‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १५

ईश्वराप्रत जाण्याचा ध्यान हा एक मार्ग आहे, तो महान मार्ग आहे; पण तो जवळचा मार्ग आहे, असे म्हणता येणार नाही. कारण तो खूप उच्च स्तरावर घेऊन जाणारा असला, तरीही तो बहुतेकांसाठी खूप लांबचा आणि अवघड मार्ग असतो. जर त्यामुळे (ईश्वराचे)अवतरण घडून आले नाही तर, तो जवळचा मार्ग आहे असे कदापिही म्हणता येणार नाही…

कर्म हा तुलनेने बराच साधासरळ मार्ग आहे. परंतु, त्यामध्ये व्यक्तीचे मन ईश्वराला वगळून, फक्त कर्मावरच खिळलेले असता कामा नये. ईश्वर हेच साध्य असले पाहिजे आणि कर्म हे केवळ एक साधन होऊ शकते.

…प्रेम आणि भक्ती ह्या गोष्टी जर अधिक प्राणप्रधान (Vital) असतील तर, हर्षभरित अपेक्षा आणि विरह, अभिमान आणि नैराश्य या गोष्टींमध्ये दोलायमान स्थिती होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे प्रेम आणि भक्तीचा मार्ग जवळचा न राहता, दूरवरचा, वळणावळणाचा होतो. ईश्वराकडे धाव घेण्याऐवजी, थेट झेपावण्याऐवजी, एखादा स्वतःच्या अहंकाराच्या भोवती भोवती घोटाळत राहण्याची शक्यता असते.

*

पूर्णयोगामध्ये ध्यान, कर्म, भक्ती या सर्व गोष्टींचाच समावेश होतो; परिपूर्तीच्या दिशेने जाण्यासाठी पूर्वतयारी म्हणून साहाय्यभूत होणारे हे प्रत्येक साधन आहे. जर व्यक्ती कर्माच्या माध्यमातून समर्पित होऊ शकत असेल तर आत्म-दानासाठी असलेल्या अत्यंत प्रभावी साधनांपैकी ते एक साधन असते; आणि स्वयमेव आत्म-दानदेखील साधनेचे एक अत्यंत शक्तिशाली आणि अपरिहार्य तत्त्व असते.

पूर्णयोग हा, समग्र अस्तित्वाचे त्याच्या सर्व घटकांनिशी आत्मार्पण करण्याचा, विचारी मनाचे आणि हृदयाचे, इच्छेचे आणि कृतींचे, आंतरिक व बाह्य साधनभूत घटकांचे अर्पण करण्याचा मार्ग आहे; ज्यामुळे व्यक्ती ईश्वराच्या अनुभूतीपर्यंत, आंतरिक उपस्थितीपर्यंत येऊन पोहोचते, आंतरात्मिक आणि आध्यात्मिक परिवर्तनापर्यंत येऊन पोहोचते. (उपरोक्त) सर्वच मार्गांनी व्यक्ती जितके आत्म-दान करेल तेवढे ते साधनेसाठी चांगलेच असते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 212), (CWSA 29 : 213-214)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १४

योगमार्ग अनेक आहेत, आध्यात्मिक साधना अनेक आहेत, मुक्ती आणि पूर्णत्वाप्रत घेऊन जाणारे मार्ग अनेक आहेत, आत्म्याचे ईश्वराभिमुख असणारे मार्ग अनेक आहेत. प्रत्येकाचे स्वतःचे स्वतंत्र ध्येय आहे, त्या ‘एकमेवाद्वितीय सत्या’बाबतचे प्रत्येकाचे वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोन आहेत, प्रत्येकाच्या स्वतंत्र पद्धती आहेत, प्रत्येकास साहाय्यभूत असे त्यांचे तत्त्वज्ञान आणि साधनापद्धती आहे. पूर्णयोग (Integral Yoga) या साऱ्या पद्धतींचे सारग्रहण करतो आणि त्यांच्या ध्येयांच्या, पद्धतींच्या, दृष्टिकोनांच्या एकीकरणाप्रत (तपशीलांच्या नव्हे, तर साराच्या एकीकरणाप्रत) पोहोचण्याचा प्रयत्न करतो; ‘सर्वसमावेशक तत्त्वज्ञान आणि साधना’ म्हणजे पूर्णयोग.

