मनुष्याचे बाह्य अस्तित्व, जसे आहे तसेच राहू दिले (म्हणजे त्यास आंतरिक अस्तित्वाच्या नियंत्रणाखाली आणले नाही) तर ते तितकेसे जबाबदारीने वागत नाही. बरेचदा ते प्रकृतीच्या शक्तींच्या हातातले बाहुले बनलेले असते. मात्र आपले आंतरिक किंवा उच्चतर अस्तित्व, आपली सखोल चेतना ही आपल्या नियतीची स्वामिनी असते; ती आपली नियती घडवत असते. आणि म्हणूनच या सार्वभौम चेतनेचा शोध घेणे आणि जीवनातील सर्व विसंवाद, प्रकृतीमधील सर्व संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी तिच्याशी एकत्व पावणे अत्यंत महत्त्वाचे असते.

– श्रीमाताजी (CWM 14 : 335)

 

पूर्णयोगासाठी व्यक्तीची तयारी असणे याचा मला अभिप्रेत असलेला अर्थ ‘पूर्णयोगाची क्षमता असणे’ असा नसून ‘पूर्णयोगाचे अनुसरण करावे अशी व्यक्तीला इच्छा असणे’ असा आहे. सर्व अडचणींना तोंड देत, त्यावर मात करण्याची आंतरिक इच्छा व्यक्तीकडे असेल, तर पूर्णयोगाच्या मार्गाचा अवलंब करता येईल; मग त्यासाठी किती काळ लागतो हे तितकेसे महत्त्वाचे नाही.

*

सामान्य जीवनाबद्दल फक्त अस्वस्थ करणारे असमाधान असणे एवढीच तयारी पूर्णयोगासाठी पुरेशी नाही. अध्यात्मजीवनात यश मिळण्यासाठी नि:संदिग्ध आंतरिक हाक, दृढ संकल्प आणि अत्यंत स्थिरता यांची आवश्यकता असते.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 27-28)

 

तुम्ही तुमचे जीवन इतर कोणत्याही गोष्टीसाठी नव्हे तर, ‘दिव्य-सत्या’चा शोध घेण्याची आणि त्या ‘सत्या’चे मूर्त स्वरूप बनण्याची अभीप्सा बाळगून ते पूर्णतया निष्ठापूर्वक अर्पित करावे, ही पूर्णयोगाची मागणी आहे. एकीकडे ईश्वर आणि दुसरीकडे ज्या गोष्टीचा त्या दिव्य सत्याच्या शोधनाशी काहीही संबंध नाही असे एखादे बाह्य कर्म व ध्येय अशा दोन भिन्न गोष्टींमध्ये तुमच्या जीवनाची विभागणी करणे, याला येथे मान्यता नाही. अशा प्रकारे केलेल्या अगदी छोट्याशा कृतीमुळेदेखील या योगामध्ये यश मिळणे अशक्य होईल.

तुम्ही तुमच्या अंतरंगामध्ये प्रवेश केला पाहिजे आणि आध्यात्मिक जीवनाला पूर्णपणे निष्ठापूर्वक वाहून घेतले पाहिजे. या योगामध्ये यश मिळावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर, मानसिक अग्रक्रमांबाबत असलेला तुमचा हेका नाहीसा झाला पाहिजे; प्राणिक आवडीनिवडी, आसक्ती यांबाबतचा आग्रह दूर केलाच पाहिजे; कुटुंब, मित्रपरिवार, देश यांच्याबद्दल असणारी अहंभावात्मक आसक्तीदेखील नाहीशी झालीच पाहिजे. बाहेर पडणारी ऊर्जा असेल किंवा जी कोणती कृती असेल, या सर्व गोष्टी, त्या गवसलेल्या सत्यामधूनच उगम पावल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्यातरी कनिष्ठ मानसिक किंवा प्राणिक प्रेरणांमधून उत्पन्न झालेल्या असता कामा नयेत; त्या कोणत्याही वैयक्तिक आवडीनिवडीतून किंवा अहंभावात्मक अग्रक्रमातून नव्हे तर, ईश्वरी संकल्पामधून उगम पावल्या पाहिजेत.

