साधना, योग आणि रूपांतरण – २४२

नमस्कार वाचकहो,

मानवी प्रकृतीचे रूपांतरण हे पूर्णयोगाचे एक वैशिष्ट्य आहे.

‘रूपांतरण कोणत्या शक्तीद्वारे घडून येणार’ या निकषावर आधारित असलेले, आंतरात्मिक रूपांतरण, आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक रूपांतरण हे तीन प्रकार आपण आजवर पाहिले. अगदी सारांशरूपाने सांगायचे तर, चैत्य पुरुषाद्वारे होणारे रूपांतरण हे आंतरात्मिक रूपांतरण, उच्चतर चेतनेद्वारे होणारे रूपांतरण हे आध्यात्मिक रूपांतरण आणि अतिमानसिक शक्तीद्वारे होणारे रूपांतरण हे अतिमानसिक रूपांतरण असते हे आता आपल्याला ज्ञात झाले आहे.

आता ‘रूपांतरण कोणाचे’ या निकषावर आधारित असलेले मानसिक, प्राणिक व शारीरिक रूपांतरण हे तीन प्रकार आपल्याला समजावून घ्यायचे आहेत. या रूपांतरणामध्ये मन, प्राण आणि शरीर यांच्या रूपांतरणाचा समावेश होतो. तसेच पुढे जाऊन, आपल्यामधील अवचेतन, आणि अचेतनाचे रूपांतरणही पूर्णयोगामध्ये अभिप्रेत असते.

मनुष्य देहरूपात आला तेव्हा त्याला स्वत:च्या मूळ स्वरूपाचे, आणि स्वत:च्या अंतरीच्या दिव्यत्वाचे विस्मरण झाले. आणि त्याच्या मन, प्राण व शरीर या साधनांमध्ये विकार निर्माण झाले. आणि त्यामुळेच दिव्य जीवनाकडे चालणाऱ्या मार्गक्रमणामध्ये, साधनेमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे त्यांच्यावर मात करून पुढे जाणे हे साधकासाठी आवश्यक ठरते. त्यावर मात करायची झाली तर त्याचे नेमके स्वरूप, त्याची लक्षणे, त्याची गुणवैशिष्ट्ये व मर्यादा माहीत असणे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टींचा म्हणजे, मन, प्राण, शरीर यांचे स्वरूप काय आहे, त्यांची बलस्थानं कोणती व त्यांच्या मर्यादा कोणत्या याचा सारासार आणि सांगोपांग विचार श्रीअरविंद व श्रीमाताजी यांनी केला आहे. हा विचार इतका विस्तृत व सखोल आहे की, त्या सगळ्याचा येथे समावेश करायचा ठरवले तर एक स्वतंत्र ग्रंथच तयार होईल. त्यामुळे इतक्या तपशिलात न जाता, परंतु तरीही त्यातील गाभाभूत विचार वाचकांच्या हाती लागावा, असा आमचा प्रयत्न आहे. आता आपण क्रमशः मन, प्राण व शरीर यांच्या रूपांतरणासाठी साहाय्यक होतील असे विचार समजावून घेण्याचा प्रयत्न करू या. उद्यापासून ‘मानसिक रूपांतरण’ हा भाग सुरू करत आहोत.

धन्यवाद.
संपादक, अभीप्सा मराठी मासिक

भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे…

श्रीअरविंदांच्या जन्मापूर्वी, धर्म आणि आध्यात्मिकता या गोष्टी भूतकाळातील व्यक्तींभोवती केंद्रित झालेल्या होत्या. आणि त्या व्यक्ती ‘पृथ्वीवरील जीवनाला नकार हे (जीवनाचे) उद्दिष्ट’ असले पाहिजे असे सांगत असत. तेव्हा त्याकाळी तुमच्यापुढे दोन पर्याय ठेवले जात :

किरकोळ आनंद किंवा यातना, सुख किंवा दु:ख यांच्या चक्रामध्ये फिरत राहणारे हे इहलोकातील जीवन जगत असताना जर तुम्ही चुकीचे वर्तन केलेत (तुमच्याकडून पापाचरण घडले) तर तुम्हाला नरकाची भीती दाखविली जात असे. हा पहिला पर्याय असे.

