(अंतराम्याला झालेले ज्ञान हेच खरे ज्ञान असते आणि उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह आणि मतमतांतरं असतात; असे श्रीअरविंद यांनी का म्हटले आहे ते श्रीमाताजी येथे स्पष्ट करून सांगत आहेत. मागील भागावरून पुढे…)

तुम्हाला जी गोष्ट ज्ञात आहे असे तुम्हाला वाटते; जे जे काही तुम्ही शिकलेले असता; वैयक्तिक निरीक्षण, अनुमान, तुलना इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून तुमच्या जीवनात जे ज्ञान तुम्हाला झालेले असते ते सर्व ज्ञान हे अगदीच सापेक्ष (relative knowledge) असते आणि त्या आधारावर तुम्ही जीवनाचा टिकाऊ आणि खराखुरा मार्ग आखू शकत नाही याची तुम्हाला जाणीव करून देणे, हा आत्ता आपण श्रीअरविंद लिखित जे वचन विचारात घेतले त्याचा मथितार्थ आहे. किती तरी वेळा आम्ही ही गोष्ट पुन्हापुन्हा सांगितली आहे की, मनाकडून जे जे येते ते पूर्णपणे सापेक्ष असते.

मन जितके अधिक शिक्षित असेल आणि त्याने जर विविध विद्याशाखांचा अभ्यास केलेला असेल तेवढ्या अधिक प्रमाणात, ‘त्याचे म्हणणेच कसे सत्य आहे किंवा त्याने जे काही मांडले आहे तेच कसे सत्य आहे,’ हे सिद्ध करण्यात ते अधिक यशस्वी होते. व्यक्ती कोणतीही गोष्ट तर्कबुद्धीच्या साहाय्याने खरी असल्याचे सिद्ध करू शकते; परंतु त्यामुळे ती गोष्ट काही सत्य ठरत नाही. तर ती गोष्ट कायमच एक मत, एक पूर्वग्रह किंवा ज्या गोष्टी मुळातच शंकास्पद असतात अशा वरकरणी गोष्टींवर आधारित असलेली माहिती असते.

आणि त्यामुळे केवळ एकच मार्ग शिल्लक राहतो असे दिसते आणि तो मार्ग म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या अंतरात्म्याचा शोध घेण्यास सुरुवात करायची आणि त्याचा शोध घ्यायचा. तो तेथेच असतो, तो स्वतःला तुमच्यापासून दडवून ठेवत नाही किंवा गोष्टी अधिक अवघड व्हाव्यात म्हणून तो तुम्हाला खेळवत ठेवत नाही. उलट, तुम्ही त्याला शोधून काढावे, त्याचे म्हणणे तुमच्या कानी पडावे यासाठी मदत करण्याचा तो खूप प्रयत्न करतो. पण तुमचा आत्मा आणि तुमची सक्रिय चेतना यांच्यामध्ये लुडबूड करणारी दोन अंग असतात आणि त्यांना खूप आरडाओरड, गलका करण्याची सवय असते. आणि ही दोन अंग म्हणजे तुमचे मन व तुमचा प्राण. मन आणि प्राण खूप गलका करत असल्यामुळे आणि अंतरात्मा तसे करत नसल्यामुळे, किंबहुना, तो अतिशय सौम्य आवाजात त्याचे म्हणणे मांडत असल्यामुळे, मनाच्या व प्राणाच्या गलक्यामध्ये अंतरात्म्याचे म्हणणे तुमच्या कानी पडत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 10 : 24)

 

(श्रीअरविंद यांनी वेळोवेळी काही वचने लिहिली आहेत. त्यामध्ये खोलवर अर्थ भरलेला असल्याने ती समजण्यास काहीशी अवघड आहेत. श्रीमाताजींनी त्यातील अर्थ उलगडून दाखवला आहे. असे एक वचन आज विचारार्थ घेतले आहे. त्यावरील विवेचन विस्तृत असल्यामुळे ते क्रमश: देत आहोत…)

श्रीअरविंद लिखित वचन : अंतरात्मा जे पाहतो आणि अनुभवतो तेवढेच तो जाणतो. उर्वरित सर्व गोष्टी म्हणजे दिखावा, पूर्वग्रह आणि मतमतांतरं असतात.

