पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३४

 

आमचा योग-समन्वय, मानव हा शरीरधारी आत्मा असण्यापेक्षा, मनोमय आत्मा आहे असे धरून चालतो; म्हणजेच मनाच्या पातळीवर मानव आपल्या साधनेला आरंभ करू शकतो, असे मानतो; आणि उच्चतर आध्यात्मिक शक्तीला आणि अस्तित्वाला स्वतः थेट खुला होत, मानव मनामधील आत्मशक्तीच्या योगे, आपले अस्तित्व अध्यात्मसंपन्न करू शकतो, असे मानतो; त्या उच्चतर शक्तीने परिव्याप्त (Possessed) झालेला तो, स्वतःला परिपूर्ण बनवू शकतो आणि आपल्या समग्र प्रकृतीमध्ये या गोष्टी तो कृतीत उतरवू शकतो, अशी क्षमता मानवाकडे असते, असे आमचा समन्वय-योग मानतो. याप्रमाणे आमची दृष्टी असल्याने, आमचा प्रारंभिक जोर मनामध्ये असणाऱ्या आत्मशक्तीच्या उपयोगावर आहे; आत्म्याच्या कुलुपांना ज्ञान, कर्म, भक्तीची त्रिविध किल्ली वापरून, ती कुलुपं उघडण्यावर आमचा भर आहे; तेव्हा आमच्या समन्वययोगात हठयोग-पद्धती उपयोगात आणावी लागत नाही; मात्र तिचा थोडासा उपयोग करण्यास हरकत नाही. राजयोगपद्धती आमच्या समन्वययोगात अनौपचारिक अंग म्हणून येऊ शकते. आध्यात्मिक शक्तीच्या आणि आध्यात्मिक अस्तित्वाच्या अधिकात अधिक विकसनाप्रत, सर्वांत जवळच्या मार्गाने जाऊन पोहोचावे आणि त्यायोगे दिव्य झालेली आणि मानवी जीवनाच्या सर्व प्रांतात जिचा अत्युच्च मुक्ताविष्कार असेल अशी प्रकृती असावी, अशी आमची स्फूर्तिदायक प्रेरणा आहे.
– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 612-613)

पूर्णयोग

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३३

आपल्याला जी पद्धती उपयोगात आणावी लागते ती अशी असते की, आपण आपल्या सर्व जाणीवयुक्त अस्तित्वाने ईश्वराशी संपर्क साधावा, त्याच्याशी नाते जुळवावे; आणि आपले समग्र अस्तित्व हे त्याने त्याच्या रूपामध्ये रूपांतरित करावे म्हणून, आपण त्याला आवाहन करावे. म्हणजेच एक प्रकारे, आपल्यातील खरा पुरुष जो ईश्वर तोच साधनेचा साधक बनतो आणि तोच योगाचा प्रभुही बनतो. आणि मग या ईश्वराद्वारे, आपले कनिष्ठ व्यक्तिमत्त्व हे त्याच्या स्वतःच्या पूर्णतेचे साधन म्हणून, तसेच दिव्य रूपांतराचे केंद्र म्हणून उपयोगात आणले जाते….

या पद्धतीचे मानसशास्त्रीय तथ्य सांगायचे तर असे म्हणता येईल की, ह्या पद्धतीमध्ये अहंभाव त्याच्या सर्व क्षेत्रांसह, सर्व साधनसंभारासह क्रमश: अहंभावातीत परमतत्त्वाप्रत समर्पित होतो. या परमतत्त्वाच्या क्रिया अफाट असतात, त्यांचे मोजमाप करणे अशक्य असते आणि त्या नेहमी अटळ, अपरिहार्य अशा असतात. खचितच, ही साधना सोपी साधना नाही, किंवा हा मार्ग जवळचादेखील नाही. येथे प्रचंड श्रद्धेची आवश्यकता असते, पराकोटीचे धैर्य येथे लागते आणि सर्वांहूनही अधिक, कशानेही विचलित न होणारी सबुरी आवश्यक असते. कारण या मार्गात तीन टप्पे असतात आणि त्यापैकी केवळ शेवटच्या टप्प्यांत वेगाने वाटचाल होते व ही वाटचाल आनंदमयी असते.

