ॐ आनंदमयि चैतन्यमयि सत्यमयि परमे

योग आणि मानवी नातेसंबंध – २१

एक प्रकारच्या आत्मीयतेच्या, सहमतीच्या भावनेने एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीबरोबर जोडली जाते किंवा त्यामुळे माणसं एकमेकांकडे आकर्षित होतात किंवा एखाद्या व्यक्तीच्या स्वतःच्या प्रकृतीमधील एखाद्या घटकाचे व दुसऱ्या व्यक्तीच्या एखाद्या घटकाचे परस्परांमध्ये आकर्षण असते आणि त्यामुळे दोन व्यक्ती परस्परांशी जोडल्या जातात. सुरुवातीला व्यक्तीला हे फक्त जाणवते; दुसऱ्या व्यक्तीच्या प्रकृतीमधील जे काही सुखद आहे किंवा चांगले आहे ते व्यक्तीला दिसते, तिचे गुण दिसतात; आणि कधीकधी तर त्या व्यक्तीमध्ये नसलेले गुणही दिसतात; किंवा तिला जेवढे ते वाटत असतात तेवढे ते प्रत्यक्षात नसतात. परंतु नंतर मात्र अति-परिचयामुळे, प्रकृतीमधील ज्या घटकांविषयी आत्मीयता नसते असे इतर घटकदेखील जाणवू लागतात. कधीकधी कल्पनांमध्ये संघर्ष असतो किंवा परस्परविरोधी भावना असतात किंवा कधी कधी दोघांच्या अहंकारांमध्ये संघर्ष असतो. शाश्वत गाढ प्रेम किंवा घट्ट मैत्री असेल तर मात्र परस्परसंबंधांतील या अडचणींवर मात करता येते आणि दोघांमध्ये सुसंवाद किंवा सामंजस्य निर्माण होते; पण बहुधा हे असे असत नाही किंवा परस्परांमधील मतभेद इतके विकोपाला गेलेले असतात की, या सामंजस्याच्या वृत्तीला छेद बसतो किंवा कधीकधी अहंकार इतका दुखावला जातो की, त्यामुळे ती सामंजस्याची वृत्ती संकोच पावते. आणि मग अशा वेळी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे अधिकच काटेकोरपणे निरीक्षण करू लागण्याची शक्यता असते आणि दुसऱ्याचे दोष अतिरंजित करण्याची किंवा वस्तुतः दुसरी व्यक्ती दुराचारी नसली वा वाईट चारित्र्याची नसली तरीही तिच्यावर तसे दोषारोप करण्याची शक्यता असते; पूर्ण दृष्टिकोनच बदलून जाण्याची शक्यता असते, सद्भावना या दुर्भावनांमध्ये, दुरावलेपणामध्ये, कधीकधी तर शत्रुत्वामध्ये किंवा हाडवैरामध्येसुद्धा बदलण्याची शक्यता असते. मानवी जीवनात हे नेहमीच घडत असते. याच्या अगदी उलटदेखील घडते, परंतु ते मात्र इतक्या सहजासहजी घडत नाही. म्हणजे वाईट भावनांचे परिवर्तन सद्भावनांमध्ये, किंवा विरोधाचे रूपांतर सुसंवादामध्ये होणे मात्र इतक्या सहजपणाने घडत नाही. अर्थात दुसऱ्या व्यक्तीबद्दलचे वाईट मत किंवा वाईट भावना ही काही या एकाच कारणामुळे निर्माण होते असे नाही. स्वाभाविक तिरस्कार, मत्सर, परस्परांच्या आड येणारे हितसंबंध इ. अनेक कारणांमुळे हे घडून येते.

व्यक्तीने इतरांकडे शांत-स्थिर भावाने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे; गुण वा दोष यांपैकी कशावरच अतिरिक्त भर देता कामा नये; कोणतीही वाईट भावना नको किंवा कोणता गैरसमज नको वा अन्याय नको; तर एका स्थिर मनाने आणि दृष्टीने बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

– श्रीअरविंद
(CWSA 31 : 299-300)

श्रीअरविंद

श्री अरविंद यांची विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ती प्रामुख्याने इंग्रजी व बंगाली भाषेत आहे, त्याचा मराठी अनुवाद येथे करण्यात आला आहे.

Recent Posts

स्वत:ला न फसविणे अवघड

  व्यक्ती जेव्हा प्रामाणिक असते तेव्हा तिला स्वत:च्या चुका कळतात. स्वतःच्या चुकांची जाणीव नसणे, ही…

5 hours ago

प्रामाणिकपणा आणि स्व-समर्थन

  आपण ईश्वराला फसवू शकत नाही हे व्यक्तीला कळत असते, माहीत असते. अत्यंत हुशार असा…

1 day ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०४

  (भाग ०४) व्यक्तीच्या अवस्थेनुसार किंवा व्यक्तीमधील विविध घटकांनुसार अप्रामाणिकपणाचे विविध प्रकार असतात, हे खरं…

2 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०३

  (भाग ०३) अप्रामाणिकपणाच्या ज्या मूढतापूर्ण गोष्टी असतात त्या प्रत्येकाला माहीत असतात आणि मला वाटते…

3 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०२

  भाग ०२ (व्यक्तीमध्ये जोपर्यंत पसंती-नापसंती अशी द्वंद्वे शिल्लक असतात तोपर्यंत व्यक्ती खऱ्या अर्थाने प्रामाणिक…

4 days ago

द्वंद्वात्मकता आणि संपूर्ण प्रामाणिकपणा – भाग ०१

  साधक : संपूर्णतया प्रामाणिक असणे मनुष्यमात्राला शक्य आहे का? प्रामाणिकपणामध्ये मानसिक प्रामाणिकपणा, प्राणिक प्रामाणिकपणा,…

5 days ago