– श्रीअरविंद (CWSA 29 : 15)

अभीप्सा ही बहुधा नेहमीच चैत्य पुरुषाची (psychic being) अभिव्यक्ती असते. चैत्य पुरुष म्हणजे आपल्यातील असा एक भाग की, जो दिव्य केंद्राभोवती सुरचित झालेला असतो; मानवी अस्तित्वाच्या अंतरंगात खोलवर असणारी ती एक छोटीशी दिव्यज्योती असते. ही दिव्य ज्योत प्रत्येक माणसामध्ये असते आणि तिच्याभोवती सर्व जन्मांमधून, कर्मांमधून, हळूहळू एक अस्तित्व आकाराला येऊ लागते, त्या अस्तित्वालाच मिस्टर तेआँ (श्रीमाताजींचे गूढविद्येच्या अभ्यासाचे पहिले प्रशिक्षक) ‘psychic being’ असे संबोधत असत. आणि जेव्हा हा चैत्य पुरुष विकसित अवस्थेला येऊन पोहोचतो तेव्हा चैत्य पुरुष म्हणजे जणू एक प्रकारे, आत्म्याचे शारीरिक किंवा व्यक्तिगत वस्त्र बनते.

आत्मा हा परमेश्वराचा अंश असतो; तर व्यक्तिगत रूपामध्ये जीव हा सर्वोच्च, परम असतो. आणि परमेश्वर एकच असल्याने, जीव सुद्धा एकच आहे पण त्याची व्यक्तिगणिक रूपं मात्र अगणित असतात.

अपरिवर्तनीय, शाश्वत आणि अनंत (शक्यतांच्या बाबतीत अनंत) अशा दिव्य ज्योतीच्या रूपात या जिवाची सुरुवात झालेली असते. अनेक जन्मांमधून, जे काही प्राप्त झालेले असते आणि दिव्य प्रभावाला जो काही प्रतिसाद दिला गेलेला असतो असे सर्वकाही जिवाभोवती क्रमाक्रमाने घनीभूत होत जाते, त्यातून ते अधिकाधिक सचेत आणि अधिकाधिक सुरचित, सुघटित होऊ लागते. अंतिमत: स्वत:चा स्वामी असणारे आणि फक्त ईश्वरी संकल्पानुसारच वागणारे पूर्णपणे सचेत असे व्यक्तिगत अस्तित्व तयार होते. म्हणजे असे म्हणता येईल की, परमेश्वराचे ते एक व्यक्तिभूत झालेले रूप असते. त्यालाच आपण ‘चैत्य पुरुष’ असे म्हणतो.

– श्रीमाताजी (Conversation with a disciple July 25, 1962)

ईश्वराविषयीची अभीप्सा हीच पहिली आवश्यक गोष्ट आहे. ती असेल तर पुढची आवश्यक गोष्ट म्हणजे, या अभीप्सेचे (हृदयामध्ये) पोषण करायचे; ती सतत सावध, जागृत, व जिवंत ठेवायची. त्यासाठी एकाग्रतेची – ईश्वरावरील एकाग्रतेची आवश्यकता असते. एकाग्रता करताना त्यामध्ये, ईश्वरी संकल्प व उद्दिष्ट यांच्याप्रत समग्रपणे व नि:शेषतया समर्पित होता यावे, हा दृष्टिकोन असणे आवश्यक असते.

हृदयामध्ये लक्ष एकाग्र करा. त्यात प्रवेश करा, तुम्हाला शक्य होईल तेवढे आत खोल खोल, अगदी आत जा. तुमच्या चेतनेचे बाहेर दूरवर पसरलेले सारे धागे एकत्रित करून, ते सारे गुंडाळून घ्या आणि आत खोलवर बुडी मारा, आत खोल… खोल…खोलवर… जा.

तुम्हाला आढळेल की, हृदयाच्या त्या निवांत, प्रशांत गाभाऱ्यामध्ये एक ज्योत तेवत आहे. तेच तुमच्या अंतरीचे ‘ईश्वरत्व,’ तेच तुमचे खरेखुरे अस्तित्व. त्याचा आदेश ऐका, त्याच्या आज्ञेचे अनुसरण करा.