श्रीमाताजींचे भाष्य : वरील वचनामधून असा अर्थ ध्वनीत होतो की, ज्या ज्ञानाची निष्पत्ती आत्मदृष्टीतून किंवा आत्मानुभवातून झालेली नसते त्या ज्ञानाला खरे मोल नसते. पण मग त्यातूनच एक प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो, किंबहुना मला हा प्रश्न विचारण्यातदेखील आलेला आहे. “अंतरात्मा काय पाहतो हे आम्हाला कसे कळेल?” अर्थातच त्याचे एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे तुम्ही तुमच्या अंतरात्म्याविषयी सचेत झाले पाहिजे. व्यक्ती जोपर्यंत आत्म्याविषयी सचेत होत नाही तोपर्यंत तिला खरे ज्ञान प्राप्त होत नाही. येथे हे वचन खऱ्या अर्थाने पूर्ण होते.

त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या अंतरात्म्याचा शोध घेणे, त्याच्याशी एकत्व पावणे आणि त्याला तुमच्या जीवनाचे संचालन करून देणे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. काही जणं मला असे विचारतात की, “तो अंतरात्मा आहे हे आम्हाला कसे कळेल?” मी या प्रश्नाचे आजवर अनेकदा उत्तर दिले आहे. हे जे कोणी प्रश्न विचारणारे आहेत, त्यांच्या या प्रश्नावरूनच सिद्ध होते की, ते त्यांच्या आत्म्याविषयी सचेत झालेले नाहीयेत. कारण ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आत्म्याविषयी सचेत होता आणि त्याच्याशी एकत्व पावता, त्याच क्षणी तुम्हाला त्याचे सकारात्मक ज्ञान होते आणि मग तुम्ही ‘त्याला कसे जाणावे’ हा प्रश्न विचारत नाही.

त्या अनुभवाची नक्कल करता येत नाही किंवा त्याची कल्पनादेखील करता येत नाही. तुम्ही तुमच्या आत्म्याच्या संपर्कात आहात असे सोंगदेखील तुम्ही करू शकत नाही; कारण ती अशी गोष्ट आहे की ज्याची कल्पना किंवा नक्कल करता येत नाही. जेव्हा आत्म्याद्वारे तुमच्या जीवनाचे संचालन होऊ लागते तेव्हा त्याची तुम्हाला पूर्ण शाश्वती असते आणि मग तुम्ही असे प्रश्न विचारत नाही. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 10 : 23-24)

 

 

चैत्य पुरुषाचा साक्षात्कार व त्याच्याबद्दलची जागृती येणे आणि तो अग्रभागी येणे या गोष्टी मुख्यतः व्यक्ती, ईश्वराबरोबरचे वैयक्तिक नाते किती प्रमाणात विकसित करते यावर अवलंबून असतात. भक्ती, प्रेम, विश्वास, आत्मदान आणि ईश्वरापासून विभक्त करणाऱ्या व स्वत:चेच म्हणणे खरे करू पाहणाऱ्या मानसिक, प्राणिक व शारीरिक अहंकाराच्या आग्रहांना व्यक्तीने दिलेला नकार या सगळ्या गोष्टींमधून तिचे ईश्वराबरोबरचे नाते विकसित होत जाते.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 360)

 

(आंतरात्मिक भक्तीचे स्वरूप प्राणिक व मानसिक भक्तीपेक्षा कसे भिन्न असते ते आपण पाहिले. आज त्याचा उत्तरार्ध…)

चैत्य पुरुष (psychic being) जर पृष्ठभागावर आलेला असेल आणि मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व त्याला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करत आहेत, असे जर त्याला आढळले तर त्याला खेद होतो. विशुद्धतेस धक्का बसल्यामुळे त्याला हा खेद झालेला असतो. जेव्हा मन स्वतःच्या खेळामध्ये मग्न असते किंवा प्राणिक अस्तित्व हे प्राणिक आवेगांबरोबर वाहवत जात असते तेव्हा चैत्य पुरुष म्हणतो, “या गोष्टी मला नको आहेत.” “मी येथे कशासाठी आहे?” “या असल्या गोष्टींसाठी मी येथे आलेलो नाहीये. मी येथे सत्यासाठी आलो आहे.”

