत आहे.

 

भारत सरकारने भारताचा हा अर्थ लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्यांच्या कृति-कार्यक्रमाची आखणी केली पाहिजे.

 

– श्रीमाताजी [CWM 13 : 353]