दुसरा पर्याय म्हणजे, ऐहिक जीवनाचा त्याग करून स्वर्ग, निर्वाण, मोक्ष इत्यादी गोष्टींच्या प्राप्तीसाठी कोणत्यातरी दुसऱ्याच जगामध्ये पलायन करायचे.

तुम्हाला या दोन्हीपैकी एका पर्यायाची निवड करावी लागत असे, खरंतर त्यामध्ये निवड करण्यासारखे काहीच नसे कारण दोन्ही पर्याय एकसारखेच अयोग्य, सदोष आहेत.

श्रीअरविंदांनी आपल्याला असे सांगितले आहे की, अशा प्रकारचा विचार करणे हीच मूलभूत चूक होती; कारण त्यातूनच भारताची अवनती घडून आली आणि या गोष्टीच भारताच्या दुर्बलतेला कारणीभूत झाल्या…

मात्र, हेही तितकेच खरे आहे की, भारत हाच जगातील असा एकमेव देश आहे की, ज्याला आजही, जडभौतिकाच्या पलीकडेही काही असते याची जाणीव आहे. युरोप, अमेरिका आणि इतर देशांना याचा विसर पडलेला आहे. आणि म्हणूनच जतन करण्यायोग्य आणि विश्वाला देण्यायोग्य एक संदेश आजही भारताकडे आहे.

श्रीअरविंदांनी आम्हाला हे दाखवून दिले की, या भौतिक जीवनापासून पळ काढण्यामध्ये सत्य सामावलेले नाही; तर या भौतिक जीवनात राहूनच, त्याचे रूपांतरण करायचे आहे. या भौतिक जीवनाचे रूपांतरण ‘दिव्यत्वा’मध्ये केल्यामुळे, ‘ईश्वर’ या ‘इथे’च, या ‘जडभौतिक विश्वा’मध्ये आविष्कृत होऊ शकेल.

– श्रीमाताजी (CWM 12 : 210-211)

साधना, योग आणि रूपांतरण – १९२

योगामधील केंद्रवर्ती प्रक्रिया – भाग ०८

एकाग्रतेचा परिणाम सहसा अगदी त्वरेने घडून येत नाही; मात्र काही जणांमध्ये तो एकदम वेगवान आणि अचानकपणे घडून येतो; परंतु बहुतेकांना मात्र पूर्वतयारीसाठी आणि समायोजनासाठी कमीअधिक कालावधी लागतो. विशेषतः अभीप्सा आणि तपस्येद्वारे, जिथे प्रकृतीची काही प्रमाणात का होईना पण पूर्वतयारी झालेली नसते, तिथे अधिक कालावधी लागतो.

ज्ञानमार्गाची एक ‘अद्वैती’ प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये व्यक्ती स्वतःच्या मन, प्राण आणि शरीराशी असलेल्या तादात्म्याला नकार देते, ती सातत्याने असे म्हणत राहते की, “मी मन नाही”, “मी प्राण नाही”, “मी शरीर नाही.” या गोष्टींना ती स्वतःच्या खऱ्या ‘स्व’पासून अलग करून पाहते आणि कालांतराने व्यक्तीला साऱ्या मानसिक, प्राणिक, शारीरिक क्रिया-प्रक्रिया आणि मन, प्राण व शरीराच्या स्वयमेव जाणिवासुद्धा बाह्य व बहिवर्ती क्रिया बनत चालल्याचे जाणवू लागते. त्याचवेळी अंतरंगामध्ये, त्यांच्यापासून निर्लिप्त अशी अलग स्वयंभू अस्तित्वाची जाणीव वाढीस लागते, जी जाणीव वैश्विक आणि परात्पर चैतन्याच्या साक्षात्कारामध्ये खुली होते.