पहिला टप्पा : या टप्प्यात आपला अहंभाव हा ईश्वराशी व्यापकतेने आणि समग्रतेने संपर्क साधावयाचा प्रयत्न करीत असतो;

दुसरा टप्पा : खालच्या प्रकृतीची सर्व तयारी या टप्प्यात केली जात असते. ही तयारी ईश्वरी कार्याद्वारे होत असते, वरिष्ठ प्रकृतीला कनिष्ठ प्रकृतीने ग्रहण करावे व कालांतराने स्वत:च वरची प्रकृती व्हावे, ह्यासाठी कनिष्ठ प्रकृतीची तयारी केली जात असते.

तिसरा टप्पा : या टप्प्यात कनिष्ठ प्रकृतीचे वरिष्ठ प्रकृतीमध्ये अंतिम रूपांतर होत असते. तथापि, वास्तवात ईश्वरी शक्ती न कळत पडद्याआडून आपल्याकडे बघत असते व आपला दुबळेपणा पाहून, ती स्वत:च पुढे सरसावते आणि आपल्याला आधार देते. आपली श्रद्धा, धैर्य, सबुरी कमी पडेल त्या त्या वेळी ती आपल्याला आधार देऊन सावरते. ही ईश्वरी शक्ती “आंधळ्याला पाहाण्याची शक्ती देते, लंगड्याला डोंगर चढण्याची शक्ती देते.” आपल्या बुद्धीला ही जाणीव होते की, आपल्याला वर चढण्याचा प्रेमाने आग्रह करणारा असा दिव्य कायदा आपल्या मदतीला आहे; सर्व वस्तुजातांचा स्वामी असणाऱ्या, मानवांचा सखा असणाऱ्या ईश्वराबद्दल किंवा विश्वमातेबद्दल आपले हृदय आपल्याला सांगत असते की, आपण जेथे जेथे अडखळतो तेथे तेथे हा स्वामी व ही विश्वमाता आपल्याला हात देऊन सावरतात. तेव्हा असे म्हणणे भाग आहे की, हा मार्ग अतिशय अवघड, कल्पनातीत अवघड असला तरी, या मार्गाचे परिश्रम आणि या मार्गाचे उद्दिष्ट यांची तुलना केली असता, हा मार्ग अतिशय सोपा व अतिशय खात्रीचा आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 45-46)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – ३०

 

प्रकृती गुप्तपणे विकास पावत आहे. तिच्या ठिकाणी जे दिव्य ईश्वरी तत्त्व दडलेले आहे ते शोधून काढण्याच्या व त्याची परिपूर्ती करण्याच्या दिशेने प्रकृतीचा गुप्तपणे विकास घडून येत आहे; या विकासाच्या योगाने ते दिव्य तत्त्व अधिकाधिक स्पष्ट होत आहे… मन, प्राण, शरीर ही आपल्या प्रकृतीची सर्व रूपे या विकासाची साधने आहेत; परंतु मन, प्राण, शरीर यांच्या पलीकडले असे जे कोणते अस्तित्व आहे, त्याप्रत खुले होण्यानेच मन, प्राण, शरीर यांना त्यांचे अंतिम पूर्णत्व गवसते; याचे पहिले कारण असे की, केवळ मन, प्राण, शरीर म्हणजे काही पूर्ण मनुष्य नव्हे. आणि दुसरे कारण असे की, मनुष्याचे हे जे अन्य अस्तित्व आहे तीच त्याच्या संपूर्णतेची गुरुकिल्ली आहे आणि तेथून जो प्रकाश येतो त्या प्रकाशात मनुष्याला त्याच्या अस्तित्वाचे उच्च व विशाल सत्यरूप समग्रतेने दिसू शकते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 617)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २९

कर्मयोग

 

जीवन आणि आध्यात्मिकता या दोन विभक्त गोष्टी आहेत, असा विचार करणे चुकीचे आहे, हे आम्ही पुन्हा एकदा सांगतो.
….श्रीकृष्ण अर्जुनाला पुनपुन्हा कंठशोष करून संघर्ष करण्यावर भर द्यायला सांगत आहे. “युद्ध कर आणि तुझ्या विरोधकांचा पाडाव कर”. “माझे स्मरण कर आणि लढ!”, “कोणत्याही अभिलाषेपासून मुक्त असलेले कर्म, कोणत्याही स्वार्थी दाव्यांपासून मुक्त असलेले असे कर्म आणि आध्यात्मिकतेने काठोकाठ भरलेल्या हृदयानिशी केलेले सर्व कर्म मला अर्पण कर आणि लढ!” ….कुरुक्षेत्राचा सारथी अर्जुनाच्या रथाला उध्वस्त झालेल्या क्षेत्रामधून घेऊन जात आहे असे कर्मयोगाचे वर्णन आहे, ते कर्मयोगाचे प्रतीक आहे. कारण शरीर हा रथ आहे, इंद्रियं ही त्या रथाला जोडलेले घोडे आहेत आणि या रक्तपात आणि चिखलाने माखलेल्या जगाच्या मार्गावरून, श्रीकृष्ण मानवी आत्म्याला वैकुंठाच्या दिशेने घेऊन जात आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 12)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २८