आंतरात्मिक खिन्नता ही मानसिक असमाधान किंवा प्राणिक दुःख किंवा शारीरिक नैराश्य यांच्याहून भिन्न असते. आंतरात्मिक अस्तित्व जर सक्षम असेल तर, मानसिक व प्राणिक अस्तित्वाला ते स्वतःची जाणीव करून देते आणि त्यांना परिवर्तन करण्यास भाग पाडते. परंतु ते जर दुर्बल असेल तर, मन व प्राणादी इतर घटक त्याचा फायदा घेतात आणि स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करतात. मात्र काही उदाहरणांबाबत असे आढळते की, ते आंतरात्मिक अस्तित्व पृष्ठभागावर येते आणि मानसिक व प्राणिक अस्तित्वाची घडी विस्कटून टाकते; त्यांच्या सर्व प्रस्थापित रचना, त्यांच्या सवयी मोडून टाकते आणि एका नवीन व दिव्य व्यवस्थेसाठी त्यांच्यावर दबाव टाकते. पण मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व हे आंतरात्मिक अस्तित्वाहून अधिक बलवान असेल तर, आंतरात्मिक अस्तित्वाचा प्रभाव अधूनमधूनच पडतो आणि मग ते हळूच पाठीमागे सरकते. अशावेळी त्याचा आक्रोश म्हणजे अरण्यरुदन ठरते आणि मानसिक किंवा प्राणिक अस्तित्वं स्वतःच्या चक्रामध्ये गोलगोल फिरत राहतात.

सरतेशेवटी मात्र, चैत्य पुरुष या वरकरणी गोष्टींमुळे स्वतःची फसवणूक करून घेण्यास नकार देतो. तो आता खोटेपणाच्या फशी पडत नाही. मिथ्यत्वाद्वारे दबले जाण्यास तो आता नकार देतो; त्याचबरोबर तो सत्याची अतिशयोक्तीपण करत नाही. उदाहरणार्थ, त्याच्या अवतीभोवतीचा प्रत्येक जण जरी “ईश्वर अस्तित्वात नाही,” असे त्याला सांगत असला तरी चैत्य पुरुष त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवण्यास नकार देतो. तो म्हणतो, “सत्य काय आहे ते मला माहीत आहे,” “मला माहीत आहे कारण मला त्याची जाण आहे.” आणि त्याला वरकरणी दृश्यांच्या पाठीमागे असलेल्या गोष्टीची जाण असल्यामुळे आता बाह्य दृश्यांमुळे त्याची फसवणूक होऊ शकत नाही. पाठीमागच्या शक्तीची त्याला चटकन जाणीव होते.

तुमच्यामध्ये चैत्य पुरुष जेव्हा जागृत झालेला असतो तेव्हा, भावनिक अस्तित्वामधील साऱ्या हीणकस गोष्टी तो फेकून देतो आणि तो त्यास भावविवशतेपासून किंवा अतिभावनाशीलतेच्या कनिष्ठ खेळापासून मुक्त करतो. मात्र त्यामुळे त्याच्यामध्ये मनाची शुष्कता येत नाही किंवा प्राणिक भावभावनांचा अतिरेक निर्माण होत नाही. तो प्रत्येक भावनेस यथोचित न्याय देतो.

