अंतरात्म्याचा आवाज

 

(मन आणि प्राण यांच्या गडबडगोंधळामुळे अंतरात्म्याचा आवाज आपल्याला कसा ऐकू येत नाही, यासंबंधी आपण कालच्या भागात जाणून घेतले. आज त्याचा पुढील भाग…)

तुमच्या अंतरात्म्याला काय ज्ञात आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला आंतरिक प्रयत्न करावे लागतात; तुम्हाला अतिशय दक्ष, सावधचित्त राहावे लागते. आणि खरोखरच, जर तुम्ही असे सावधचित्त राहिलात तर, मन व प्राणाच्या या बाह्य गलक्याच्या पाठीमागे असणारे असे जे काही आहे ते तुम्ही जाणू शकता. अतिशय सूक्ष्म, अतिशय शांत, अतिशय शांतिपूर्ण असा त्याचा आवाज तुम्ही ओळखू शकता. त्याला सारे ज्ञात असते आणि जे काही त्याला ज्ञात असते ते तो तुम्हाला सांगतो. पण इतरांचा (मन व प्राणाचा) जोर अत्यंत अरेरावीचा असतो आणि अंतरात्म्याचा आवाज मात्र खूप शांत, सौम्य असतो. पण जो अधिक बडबड करतो त्याचेच म्हणणे तुम्ही ऐकता आणि त्याच्या नादी लागल्याने तुमची दिशाभूल होते. आणि बरेचदा असे होते की, अंतरात्म्याचा आवाजच बरोबर होता हे, वेळ निघून गेल्यावर तुमच्या लक्षात येते. अंतरात्मा त्याचे म्हणणे तुमच्यावर लादत नाही किंवा त्याचे म्हणणे तुम्ही ऐकलेच पाहिजे अशी सक्तीही तो करत नाही, कारण तो आक्रमक नसतो.

जेव्हा तुमची मनस्थिती द्विधा होते, या किंवा त्या परिस्थितीत काय करावे असा विचार जेव्हा तुम्ही करत असता, तेव्हा मानसिक व प्राणिक असे दोन्ही अग्रक्रम (preference) व इच्छा पुढे येतात आणि ते स्वतःचे घोडे पुढे दामटतात, आग्रह धरतात, हट्ट करतात आणि स्वतःचे म्हणणे तुमच्यावर लादतात; आणि आपलेच म्हणणे कसे योग्य आहे हे जगातल्या उत्तमोत्तम कारणांच्या साहाय्याने तुम्हाला पटवून देतात. तुम्ही जर दक्ष नसाल, तुम्ही कठोर शिस्तीचे पालन करत नसाल, आत्मनियंत्रणाची सवय तुम्हाला नसेल तर सरतेशेवटी त्या इच्छाच कशा बरोबर आहेत, हे मन व प्राण तुम्हाला पटवून देतात. मी मगाशी म्हटले त्याप्रमाणे, त्या इच्छावासनांचा गलका एवढा मोठा असतो की, “अरे, असे करू नकोस,” असे सूचित करणारा, आत्म्याचा अगदी शांत, छोटासा आवाज तुमच्या कानीसुद्धा पडत नाही. “अरे, असे करू नकोस,” हे सांगणारा हा आवाज खरंतर अनेकदा येत असतो, पण त्याच्यामध्ये काही अर्थ नाही असे समजून, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता आणि तुम्ही तुमच्या आवेगात्मक नियतीचे अनुसरण करता. (क्रमश:)

– श्रीमाताजी (CWM 10 : 24-25)

(सौजन्य : @AbhipsaMarathiMasik – अभीप्सा मराठी मासिक)

आपल्या auromarathi.org या वेबसाईटला आणि AuroMarathi या युट्यूब चॅनलला जरूर भेट द्या आणि सबस्क्राईब करा.

श्रीमाताजी
Latest posts by श्रीमाताजी (see all)