प्रत्येक धर्मामुळेच मानवजातीला मदत झाली आहे.

‘पेगानिझम’ मुळे (रोमन साम्राज्यातील शेतकऱ्यांचा धर्म) माणसाच्या सौंदर्याच्या प्रकाशामध्ये, जीवनाच्या व्यापकतेमध्ये आणि उंचीमध्ये भर पडली आहे; बहुआयामी पूर्णत्व हे ध्येय ठरविण्यास त्याला मदत झाली आहे. ख्रिश्चन धर्माने मानवाला दिव्य प्रेम आणि औदार्य या विषयी काही दृष्टी प्रदान केली आहे. बुद्धधर्माने मानवाला अधिक प्रज्ञावान, अधिक सौम्य, अधिक शुद्ध बनविण्याचा उमदा मार्ग दाखविला आहे. ज्यू आणि इस्लाम धर्माने आपल्या कार्यामध्ये धार्मिक-निष्ठावान कसे असले पाहिजे आणि ईश्वराप्रत उत्साहपूर्ण भक्ती कशी असली पाहिजे हे दाखविले आहे. हिंदुधर्माने अत्यंत विशाल आणि गाढ अशा आध्यात्मिक शक्यता मानवापुढे खुल्या केल्या आहेत.

ईश्वरविषयक हे सर्व दृष्टिकोन अंगीकारले गेले आणि एकमेकांमध्ये प्रक्षेपित झाले तर किती चांगले होईल; पण या मार्गामध्ये बौद्धिक सिद्धान्त आणि सांप्रदायिक अहंवाद आडवे येतात. आजवर अनेक धर्मांमुळे असंख्य ‘जीव’ तरून गेले आहेत पण, यांपैकी कोणीही ‘मानवजाती’चे आध्यात्मिकीकरण करू शकलेला नाही. यासाठी कोणत्या एका पंथाची, कोणत्या एका संप्रदायाची नव्हे तर, आध्यात्मिक आत्म-उत्क्रांतीच्या दिशेने केलेल्या सातत्यपूर्ण आणि सर्वसमावेशक प्रयत्नांची आवश्यकता आहे.

– श्रीअरविंद
(SABCL 16 : 394)

व्यक्तीमध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्व नसते, व्यक्तीच्या गाभ्यामध्ये जर ‘ईश्वरा’चे अस्तित्वच नसते, तर व्यक्तीला ‘ईश्वरा’ची जाणीव कधीच होऊ शकली नसती, ती एक अशक्यप्राय गोष्ट ठरली असती. …तुमच्या अंतरंगामध्ये ‘ईश्वर’ आहे आणि तुम्ही ‘ईश्वरा’मध्ये आहात, हे ज्या क्षणी तुम्हाला या किंवा त्या मार्गाने आकलन होते, जाणवते, किंवा जाणवायला सुरूवात होते, आणि जेव्हा तुम्ही ते मान्य करता, तेव्हा तुमचे दार साक्षात्काराच्या दिशेने किंचितसे खुले होते, किलकिले होते. नंतर कधीतरी मग अभीप्सा निर्माण झाली, ‘ईश्वरा’ला जाणून घेण्याची आणि ‘ईश्वर’च बनण्याची तीव्र निकड निर्माण झाली तर त्यामुळे, म्हणजे त्या तीव्र निकडीमुळे, ते किलकिले झालेले दार, व्यक्तीचा आतपर्यंत शिरकाव होईल इतके खुले होते. आणि एकदा का व्यक्तीचा आत शिरकाव झाला की, व्यक्तीला ‘आपण कोण आहोत’ याची जाणीव होते.

– श्रीमाताजी [CWM 07 : 236]

कर्म आराधना – ०३

हे ‘दिव्य’ प्रेमा, ‘परमप्रज्ञे’, परिपूर्ण ‘एकत्वा’, मी अन्य कोणी नाही तर, मी केवळ ‘तू’च व्हावे यासाठी दिवसातील प्रत्येक क्षणाला मी ‘तुला’ आवाहन करते. या देहाद्वारे ‘तुझी’ सेवा घडू दे, ते तुझे साधन (Instrument) असल्याची जाणीव त्याला होऊ दे आणि माझी सर्व चेतना ‘तुझ्या’ चेतनेमध्ये विलीन होऊ दे. आणि त्या चेतनेद्वारे, ‘तुझ्या’ दिव्य दृष्टीने मला सर्व वस्तुमात्रांचे चिंतन करता येऊ दे. हे ‘प्रभू’, हे ईश्वरा, ‘तुझी’ सार्वभौम ‘शक्ती’ आविष्कृत होईल असे वरदान दे; ‘तुझे’ कार्य सिद्धीस जाईल असे वरदान दे; आणि ‘तुझी’ सेविका निःशेषतया ‘तुझ्या’ सेवेमध्ये स्वतःला झोकून देऊ शकेल, असे वरदान दे. माझ्यातील ‘मी’ कायमचा नाहीसा होऊ दे आणि केवळ साधन तेवढे शिल्लक राहू दे.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 134)