कर्मयोग

 

ज्ञानासाठी, प्रेमासाठी किंवा कर्मासाठी ईश्वराशी सायुज्य म्हणजे ‘योग’ होय. योगी, माणसाच्या अंतरंगात असणाऱ्या आणि माणसाच्या बाहेर असणाऱ्या सर्वज्ञ व सर्वशक्तिमान ईश्वराशी स्वतःचा थेट संपर्क साधतो. तो त्या अनंताशी जोडलेला असतो; या विश्वामध्ये ईश्वराचे सामर्थ्य ओतण्याचा तो एक स्रोत बनतो. मग तो शांत परोपकाराच्या भूमिकेद्वारे असेल किंवा सक्रिय उपकाराच्या भूमिकेद्वारे असेल. जेव्हा एखादा मनुष्य स्वतःची व्यक्तिगत दलदल सोडून, इतरांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होऊन, इतरांसाठी जगू लागतो; जेव्हा तो सुयोग्य रीतीने आणि प्रेम व उत्साहाने कर्म करू लागतो; मात्र परिणामांची चिंता सोडून देतो, तो विजयासाठी उत्सुक नसतो किंवा पराजयाची भीतीही बाळगत नाही; जेव्हा तो त्याची सारी कर्मे ईश्वरार्पण करतो आणि प्रत्येक विचार, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक कृती दिव्यत्वाच्या वेदीवर अर्पण करतो; जेव्हा तो भीती आणि द्वेष, घृणा आणि किळस, आसक्ती यांपासून मुक्त होतो आणि प्रकृतीच्या शक्तींप्रमाणे, कोणतीही घाईगडबड न करता, अविश्रांतपणे, अपरिहार्यपणे, परिपूर्णपणे कर्म करतो; जेव्हा तो, ‘मी म्हणजे देह आहे’, ‘मी म्हणजे हृदय आहे’ किंवा ‘मी म्हणजे मन आहे’ किंवा ‘मी म्हणजे या तिन्हींची गोळाबेरीज आहे’; या विचारांच्या तो वर उठतो आणि जेव्हा तो स्वतःच्या, खऱ्या ‘स्व’ चा शोध घेतो; जेव्हा त्याला स्वतःच्या अमर्त्यतेची आणि मृत्युच्या अवास्तवतेची जाण येते; जेव्हा त्याला ज्ञानाच्या आगमनाची अनुभूती येते आणि जेव्हा मी स्वतः निष्क्रिय आहे, आणि ती दिव्य शक्ती माझ्या मनाच्या द्वारे, माझ्या वाणीच्या द्वारे, माझ्या इंद्रियांच्या द्वारे, आणि माझ्या सर्व अवयवांद्वारे अप्रतिहत रीतीने कार्य करत आहे; अशी जाण त्याला येते; अशा रीतीने, सर्वांचा स्वामी, मानवतेचा साहाय्यक आणि सखा असणाऱ्या ईश्वराप्रत तो मनुष्य स्वतः जे काही आहे, तो स्वतः जे काही करतो ते आणि त्याच्यापाशी जे काही आहे, अशा सर्व गोष्टींचा, जेव्हा तो परित्याग करतो तेव्हा मग, तो कायमस्वरूपी त्या ईश्वरामध्ये निवास करू लागतो आणि मग अशा तऱ्हेने दुःख, अस्वस्थता किंवा मिथ्या क्षोभ यांची त्याला बाधा होत नाही. हाच योग होय.

