ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र

(अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष, वुड्रो विल्सन यांच्या कन्या कुमारी मार्गारेट वुड्रो विल्सन या श्रीअरविंद लिखित ‘एसेज ऑन द गीता’ हा ग्रंथ वाचून प्रभावित झाल्या. १९३२ साली न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीमध्ये हा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला. मार्च १९३६ मध्ये त्यांनी श्रीअरविंदांना पत्र लिहिले आणि आपल्याला साधनेमध्ये मार्गदर्शन करावे अशी विनंती केली. मला श्रीअरविंद-आश्रमात राहता येईल का अशी विचारणाही त्यांनी या पत्राद्वारे केली. १९३८ साली त्यांना आश्रमात राहण्याची परवानगी देण्यात आली. श्रीअरविंदांनी त्यांना ‘निष्ठा’ अशी नाममुद्रा दिली. पुढे १९४८ साली त्यांचे आश्रमात निधन झाले.

कुमारी मार्गारेट यांनी श्रीअरविंदांना लिहिलेले पत्र आणि त्यांनी मार्गारेट यांना उत्तरादाखल लिहिलेले पत्र आपण विचारात घेणार आहोत. आज त्यांनी श्रीअरविंद यांना लिहिलेले पत्र विचारात घेऊ या.)

०३ मार्च १९३६

प्रिय श्रीअरविंद,

तुमचा ‘एसेज ऑन द गीता’ हा ग्रंथ १९३२ सालच्या उन्हाळ्यामध्ये माझ्या वाचनात आला आणि तेव्हापासून हा ग्रंथ माझ्यासाठी साहाय्य आणि प्रेरणा देणारा एक स्रोत ठरला आहे. आता तुमचे थेट साहाय्य आणि तुमच्याकडून थेट प्रेरणा मला लाभावी म्हणून मी विनम्रपणे तुम्हाला लिहीत आहे.

मी विश्वासाने ज्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी वळावे असे माझ्या देशात मला कोणी दिसत नाही कारण, ज्ञानप्रकाश लाभलेली अशी कोणी व्यक्ती येथे आहे असे माझ्यातरी ऐकिवात नाही. कोणत्यातरी एका विचारधारेशी किंवा एखाद्या (आध्यात्मिक) संस्थेशी जोडून घेण्याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा, ‘त्यांची शिस्त आणि त्यांचे नियम मला बंधनकारक होतील आणि त्यामुळे माझा आत्मा मुक्त करण्यासाठी मला ते साहाय्यक ठरणार नाहीत,’ अशा आशंकेने मी पुन्हा मागे फिरते.

नुकतेच मला तुमच्या आश्रमाचे एक छोटेसे माहितीपत्रक मिळाले आहे. माझ्यामध्ये आणि सर्वच जिवमात्रांमध्ये असलेल्या आत्म्याची चेतना ज्यामुळे मुक्त होऊ शकेल अशी कोणती साधना मी प्रथमत: करावी आणि अखेरीस, माझ्या हृदयातील ईश्वराची जेव्हा इच्छा होईल तेव्हा पुरुषोत्तमाच्या चेतनेशी आणि पुरुषोत्तमाशी अंतिम एकत्व पावण्याचा अनुभव मला लाभावा यासाठी कोणती साधना मी करावी, हे तुम्ही मला सुचवाल, अशी आशा बाळगण्याचे धाडस मी करत आहे. मला याची जाणीव आहे की हे साध्य होण्यापूर्वीचा मार्ग खूप दूरवरचा आणि कष्टप्रद असणार आहे; पण तरीही या मार्गावर मला पाऊल ठेवायचे आहे आणि कोणत्याही आंतरात्मिक वैभवाच्या किंवा शक्तिसामर्थ्याच्या उपभोगासाठी मार्गावर मध्येच थांबून न राहता, शक्य तितक्या सरळपणे आणि शक्य तितक्या त्वरेने ही वाटचाल करण्याची माझी इच्छा आहे. ही वाटचाल करत असताना, त्याच्या बरोबरीने, ईश्वरी कार्यासाठी आध्यात्मिक आत्म्याचे एक साधन बनावे अशीही माझी इच्छा आहे.