कर्म आराधना – ०२

(जे ईश्वराची सेवा करू इच्छितात त्यांनी ही प्रार्थना जरूर करावी…) सर्व अडथळ्यांवर मात करून विजयी होणाऱ्या हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ तुझा जयजयकार असो. असे वरदान दे की, आमच्यातील कोणतीही गोष्ट ‘तुझ्या’ कार्यात अडसर ठरू नये. असे वरदान दे की, कशामुळेही ‘तुझ्या’ आविष्करणामध्ये विलंब होऊ नये. असे वरदान दे की, सर्व गोष्टींमध्ये आणि प्रत्येक क्षणी ‘तुझी’च इच्छा कार्यरत राहील. ‘तुझा’ मानस आमच्यामध्ये परिपूर्ण व्हावा, आमच्या प्रत्येक तत्त्वामध्ये, आमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक क्रियेमध्ये, आमच्या सर्वोच्च उंचीपासून ते आमच्या देहाच्या अगदी सूक्ष्मतम अशा पेशींपर्यंत तुझीच इच्छा पूर्णत्वाला जावी म्हणून, आम्ही ‘तुझ्या’समोर उभे आहोत. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत पूर्णपणे आणि सदोदित एकनिष्ठ राहू. इतर कोणत्याही प्रभावाविना आम्ही पूर्णत: ‘तुझ्या’च प्रभावाला खुले राहू, असे वरदान दे. असे वरदान दे की, आम्ही ‘तुझ्या’प्रत एक प्रगाढ आणि उत्कट कृतज्ञता बाळगण्यास कधीही विसरणार नाही. असे वरदान दे की, ‘तुझ्या’कडून प्रसादरूपाने, हरघडी मिळालेल्या अद्भुत गोष्टींचा आमच्याकडून कधीही अपव्यय होणार नाही. असे वरदान दे की, आमच्यातील सर्वकाही ‘तुझ्या’ कार्यात सहभागी होईल आणि ‘तुझ्या’ साक्षात्कारासाठी सज्ज होईल. हे ‘ईश्वरा’, हे ‘प्रभू’ सर्व साक्षात्कारांच्या परमोच्च स्वामी, तुझा जयजयकार असो. आम्हाला ‘तुझ्या विजया’बद्दलची सक्रिय आणि उत्कट, संपूर्ण आणि अविचल अशी श्रद्धा प्रदान कर.

– श्रीमाताजी

(CWM 01 : 382)

कर्म आराधना – ०१

प्रस्तावना

श्रीअरविंदांच्या पूर्णयोगातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कर्म’. पूर्णयोगामध्ये मानवतेची सेवा करण्यावर किंवा कोणत्यातरी विशिष्ट मानसिक आदर्शानुसार सेवा करण्यावर भर नसून, ईश्वराची सेवा करण्यावर भर आहे. मानवतेची सेवा केल्याने व्यक्ती व्यापक होऊ शकते खरी परंतु, बरेचदा तीच सेवा, आपण इतरांचे कल्याण करत आहोत याची प्रौढी मिरविणाऱ्या राजसिक अहंकारावर पांघरूण घालते. फारफार तर आपल्याला मानवी दशेमध्येच जखडून ठेवणारा तो एक सात्त्विक भ्रम ठरू शकतो. परंतु प्रथमत: ईश्वराचे साधन आणि माध्यम बनून, सर्व मानवी संकल्पनांच्या अतीत जाणे, ‘पूर्णयोगा’मध्ये अभिप्रेत आहे; जेणेकरून मानवाच्या माध्यमातून ‘ईश्वरा’ला या पृथ्वीवर ‘स्वतःच्या’ वैभवाचा वर्षाव करता येईल. आपल्या समग्र अस्तित्वाने केलेल्या ‘प्रार्थनेमध्ये आणि आराधनेमध्ये’ कर्माचे रूपांतर केल्यानेच ही गोष्ट चांगल्या रीतीने करता येते. ‘ईश्वरा’ची सेवा केल्याने, आपली मानवी चेतना ही गतिमान ‘दिव्य चेतने’च्या आणि तिच्या रूपांतरकारी शक्तीच्या संपर्कात येते. आजपासून आपण “कर्म आराधना” या मालिकेद्वारे श्रीअरविंद व श्रीमाताजी यांच्या विचारधनाच्या माध्यमातून पूर्णयोगातील ‘कर्म’ हा पैलू समजावून घेणार आहोत.

– संपादक, ‘अभीप्सा’ मराठी मासिक.

स्वत:विषयी फार विचार करत बसू नका. तुमच्या क्षुल्लक अहंकाराला, तुम्ही तुमच्या सर्व जीवनव्यवहाराचे केंद्र बनविता आणि त्यामुळे तुम्ही असमाधानी व खिन्न होता. स्वत:ला विसरणे हाच सर्व व्याधींवरील रामबाण उपाय आहे.