– श्रीअरविंद
(CWSA 12 : 356)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १३

मानवाने आध्यात्मिकीकरणासाठी एकदा जरी संमती दिली तरी हे अवघे विश्व बदलून जाईल परंतु मानवाची शारीरिक, प्राणिक आणि मानसिक प्रकृती ही या उच्चतर कायद्याबाबत बंडखोर असते. मानवाला स्वत:च्या अपूर्णतेविषयीच प्रेम असते.

आत्मा हे आपल्या अस्तित्वाचे सत्य आहे; अपूर्ण दशेमध्ये असताना मन, प्राण आणि शरीर हे त्याचे केवळ मुखवटे असतात, पण तेच त्यांच्या पूर्ण दशेमध्ये त्या आत्म्याचे साचे बनले पाहिजेत. केवळ आध्यात्मिक असणे पुरेसे नाही; त्यामधून स्वर्ग-गमनासाठी कित्येक आत्मे तयार होतात पण ही पृथ्वी मात्र जशी आहे तिथे व तशीच राहते. कोणतीही तडजोड हा मुक्तीचा मार्ग असू शकत नाही.

विश्वाला तीन प्रकारच्या क्रांती ज्ञात आहेत. भौतिक क्रांतीचे ठाशीव परिणाम दिसून येतात; नैतिक आणि बौद्धिक क्रांतीची फळे ही अधिक समृद्ध असतात आणि त्या क्रांतीचे क्षेत्रदेखील अनंतपटीने व्यापक असते; परंतु आध्यात्मिक क्रांतीमध्ये महान बीजे दडलेली असतात.

हा तिहेरी बदल या परस्परांचा सुयोग्य संयोग घडवू शकला तर निर्दोष कार्य आकारास येऊ शकते; परंतु मानवजातीचे शरीर आणि मन हे, जोरकस असणारा आध्यात्मिक प्रवाह परिपूर्ण रीतीने धारण करू शकत नाहीत; त्यातील बहुतांश विखरून जातो, बाकी जे शिल्लक असते ते दूषित होऊन जाते. आपल्या या भूमितून पुष्कळशा अध्यात्म-बीजांमधून थोडासातरी परिणाम साध्य व्हावा म्हणून असंख्य बौद्धिक आणि शारीरिक सुधारणांची आवश्यकता आहे.

…आज आपण या विश्वामध्ये जे बदल पाहत आहोत ते त्यांच्या आदर्शाच्या आणि प्रयोजनाच्या बाबतीत बौद्धिक, नैतिक, आणि भौतिक आहेत. आध्यात्मिक क्रांती आपली वेळ येण्याची वाट पाहात थांबली आहे आणि तोपर्यंत तिच्या केवळ लाटाच इथे-तिथे प्रस्फुटित होत आहेत. इतरांना जोवर ह्याचा बोध होत नाही तोपर्यंत त्या क्रांतीचे आकलन होणार नाही आणि तोपर्यंत सद्यस्थितीतील घडामोडींची सर्व स्पष्टीकरणे आणि मानवाच्या भवितव्याविषयीची सर्व भाकिते ह्या गोष्टी फोल आहेत. कारण त्या आध्यात्मिक क्रांतीचे स्वरूप, तिचे सामर्थ्य, तिच्या घडामोडी याद्वारेच आपल्या मानवतेचे पुढील चक्र निर्धारित व्हावयाचे आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 210-211)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – १०