– श्रीमाताजी (CWM 03 : 01)

जर इच्छावासनांना नकार दिला गेला व त्यांनी व्यक्तीच्या विचार, भावभावना, कृती यांच्यावर वर्चस्व गाजवणे बंद केले आणि पूर्ण प्रामाणिकपणे आत्मदान करण्याविषयीची एक स्थिर अभीप्सा व्यक्तीमध्ये उदित झाली तर, कालांतराने चैत्य पुरुष (psychic being) सहसा आपणहूनच खुला होतो.

– श्रीअरविंद (CWSA 30 : 349)

 

आपण प्रथम कोणती गोष्ट केली पाहिजे? तर ती म्हणजे, आपण स्वत:चे अस्तित्व घडवले पाहिजे ; मात्र आपले खरे अस्तित्व आपल्या अंतरंगामध्ये असते. हे सर्वोच्च अस्तित्व असते, ते आपले खरे व दिव्य अस्तित्व असते. ते सक्रिय आणि प्रकट व्हावे यासाठी आपण शरीर, प्राण व मन या आपल्या बाह्यवर्ती ‘स्व’च्या अतीत जाणे आवश्यक असते.

अंतरंगामध्ये राहून जीवन जगल्याने आणि अंतरंगामध्ये वृद्धिंगत होत राहण्याने आपल्याला त्या दिव्य अस्तित्वाचा शोध लागू शकतो. एकदा का तो शोध लागला की, तेथे राहून आध्यात्मिक किंवा दिव्य अशा मन, प्राण, शरीर यांची घडण करणे आणि या साधनांद्वारे ज्यामधून दिव्य जीवनासाठी सुयोग्य असे वातावरण निर्माण होऊ शकेल अशा एका जगापर्यंत जाऊन पोहोचणे हे प्रकृतीच्या शक्तीने आपल्यापुढे ठेवलेले अंतिम उद्दिष्ट आहे. त्यासाठी पहिली आवश्यकता असते ती म्हणजे, प्रत्येक व्यक्तीने आपल्या आत्म्याचा शोध घेतला पाहिजे, आपल्या अंतरंगातील दिव्य सद्वस्तुचा शोध घेतला पाहिजे आणि स्वतःच्या सर्व अस्तित्वाद्वारे जीवनामध्ये त्याची अभिव्यक्ती केली पाहिजे.

• श्रीअरविंद (CWSA 21 : 1059-1060)

 

(उत्तरार्ध…)

बाह्य रूपाकारालाच जखडून राहणे आणि शरीर म्हणजेच ‘मी’ आहे असे समजणे ही व्यक्तीची सामान्य संवेदना असते. ही अशी संवेदना सहसा नेहमीच आढळून येते. शरीराची वास्तविकता हीच व्यक्तीला तिची स्वतःची वास्तविकता वाटत असते.

व्यक्ती जेव्हा आंतरिक प्रगतीसाठी प्रयत्न करते आणि शरीराहूनही अधिक स्थायी असणाऱ्या अशा कोणत्यातरी गोष्टीचा शोध घेण्याचा ती प्रयत्न करते, तेव्हा मग व्यक्तीला युगायुगांपासून चालत आलेल्या आणि अनेक परिवर्तने घडूनदेखील नित्य सचेत असणाऱ्या एका गोष्टीची जाणीव होऊ लागते आणि मग तिला वाटू लागते की, ही गोष्ट म्हणजेच ‘मी’ असणार. परंतु अशी जाणीव होण्यासाठीसुद्धा खूप गहन अभ्यासाची आवश्यकता असते.