– श्रीमाताजी
(CWM 16 : 175)

धीर धरा ! प्रतिदिनी प्रात:काळी आपल्या पहिल्या किरणांच्या द्वारा उगवता दिनमणी जी शिकवण, जो संदेश अवनीला देतो तो ऐका. तो आशेचा किरण दाखवितो, सांत्वनपर संदेश आणतो….
…अशी कोणतीच निशा नाही की, जिच्या अंती उषेचा उदय होत नाही; अंधकार जेव्हा अति घनदाट होतो त्याचवेळी उषेचे आगमन होण्याची तयारी झालेली असते.
*
उगवणारी प्रत्येक उषा ही प्रगतीच्या नव्या शक्यता दृष्टिपथात आणते.
*
भूतलावर अवतरणाऱ्या नूतन उष:प्रभेप्रत स्वत:स खुले करा, तुमच्यासमोर एक तेजोमय पथ उलगडेल.

– श्रीमाताजी
(CWM 02 : 44 & 15 : 74, 97)

श्रीअरविंदप्रणीत पूर्णयोगाच्या महान साहसामध्ये जर त्यांचे अनुसरण करायचे असेल तर, व्यक्तीकडे योद्ध्याची जिगर असावी लागते आणि आता तर, जेव्हा श्रीअरविंद आपल्यातून भौतिकदृष्टया निघून गेले आहेत तेव्हा तर व्यक्ती शूरवीरच असली पाहिजे.

– श्रीमाताजी
(CWM 15 : 184)

योगाचे दोन मार्ग आहेत, एक मार्ग तपस्येचा आणि दुसरा मार्ग समर्पणाचा. तपस्येचा मार्ग खडतर असतो. येथे तुम्ही पूर्णतः स्वत:वर अवलंबून असता, तुम्ही तुमच्या स्वत:च्या ताकदीनिशी योगाला सुरुवात करता. तुम्ही तुमच्या शक्तीच्या प्रमाणात उन्नत होता, प्राप्ती करून घेता. पण येथे नेहमीच पतन होण्याचा धोका असतो. आणि एकदा जर का तुम्ही खाली पडलात तर तुम्ही खोलवर दरीतच फेकले जाऊन, तुमच्या चिंधड्या होतात आणि मग त्यावर कोणताच उपाय नसतो. दुसरा मार्ग समर्पणाचा, हा सुरक्षित आणि खात्रीचा मार्ग आहे.… रामकृष्ण परमहंस म्हणतात त्याप्रमाणे, तुम्ही एकतर माकडाच्या पिल्लाचा नाहीतर मांजराच्या पिल्लाचा मार्ग अवलंबू शकता. माकडिणीचे पिल्लू आईने आपल्याला बरोबर घेऊन जावे यासाठी तिला पकडून ठेवते, पिल्लाने तिला घट्ट पकडलेच पाहिजे, नाहीतर त्याची पकड ढिली होऊन ते खाली पडेल. दुसऱ्या बाजूला, मांजराचे पिल्लू ! ते त्याच्या आईला धरून ठेवत नाही, तर त्याच्या आईनेच त्याला पकडलेले असते, त्यामुळे त्याला कोणतीच भीती नसते किंवा त्याच्यावर कोणतीच जबाबदारी नसते; त्याला काहीच करावे लागत नाही. आईने त्याला पकडावे म्हणून त्याने फक्त ‘मा मा’ असा आकांत करायचा असतो.

जर तुम्ही हा समर्पणाचा मार्ग पूर्णतया आणि प्रामाणिकपणे आचरणात आणलात, तर मग कोणताही धोका किंवा कोणतीही गंभीर समस्या निर्माण होणार नाही. प्रश्न असतो फक्त प्रामाणिकपणाचा! जर तुम्ही प्रामाणिक नसाल तर योगाची सुरुवातच करू नका… जर तुम्ही विनम्र असाल आणि तुमचा गाभा खुला असेल आणि जर तुमचे साध्य ईश्वराचा साक्षात्कार आणि त्याची प्राप्ती हेच असेल आणि तोच आपला ‘चालविता धनी’ व्हावा हे जर तुमचे साध्य असेल तर तुम्ही या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकता.

– श्रीमाताजी
(CWM 03 : 4-5)

मी नेहमी ऊर्ध्व दिशेकडे पाहते. तेथे सौंदर्य, शांती, प्रकाश आहेत; ते खाली येण्यासाठी सज्ज आहेत. ते या पृथ्वीतलावर आविष्कृत व्हावेत म्हणून नेहमी अभीप्सा बाळगा आणि त्या दिशेने वर पाहा.

खाली, या विश्वातील वाईट गोष्टींकडे पाहू नका. जेव्हा तुम्हाला उदास वाटते तेव्हा माझ्यासमवेत ऊर्ध्व दिशेकडे पाहा.

– श्रीमाताजी
(CWM 13 : 68)