तुम्हाला योगाची प्रत्यक्ष हाक आलेली असू शकते आणि तुम्ही योगासाठी पात्रदेखील असू शकता, परंतु योगाचे विविध मार्ग आहेत आणि प्रत्येकाचे ध्येय व उद्दिष्ट भिन्न भिन्न असते. इच्छा-वासनांवरील जय तसेच जीवनातील सामान्य नातेसंबंध बाजूला ठेवणे आणि अनिश्चिततेकडून चिरस्थायी निश्चिततेप्रत वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे या गोष्टी सर्व योगांमध्ये समानच असतात. व्यक्ती स्वप्न आणि निद्रा, तहान आणि भूक इ. वर विजय मिळविण्याचाही प्रयत्न करू शकते. परंतु जगाशी, जीवनाशी काहीही कर्तव्य नाही किंवा संवेदना मारून टाकणे किंवा त्यांच्या कृतींना पूर्णपणे अटकाव करणे या गोष्टी माझ्या योगाचा (पूर्णयोगाचा) भाग असू शकत नाहीत. दिव्य सत्याचा प्रकाश, सामर्थ्य, आनंद आणि त्यांची गतिशील निश्चितता जीवनामध्ये खाली उतरवून, त्यायोगे हे जीवन रूपांतरित करणे हे या योगाचे उद्दिष्ट आहे. हा ऐहिकाचा त्याग करणारा संन्यासवादी योग नसून, हा दिव्य जीवनाचा योग आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०७

व्यक्ती त्या ईश्वरी प्रभावाप्रत स्वतःला खुली करू शकते किंवा नाही यावरच पूर्णयोगामध्ये सारे काही अवलंबून असते. अभीप्सेमध्ये जर प्रामाणिकता असेल, आणि कितीही अडथळे आले तरी, उच्चतर चेतनेप्रत पोहोचण्याची धीरयुक्त इच्छा असेल तर, कोणत्या ना कोणत्या प्रकारे खुलेपण निश्चित येते. यासाठी जास्त वेळ लागेल की कमी ते मन, हृदय आणि शरीराची तयारी असण्यावर किंवा नसण्यावर अवलंबून असते. आणि म्हणून आवश्यक तो धीर व्यक्तीकडे नसेल तर, आरंभीच्या अडचणीमुळेच व्यक्ती ते प्रयत्न सोडून देईल अशी शक्यता असते. एकाग्र होणे, शक्यतो हृदयकेंद्रावर एकाग्र होणे आणि श्रीमाताजींनी अस्तित्वाचा स्वीकार करावा, म्हणून श्रीमाताजींच्या उपस्थितीला आणि त्यांच्या शक्तीला आवाहन करणे आणि त्यांच्या शक्तीद्वारे चेतनेमध्ये परिवर्तन घडून येणे, याव्यतिरिक्त या योगामध्ये अन्य कोणतीही पद्धत नाही. व्यक्ती मस्तककेंद्रावर किंवा भ्रूमध्यामध्येही एकाग्रता करू शकते परंतु बऱ्याच जणांसाठी येथील खुलेपण अधिक अवघड असते. जेव्हा मन निश्चल होते आणि जेव्हा एकाग्रता दृढ होते आणि जेव्हा अभीप्सा उत्कट होते, तेव्हा तेथे अनुभूतीचा प्रारंभ होतो. जितकी श्रद्धा अधिक तितकेच परिणाम शीघ्र गतीने प्राप्त होण्याची शक्यता अधिक. इतर बाबींसाठी व्यक्तीने केवळ स्वतःच्या प्रयत्नांवर विसंबून राहता कामा नये तर, ईश्वराशी संपर्क आणि श्रीमाताजींच्या शक्तीप्रत व त्यांच्या उपस्थितीप्रत ग्रहणशीलता प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 107)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०६