– श्रीअरविंद (CWSA 36 : 380-381)

(श्रीअरविंद यांनी एका साधकाला लिहिलेल्या पत्रामधून…)

चैत्य पुरुष (psychic being) जेव्हा जागृत होतो तेव्हा तुम्ही तुमच्या आत्म्याविषयी (Self) सचेत होता, तेव्हा तुम्हाला तुमच्या आत्म्याचे ज्ञान होते. आणि मग, मानसिक किंवा प्राणिक अस्तित्व म्हणजे आपण आहोत, असे समजण्याची चूक तुम्ही करत नाही. किंवा ती अस्तित्वं म्हणजेच आत्मा, असे समजण्याची चूक तुम्ही करत नाही.

चैत्य पुरुषाविषयी जागृती आल्यावर, ईश्वराविषयी किंवा गुरूविषयी खरी भक्ती उदयाला येते. या भक्तीचे स्वरूप मानसिक किंवा प्राणिक भक्तीपेक्षा वेगळे असते. तुमच्या मनात, गुरूंच्या बौद्धिक किंवा आध्यात्मिक महानतेविषयी प्रचंड आदर असू शकतो किंवा जाण असू शकते; तसे असेल तर गुरूंचे अनुसरण करा आणि मानसिकदृष्ट्या त्यांच्या आज्ञांचे पालन करा. परंतु ही गोष्ट जर निव्वळ मानसिक असेल तर, त्यायोगे तुमची फार प्रगती होईल असे नाही. अर्थात, तसे करण्यात (मानसिकरितीने अनुसरण करण्यात) काही गैर आहे असे नाही. पण फक्त तेवढे केल्यामुळे तुमचे समग्र आंतरिक अस्तित्व (inner being) खुले होत नाही, तर त्यामधून तुमचा ईश्वराशी फारफार तर मानसिक संपर्क निर्माण होतो.

प्राणिक भक्ती (vital Bhakti) एका पाठोपाठ एक मागण्या करतच राहते. ती तिच्या स्वतःच्या अटी ईश्वरावर लादत असते. अशा भक्तीमध्ये भक्त स्वत:ला समर्पित करतो; पण तो ईश्वरावर काही अटी लादतो. अशी भक्ती असलेला भक्त ईश्वराला म्हणतो, “तू किती महान आहेस,” “मी तुझी पूजा करतो,” “आणि आता माझी अमुक एक इच्छा किंवा माझी अमुक एक आकांक्षा तू पूर्ण केलीच पाहिजेस.” “मला महान बनव, मला थोर साधक, एक महान योगी बनव,” इत्यादी.

अ-दिप्त मनसुद्धा (unillumined mind) सत्याप्रत समर्पित होते पण ते देखील स्वतःच्या अटी लादते. असे मन सत्याला म्हणते, “माझा निर्णय, माझे मतच बरोबर आहे, असे तू मान्य कर.” मनाने ज्या रचना तयार केलेल्या असतात, त्या साच्यामध्येच सत्याने स्वतःला सामावून घ्यावे अशी त्याची अपेक्षा असते.

सत्याने माझ्या शक्तीच्या प्राणिक गतिविधींमध्ये स्वतःला झोकून द्यावे, अशी प्राणिक अस्तित्वाची देखील सत्याकडून अपेक्षा असते. प्राणिक अस्तित्व उच्चतर शक्तीस आणि गुरूच्या प्राणिक अस्तित्वासदेखील खेचत राहते. मानसिक आणि प्राणिक ही दोन्ही अस्तित्वं समर्पित होताना, हातचे काही राखून समर्पित होतात.

मात्र आंतरात्मिक भक्ती (Psychic Bhakti) तशी नसते. ती (मन व प्राण यांच्या) पाठीमागे असणाऱ्या दिव्यत्वाच्या संपर्कात असल्यामुळे, तिला खरी भक्ती करणे शक्य असते. आंतरात्मिक भक्ती कोणतीही मागणी करत नाही किंवा ती कोणती गोष्ट हातची राखूनदेखील ठेवत नाही. (दिव्यत्वाच्या संपर्कात असल्यामुळे,) ती स्वतःच्या अस्तित्वावर समाधानी असते. सत्याचे योग्य प्रकारे पालन कसे करावे, हे चैत्य पुरुषाला ज्ञात असते. चैत्य पुरुष ईश्वर किंवा गुरू यांच्याप्रत खऱ्या अर्थाने समर्पित होतो आणि तो स्वतःचे खऱ्या अर्थाने आत्मदान करत असल्यामुळे, तो ईश्वराकडून किंवा गुरूंकडून खऱ्या अर्थाने काही ग्रहणदेखील करू शकतो. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीअरविंद (CWSA 36 : 379-380)