– श्रीअरविंद
(CWSA 13 : 11)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २७

कर्मयोग

 

कर्ममार्ग, प्रत्येक मानवी कर्म परमेश्वराच्या इच्छेला समर्पित करावे, हे ध्येय समोर ठेवतो. या मार्गाचा आरंभ, आपल्या कर्मामागे असणारा अहंभावप्रधान हेतू सर्वथा टाकून देणे, स्वार्थी हेतूने कोणतेही कर्म न करणे, सांसारिक फळासाठी कोणतेही कर्म न करणे, या गोष्टींपासून होतो. या त्यागामुळे, कर्ममार्ग हा आपले मन व आपली इच्छा अशा प्रकारे शुद्ध करू शकतो की त्यामुळे, महान विश्वशक्ती हीच आपल्या सर्व कर्मांची खरी कर्ती आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. या शक्तीचा स्वामी ईश्वर हा या कर्मांचा खरा स्वामी व नेता आहे; व्यक्ती हा केवळ एक मुखवटा आहे; व्यक्ती ही सबब आहे; या शक्तीचे ती एक साधन आहे किंवा अधिक सकारात्मकपणे सांगावयाचे झाले तर, व्यक्ती हे कर्माचे व सांसारिक संबंधाचे जाणीवयुक्त केंद्र आहे, ही जाणीव आपल्याला सहजपणे होऊ लागते. कर्मयोगी कर्माची निवड व त्याची दिशा अधिकाधिक जाणीवपुर:सर ईश्वराच्या इच्छेवर आणि विश्वशक्तीवर सोपवितो. आपले कर्म व आपल्या कर्माची फळे शेवटी ईश्वराला व त्याच्या विश्वशक्तीला समर्पित करण्यात येतात. आपला आत्मा दृश्यांच्या कैदेत असतो तो मुक्त व्हावा; आपला आत्मा प्रापंचिक व्यापारांच्या प्रतिक्रियांच्या बंधनात असतो, तो त्या बंधनातून मुक्त व्हावा, हा या समर्पणाच्या मागचा हेतू असतो. भक्तिमार्ग व ज्ञानमार्ग यांच्याप्रमाणे कर्ममार्गही नामरूपात्मक अस्तित्वातून मुक्त होऊन, परमात्म्यात विलीन होण्यासाठी वापरला जातो. परंतु येथेही हा विलिनीकरणाचा परिणाम अपरिहार्य आहे, असे मात्र नाही. भक्तिमार्ग आणि ज्ञानमार्गाप्रमाणेच या मार्गाची परिणती ही, सर्व शक्तींच्या ठायी, सर्व घटनांमध्ये, सर्व कृतींमध्ये, ईश्वराचे दर्शन घडण्यात होऊ शकते; वैश्विक कार्यामध्ये असा कर्मयोगी आत्मा मुक्तपणाने आणि अनहंकारी पद्धतीने सहभागी होऊ शकतो. कर्मयोगाचे याप्रमाणे आचरण केले तर, हा योग सर्व मानवी इच्छा व सर्व कर्म यांचे उन्नतीकरण करून, त्यांना दिव्य पातळीवर नेऊ शकेल; त्यांचे आध्यात्मिकीकरण करू शकेल; मुक्ती, सामर्थ्य आणि पूर्णत्व यासाठी मानव विश्वभर जे परिश्रम करत आहे, त्याचे समर्थन याद्वारे करता येईल.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 39-40)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २६

भक्तियोग

प्रेम, भक्ती हे सर्व अस्तित्वाच्या मुकुटस्थानी आहे, अस्तित्वाची परिपूर्ती प्रेमानेच होते; प्रेमानेच अस्तित्व आणि जीवन सर्व प्रकारची उत्कटता, सर्व प्रकारची पूर्णता गाठते आणि पूर्ण आत्मलाभाचा आनंद भोगते. कारण जरी मूळ अस्तित्व हे स्वभावतःच जाणिवेच्या स्वरूपाचे आहे; आणि जाणिवेच्या द्वाराच आपण या अस्तित्वाशी एकरूप होतो, हे खरे असले तरी जाणीव स्वभावतः आनंदरूप आहे आणि आनंदाचे शिखर गाठण्यास प्रेम हे गुरुकिल्लीप्रमाणे उपयोगी पडते.

