ईश्वराशी पूर्ण तादात्म्य पावण्याइतकी आमची साधना पूर्णत्वाला जाण्यापूर्वीही ईश्वराची इच्छा आमच्या ठिकाणी अंशतः साकार होऊ शकते. अशावेळी ती इच्छा ‘अनिवार प्रेरणा’, ‘ईश-प्रेरित कर्म’ ह्या स्वरुपात आमच्या प्रत्ययास येते; अशा प्रत्येक वेळी एक उत्स्फूर्त स्वयंनिर्णायक शक्ती आमच्याकडून कार्य करवून घेत आहे अशी जाणीव आम्हाला होते; परंतु त्या कार्याचा अर्थ काय, त्याचे प्रयोजन काय याबाबतचे पूर्ण ज्ञान आम्हाला नंतर केव्हातरी प्राप्त होते. Read more

पूर्णयोगाचा साधक जीवन मान्य करीत असल्याने त्याला स्वतःचे ओझे तर वाहावे लागतेच; पण त्याबरोबर जगातीलही पुष्कळसे ओझे वाहावे लागत असते. त्याचे स्वतःचे ओझे काही कमी नसते; पण या बऱ्याचशा जड ओझ्याबरोबरच त्याला जोडून असणारे असे जगाचेही बरेचसे ओझे त्याला वाहावे लागत असते. म्हणून दुसरे योग लढ्याच्या स्वरूपाचे वाटत नसले, तरी हा पूर्णयोग मात्र पुष्कळसा लढ्याच्याच स्वरूपाचा असतो; मात्र हा लढा केवळ वैयक्तिक स्वरूपाचा नसतो; ते जणू सामुदायिक युद्धच असते आणि त्याचे क्षेत्रही मोठे असते. Read more

आमच्या साधनेची पार्श्वभूमी एका आदर्शाकडे निर्देश करते. हा आदर्श पुढील सूत्रात व्यक्त करता येईल.

ईश्वरात राहावे, अहंभावात राहू नये; लहानशा, अहंभावी जाणिवेत राहून नव्हे; तर सर्वात्मक व सर्वातीत पुरुषाच्या जाणिवेत राहून, विशाल पायावर ठामपणे सुस्थिर होऊन, जीवन जगावे. Read more

जीवनाकडे आणि योगाकडे योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास असे आढळून येते की, सर्व जीवन हे योगच आहे. मग ते पूर्ण जाणीवपुर:सर असो किंवा अर्ध-जाणिवेचे असो. “माणसामध्ये सुप्त असलेल्या क्षमतांच्या आविष्करणाद्वारे, आत्मपूर्णत्वाच्या दिशेने चाललेला पद्धतशीर प्रयत्न” असा ‘योग’ या संकल्पनेचा आमचा अर्थ आहे. या प्रयत्नांमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक असलेली उच्चतम अट म्हणजे, मानवामध्ये आणि विश्वामध्ये अंशतः आविष्कृत झालेल्या विश्वात्मक आणि विश्वातीत अस्तित्वाशी मानवी व्यक्तीचे ऐक्य, ही होय. Read more

आम्ही जे कार्य आमच्या डोळ्यांसमोर ठेवले आहे ते केवळ यांत्रिक नाही तर नैतिक आणि आध्यात्मिक आहे. केवळ शासनाच्या प्रकारामध्ये बदल घडविणे हेच आमचे उद्दिष्ट नसून राष्ट्रबांधणी हे आमचे उद्दिष्ट आहे. राजकारण हा या कामाचा एक भाग आहे, पण केवळ अंशभागच !

केवळ राजकारण, केवळ सामाजिक प्रश्न, केवळ धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान, साहित्य वा केवळ विज्ञान यांना आम्ही स्वत:ला वाहून घेता कामा नये तर या सर्वांचा समावेश आम्ही ज्या एका तत्त्वामध्ये करतो, जो आमच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा धर्म आहे, राष्ट्रधर्म आहे, जो आमच्या दृष्टीने वैश्विक देखील आहे, त्याला आम्ही समर्पित झाले पाहिजे.

जीवनाचा एक थोर कायदा आहे, मानवी उत्क्रांतीचे एक महान तत्त्व आहे; आध्यात्मिक ज्ञान आणि अनुभूतीचा देह आहे की ज्याचे संरक्षण करणे, ज्याचे जितेजागते उदाहरण बनणे आणि ज्याचा प्रचार करणे हे भारताचे आजवरचे नियत कार्य राहिले आहे. हा शाश्वत धर्म आहे. परकीय प्रभावांच्या दडपणाखाली येऊन भारताने केवळ धर्माचा बांधा, आराखडाच मोठ्या प्रमाणात गमावला आहे असे नाही तर त्या परकीय प्रभावांच्या दडपणामुळे भारताने ह्या धर्माचे जिवंत सत्यत्वच गमावले आहे.

जर हा भारताचा धर्म आचरणात आणला गेला नाही तर हा धर्म, धर्मच नव्हे. तो जीवनाच्या कोणत्या तरी एका भागात उपयोगात आणून पुरेसे नाही तर, तो जीवनाच्या सर्वांगांत उपयोगात आणला पाहिजे. त्याचा आत्मा आपल्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या राजकारणामध्ये, आपल्या साहित्यामध्ये, आपल्या विज्ञानामध्ये, आपल्या व्यक्तिभूत चारित्र्यामध्ये, आपल्या आत्मीयतांमध्ये, आपल्या आशाआकांक्षामध्ये प्रविष्ट व्हायला पाहिजे.

ह्या धर्माचे मर्म जाणून घेणे, त्याची सत्य म्हणून अनुभूती घेणे, तो ज्या उच्च भावनांप्रत उन्नत होत आहे त्या भावना अनुभवणे आणि त्या जीवनामध्ये अभिव्यक्त करणे व प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे आमच्या दृष्टीने कर्मयोग होय.

आम्ही असे मानतो की, योगसाधनेला मानवी जीवनाचे ध्येय बनविण्यासाठी भारताची उन्नती होत आहे. योगामुळेच भारताला स्वातंत्र्य, एकता आणि महानता प्राप्त करून घेण्यासाठी बळ मिळणार आहे, आणि ते सारे टिकवून ठेवण्यासाठीचे बळदेखील भारताला या योगामुळेच मिळणार आहे. आमच्या नजरेला आध्यात्मिक क्रांती दिसत आहे आणि भौतिक ही केवळ त्याची छाया आणि प्रतिक्रिया आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 08 : 24-28)