अन्यथा “मी अमुक गोष्ट करणार आहे, मला ही गोष्ट गरजेची आहे,” असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा, नेहमीच तो शारीरिक स्तरावरील विचार असतो. त्यावेळी तेथे विविध संवेदना, कमीअधिक गोंधळलेल्या संवेदनांच्या प्रतिक्रिया व त्यांचे मिश्रण असणारी अशी एक प्रकारची इच्छा आणि त्याहूनही अधिक गोंधळलेले विचार या सगळ्याचे मिळून एक कडबोळं तयार झालेले असते. या सर्व गोष्टी आवेग, आकर्षण, इच्छावासना आणि एक प्रकारची इच्छाशक्ती यांनी संचालित व्हायला लागतात आणि काही क्षणांसाठी अप्रत्यक्ष्यरित्या या सर्व गोष्टी म्हणजेच तुमचा ‘मी’ झालेला असतो. कारण डोकं, धड, हातपाय आणि चलनवलन करणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून स्वतंत्र असणाऱ्या ‘मी’चा विचारच तुम्ही कधी करू शकत नाही. कारण या सगळ्या गोष्टींशी तुम्ही खूप घट्टपणे जोडलेले असतात.

मात्र पुष्कळ विचार केल्यानंतर, खूप गोष्टी पाहिल्यानंतर, खूप अभ्यास केल्यानंतर, खूप निरीक्षण केल्यानंतर मग तुम्हाला जाणीव व्हायला लागते की, त्यापैकी एक गोष्ट ही अन्य गोष्टीपेक्षा कमीअधिक प्रमाणात स्वतंत्र आहे आणि त्या गोष्टीच्या पाठीमागे असणारी इच्छाशक्ती, अमुक एखादी कृती करायची की करायची नाही हे ठरवू शकते. आणि तेव्हा मग तुम्ही त्या (अस्थायी) प्रेरणेशी, हालचालीशी, त्या कृतीशी पूर्णपणे समरस होऊ शकत नाही. कारण त्या साऱ्या गोष्टी काहीशा अस्थायी आहेत, याची आता तुम्हाला जाणीव झालेली असते. परंतु हे लक्षात येण्यासाठी, तुम्ही खूप निरीक्षण केले पाहिजे.

आणि त्यानंतरही तुम्ही आणखी निरीक्षण करत राहिले पाहिजे. तेव्हा तुम्हाला असे आढळेल की, तिथे असणारी ही जी दुसरी (अधिक स्थायी) गोष्ट आहे, एक प्रकारची सक्रिय सचेत इच्छाशक्ती म्हणून जी आहे, ती आणखीन एका तिसऱ्याच कोणत्यातरी गोष्टीमुळे संचालित होत आहे. ती या सक्रिय सचेत इच्छाशक्तीचे निरीक्षण करत असते, मूल्यमापन करत असते, निर्णय घेत असते आणि तिचे निर्णय हे ज्ञानाच्या अधिष्ठानावर घेण्याचा ती प्रयत्न करत असते. परंतु हे खूप नंतर घडून येते.

जेव्हा तुम्हाला ही ‘तिसरी गोष्ट’ दिसू लागते, तेव्हा तुमच्या लक्षात येते की, तिच्यामध्ये त्या दुसऱ्या (अधिक स्थायी) गोष्टीला म्हणजे सक्रिय इच्छाशक्तीला चालना देण्याची शक्ती आहे आणि एवढेच नाही तर, क्रियाप्रतिक्रियांवर, भावभावना, संवेदना यांच्यावर तिचे अगदी थेटपणे आणि अतिशय महत्त्वाचे कार्य चालते. तुम्हाला हेदेखील आढळते की, (लक्ष ठेवून असणारी, निरीक्षण करणारी, मूल्यमापन करणारी आणि निर्णय घेणारी ही जी तिसरी गोष्ट आहे) ती सरतेशेवटी अस्तित्वाच्या सर्वच गतिविधींवर नियंत्रण ठेवू शकते.

ही नियंत्रणाची सुरुवात असते. व्यक्ती जेव्हा याबाबत सचेत होते तेव्हा तिला या सर्वाचे मूळ गवसलेले असते. आणि आता जेव्हा व्यक्ती नियंत्रणाबाबत बोलत असते तेव्हा तिला समजू शकते की, “हां, या (तिसऱ्या) गोष्टीकडे नियंत्रणशक्ती आहे.” अशा पद्धतीने व्यक्ती स्वत:चे निरीक्षण करायला शिकते.