– श्रीअरविंद
(संदर्भ : योगसमन्वय – सेनापती बापट)
(CWSA 23-24 : 546-547)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २५

भक्तियोग

 

भक्तिपूर्ण मनाच्या द्वारा ईश्वराच्या भेटीसाठी जी साधना केली जाते, तिच्या तीन अवस्था असतात, असे भक्तिमार्गाची व्यवस्था लावू पाहणारे मानतात. पहिली अवस्था म्हणजे श्रवण – ईश्वराच्या नावाचे, त्याच्या गुणांचे आणि या गुणांशी संबंधित असणाऱ्या अशा गोष्टींचे नित्य श्रवण. दुसरी अवस्था म्हणजे मनन – ईश्वराच्या गुणांचे, त्याच्या व्यक्तिरूपाचे, ईश्वराचे नित्य मनन. तिसरी अवस्था म्हणजे ईश्वरावर मन स्थिर करून, ईश्वराचा साक्षात्कार करून घेणे. यांद्वारे आणि त्याचबरोबर जर मनोभाव उत्कट असतील, एकाग्रता तीव्र असेल तर, समाधीचाही अनुभव येतो; अशा वेळी मग बाह्य विषयांपासून जाणीव दूर निघून गेलेली असते. परंतु याही सर्व गोष्टी वस्तुतः प्रासंगिक आहेत; मनातील विचार हे पूजाविषयाकडे उत्कट भक्तीने लागले पाहिजेत, हीच एक अत्यंत आवश्यक गोष्ट आहे.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 574)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २४

भक्तियोग

 

पूर्ण आत्मसमर्पणामध्ये आपले सर्व अस्तित्वच ईश्वराला अर्पण करणे अपेक्षित असते; त्यामुळे अर्थातच त्यामध्ये आपले विचार आणि आपली कर्मे यांचे अर्पणही अपेक्षित असते. असे करताना भक्तियोग हा कर्मयोग व ज्ञानयोगाचे महत्त्वाचे घटक अंतर्भूत करून घेतो, पण तो हे स्वतःच्या पद्धतीने व स्वतःच्या विशिष्ट भावाने करतो. येथेही भक्त त्याच्या कर्माचे आणि त्याच्या जीवनाचे ईश्वराला समर्पण करतो; पण ईश्वरी इच्छेशी आपली इच्छा मिळतीजुळती घेण्यापेक्षा, तो आपल्या प्रेमाचे समर्पण करत असतो. भक्त ईश्वराला आपले जीवन अर्पण करतो म्हणजे तो जे काही असतो, त्याच्यापाशी जे काही असते, तो जे काही कर्म करतो ते सर्व तो ईश्वरार्पण करतो. हे आत्मसमर्पण संन्यासाचे रूप घेऊ शकेल. जेव्हा संन्यासी सामान्य मानवी जीवन सोडून देतो आणि त्याचे सारे दिवस हे पूजाअर्चना, भक्ती किंवा ध्यानसमाधीत व्यतीत करतो, तेव्हा त्याची सारी वैयक्तिक मालमत्ता त्यागून, तो बैरागी किंवा भिक्षू बनतो; ईश्वर हीच ज्याची एकमेव अशी संपदा बनते, ईश्वराच्या सायुज्यतेसाठी आणि इतर भक्तांच्या संबंधांपुरते साहाय्यभूत ठरतील किंवा त्याच्याशी जे निगडित असतील अशा कर्मांव्यतिरिक्तच्या सर्व कर्मांचा तो त्याग करतो; किंवा फार फार तर संन्यासाश्रमाच्या सुरक्षित गढीमध्ये राहून, ईश्वरी प्रकृतीचा आविष्कार असणारी प्रेममय, दयामय, कल्याणमय अशी सेवाकर्मे तो करत राहतो. परंतु पूर्णयोगामध्ये, यापेक्षा अधिक व्यापक असे आत्मसमर्पण असू शकते. पूर्णयोगामध्ये जीवन त्याच्या पूर्णतेसह, विश्व त्याच्या समग्रतेसह, ईश्वराची लीला आहे, असे समजून स्वीकारले जाते; असा भक्त हा स्वतःचे समग्र अस्तित्व ईश्वराच्या ताब्यात देतो. सर्व अस्तित्व म्हणजे तो स्वतः जे काही आहे ते आणि त्याची स्वतःची जी काही मालमत्ता आहे ती सारी, ‘त्या ईश्वराची आहे’ असे समजून, (‘इदं न मम’ या भावनेने) स्वतःकडे बाळगतो. त्या गोष्टी स्वतःच्या आहेत, असे तो मानत नाही. तो सारी कर्मे ईश्वरार्पण म्हणूनच करतो. या व्यापक आत्मसमर्पणात आंतरिक व बाह्य जीवनाचे परिपूर्ण सक्रिय समर्पण होत असते; त्यामध्ये कोणतेही न्यून राहात नाही.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 573-574)

पूर्णयोगांतर्गत पारंपरिक योग – २३

भक्तियोग

 

