(श्रीअरविंद यांनी इ. स. १९३० मध्ये, बडोदा संस्थानच्या महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड यांना एक पत्र लिहिले आहे. त्यातील हा पूर्वार्ध…)
योगसाधनेतून प्राप्त होणारी उच्च आध्यात्मिक चेतना मी योगाभ्यासातून संपादन केली आहे, हे खरे आहे. त्या चेतनेबरोबर एक विशिष्ट शक्तीही प्राप्त होत असते. विशेषत: योगासाठी जे कटिबद्ध झाले आहेत त्यांच्याशी संवाद साधण्याची शक्ती मी संपादन केली आहे. एक अशी स्थिती असते की जी पूर्णत्वास गेली तर अविचल स्थिरता, सामर्थ्य व परमानंद यांची प्राप्ती होते. ती आध्यात्मिक अवस्था हा योग करणाऱ्यांना प्राप्त व्हावी म्हणून त्यांना मदत करण्याची शक्तीसुद्धा मला प्राप्त झाली आहे. मानसिक आनंद व मानसिक शांतीपेक्षा, आध्यात्मिक आनंद व आध्यात्मिक शांतीचे स्वरूप काही निराळेच असते. पण आध्यात्मिक साधना केल्याशिवाय त्या गोष्टी लाभू शकत नाहीत.
थोडक्यात सांगायचे तर, चेतनेच्या दोन अवस्था असतात; त्यांपैकी कोणत्याही एका अवस्थेमध्ये व्यक्ती जीवन जगू शकते. जीवनलीलेच्या वर राहून तिला नियंत्रित करणारी उच्चतर चेतना, ही चेतनेची एक अवस्था असते. तिला जीवात्मा, आत्मा, ईश्वर अशा विविध नावांनी संबोधण्यात येते. आणि माणसं ज्या चेतनेमध्ये जगत असतात ती सामान्य चेतना, ही चेतनेची दुसरी अवस्था असते. ही चेतना काहीशी वरवरची असते आणि ती जीवनलीलेसाठी आत्म्याचे एक साधन म्हणून उपयोगात आणली जाते. सामान्य चेतनेमध्ये राहून, कृती करणाऱ्या माणसांचे जीवन मनाच्या सामान्य आंदोलनांनी पूर्णपणे संचालित होत असते आणि साहजिकच अशी माणसं सुखदुःख, काळजी, इच्छावासना आणि तत्सम सर्व गोष्टींच्या, म्हणजे ज्या गोष्टींनी हे सर्वसामान्य जीवन बनलेले असते, त्या गोष्टींच्या अधीन असतात. त्यांना मानसिक शांती आणि आनंद मिळू शकतो, पण ती शांती आणि तो आनंद कधीच चिरस्थायी किंवा सुरक्षित असू शकत नाही.
प्रकाश, शांती, शक्ती आणि परमानंद या सर्व गोष्टी म्हणजे आध्यात्मिक चेतना. एखादी व्यक्ती जर संपूर्णपणे अशा चेतनेमध्येच राहू शकली तर काही प्रश्नच नाही; स्वाभाविकपणे आणि सुरक्षितपणे या सर्व गोष्टी तिला लाभतात. पण एखादी व्यक्ती अंशत: जरी त्यामध्ये राहू शकली किंवा व्यक्तीने स्वतःला सातत्यपूर्वक त्या चेतनेप्रत खुले ठेवले, तर जीवनातील धक्क्यांमधून सुरक्षितरित्या बाहेर पडण्यासाठी आध्यात्मिक प्रकाश, शांती, सामर्थ्य आणि आनंद या गोष्टी पुरेशा प्रमाणात तिला प्राप्त होतात.
या आध्यात्मिक चेतनेला खुले झाल्याचा परिणाम म्हणून त्या व्यक्तीला काय प्राप्त होणार आहे हे, ती व्यक्ती कशाचा शोध घेत आहे, यावर अवलंबून असते. व्यक्ती जर शांतीच्या शोधात असेल तर तिला शांती लाभते; व्यक्तीला जर प्रकाश वा ज्ञान हवे असेल तर ती महान प्रकाशामध्ये जीवन जगू लागते आणि सामान्य माणसाचे मन मिळवू शकेल त्यापेक्षा कितीतरी अधिक सखोल व अधिक सत्य ज्ञान तिला प्राप्त होते. व्यक्ती जर शक्ती वा सामर्थ्य मिळवू इच्छित असेल तर व्यक्तीला आंतरिक जीवनासाठी आध्यात्मिक सामर्थ्य किंवा बाह्य कार्य व कृती यांचे नियमन करणारी योग-शक्ती प्राप्त होते. व्यक्तीला जर आनंद हवा असेल तर, सामान्य मानवी जीवन देऊ शकते अशा हर्ष व आनंदापेक्षा कितीतरी अधिक महान अशा परमानंदामध्ये ती व्यक्ती प्रविष्ट होते. (उत्तरार्ध उद्या…)
– श्रीअरविंद (CWSA 36 : 440-441)
तुमच्या जीवनाचे ध्येय आणि तुमचे उद्दिष्ट कधीही विसरू नका. त्या परमशोधाची इच्छा ही नेहमीच…
(अंतरात्म्याचा आवाज कसा असतो, आणि मन व प्राण यांचे आवाज कसे असतात, हे आपण…
(मन आणि प्राण यांच्या गडबडगोंधळामुळे अंतरात्म्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येत नाही, यासंबंधी आपण…
(अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह…
(श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास…
चैत्य पुरुषाचा साक्षात्कार व त्याच्याबद्दलची जागृती येणे आणि तो अग्रभागी येणे या गोष्टी मुख्यतः…