अशीच आणखी एक अतिशय शक्तिशाली पद्धत आहे ती म्हणजे सांख्य दर्शनाची पद्धत. या पद्धतीमध्ये ‘पुरुष’ आणि ‘प्रकृती’चे विलगीकरण केले जाते. यामध्ये मनावर ‘साक्षित्वा’ची भूमिका लादली जाते म्हणजे मन, प्राण, शरीराच्या सर्व कृती या ‘मी’ आणि ‘माझे’ यांपासून वेगळ्या असतात, त्या बाह्य क्रिया बनलेल्या असतात, पण ‘प्रकृती’शी संबंधित असतात आणि ‘मी’च्या बाह्य व्यक्तित्वावर लादल्या जातात. या कोणत्याही गोष्टींनी ‘मी’ बांधला जात नाही, ‘मी’ हा त्यांपासून निर्लिप्त असतो; शांत, साक्षी ‘पुरुष’ असतो. परिणामतः व्यक्तीमध्ये एक प्रकारचे विभाजन वाढीस लागते. साधकाला स्वतःच्या अंतरंगामध्ये एका स्थिर, शांत, स्वतंत्र चेतनेच्या वाढीची जाणीव होते, ज्या चेतनेला पृष्ठवर्ती मन, प्राण आणि शारीरिक प्रकृतीच्या खेळापासून आपण स्वतः दूरस्थ आहोत याची जाणीव होते.

सहसा जेव्हा असे घडून येते तेव्हा उच्चतर ‘चेतने’ची शांती, उच्चतर ‘शक्ती’चे कार्य अगदी त्वरेने खाली आणणे शक्य असते, आणि त्यामुळे ‘योगा’ची संपूर्ण वाटचाल वेगाने घडून येऊ शकते. परंतु बरेचदा, आवाहन (call) आणि एकाग्रतेला प्रतिसाद म्हणून ‘शक्ती’च स्वतःहून खाली अवतरित होते आणि मग, उपरोक्त गोष्टी आवश्यक असतील तर ती त्या करते आणि साहाय्यकारी व अनिवार्य अशा इतर मार्गांचा किंवा प्रक्रियांचा उपयोग करते. (क्रमश:)

– श्रीअरविंद (CWSA 30 : 328-329)

साधना, योग आणि रूपांतरण – १७५

उत्तरार्ध

(पूर्वार्धामध्ये आपण योग आणि योगिक चेतना म्हणजे काय, याचा विचार केला.)

नवीन चेतनेच्या (योगिक चेतनेच्या) वाढीबरोबर एक शक्ती साथसंगत करत असते आणि ती त्या चेतनेसोबतच वाढीस लागते आणि चेतनेची वाढ घडून यावी आणि ती पूर्णत्वाला पोहोचावी म्हणून त्या चेतनेला साहाय्य करते. ही शक्ती म्हणजे ‘योगशक्ती’ असते. ही शक्ती आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या सर्व चक्रांमध्ये निद्रिस्त असते आणि ती तळाशी वेटोळे घालून बसलेली असते, या शक्तीस ‘तंत्रशास्त्रा’मध्ये ‘कुंडलिनी’ शक्ती असे म्हणतात.

परंतु ती (योगशक्ती) आपल्या वरच्या बाजूसदेखील असते, आपल्या मस्तकाच्या वरच्या बाजूस ती ‘ईश्वरी शक्ती’ म्हणून स्थित असते – तेथे मात्र ती वेटोळे घालून, अंतर्हित, निद्रिस्त अशी नसते तर ती जागृत, ज्ञानसंपन्न, शक्तिशाली, विस्तृत आणि व्यापक असते. ती तेथे आविष्करणासाठी वाट पाहत असते आणि या ‘ईश्वरी शक्ती’प्रतच म्हणजे ‘श्रीमाताजीं’च्या शक्तीप्रत आपण स्वतःला खुले केले पाहिजे.

मनामध्ये ती ‘दिव्य मनःशक्ती’ या रूपामध्ये किंवा ‘वैश्विक मनःशक्ती’च्या रूपामध्ये आविष्कृत होते आणि वैयक्तिक मनाला जे करता येणे शक्य नसते असे सारेकाही ती करू शकते; तेव्हा ती ‘योगिक मनःशक्ती’ असते. याचप्रमाणे जेव्हा ती प्राण किंवा शरीर यामध्ये आविष्कृत होते तेव्हा ती ‘योगिक प्राणशक्ती’ किंवा ‘योगिक शारीरिक-शक्ती’ म्हणून प्रकट होते. ती वरील सर्व रूपांमध्ये जागृत होऊ शकते, बहिर्गामी आणि ऊर्ध्वगामी भेदन करत (bursting), ती खालून ऊर्ध्वगामी होताना स्वतःला व्यापक करत करत विस्तृत होऊ शकते किंवा ती अवरोहण (descend) करू शकते आणि वस्तुमात्रांसाठी तेथे एक निश्चित शक्ती बनून राहू शकते; किंवा ती स्वतः अधोमुखी होत, कार्यकारी होत व्यक्तीच्या शरीरामध्ये स्वतःचा वर्षाव करू शकते, तिचे स्वतःचे साम्राज्य प्रस्थापित करत, ती वरून खाली अशी व्यापकतेमध्ये विस्तृत होऊ शकते, ती आपल्यामधील कनिष्ठतमतेचा आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या उच्चतमतेशी धागा जोडून देते, व्यक्तीची वैश्विक जगामध्ये किंवा केवलतेमध्ये आणि विश्वतीतामध्ये प्रवेश करून देते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 422)