ईश्वरी प्रभावाप्रत स्वत:ला खुले करणे हे या (पूर्ण)योगाचे संपूर्ण तत्त्व आहे. हा प्रभाव तुमच्या मस्तकाच्या वरती असतो आणि एकदा का तुम्हाला त्याची जाणीव झाली की, त्याने तुमच्यामध्ये प्रवेश करावा म्हणून तुम्ही केवळ त्यास आवाहन करायचे असते. ते ईश्वरीतत्त्व तुमच्या मनामध्ये, शरीरामध्ये शांतीच्या, प्रकाशाच्या, कार्यकारी शक्तीच्या रूपाने अवतरते; आनंदरूपाने अवतरते; साकार किंवा निराकार रूपात ते दिव्य अस्तित्व अवतरते. जोपर्यंत तुमच्याकडे ही चेतना असत नाही तोपर्यंत तुम्ही श्रद्धा बाळगली पाहिजे आणि खुलेपणाची आस बाळगली पाहिजे. अभीप्सा, आवाहन, प्रार्थना ह्या सर्व गोष्टी एकाच गोष्टीची विविध रूपे असतात आणि या सर्वच गोष्टी सारख्याच प्रभावी असतात. यांपैकी, तुमच्यापाशी जे कोणते रूप येते वा जे तुम्हाला अगदी सहजसोपे, स्वाभाविक वाटते ते तुम्ही अवलंबावे. दुसरा मार्ग एकाग्रतेचा. तुम्ही तुमची चेतना तुमच्या हृदयामध्ये एकाग्र करा (काहीजण मस्तकामध्ये वा मस्तकाच्या वर एकाग्र करतात.) आणि अंत:करणामध्ये श्रीमाताजींचे ध्यान करा आणि तेथे त्यांना आवाहन करा. तुम्ही यांपैकी कोणतीही एक गोष्ट करू शकता किंवा दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या वेळी करू शकता – जे तुम्हाला सहजस्वाभाविक वाटेल किंवा ज्या क्षणी तुम्ही जे करण्यासाठी प्रवृत्त व्हाल ते करावे. विशेषत: प्रथम एक गोष्ट आत्यंतिक निकडीची असते ती म्हणजे, मन निश्चल (quiet) करायचे आणि ध्यानाच्या वेळी, साधनाबाह्य असे सारे विचार, मनाच्या हालचाली हद्दपार करायच्या. अशा निश्चल मनामध्ये, अनुभूती येण्यासाठीची प्रगतिशील तयारी सुरू होते. परंतु लगेचच कोणती अनुभूती आली नाही तरी तुम्ही अधीर बनता कामा नये. कारण मनामध्ये संपूर्ण निश्चलता येण्यासाठी पुष्कळ वेळ लागतो; तुमची चेतना सिद्ध होईपर्यंत तुम्हाला प्रयत्न चालू ठेवावे लागतात.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 106)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०५

चेतना (consciousness) ईश्वराप्रत खुली करणे, अधिकाधिक आंतरिक चेतनेमध्ये निवास करत, तेथून बाह्य जीवनावर कार्य करणे, आंतरतम असणाऱ्या चैत्य पुरुषाला (psychic) पुढे आणणे आणि त्याच्या शक्तीने अस्तित्वाचे शुद्धीकरण आणि परिवर्तन घडविणे; ज्यामुळे ते अस्तित्व रूपांतरासाठी सज्ज होऊ शकेल आणि दिव्य ज्ञान, दिव्य संकल्प आणि दिव्य प्रेम यांच्याशी एकत्व पावू शकेल, हे या योगाचे ध्येय आहे. दुसरे ध्येय म्हणजे योगिक चेतना विकसित करणे – म्हणजे, अस्तित्वाचे त्याच्या सर्व स्तरांवर वैश्विकीकरण करणे, विश्व-पुरुषाविषयी आणि वैश्विक शक्तींविषयी (cosmic being and cosmic forces) जागृत होणे, आणि अधिमानसापर्यंतच्या (Overmind) सर्व स्तरांवर ईश्वराशी एकत्व पावून राहणे. तिसरे ध्येय असे की, अधिमानसाच्या पलीकडे असणाऱ्या, अतिमानसिक चेतनेच्या (supramental consciousness) माध्यमातून, विश्वातीत ईश्वराच्या (transcendent Divine) संपर्कात येणे, चेतनेचे व प्रकृतीचे अतिमानसिकीकरण घडविणे आणि गतिशील अशा ‘दिव्य सत्या’च्या साक्षात्कारासाठी तसेच त्या सत्याच्या पार्थिव-प्रकृतीमधील रूपांतरकारी अवतरणासाठी स्वतःला त्याचे एक साधन बनविणे.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 20)