• श्रीमाताजी (CWM 09 : 310-311)

तुम्हाला जर आत्म्याचा शोध घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमच्या अंतरंगात खोलवर उतरले पाहिजे. तुम्ही पृष्ठवर्ती चेतनेपासून मागे होऊन, अंतरंगात खोलवर शिरले पाहिजे. मग आत… आत… आत… खोलवर, खूप खोल, एका अतिशय खोल, अचल आणि शांत विवरामध्ये प्रवेश केला पाहिजे. तिथे गेल्यावर तुम्हाला अतिशय अचल व परिपूर्ण, माधुर्यपूर्ण असे आणि एक प्रकारच्या ऊबदार, स्थिरशांत तत्त्वामुळे समृद्ध झालेले असे काहीतरी आढळेल. तो अंतरात्मा असतो.

व्यक्ती जर तसाच प्रयत्न करत राहिली आणि सचेत राहिली तर, तिला एक प्रकारची परिपूर्णता अनुभवास येते आणि त्यामध्ये काहीतरी परिपूर्ण, अगाध खोली असल्याची तिला जाणीव होते. व्यक्तीला असे जाणवते की, तिने जर त्यामध्ये प्रवेश केला तर तिच्यासमोर अनेक रहस्यं प्रकट होतील. काहीतरी शाश्वत असावे आणि त्याचे अतिशय शांत, नितळ पाण्यामध्ये प्रतिबिंब पडलेले असावे तसे हे असते. येथे व्यक्तीला काळाच्या मर्यादेचे बंधन राहात नाही. व्यक्तीने जेव्हा अंतरात्म्याच्या गाभ्याला स्पर्श केलेला असतो तेव्हा, ‘आपण कायमच अस्तित्वात होतो आणि अनंत काळपर्यंत अस्तित्वात राहणार आहोत,’ अशी जाणीव व्यक्तीला होते. आणि हा संपर्क सचेत आणि पुरेसा परिपूर्ण असेल तर, तो तुम्हाला तुमच्या बाह्य रूपाकाराच्या बंधनांतून मुक्त करतो. तुमच्याकडे शरीर आहे म्हणूनच केवळ तुम्ही जिवंत आहात, असे आता तुम्हाला वाटेनासे होते.
(उत्तरार्ध उद्या…)

-श्रीमाताजी (CWM 09 : 310)

सर्व भावभावनांच्या पलीकडे आपल्या अस्तित्वाच्या निःशब्द आणि अक्षोभ गहनतेमध्ये एक प्रकाश सातत्याने उजळलेला असतो, तो आंतरात्मिक चेतनेचा (psychic consciousness) प्रकाश असतो. त्या प्रकाशाचा शोध घ्या, त्यावर लक्ष एकाग्र करा, तो तुमच्या अंतरंगातच असतो.

तुमच्या संकल्प दृढ असेल तर तो प्रकाश तुम्हाला निश्चितपणे गवसेल. ज्या क्षणी तुम्ही त्यामध्ये प्रवेश कराल, त्याच क्षणी तुमच्यामध्ये अमर्त्यतेची जाणीव जागृत होईल. तुम्ही कायमच जीवित होतात, तुम्ही कायम जीवित असणार आहात, हे तुम्हाला जाणवेल. तेव्हा मग तुम्ही शरीरापासून पूर्णपणे स्वतंत्र व्हाल. आत्ता तुम्ही ज्या शरीरामधून आविष्कृत झाला आहात ते शरीर म्हणजे, अनेकानेक क्षणभंगुर आकारांपैकी केवळ एक आकार आहे; आणि तुमचे जागृत अस्तित्व हे आता शरीरावर अवलंबून नाही; हे तुम्हाला जाणवू लागते. आता मृत्यू हा शेवट असत नाही तर, ते केवळ एक संक्रमण असते. मग सगळी भीती क्षणार्धात नाहीशी होते आणि तुम्ही जीवनामध्ये एखाद्या मुक्त मनुष्याप्रमाणे शांतपणे खात्रीपूर्वक मार्गक्रमण करू लागता.

– श्रीमाताजी (CWM 12 : 83-84)