 

मनुष्याचे पृष्ठस्तरीय हृदय हे पशुहृदयाप्रमाणेच प्राणसुलभ भावनांचे, विकारांचे असते. पशुहृदयाहून मानवी हृदय अधिक विविधतेने विकसित झाले आहे, इतकेच. या हृदयाच्या भावनांवर स्वार्थी विकारांचे, आंधळ्या सहजप्रवृत्तींचे आणि दोषपूर्ण, विकृत, बरेचदा अधोगतीच्या क्षुद्र जीवनप्रेरणांचे वर्चस्व असते. हे हृदय प्राणशक्तीच्या पतित कामनांनी, वासनांनी, क्रोधविकारांनी, क्षुद्र लोभांनी, तीव्र हव्यासांनी, हीन दीन मागण्यांनी वेढलेले आणि अंकित झालेले असते. प्रत्येक छोट्यामोठ्या उर्मींची गुलामी करून ते हिणकस बनलेले असते.

भावनाशील हृदय आणि भुकेलेला संवेदनाधीन प्राण यांच्या भेसळीने मानवामध्ये मिथ्या वासनात्मा (a false soul of desire) निर्माण होतो; हे जे मानवाचे असंस्कृत व भयंकर अंग आहे, त्यावर बुद्धी विश्वास ठेवू शकत नाही आणि म्हणून त्यावर आपले नियंत्रण असावे हे बुद्धीला रास्त वाटते. या असंस्कृत, हटवादी अशा प्राणिक प्रकृतीवर बुद्धी नियंत्रण मिळवू शकते; किंबहुना, ते नियमन करण्यात ती यशस्वीदेखील होते, तरीसुद्धा ही प्राणिक प्रकृती नेहमीच अनिश्चित आणि फसवी राहते.

मानवाचा खरा आत्मा (the true soul) मात्र या पृष्ठस्तरीय हृदयात नसतो, तो प्रकृतीच्या प्रकाशमय गुहेत लपलेल्या खऱ्या अदृश्य हृदयात असतो. या हृदयामध्ये दिव्य ईश्वरी प्रकाशात आपला आत्मा निवास करत असतो; या खोलवर असलेल्या शांत आत्म्याची जाणीव फारच थोड्या लोकांना असते. आत्मा सर्वांच्याच अंतरंगात असतो पण फारच थोड्यांना त्यांचा खरा आत्मा माहीत असतो, फारच थोड्या जणांना त्याच्याकडून थेट प्रेरणा मिळत असल्याचे जाणवते. तेथे म्हणजे आपल्या खोल हृदयात, आपल्या प्रकृतीच्या अंधकारमय पसाऱ्याला आधार देणारी, ईश्वराच्या तेजाची लहानशी ठिणगी असते व तिला केंद्र बनवून, तिच्याभोवती आपला चैत्य पुरुष, साकार आत्मा, आपल्यातील खरा पुरुष वृद्धिंगत होतो.

मनुष्यामधील हा चैत्य पुरुष वृद्धिंगत होऊ लागला आणि हृदय-स्पंदनांमध्ये त्याचे संकेत व प्रेरणा प्रतिबिंबित होऊ लागल्या म्हणजे, मनुष्याला त्याच्या आत्म्याची अधिकाधिक जाणीव होऊ लागते. तेव्हा मग वरच्या दर्जाचा पशू एवढेच त्याचे स्वरूप राहात नाही. स्वत:मधील देवत्वाची झलक प्राप्त झाल्यामुळे तो त्याविषयी सजग होऊ लागतो, सखोल जीवनाकडून व चेतनेकडून येणाऱ्या अंत:सूचना तो अधिकाधिक मान्य करू लागतो; मग दिव्य गोष्टींकडील त्याची प्रवृत्तीही वाढीस लागते.