‘पूर्णयोगा’ची योगसूत्रे – ०४

येथे योगाचा जो मार्ग आचरला जातो त्या मार्गाचे (पूर्णयोगाचे) इतर योगांपेक्षा काहीएक भिन्न प्रयोजन आहे. कारण सर्वसामान्य अज्ञानी विश्व-चेतनेमधून बाहेर पडून, दिव्य चेतनेमध्ये उन्नत होणे हे केवळ या योगाचे ध्येय नाही, तर मन, प्राण आणि शरीर यांच्या अज्ञानामध्ये दिव्य चेतनेची अतिमानसिक शक्ती उतरविणे; मन, प्राण आणि शरीर यांचे रूपांतरण करणे, इहलोकामध्ये ईश्वराचे आविष्करण घडविणे आणि या जडभौतिकामध्ये दिव्य जीवन निर्माण करणे, हे या योगमार्गाचे ध्येय आहे. हे ध्येय अत्यंत कठीण आहे आणि हा योगमार्गही अत्यंत कठीण आहे; बऱ्याच जणांना किंबहुना बहुतेकांना तर तो अशक्यच भासतो. सर्वसामान्य अज्ञ विश्व-चेतनेच्या साऱ्या प्रस्थापित शक्ती या योगमार्गाच्या विरोधात असतात आणि त्या शक्ती या मार्गाला नाकारतात आणि त्या शक्ती या योगमार्गाला रोखण्याचा प्रयत्न करत असतात. साधकाला असे आढळून येईल की, त्याच्या स्वतःच्या मनामध्ये, प्राणामध्ये आणि शरीरामध्येच या साक्षात्कारासाठी प्रतिकूल असे सर्वाधिक हट्टी अडथळे ठासून भरले आहेत. जर तुम्ही हे ध्येय अगदी पूर्ण अंतःकरणाने स्वीकारलेत, साऱ्या अडीअडचणींना सामोरे गेलात, भूतकाळ आणि त्याचे सारे बंध तुम्ही मागे टाकून दिलेत, आणि सर्व गोष्टींचा त्याग करण्यास तयार झालात, या दिव्य शक्यतेसाठी प्रत्येक जोखीम घेण्यास तयार झालात, तरच केवळ तुम्हाला त्या पाठीमागील ‘सत्य’ हे अनुभवाच्या द्वारे सापडण्याची काही आशा असते.

या योगाची साधना, कोणत्याही ठरावीक साचेबद्ध अशा मानसिक शिक्षणाने किंवा ध्यानधारणेच्या नेमून दिलेल्या प्रकारांच्या द्वारे, कोणत्याही मंत्रांनी किंवा तत्सम गोष्टींनी, प्रगत होत नाही; तर अभीप्सेद्वारे, अंतर्मुख आणि ऊर्ध्वमुख आत्म-एकाग्रतेद्वारे, ईश्वरी शक्तीच्या दिव्य प्रभावाप्रत स्वतःला खुले केल्याने, आपल्या ऊर्ध्वस्थित असणाऱ्या दिव्य शक्तीप्रत आणि तिच्या कार्याप्रत स्वतःला खुले केल्याने, हृदयामध्ये असणाऱ्या दिव्य अस्तित्वाला खुले होत, आणि या साऱ्यांना ज्या ज्या गोष्टी परक्या असतील त्या साऱ्या गोष्टींना नकार दिल्याने ही साधना प्रगत होते. केवळ श्रद्धा, अभीप्सा आणि समर्पण यांच्या द्वारेच हे आत्मउन्मीलन (self-opening) घडून येते.

– श्रीअरविंद
(CWSA 29 : 19-20)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३७

वैयक्तिक आत्म्याने सर्व जगताच्या अतीत जाऊन, विश्वात्मक ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे एवढ्यापुरताच ‘पूर्णयोग’ मर्यादित नाही; तर ‘सर्व आत्म्यांची एकत्रित बेरीज’, म्हणजे विश्वात्मक साक्षात्कार देखील पूर्णयोग आपल्या कवेत घेतो; आणि त्यामुळे पूर्णयोग व्यक्तिगत मोक्ष किंवा व्यक्तिगत सुटका एवढ्यापुरताच मर्यादित राहू शकत नाही. पूर्णयोगाचा साधक विश्वात्मक मर्यादांच्या अतीत झालेला असूनही, तो सर्वात्मक ईश्वराशी देखील एकात्म असतो; त्यामुळे त्याचे या विश्वातील दिव्य कर्म अजूनही शिल्लक असते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 270)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३५