माझ्या कृती आणि मी उच्चारलेला एकेक शब्द हा माझ्या अंतरात्म्यापासून निघालेला नसल्यामुळे, तो किती पोकळ आहे, किती निरर्थक आहे याची मला आता जाणीव होत आहे. उच्चतर आत्म्याकडून मार्गदर्शन मिळाल्याशिवाय आणि ज्ञानप्रकाश लाभल्याशिवाय माझा हा क्षुद्र जीव काही उपयुक्त कार्य करू शकेल या भ्रमात आता मी कधीही राहू शकणार नाही, याची मला आता खात्री पटली आहे. ज्याने आपला चिरपरिचित किनारा मागे टाकला आहे आणि होकायंत्र नसल्यामुळे, पैलतीरी जायचा मार्गही ज्याला सापडत नाहीये, अशा एखाद्या नावाड्याप्रमाणे माझी अवस्था झाली आहे.

मी असे ऐकले आहे की, ‘जेव्हा शिष्याची तयारी झालेली असते तेव्हा त्याला गुरू भेटतो.’ माझी तयारी झाली आहे किंवा नाही आणि तुमच्या मार्गदर्शक सूचनांचे अनुसरण करण्यास मी पात्र आहे की नाही हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला कळकळीने विनंती करत आहे. हे परमप्रभो, तुम्ही मला मार्ग दाखवावा. तुम्ही दाखविलेल्या मार्गाचे निर्भयपणे अनुसरण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करीन. कारण मला हे माहीत आहे की, मी आज जिच्याविषयी अनभिज्ञ आहे त्या माझ्याच उच्चतर चेतनेचे तुम्ही प्रतिनिधी आहात. मला वाटते तितकी माझी मुक्तीची आस सखोल आणि प्रमाणिक नसेल तर, कृपा करून ती अधिक सखोल करावी. हे परमप्रभो, त्यामुळे प्रसंगी मला कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरीही मी ती आस गमावू इच्छित नाही.

आश्रमात न राहणारे असेही तुमचे काही शिष्य आहेत, असे मला सांगण्यात आले. अमेरिकेतील व्यक्तींचा तुम्ही शिष्य म्हणून स्वीकार करता का? अगदी कोणत्याही क्षणी तुम्ही मला येथील (अमेरिकेतील) सर्व गोष्टींचा परित्याग करून, आश्रमात जीवन व्यतीत करण्यासाठी यायला सांगितलेत तर मी तसे करीन, ईश्वर माझा पाठीराखा आहे. अतिशय विनम्रतेने मी तुमच्या उत्तराची वाट पाहत आहे. तुम्ही माझ्यासाठी आजवर जे केले आहे त्याबद्दल अंतःकरणपूर्वक धन्यवाद!

तुमची विनीत,
मार्गारेट वुड्रो विल्सन.

संदर्भ : presidentwilson.org

अभीप्सा मराठी मासिक

या संकेतस्थळावरील बहुतांश सर्व मजकूर हा श्रीअरविंद व श्रीमाताजी लिखित आहे, त्याचा मराठी अनुवाद अभीप्सा मासिकाने केला आहे. तसेच या मासिकातर्फेच, आकलनाच्या सोयीसाठी काही ठिकाणी चित्रे, तक्ते, आकृत्या यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Recent Posts

आत्मदानाचा अर्थ

  (बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये लिहिलेल्या…

2 days ago

आध्यात्मिक चेतना

(श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना एक पत्र…

3 days ago

तुम्हीच तुमच्या जीवनाचे स्वामी

  तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच…

4 days ago

सत्यशोधनाची प्रामाणिक इच्छा

  (अंतरात्म्याचा आवाज कसा असतो, आणि मन व प्राण यांचे आवाज कसे असतात, हे आपण…

5 days ago

अंतरात्म्याचा आवाज

  (मन आणि प्राण यांच्या गडबडगोंधळामुळे अंतरात्म्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येत नाही, यासंबंधी आपण…

6 days ago

अंतरात्म्याचा आवाज

  (अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…

7 days ago