– श्रीअरविंद (CWSA 23 : 150)

(चैत्य दृष्टिकोनातून माणसापेक्षा एखादे गुलाबाचे फुलदेखील किती चांगले असू शकते ते श्रीमाताजींनी सांगितले, हे आपण बघितले. आज त्याचा उत्तरार्ध पाहू.)

तुम्ही एक जरी पुढचा टप्पा सचेतपणे वर चढून गेलात आणि ते गुलाबाचे फूल जी गोष्ट अजाणतेपणे करते, ते जर तुम्ही सचेतपणे (consciously) केलेत तर, मग ते कितीतरी पटीने अधिक चांगले होईल. खरंतर, कोणताही हिशोब न ठेवता, केवळ अस्तित्वाच्या आनंदासाठी सौंदर्य उमलून येणे ही गोष्ट सहजस्वाभाविक असली पाहिजे. ही गोष्ट फुलाप्रमाणेच माणसामध्येही असली पाहिजे. लहान मुलांमध्ये कधीकधी ही गोष्ट आढळून येते. (मात्र कधीकधीच, नेहमी नाही.) दुर्दैवाने, पालकांच्या आणि वातावरणाच्या प्रभावामुळे मुलं अगदी लहान असतानाच स्वार्थीपणा शिकतात.

परंतु आपल्यापाशी जे आहे किंवा आपण जे काही केले आहे त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी मिळावे अशी इच्छा बाळगणे, ही जगातील सर्वांत वाईट गोष्ट आहे. आणि तीच गोष्ट आता अत्यंत सार्वत्रिक झाली आहे. ती आता इतकी सार्वत्रिक झाली आहे की, माणसाचा तो जणू सहजस्वभावच बनला आहे. प्रत्येक गोष्टीचा हिशोब मांडण्याच्या आणि त्यातून लाभ मिळवण्याच्या या प्रवृत्तीमुळे व्यक्ती ईश्वरी प्रेमापासून जेवढी दूर जाते तेवढी ती दुसऱ्या कोणत्याच गोष्टीने दूर जात नाही.

फुलांचे उमलणे म्हणजे त्यांच्या प्रेमाचे रूप असते. जेव्हा एखादे गुलाबाचे फूल सूर्याच्या दिशेने उमलते तेव्हा खचितच, ते जणू स्वतःचे सौंदर्य प्रदान करण्याच्या गरजेतून उमलत असते. माणसाच्या आकलनापलीकडचे आहे हे सारे. कारण ती फुलं जे काही करत असतात त्याचा ती विचार करत बसत नाहीत. (तो त्यांचा स्वभावधर्म असतो.)

कृती करत असताना स्वतःकडे पाहण्याची म्हणजे, स्वतःचा विचार करण्याची जी वृत्ती (स्वत:चा स्वार्थ साधण्याची) माणसामध्ये आहे ती वृत्ती, तो नेहमी सर्वत्रच उपयोगात आणत असतो. माणसाला माहीत असते की, तो काहीतरी करत आहे. पण प्राणी मात्र तसा विचार करत बसत नाहीत. त्यामुळे त्यांचे प्रेम हे माणसाच्या प्रेमासारखे नसते. आणि फुलांबाबत बोलायचे झाले तर ती त्याबाबतीत सचेत नसतात. स्वतःच्या चेतनेविषयी सचेत होण्यासाठी लागणारी चेतना त्यांच्यामध्ये नसते; तर ती एक सहजस्फूर्त, स्वाभाविक प्रक्रिया असते. पण त्या सर्वांमध्ये एक महान शक्ती, महान वैश्विक चेतना आणि वैश्विक प्रेमाची महान शक्ती कार्यरत असते आणि त्यामुळेच या साऱ्या गोष्टी सौंदर्यपूर्णतेने बहरून येतात.