मानवी मन आणि मानवी जीव, जो अजूनही दिव्य झालेला नाही; परंतु ज्याला दिव्य प्रेरणा जाणवू लागली आहे आणि ज्याला दिव्यतेचे आकर्षण वाटू लागले आहे, अशा मनाला आणि जीवाला, त्यांचे श्रेष्ठ अस्तित्व मिळवून देणाऱ्या ईश्वराकडे वळविणे, हे सर्व योगांचे स्वरूप असते. भावनेच्या दृष्टीने, या ईश्वरोन्मुख वृत्तीचे पहिले रूप असते ते पूजाअर्चेचे. सामान्य धर्मामध्ये हा पूजाभाव बाह्य पूजेचे रूप धारण करतो आणि मग पुन्हा त्याला अगदी बाह्य विधिवत पूजेचे रूप प्राप्त होते. अशा प्रकारची पूजा सामान्यतः जरुरीची असते कारण बहुतांशी मानवसमूह हा त्यांच्या भौतिक मनांमध्येच जीवन जगत असतो; आणि त्यामुळे, कोणतेतरी भौतिक प्रतीक असल्याशिवाय, त्यांना ती गोष्ट अनुभवताच येत नाही. भौतिक-शारीरिक कर्मशक्तीविना आपण इतरकाही जीवन जगत असतो, हे त्यांना जाणवूच शकत नाही.

…हा पूजाभाव सखोल अशा भक्तिमार्गाचा एक घटक म्हणून परिवर्तित होण्याआधी, प्रेमभक्तिरूपी फुलाची पाकळी, तिचे श्रद्धासुमन त्या सूर्याच्या दिशेने, म्हणजे ज्याची पूजा केली जाते त्या ईश्वराच्या दिशेने आत्मोन्नत होण्याची आवश्यकता असते. आणि त्याचबरोबर, जर का तो पूजाभाव अधिक गाढ असेल तर, त्याचे ईश्वराबाबतचे चढतेवाढते आत्मसमर्पण आवश्यक असते. ईश्वराशी संपर्क येण्यासाठी सुपात्र बनावयाचे असेल, आपल्या आंतरिक अस्तित्वाच्या मंदिरामध्ये ईश्वराचा प्रवेश व्हावा, असे वाटत असेल, आपल्या हृदय-गाभाऱ्यामध्ये त्याने आत्म-प्रकटीकरण करावे असे आपल्याला वाटत असेल, तर या आत्मसमर्पणापैकी एक घटक हा आत्मशुद्धीकारक असणे आवश्यक असते. हे शुद्धीकरण नैतिक स्वरूपाचे देखील असू शकते. परंतु नैतिकतावादी मनुष्याला ज्या प्रकारचे न्याय्य व निर्दोष कर्म अपेक्षित असते, केवळ तसे हे शुद्धीकरण नसते; किंवा जेव्हा आपण योगदशेप्रत येऊन पोहोचतो तेव्हा, औपचारिक धर्मामध्ये ईश्वरी कायद्याचे पालन म्हणून जे सांगितले जाते, त्या अर्थानेही आत्मशुद्धीकरण पुरेसे नसते; तर खुद्द ‘ईश्वर’ या संकल्पनेच्या किंवा आपल्या अंतरंगातील ईश्वराशी जे जे काही विरोधात जाणारे असेल त्या त्या साऱ्याचे विरेचन, त्या साऱ्या गोष्टी फेकून देणे, हे येथे अपेक्षित असते. पहिल्या प्रकारामध्ये आपण आपल्या भावनेची सवय व आपल्या बाह्य कृती या ईश्वराचे अनुकरण असल्याप्रमाणे बनत जातात; तर दुसऱ्या प्रकारामध्ये आपली प्रकृती ही ईश्वराच्या प्रकृतीसारखी बनत जाते. आंतरिक पूजाभाव आणि विधिवत पूजाअर्चा यांचा जो संबंध असतो, तसाच संबंध ईश्वराशी असलेले सादृश्य आणि नैतिक जीवन यामध्ये असतो. ईश्वराशी असलेले हे आंतरिक सादृश्य ‘सादृश्यमुक्ती’मध्ये परिणत होते; या सादृश्यमुक्तीमुळे आपल्या कनिष्ठ प्रकृतीची सुटका होऊन, तिचे ईश्वरी प्रकृतीमध्ये रूपांतरण होते.

– श्रीअरविंद
(CWSA 23-24 : 572-573)