साधना, योग आणि रूपांतरण – १३९

(ईश्वरी कार्याचे साधन झालेल्या साधकामध्ये ‘दिव्य शक्ती’ अवतरित होऊ लागते, त्याला स्वतःमध्ये एक प्रकारची विशेष ऊर्जा जाणवू लागते. त्या ऊर्जेचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी श्रीअरविंद येथे मार्गदर्शन करत आहेत.)

एक ‘दिव्य शक्ती’ येते आणि ती तुम्हाला कार्यप्रवृत्त करते आणि ही गोष्टदेखील आध्यात्मिक जीवनाच्या इतर सर्व गोष्टींइतकीच अस्सल असते. ती विशेष ‘ऊर्जाशक्ती’ व्यक्तीमधील कर्म-कर्त्याचा (worker) ताबा घेते आणि ती त्या व्यक्तीच्या माध्यमातून स्वतःची परिपूर्ती करते. एखाद्या व्यक्तीमध्ये अशा रीतीने त्या शक्तीने पूर्णतः कार्य करणे ही गोष्ट खरोखर कल्याणकारी असते. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, व्यक्तीने त्याचा अतिरेक करता कामा नये. म्हणजे (त्याचा परिणाम म्हणून,) शरीरातील सगळी ऊर्जाच संपुष्टात आल्यासारखे होणे किंवा शारीरिक जडत्व येण्याइतपत शीण येणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत.

समर्पणाच्या बाबतीत सांगायचे तर, (हातून घडलेले प्रत्येक कर्म) ईश्वराला नित्य अर्पण करण्याचा संकल्प केला पाहिजे. जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही प्रार्थना केली पाहिजे, ईश्वराचे स्मरण केले पाहिजे. (कर्माच्या संदर्भात मला असे म्हणायचे आहे.) एक विशिष्ट दृष्टिकोन सुनिश्चित होण्यासाठी मी हे करायला सांगत आहे. कालांतराने, तुमच्या अंतरंगामधील अधिक खोलवरचे समर्पण खुले करण्यासाठी, या गोष्टीचा एखाद्या किल्लीसारखा उपयोग ती शक्ती करून घेऊ शकेल.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 270-271)