– श्रीमाताजी (CWM 05 : 241)

आंतरात्मिक चेतनेच्या अनेकविध सुंदर रूपांमधील नि:स्वार्थी, निरपेक्ष कृती हे या जगातील एक सर्वोत्तम रूप आहे. परंतु, मानसिक क्रियाकलापांच्या श्रेणीत आपण जसजसे वरवर जाऊ लागतो तसतशी ही निरपेक्ष कृती दुर्मिळ होऊ लागल्याचे आढळते. कारण बुद्धी आली की त्या बुद्धीच्या बरोबरीने सर्व चलाखी, अक्कलहुशारी, भ्रष्टपणा, हिशोबीपणा यांची सुरुवात होते.

उदाहरणार्थ असे पाहा की, जेव्हा एखादे गुलाबाचे फूल उमलते तेव्हा ते अगदी सहज-स्वाभाविकपणे उमलते. सुंदर असण्याच्या आनंदासाठी, आल्हाददायक सुगंध देण्यासाठी, जीवनाचा आनंद अभिव्यक्त करण्यासाठी ते उमलते. ते कोणत्याही लाभ-हानीचा विचार करत नाही, त्याला त्यामधून काही मिळवायचे नसते. ते अगदी सहजस्फूर्तपणे, अस्तित्वाच्या आणि जीवनाच्या आनंदाने बहरून येत असते.

आता माणसाचा विचार करू. काही थोडे अपवाद वगळता, ज्या क्षणी माणसाचे मन सक्रिय होते त्या क्षणापासून तो त्याच्यातील त्या सौंदर्यापासून आणि हुशारीपासून काही लाभ मिळवू पाहतो; त्यातून काहीतरी मिळावे अशी त्याची अपेक्षा असते, लोकांकडून स्तुती किंवा कौतुक किंवा त्यापेक्षाही जास्त असा काहीतरी लाभ व्हावा अशी त्याची अपेक्षा असते. परिणामतः चैत्य दृष्टिकोनातून (psychic point of view) पाहिले असता, गुलाबाचे फूल हे माणसापेक्षा अधिक चांगले असते. (उत्तरार्ध उद्या…)

– श्रीमाताजी (CWM 05 : 240)

‘सातत्यपूर्ण व प्रामाणिक अभीप्सा आणि फक्त ईश्वराप्रति अभिमुख होण्याची इच्छा या गोष्टी म्हणजे चैत्य पुरुष (psychic being) अग्रभागी आणण्याची सर्वोत्तम साधने आहेत,’ हे श्रीअरविंदांचे वचन लक्षात घ्या.

जेव्हा तुम्ही मोकळे असाल आणि इतर कोणतीही व्यवधाने नसतील अशी दिवसातील कोणतीही एक वेळ निश्चित करा. शांतपणे बसा आणि चैत्य पुरुषाच्या संपर्कात येण्याची तळमळ, अभीप्सा (aspiration) उरी बाळगून चैत्य पुरुषाचा ध्यास घ्या. त्यामध्ये तुम्हाला लगेच यश आले नाही तरी नाउमेद होऊ नका, एक ना एक दिवस तुम्हाला यश मिळेलच, याची खात्री बाळगा.

– श्रीमाताजी (CWM 17 : 363)

मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही) तर ते तितकेसे जबाबदारीने वागत नाही. बरेचदा ते प्रकृतीच्या शक्तींच्या हातातले बाहुले बनलेले असते. मात्र आपले आंतरिक किंवा उच्चतर अस्तित्व, आपली सखोल चेतना ही आपल्या नियतीची स्वामिनी असते; ती आपली नियती घडवत असते. आणि म्हणूनच या सार्वभौम चेतनेचा शोध घेणे आणि जीवनातील सर्व विसंवाद, प्रकृतीमधील सर्व संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तिच्याशी एकत्व पावणे अत्यंत महत्त्वाचे असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 335)