मर्यादित बहिर्मुख अहंभावाला हद्दपार करून, त्याच्या जागी प्रकृतीचा हृदयस्थ शासनकर्ता म्हणून ईश्वराला सिंहासनावर बसविणे, हे आमच्या योगाचे प्रयोजन आहे. प्रथमतः वासनेचा वारसा रद्द करणे, आणि त्यानंतर, वासनाभोगाला आपल्या जीवनाचे शासन करण्यास संमती न देणे; असा ह्याचा अर्थ आहे. वासनेमधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळविणार नाही; तर सारभूत जीवनाचा एक नि:स्वार्थी शुद्ध आध्यात्मिक आनंद असतो, त्यामधून आध्यात्मिक जीवन पोषण मिळवेल. वासनेचा शिक्का असलेली आपली जी प्राणिक प्रकृती आहे, केवळ तिलाच नवा जन्म, नवे रूपांतर आवश्यक आहे असे नाही, तर आपल्या मनोमय अस्तित्वाचाही नवा जन्म, नवे रूपांतर होणे आवश्यक आहे. आपला भेदमय, अहंप्रधान, मर्यादित, अज्ञानव्याप्त विचार व तशाच प्रकारची बुद्धी नष्ट झाली पाहिजे. त्यांच्या जागी छायाविरहित दिव्य प्रकाश, सर्वगामी निर्दोष प्रकाश प्रवाहित झाला पाहिजे; या प्रकाशाची वाढ होऊन शेवटी त्याची परिणती, चाचपडणारे अर्धसत्य आणि ठेचाळणारा प्रमाद यापासून मुक्त अशा स्वाभाविक स्वयंभू सत्य-जाणिवेमध्ये झाली पाहिजे. आपली गोंधळलेली आणि खजिल झालेली अहंभावकेंद्रित क्षुद्र हेतूंची इच्छा व कृती थांबली पाहिजे; आणि त्यांची जागा द्रुतगतीच्या समर्थ, सुबोध स्वयंचलित, ईश्वरप्रेरित, ईश्वरी मार्गदर्शन लाभलेल्या शक्तीने घेतली पाहिजे; ईश्वराच्या इच्छेशी आपली इच्छा स्वखुशीने संपूर्णपणे एकरूप झाली पाहिजे आणि मग ही आपली श्रेष्ठ, निर्व्यक्तिक, न अडखळणारी, निश्चयात्मक इच्छा आपल्या सर्व कार्यात पायाभूत होऊन सक्रिय झाली पाहिजे. आपल्या अहंभावप्रधान, पृष्ठवर्ती, असंतुष्ट, दुर्बल भावनांचा खेळ बंद झाला पाहिजे; आणि त्याच्या जागी स्वतःच्या संधीची वाट पाहात असणाऱ्या, गुप्त, खोल, व्यापक आंतरात्मिक हृदयाचा व्यापार सुरू झाला पाहिजे. ईश्वराचे स्थान असलेल्या या आंतरिक हृदयाने प्रेरित झालेल्या आपल्या भावना तेव्हा मग, दिव्य प्रेम व बहुविध आनंद यांच्या शांत, जोरकस दुहेरी व्यापारांमध्ये रुपांतरित होतील. दिव्य मानवता किंवा अतिमानसिक मानवजात कशी असेल त्याची ही व्याख्या आहे. ज्याच्यामध्ये असामान्य कोटीची वा परिशुद्ध अशी मानवी बुद्धी आणि मानवी कृती आहे, अशा तऱ्हेचा अतिमानव नव्हे तर, उपरोक्त स्वरूपाचा, लक्षणाचा अतिमानव, आमच्या योगाच्या द्वारा आम्ही विकसित करावा, अशी हाक आम्हाला आली आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 90-91)