साधना, योग आणि रूपांतरण – १३०

तुम्ही जेव्हा ‘दिव्य माते’शी पूर्णतः एकात्म व्हाल; तुम्हाला आपण कर्ते आहोत, सेवक आहोत, किंवा साधन आहोत, अशी स्वतःच्या स्वतंत्र अस्तित्वाची जाणीव न राहता, आपण त्या दिव्य मातेच्या चेतनेचा आणि तिच्या शक्तीचा एक शाश्वत अंशभाग आहोत आणि तिचे खरेखुरे बालक आहोत अशी जाणीव होईल, तेव्हा परिपूर्णत्वाची अंतिम अवस्था येईल. (त्यानंतर) ती दिव्य माता नेहमीच तुमच्या अंतरंगामध्ये असेल आणि तुम्ही तिच्यामध्ये (निवास करत) असाल. तुमचे सारे विचार, तुमची दृष्टी, तुमच्या कृती, तुमचा अगदी श्वासोच्छ्वास आणि तुमचे सारे जीवनव्यवहार तिच्यापासून निर्माण होत आहेत आणि ते तिचेच आहेत असा तुमचा सततचा, सहज-स्वाभाविक अनुभव असेल. तुम्ही म्हणजे तिने तिच्यामधूनच घडविलेली एक व्यक्ती आणि एक शक्ती आहात, लीलेसाठी तिने स्वतःमधून तुम्हाला वेगळे केले आहे आणि तरीही तुम्ही तिच्यामध्ये नेहमीच सुरक्षित आहात, तुम्ही तिच्या अस्तित्वाचेच एक अंग आहात, तिच्या चेतनेचीच एक चेतना आहात, तिच्या शक्तीचीच एक शक्ती आहात आणि तिच्या ‘आनंदा’चाच एक आनंद आहात, असे तुम्हाला जाणवेल, दिसेल आणि तसा अनुभव देखील तुम्हाला येईल. जेव्हा अशी नि:शेष स्थिती असेल आणि दिव्य मातेच्या अतिमानसिक ऊर्जा तुम्हाला मुक्तपणे संचालित करतील तेव्हा तुम्ही ईश्वरी कार्यामध्ये परिपूर्ण झालेले असाल. तेव्हा ज्ञान, इच्छा, कृती या गोष्टी खात्रीशीर, सहजसाध्या, तेजोमय, उत्स्फूर्त, निर्दोष झालेल्या असतील; त्या सर्व गोष्टी ‘परमेश्वरा’पासून प्रवाहित झालेल्या असतील; आणि अशी परिस्थिती म्हणजे ‘शाश्वता’चा दिव्य संचार असेल.

– श्रीअरविंद (CWSA 32 : 13)

नमस्कार वाचकहो,

आज २९ मार्च २०२४. एकशे दहा वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे २९ मार्च १९१४ रोजी श्रीअरविंद आणि श्रीमाताजी यांची प्रथम भेट झाली होती. या घटनेच्या पावन स्मृतीप्रीत्यर्थ, या भेटीचा अन्वयार्थ उलगडवून दाखवणारी एक podcast मालिका आजपासून सुरू करत आहोत.

auro marathi या youtube channel वर ही मालिका दररोज सायंकाळी ७ वाजता प्रसृत होईल.

https://www.youtube.com/@auromarathi682/videos

संपादक,

‘अभीप्सा’ मराठी मासिक.

प्रत्येक धर्मामुळेच मानवजातीला मदत झाली आहे.

‘पेगानिझम’ मुळे (रोमन साम्राज्यातील शेतकऱ्यांचा धर्म) माणसाच्या सौंदर्याच्या प्रकाशामध्ये, जीवनाच्या व्यापकतेमध्ये आणि उंचीमध्ये भर पडली आहे; बहुआयामी पूर्णत्व हे ध्येय ठरविण्यास त्याला मदत झाली आहे. ख्रिश्चन धर्माने मानवाला दिव्य प्रेम आणि औदार्य या विषयी काही दृष्टी प्रदान केली आहे. बुद्धधर्माने मानवाला अधिक प्रज्ञावान, अधिक सौम्य, अधिक शुद्ध बनविण्याचा उमदा मार्ग दाखविला आहे. ज्यू आणि इस्लाम धर्माने आपल्या कार्यामध्ये धार्मिक-निष्ठावान कसे असले पाहिजे आणि ईश्वराप्रत उत्साहपूर्ण भक्ती कशी असली पाहिजे हे दाखविले आहे. हिंदुधर्माने अत्यंत विशाल आणि गाढ अशा आध्यात्मिक शक्यता मानवापुढे खुल्या केल्या आहेत.

ईश्वरविषयक हे सर्व दृष्टिकोन अंगीकारले गेले आणि एकमेकांमध्ये प्रक्षेपित झाले तर किती चांगले होईल; पण या मार्गामध्ये बौद्धिक सिद्धान्त आणि सांप्रदायिक अहंवाद आडवे येतात. आजवर अनेक धर्मांमुळे असंख्य ‘जीव’ तरून गेले आहेत पण, यांपैकी कोणीही ‘मानवजाती’चे आध्यात्मिकीकरण करू शकलेला नाही. यासाठी कोणत्या एका पंथाची, कोणत्या एका संप्रदायाची नव्हे तर, आध्यात्मिक आत्म-उत्क्रांतीच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद
(SABCL 16 : 394)

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

कर्म आराधना – ०३

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते. या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे. हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे. माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 134)