(बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये लिहिलेल्या पत्राचा पूर्वार्ध आपण विचारात घेतला. त्या पत्राचा हा उत्तरार्ध…)
दिव्य चेतनेप्रत स्वतःला खुले करण्याचे किंवा त्यामध्ये प्रवेश करण्याचे अनेक मार्ग आहेत. मी जो माझा मार्ग सांगतो तो असा आहे की, व्यक्तीने स्वतःच्या अंतरंगात शिरण्याचा निरंतर सराव करायचा; अभीप्सेच्या माध्यमातून ईश्वराप्रति स्वत:ला खुले करायचे आणि एकदा का व्यक्ती ईश्वराविषयी आणि त्याच्या कार्याविषयी सजग झाली की, ईश्वराप्रति स्वतःचे संपूर्णपणे आत्मदान (self-giving) करायचे.
या आत्मदानाचा अर्थ असा की, कशाचीही मागणी न करता, त्या दिव्य चेतनेच्या सतत संपर्कात राहायचे किंवा तिच्याशी ऐक्य साधायचे; तिची शांती, शक्ती, प्रकाश, आणि आनंद यांच्याबद्दल अभीप्सा बाळगायची; मात्र अन्य कशाचीही मागणी करायची नाही. या जगामध्ये दिव्य शक्तीने व्यक्तीला जे कार्य नेमून दिले आहे ते कार्य, जीवनात व कृतीमध्ये उतरविण्यासाठी त्या शक्तीचे साधन बनायचे. व्यक्तीला एकदा का मन, हृदय व शरीर यांमध्ये कार्यरत असणाऱ्या आत्मशक्तीची, दिव्य शक्तीची जाणीव होऊ शकली आणि त्याप्रत व्यक्ती खुली होऊ शकली, म्हणजे मग शिल्लक उरते ते म्हणजे त्या दिव्य शक्तीशी एकनिष्ठ राहणे, सातत्याने तिला आवाहन करणे आणि जेव्हा ती अवतरते, तेव्हा तिला तिचे कार्य करू देणे आणि निम्नतर चेतनेशी व निम्नतर प्रकृतीशी संबंधित असणाऱ्या इतर सर्व गोष्टींना व कनिष्ठ शक्तींना नकार देणे.
माझ्या योगशक्तीचे स्वरूप आणि माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी पुष्कळ लिहिले आहे. मी सहसा कोणालाही ही योगसाधना करण्यास सांगत नाही, कारण ज्यांना सुरुवातीपासून त्याविषयी उत्कट ‘हाक’ (call) आली आहे किंवा ज्यांच्यामध्ये ती हाक तीव्रतर होत गेली आहे अशा व्यक्तींनाच ही योगसाधना करणे शक्य आहे. इतर जण या साधनेच्या शेवटापर्यंत जाऊ शकत नाहीत. भौतिकामधील बहिर्वर्ती शांती मिळावी हीच ज्यांची गरज आहे त्यांना, इतर योगी जशी मदत करतात तशी, मदत करायला मी जात नाही. पण काही विशिष्ट व्यक्तींबाबत मी तशी मदत करायला नकारही देत नाही.
उच्चतर चेतनेचे अवतरण घडावे आणि ती चेतना केवळ ‘मुक्ती’ प्रदान करणारी शक्ती न राहता, या भूतलावर ‘दिव्य जीवन’ निर्माण करणारी शक्ती ठरावी यासाठी आध्यात्मिक जीवनाचे एक केंद्र तयार करणे हे माझे ध्येय आहे. या उद्देशाने मी सार्वजनिक जीवनातून अंग काढून घेतले आहे आणि पाँडिचेरी येथे आश्रम स्थापन केला आहे. (इतर दुसरा चांगला शब्द न सापडल्याने मला नाईलाजाने ‘आश्रम’ हा शब्द वापरावा लागत आहे, पण हा संन्यासी लोकांचा आश्रम नव्हे तर, वर सांगितलेल्या या कार्यासाठी तयार होण्यासाठी, इतर सर्व गोष्टींचा त्याग करू पाहणाऱ्या लोकांचे हे स्थान आहे.) त्याच वेळी जे कुटुंबीयांसमवेत आपापल्या घरी राहत आहेत आणि दूरवर राहूनसुद्धा माझे आध्यात्मिक साहाय्य प्राप्त करून घेत आहेत असे माझे काही थोडे शिष्य भारतभर आहेत. महाराणी, आत्ताच्या घडीला तुम्हाला उत्तरादाखल, मी हे एवढेच लिहू शकतो.
– श्रीअरविंद (CWSA 36 : 441-442)
(श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना एक पत्र…
तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच…
(अंतरात्म्याचा आवाज कसा असतो, आणि मन व प्राण यांचे आवाज कसे असतात, हे आपण…
(मन आणि प्राण यांच्या गडबडगोंधळामुळे अंतरात्म्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येत नाही, यासंबंधी आपण…
(अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…
(श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास…